लोप होत चाललेली पुस्तक वाचन संस्कृती
लोप होत चाललेली पुस्तक वाचन संस्कृती
आज पुन्हा एका नवीन गावी, नवीन शाळेस भेट देण्यासाठी त्याचा मोर्चा वळला होता. तो येणार असल्याची पूर्वकल्पना शाळेतील मुख्याध्यापकांना त्याने आधीचीच देवून ठेवली होती. परंतु कुणीही घ्यायला येवू नये असेही कळविले होते. सहा प्रवाशांच्या टमटमने त्याला फाट्यापर्यंत आणून सोडले. फाट्यापासून गंतव्य स्थानाकडे तो पायीच निघाला. डोक्याच्या दोन्ही बाजूला किंचीतसे पडलेले टक्कल, काळ्याशार दाट दाढीतून बंडाळी करणारे पिकलेले केस वाढत्या वयासोबत मिळालेल्या अनुभवाची अनुभूती करून देत होते. डोळ्यावरचा चष्मा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचाच जणू संदेश देत होता. खादीचा कुडता आणि पायजामा, कुडत्यावर परिधान केलेले बदामी रंगाचे जॅकेट शोभून दिसत होते. खांद्यावर घेतलेली शबनम रुबाबदार भासत होती. कराकरा वाजणारी पायातली अस्सल कोल्हापुरी चप्पल चार-चौघांचे लक्ष वेधून घेत होती. शेवटी कवीच तो....
सोनपूर फाट्याजवळून उजवीकडे २ किमी अंतरावर 'वनवासी' गाव होते. गावात तसेच गावाच्या आजूबाजूच्या ४ किमी परिसरात घनदाट पसरलेली वनराई जणू गावाच्या नावातील अर्थ विषद करीत होती. रस्त्यात भेटणारी पोक्त मंडळी रितीरिवाजाप्रमाणे रामराम घालत होती. (हल्लीच्या तरूण पिढीला मात्र रामराम घालायला ओशाळल्यासारखं वाटतं. स्पष्टच सांगायचे झाले तर लाज वाटते.) प्रत्युत्तरादाखल तो देखील रामराम घालत होता. स्वर्गीय साने गुरुजी प्राथमिक व माध्यमिक शाळा आता नजरेच्या टप्प्यात आली होती. मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सेना - हो विद्यार्थी सेनाच. कारण त्याच्या दृष्टीने भारताची भावी पिढी असलेल्या या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरच सुसंस्कृत आणि महासत्तेच्या दिशेने अग्रेसर होणाऱ्या समृद्ध भारताची धुरा पेलण्याची खरी जबाबदारी असते - त्याच्या स्वागतासाठी उत्सुक होती. त्याने आधीच सूचित केल्यानुसार कुठल्याही सत्काराचा बडेजावपणा न करता मुख्याध्यापकांनी दिलेले एक गुलाबाचे फूल तेवढे साभार स्विकारत त्याने जॅकेटला अडकवले.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांनी स्वागतपर भाषणात त्याचा थोडक्यात परिचय करून दिला व त्याला बोलण्यासाठी आमंत्रित केले. सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवरांचे आभार मानत त्याने विषयाला सुरुवात केली. मला ऐकण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी बाळराजांना माझा सप्रेम नमस्कार. तसेच बाळराजांचे आद्यगुरु उपस्थित माय-बाप, त्यांच्या जीवनाला पैलू पाडणारे सर्व शिक्षक गुरुवर्य आणि आयुष्याला कलाटणी देण्यासाठी सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावणारे " ग्रंथ " या सर्व गुरुंना माझा साष्टांग दंडवत.
एरवी आपण गुरूवंदना करताना आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक हे आपल्या डोळ्यासमोर चटकन उभे राहतात. पण " ग्रंथ " हे देखील आपले गुरुच होत, ही बाब कुणीतरी आपल्या मनावर बिंबविल्याशिवाय आपल्या लक्षातच येत नाही, हीच तर आपली शोकांतिका आहे. हल्ली स्पर्धा स्पर्धा म्हणत आपली एका ठराविक चाकोरीबद्ध जगण्याची धावपळ सुरू आहे. आपलं पाठ्यपुस्तकीय ज्ञान म्हणजे केवळ गुण पाझरणारी म्हैस बनून राहिलेलं आहे. अनावश्यक जुन्या रूढी, परंपरांना सोडण्याची अथवा कालानुरूप तीत बदल करण्याची जशी आमची सहजासहजी तयारी नसते, तशीच इंग्रजांनी घालून दिलेली, आजवर वर्षानुवर्षे आमच्या पदरी पडत आलेली आणि रट्टा मारत आम्ही तितक्याच नेटाने पुढे रेटत आणलेली आमची शिक्षणपद्धती २१ शतकाच्या पायरीवर असतानाही बदलण्याची आमची मानसिकता न व्हावी, हे आमच्या मागासलेपणाचेच लक्षण नव्हे काय ? असो.
