बाप्पाचा निरोप...
बाप्पाचा निरोप...
(दिनांक २३ सप्टेंबर, २०१८)
माझा मुलगा आयुष (साई) वय वर्षे ९, दरवर्षी बाप्पाला निरोप देताना खूप भावूक होत असतो. या दहा दिवसांच्या पाहुण्याचा त्याला इतका लळा लागतो की, त्याने जावूच नये असंच त्याला वाटत असतं. ह्या वर्षी देखील तो हट्ट धरून बसला की, बाप्पाचं विसर्जन करायचं नाही म्हणून. त्याचंही एका अर्थी बरोबरच आहे. या दहा दिवसांत घरातला प्रत्येक सदस्य, शेजा-या पाजा-यांसह सकाळी आणि संध्याकाळी या निमित्ताने एकत्र येवून मनोभावे श्रीगणेशाची आरती, वंदना करतात. वातावरणात जादूई प्रफुल्लता जशी भरून उरत असते. पण त्या भाबड्याला कसं कळणार की, पाहुणा हा पाहुणाच असतो. त्याला आल्या पावली परत आपल्या इष्ट स्थानी जावंच लागतं.
आजही त्याच्या डोळ्यांतला ओघळ थांबवणं जिकरीचंच होतं. त्याचा हा भाव माझ्याही अंतरात खोल पडसाद उमटवित होता. म्हणूनच तर, माझ्याही डोळ्यांत पाणी तरळलं होतं. आपण मोठी माणसे जर समंजस असतो, तर मग सारं काही आपल्याला कळत असून देखील ते पचनी का पडत नसतं. कसं पडणार ! ईश्वराप्रतीची व्याकुळता आपल्याला तसं करायला आपसुकच भाग पाडत असते. म्हणूनच तर, कळत असतं पण वळत मात्र नसतं. शेवटी श्रद्धेला मोजमाप नसतं हेच खरं ना ! असो. डोळ्यातलं पाणी मोठ्या कष्टाने लपवत,जिरवत हुंदका थोपवत मी पोराची समजूत काढत होतो. मुली ह्या मुळातच हळव्या असतात.माझी मुलगीही त्यास अपवाद नाही. तिचीही अवस्था तशीच अवघडल्यासारखी झालेली होती. एकूणच अशा हळव्या मन:स्थितीत असताना आधीच फोन करून बोलाविलेली ऑटो दाराशी येऊन उभी राहिली. परिवारातील सदस्यांसह 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' असा जयजयकार करत जड अंतःकरणाने बाप्पाला घेऊन बाहेर आलो. ऑटोत बसताना बाप्पाला मांडीवरच घेतलेलं. ऑटोच्या मागील सीटावरून देखील ऑटोच्या उजव्या बाजूकडील त्या एकमेव गोल आरशात बाप्पाचं मुखमंडल अगदी स्पष्ट दिसत होतं. पाहताना ते जणू धीरगंभीर असलेलं भासत होतं. जणू तो एक ईश्वरी संकेतच होता. "संसाराचा भार अंगा-खांद्यावर वाहत असताना चित्त मात्र ईश्वराकडे असावं" हेच सुचवायचं होतं का गणरायाला? माझ्या लक्षी तर हाच ईश्वरी संकेत.
भुसावळ शहरालगत तापी नदीचं विशाल पात्र आहे. जवळच असलेल्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाचे ३६ दरवाजे खुले करून पाण्याचा विसर्ग केल्याने नदीला आज पुराचं रूप आलेलं होतं, ही एक विशेष जमेची बाब होती. तापी नदीवरचा भुसावळ-यावल, भुसावळ-फैजपूर-रावेर ते थेट ब-हाणपूर शहरास जोडणा-या महामार्गावरील दुवा असलेला तो पूल पार करत आमची ऑटो नदीपल्याडच्या तीराजवळ येऊन थांबली. ऑटोतून उतरून दोन्ही हातानं बाप्पाला धरत हळूहळू ती उतरणीची पायवाट जी नदीपात्रापर्यंत नेत असते, आम्ही उतरत होतो. काल दिवसभर चाललेल्या झिमझिम पावसाने ओलसर झालेल्या मातीवरून चालताना सावकाश पाय ठेवावे लागत होते. ती पायवाट उतरून झाल्यावर गुळगुळीत व माणसांच्या तथा पावसाच्या माध्यमातून मातीच्या संसर्गाने काहीशा निसरड्या झालेल्या त्या खडकांच्या अंगावरून चालतानाही तोलून-मापून पावले टाकणेच इष्ट होते. हे सारे अडसर यशस्वीरित्या पार करत अखेर आम्ही नदीच्या काठीवर येऊन पोहचलो.
नदीचं पात्र भरून वाहत असतानाचं ते नयनरम्य दृश्य एरवी दुर्लभच. नदीवरील एका सपाट खडकावर बाप्पांना मी बसतं केलं. तेवढ्यात वडिलांनी आरतीचं ताट सज्ज केलं. विसर्जनापूर्वीची आरती झाली. आधी मुलाने मग मुलीने मिळून कळसातील नारळाचा समाचार घेतला. नारळातील अमृत प्राशन करत खोब-याच्या प्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. पोहता येत नसल्याने व नदीत पाणी खूप असल्याने पाण्यात पाय ठेवण्याचं धाडस माझ्यात नव्हतंच. पण बाप्पांना व्यवस्थित डुबकी देता येईल इतक्या पाण्यात नेण्याचं मनाने ठरवलेलं. इच्छा असली की तिथं मार्ग निश्चितच निघतो. याची प्रचिती पुन्हा अनुभवायला मिळाली. नदीतील खाच-खळग्यांची इत्थंभूत माहिती असणारे काही स्थानिक मच्छिमार ट्रक / ट्रॅक्टरच्या ट्यूबमध्ये हवा भरून आधीचेच पाण्यात सज्ज होते. लोकांकडून अल्पसा मोबदला घेत गणेश मूर्ती खोल पाण्यात नेऊन विसर्जित करण्याचं कार्य ते करीत होते. यातून दोन हेतू साध्य होत होते. पहिला म्हणजे बाप्पांना खोल पाण्यात यथेच्च डुबकी देता येत होती. दुसरा म्हणजे जमावातील कुणाचा पाय घसरून एखादी अप्रिय घटना होण्याची शक्यता नव्हती.
मला मात्र मगाशी म्हटल्याप्रमाणे बाप्पाच्या मूर्तीला त्या लोकांच्या हाती द्यायचं नव्हतं. म्हणूनच की काय पण बाप्पानं माझी प्रार्थना स्वीकृत केली होती. जवळच दोन ट्यूबवर लाकडी फळ्या रचून तयार असलेला ताटवा जणू आमचीच प्रतिक्षा करीत होता. पाण्यात उतरून ताटवा ओढणारा तो मनुष्य माझ्या जवळ येऊन म्हटला, 'साहेब, मूर्ती देता का ? मी त्याला म्हटलं, मूर्ती देतो पण मूर्ती पाण्यात नेताना मला देखील सोबत न्यावं लागेल आणि विसर्जन मी स्वतः करीन. बाकी हा ताटवा सांभाळायचं काम तुझं. तोही कुठलाही आढावेढा न घेता चटकन तयार झाला. मग मी, माझा मुलगा आणि बाप्पा त्या बॅगपायपर सोड्याच्या जाहिरातीसारखं "मिल बैठे तीन यार" ताटव्यावर जाऊन बसलो. ताटवा पाण्यात चालू लागला तसतसं काळजात धस्स होत होतं. कारण, तो मनाची काहिली करणारा क्षण नजरेच्या टप्प्यात येऊन ठेपला होता. काठापासून काही अंतर पाणी कापून ताटवा थांबला. मी बाप्पाला उचललं. एक-दोन-तीन अशा तीन वेळा डुबक्या देत बाप्पाचे विसर्जन केले. बाप्पाला पाठविताना डोळ्यातला एक अश्रू बंड करून त्याचा माग घेत पाण्यात विरून गेला. आता ताटवा माघारी फिरला होता किनाऱ्याकडे. शांत, गंभीर विरहाचे ते क्षण काळजात बोचत होते. डोळे भिरभिरत होते, पुन्हा एखादी झलक दिसते का ते पाहण्यास. पण वेळ संपली होती. बाप्पांनी अखेरचा निरोप घेतला होता, पुढील वर्षी येण्याचं अभिवचन देवून !!!
"बा गणराया घ्यावा निरोप हा आता
काही बोलू जाता, उर दाटतो
शोधती नेत्र पुन्हा, त्या वळणावर खुणा
मनी दयाघना तुझाच विरह दाटतो"
