sanjana Durgude

Inspirational Others

2  

sanjana Durgude

Inspirational Others

लॉकडाऊनमध्ये अनुभवलेले जीवन

लॉकडाऊनमध्ये अनुभवलेले जीवन

4 mins
53


कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पूर्ण देशभर लागू केला. या जनता कर्फ्युला पूर्ण देशभर लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. सर्व लोकांना घरून काम करण्याचे व घरातून बाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले. दि. ११ एप्रिल रोजी मा. पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या मिटिंगमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व गांभीर्य लक्षात घेऊन हा लॉकडाऊन दि. ३० एप्रिलपर्यंत तसाच सुरु ठेवण्याचे आदेश दिले. सध्याही हा लॉकडाऊन कायम आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून लॉकडाऊनमुळे जगाला आणि भारताला कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल यावरती आपण सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा ऐकत आणि पाहत आहोत.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे गुरुकुल शिक्षण पद्धतीपासून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास आता सर्व मर्यादा ओलांडून नव्या वळणावर पोहोचला आहे. या लॉकडाऊनमुळे १ ते ८ वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे. विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय वर्षातील मुलांनाही सरासरी गुण देण्यात येणार आहे. शेवटच्या वर्षातील मुलांच्या परीक्षेचा निर्णय अजून झालेला नाही. या वर्षी शैक्षणिक वर्षही सप्टेंबरपासून सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. शाळकरी मुलांमध्ये परीक्षा नसल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंद पाहायला मिळत आहे. मात्र पदवी व पदव्यूत्तर विद्यार्थ्यांच्या मनात गुणाबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मोठ्या- मोठ्या सरकारी परीक्षेसारख्या अनेक परीक्षा घेण्यात एकंदरीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शैक्षणिक बाबतीत अनेक शंका निर्माण होत आहेत.


त्यात भरीसभर काही कुटूंबात तर आयुष्यात पहिल्यांदाच इतके दिवस घरी असल्याने एकमेकांचे दोष दिसू लागले आहेत, एकमेकांशी होणारी भांडणे, तिरस्कार, मुले व वृद्धांची चिडचिड, पिढ्यांमधील अंतर यामुळे होणारे वादविवाद, शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांवर आलेला प्रचंड मानसिक ताण, या एक ना अनेक कारणांमुळे कुटूंब व्यवस्था मोडकळीस येते की काय? अशी भीती अनेक कुटूंबात निर्माण झाली आहे.


खरंतर प्रत्येक गोष्टीला सकारात्मक अशी दुसरी बाजू असते. आज प्रत्येकजण धावतच असतो. आपली मुले, पत्नी, पती, आई-वडील, भावंडं व आजी-आजोबा यांच्याकडे पाहायला, त्यांच्याशी बोलायला, वेळच नसतो. पण आज आपल्याला वेळच वेळ आहे. बायको किती कष्ट करते ते आपल्याला कळू लागलंय. मुलांना आपला सहवास मिळतोय, याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहतो आहे. भावंडांशी मारलेल्या गप्पा बालपणीच्या सुंदर भुतकाळाबरोबरच वर्तमानातील स्वप्नांना जागृत करीत आहेत. आई-वडीलांशी मनसोक्त संवाद साधता येतोय, याचाही आनंद वेगळाच आहे. आजी-आजोबांना दिलेला वेळ त्यांच्या एकटेपणाला पळवून लावतोय. खरंतर ज्या कुटूंबासाठी आपण रात्रंदिन धावतो, त्या कुटूंबाकडे आपण कधीच पाहात नव्हतो याची जाणीव आज होतं आहे.


