थांबला तो जिंकला!
थांबला तो जिंकला!
थांबला तो संपला! असं आम्ही एकमेकाला प्रेरित करण्यासाठी म्हणायचो ....आज मात्र आम्ही म्हणतोय थांबला तू जिंकला!!
कोरोना विषाणू प्रादुर्भाव यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे किंबहुना संपूर्ण विश्व या कोरोना विषाणूच्या वेढ्यात अडकले आहे. वृत्तवाहिनी, आकाशवाणी, वृत्तपत्रे व सर्व समाज माध्यमांमध्ये फक्त आणि फक्त कोरोना विषाणूच्या संदर्भात लिहिले बोलले व सांगितले जात आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती भविष्याबाबत चिंताग्रस्त झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्यकर्ते चांगले निर्णय घेताना दिसत आहेत जागतिक पातळीवर चांगला समन्वय घडवून येतो आहे.
लॉकडाऊनचा... पहिला दिवस म्हणजे मराठी नववर्ष दिन अर्थात गुढीपाडवा... दरवर्षीप्रमाणे हा गुढीपाडवा नक्कीच नाही याची जाणीव सकाळपासून होत होती परंतु कोरोना विषाणूविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबीयांनी घराबाहेर जाण्याचे टाळले. प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या संस्कृतीप्रमाणे घरी गुढी उभारली सर्वांनी गुढीची पूजा करून हे संकट लवकर दूर होण्यासाठी प्रार्थना केली. घरातील आवरसावर सुरू होतीच.
मराठी नववर्ष दिन याबरोबरच एक विशेष योग म्हणजे चिरंजीव राज याचा आज वाढदिवस आहे... नियमितपणे क्रिकेट खेळाचा सराव करणारा राज आज लॉकडाऊनमुळे घरीच आहे... त्याला क्रिकेटचा सराव करता येत नाही याचे वाईट वाटत होते. क्रिकेट खेळता येत नाही म्हणून नाराज न होता त्याने बुद्धिबळाचा पट मांडला आणि सुरु झाला एक नवीन खेळ अर्थात बुद्धिबळ...
त्याला बुद्धिबळ का म्हणतात हे खेळताना समजायला लागते... कुटुंबीयांसमवेत लॉकडाऊनमुळे घरीच वेळ घालवता येतो... वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळता येतात, एकमेकांशी संवाद साधता येतो... या सर्व गोष्टी सकारात्मकच आहेत.
कोरीना विषाणूला हरवण्यासाठी एकच निर्धार....
घरात थांबा सुरक्षित रहा.... थांबला तो जिंकला!