तर " ग्रंथ हेच गुरु" का असावेत बरे ? आपल्या संस्कृतीत ग्रंथांना इतके अनन्यसाधारण महत्व का आहे ? भारत ही द्रष्ट्या ऋषींची भूमी आहे. जीवनातील अनुभूती व गूढ सत्ये वेदरूपाने आपल्या समोर मांडताना वैद्यकशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, आधात्मशास्त्र अशी विविध शास्त्रीय ग्रंथरचना ऋषींनी आपल्या अंतर्ज्ञानातून साकारलेली आहे. भारत ही संतांची, महात्म्यांची भूमी आहे. रामायण, गीता हे अनमोल ग्रंथ जे जीवन जगण्याची कला शिकवतात. ते आपले धार्मिक ग्रंथ बनले आहेत. सुमारे २०० पेक्षा अधिक काळाचा वैभवशाली इतिहास असलेल्या महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीला खूप मोठा वारसा लाभलेला आहे. हा अनमोल ठेवा अर्थातच आपल्या उराशी बाळगणाऱ्या ग्रंथांचे स्वतंत्र व वेगळे असे विश्व आहे जे आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. माझ्या दृष्टीने ते प्रत्येक पुस्तक जे तुमच्या ज्ञानात भर पाडतं, तुमच्या मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतं, तुमच्या कल्पनाशक्तीला विकसित करतं, तुमच्या शब्द संग्रहात नव्याने भर घालतं, तुमच्या व्याकरणात सुधारणा करतं, तुमची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवतं, तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवतं, शीणलेल्या मनाला चंदनाची शितलता प्रदान करून तुमच्या मनावरील ताण-तणाव दूर करतं, ते पुस्तक नसून ग्रंथच होय आणि साहजिकच आपण ग्रंथ हे गुरु मानत असल्याने ते प्रत्येक पुस्तक आपला गुरु, मार्गदर्शक होय. लहान मूल जन्माला येते तेव्हा सुरूवातीच्या काळात त्याच्या सहवासात येणाऱ्या माणसांचं ते अनुकरण करत जीवनाचे धडे घेत असते. आपली भाषा, बोलणे, वागणे, संस्कृती इत्यादी सर्व ते अनुकरणातून शिकत असते. मात्र ज्याचं अनुकरण करायचं त्याला घडविलेलं असतं ते ग्रंथ ह्या गुरूने. मग ते आई-वडील असोत वा शिक्षक.
आज तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया ही माहिती व प्रसारणाचे महत्त्वाची साधने आहेत. परंतु यांपासून होणारे फायदे आणि तोटे यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास माझ्या मते, पदरी यश पडत असलं तरी मानसिक अस्वास्थ्य आणि अनुभवाची कमतरता हे तोटे निश्चितच आहेत. आमच्या वयातील एकमेव पिढी अशी आहे की, जी शाळेला सुटी लागताना मिळणाऱ्या गोष्टींच्या पुस्तकांसाठी, चांदोबा मासिकासाठी मित्रांशी, तर रोज नवीन गोष्ट ऐकवावी म्हणून आजी-आजोबांशी भांडली आहेत. तसेच आजच्या मोबाईल, संगणकासही चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. विचारा या पिढीला जगण्यातला खरा आनंद कशात होता ? माझी खात्री आहे, ही पिढी तुम्हाला छातीठोकपणे सांगेल, " बाळांनो, आम्ही जगण्यातला आनंद मागे सोडून आलो रे "! महात्मा फुलेंनी उगाच का म्हटलंय, " वाचाल तर वाचाल " म्हणून. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि म्हणूनच त्यांनी "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा", हे सूतोवाच केले. व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या जडणघडणीत वाचन संस्कृतीचा सिंहाचा वाटा आहे. खऱ्या अर्थाने ज्ञान देणारे शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे.
प्रत्येक पिढीची आवड-निवड ही वेगळी असली तरी एखादे जुने गाणे, येणारी प्रत्येक पिढी जशी अवीटपणे गुणगुणत असते, तशीच काही अवीट पुस्तकंही निर्माण झालेली असतात, जी पिढी दर पिढी वाचनीय ठरतात. आज "लोप होत चाललेली पुस्तक वाचन संस्कृती" पाहता लेखकाची देखील ही जबाबदारी ठरते की, त्याने चिरकाल टिकणारी रचना वाचकांसमोर ठेवली पाहिजे. आजकाल जो तो कवी आणि लेखक होऊ पाहतोय. रसिक, वाचक व्हायला मात्र कुणी तयार नाही. त्यामुळे दर्जेदार लेखनाचा अभाव हे देखील वाचन संस्कृतीच्या र्हासाचे एक महत्त्वाचे कारण ठरते. शेवटी इतकेच म्हणेन -
"वाचले मी चेहरे किती
वाचल्या किती समस्या
पुस्तकच ठरले मार्गदर्शक
साहित्य साधना हीच तपस्या".
त्याचा विषय संपला होता. त्याची नजर सर्वत्र भिरभिरत होती. सर्वजण विचारमग्न झालेले होते. मात्रा व्यवस्थित लागू पडलेली होती. विद्यार्थ्यांच्या मनावर वाचन संस्कृतीचा ठसा त्याने उमटवला होता. विद्यार्थ्यांच्या निमित्ताने शिक्षक व पालकांचे देखील सोनाराकडून कान टोचले गेले होते. खांद्यावरच्या पिशवीत हात घालत काही पुस्तके बाहेर काढून तो पुढे म्हणाला, "बाळांनो मी तुमच्यासाठी खूप छान छान गोष्टींची पुस्तके तुम्हांला भेट देण्यासाठी आणली आहेत. हवीत ना तुम्हाला ?" सर्व विद्यार्थ्यांनी जोराने हो... म्हणत आनंदाने टाळ्या वाजवल्या. शाळेचा निरोप घेण्यापूर्वी दोन हजार रूपयांची पुस्तके त्याने शाळेच्या ग्रंथालयास भेट दिली. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवत तो समाधानाने माघारी निघाला. पुन्हा नवीन गावाला, गावातल्या शाळेला भेट देण्यासाठी....!
..... नरेंद्र पाटील, धुळे