आज एकत्र येऊन गप्पा मारणं, जेवणं, टी. व्ही. बघणे, पत्ते, कॅरम, बुद्धीबळ खेळणे, यातून नाती आणखी जवळ येऊन घट्ट होत आहेत. एकमेकांवरील प्रेम प्रकर्षाने जाणवतंय. पैसा, संपत्तीपेक्षाही हे किती महत्त्वाचे आहे, हे कळायला लागलंय. ज्या घरात आपण राहतोय त्याचा कोपरान् कोपरा आपण न्हाहाळतोय. ज्यांनी ते बांधलंय त्यांचे स्मरण होतंय. घरातली प्रत्येक वस्तूसुद्धा आपल्याला भूतकाळात घेऊन जातेय. आपले जीवन अनेकांच्यामुळे चाललंय हे सहज ध्यानात येऊ लागलंय. आपण वेळेअभावी अनेक गोष्टींना, छंदांना तिलांजली दिली होती, जसे की, गायन, वाचन, चिंतन, व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा, नामस्मरण, साधना. त्यांची जोपासना करण्यासाठी वेळ मिळाला आहे. सर्व प्रकारची प्रदुषणं बंद झाली त्यामुळे प्रदुषणमुक्त वसुंधरा आज आपण पाहतो आहे. याचा फार मोठा इष्ट परीणाम पर्यावरणावर निश्चितच होत आहे. मानवाच्या वर्चस्वामुळे स्वत:चे मुक्तपण विसरून गेलेल्या इतर प्राण्यांनाही आज सर्वत्र मनसोक्त फिरता येते. आज भयानक परिस्थतीतही काही गोष्टी चांगल्या घडत आहेत की कदाचित त्या कधीच होऊ शकल्या नसत्या.


लॉकडाऊनच्या काळात समाजामध्ये जिवंत राहणे या गोष्टीला प्राथमिकता देण्यात येत आहे. तसेच एका विशिष्ट वर्गाला कारणीभूत ठरवून समाजामध्ये धार्मिक तेढ र्निमाण होत आहे. हतबलता वाढीस लागली आहे. वाढत जाणाऱ्या या लॉकडाऊनमुळे लोकजीवन आवश्यक गोष्टीचा साठा करून ठेवत आहे. शिवाय मागणी वाढल्यामुळे जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा पडत आहे. जास्त नफा मिळवण्याच्या लालसेने वस्तुवरील नफेखोरी आणि मक्तेदारी वाढताना दिसत आहे.


घरी राहा, सुरक्षित राहा हा संदेश अनेक समाजमाध्यमाद्वारे दिला जात आहे. अनेक जण या लॉकडाऊनचा पुरेपूर वापर करत आहे. मनोरंजनाच्या गोष्टीद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करत आहेत. सामाजिक माध्यमाच्या आधारे नव नवीन गोष्टींचा आनंद लुटत आहे. अनेक प्रकारची माहीती मिळवत आहे. बऱ्याच जागेवर Work From Home अभियान राबविले जात आहे.  


आज या परिस्थितीने सैरभैर झालेल्या मनाला आवरणं कठीण जातंय. अशा भयावह परीस्थितीतून जर आपल्याला बाहेर पडायचे असेल तर उपाय एकच तो म्हणजे मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल.


लॉकडाऊनमुळे आज प्रत्येकजण घरात बसलेला आहे. कोरोनासारख्या महाभंयकर संकटाचा सामना करण्यासाठी घरात बसणे, हाच एकमेव मार्ग आहे किंबहुना याच गनिमी काव्याने आपण कोरोनाला पराभूत करू शकतो. आपण काहीही न करता घरात बसण्याचा संयम हाच खरंतर विजयाचा मार्ग आहे. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी रात्रंदिवस राबणारे, खडा पहारा देणारे पोलीस, जीवाची बाजी लावणारे डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉय, वैद्यकीय सुविधा पुरविणारे कर्मचारी, साफसफाई कामगार, अत्यावश्यक सेवा पुरविणारे, प्रशासन, राज्य व केंद्र सरकार, आदरणीय मुख्यमंत्री व पंतप्रधान यांची किती कृतज्ञता व्यक्त करावी तितकी कमीच आहे. अक्षरशः डोळ्यात तेल घालून ते या संकटाशी सामना करण्यासाठी सदैव तत्पर आहेत व ते आपल्याला घर न सोडण्याचे आवाहन करत आहेत. अपवाद सोडले तर आपण सर्वजण प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालनही करीत आहोत. त्यामुळेच या भयानक परिस्थितीतही आपल्या भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या विकसनशील देशाला त्यावर मात करण्यात यश मिळत आहे. शेवटी एवढंच म्हणते Go Corona Go


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational