ll स्त्री शक्तीचा अगाध महिमा l
ll स्त्री शक्तीचा अगाध महिमा l


ll राजमाता माँ जिजाऊसाहेब ll
"तुझ्या भेटीची ओढ लागली अंतरी,
मस्तक टेकवीन मी तुझ्या चरणावरी,
धन्य धन्य झाला सह्याद्रीचा कण कण म्हणूनी,
साजरा करितो आम्ही १२ जानेवारीचा सण "
१२ जानेवारी सर्व मराठ्यांनी आपल्या मनात कोरून ठेवावा असा हा दिवस.
महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणा-या ,सुराज्याची स्वप्नं साकारणाऱ्या स्वाभिमानी जाधव यांची कन्या, तर भोसलेंची सून असलेल्या राजमाता जिजाऊंची जयंती .ज्यांनी सर्व मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान भिनवला ,प्रत्येक मावळयात शिवबा घडविला, ज्यांनी आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडणघडणसाठी पणाला लावले, वेळोवेळी पत्नी म्हणून धीराने शहाजी राजांच्या सोबत उभ्या राहिल्या.शिवबांच्या मातृत्वाबरोबरच गुरुत्वही स्वीकारले अशा कर्तृत्ववान " राजमाता जिजाऊ" माँसाहेबांची १२ जानेवारीला जयंती आहे.
"मुजरा माझा त्या माँ जिजाऊला,
घडविले तिने त्या शूर शिवबाला,
साक्षात होती ती आई भवानी,
जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी,
मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा,
तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा ".
माँ जिजाऊ स्वराज्याची स्फुर्ती होती, महाशक्ती होती, मातृ शक्ती होती, मराठ्याने छत्रपती घडविणारी आदर्श राजमाता होती. शिवाजीच्या अनुपस्थितीत त्याचं राज्यकारभार पाहत होत्या, न्यायनिवाडे करीत होत्या, गरजवंताला मदतीचा हात देत होत्या, तो काळ विचारात घेतला तर जिजाऊ प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्या - गांजल्याच्या पालकरत्या राजमाता होत्या.
माँ जिजाऊंनी नात्यांना भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांमध्ये पुरेपूर उतरला होता. त्यांनी शिवाजी राजांना पारतंत्रयात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या सीतेचे हरण करणारा रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता. बाकासुरांचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता.त्यांनी फक्त गोष्टीच सांगितल्या नाहीत तर शेजारी बसवून राजकारणाचे धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईनी त्यांना राजनीतीही शिकविली.समान न्याय आणि वृती अन्याय करणा-याला कठोरात कठोर शिक्षा करण्याचे धाडस दिले.
"अशा वाघिणीचा त्यो छावा
गनिमाला कसा ठेचावा
डोक्यात गनिमी कावा
अशा वाघिणीच
ा त्यो छावा"
महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्याने स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या बीज पेरलं .अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे बीज ज्या आईने पेरलं ती आई म्हणजे माँ जिजाऊसाहेब त्यांना एका शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या राजमाता आहेत.काही शतकानंतर सुध्दा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मूल्यांचा आदर करणारे विचार जे छत्रपतींच्या आचरणात त्यांच्या संस्कारातून दिसून येते.छत्रपती शिवरायांना ज्ञान ,चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्व गुणांचे बाळकडू देणा-या राजमाता होय.
"घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने,
तिच्या मायेच्या छायेत नव्हता जातीधर्म,
सर्वधर्मसमभाव हे एकच तिचे कर्म,
तिच्या राज्यात होती, सारा सुखी प्रजा,
धन्य - धन्य अशा आमुच्या जिजाऊ माता."
राजमाता जिजाऊ ह्या अशाच पिता नि पती यांच्या सहवासात निराधार जीवन जगल्या.पित्याची अमानुष हत्या पाहिली, पतीची अवहेलना उरात जतन करून ठेवली. पती हयात असताना परित्यक्तात जीवन वाट्याला येऊनही धीर सोडला नाही. आपण स्त्री आहोत, दुबळ्या आहोत असा विचारही स्पर्शू न दिलेल्या अशा स्वाभिमानी कन्या,कर्तृत्ववान पत्नी, देवधर्म ,देशांवर प्राणाहून अधिक प्रेम करणारी माता बलवंत असूनही याहूनही चाकरी करत पातशहासमोर गर्दन झुकविणारयांची कीव न करणाऱ्या एक हिंदू स्त्री होत्या.माता ही ख-या अर्थाने एक शिल्पकार असते, तीने दिलेला बोध ज्ञान हे कुठल्याही ग्रंथापेक्षा जास्त पवित्र व प्रभावशाली असतो. आपल्या अपत्यांना घडविण्याचे कर्तव्य तिला पार पाडावेच लागते. अगदी तसेच जिजाऊसाहेबांनी आपल्या सुसंस्काराने एक बादशहा बनविला. जो सिंहासनावर बसण्याआधीच राजे म्हणून मान्यता पावला.अशा बादशहा म्हणजेच छत्रपती शिवराय होय.
याच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या माऊलींची १२ जानेवारीला जयंती आहे. हरवलेला स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुर्वजन्म देणारी माता आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास आर्पण करून या मातीला आपला पहिला छत्रपती राजा देणारी हीच ती महान राजमाता होय.
शिवबाची एक - एक कथा,
तिच आहे जिजायन गाथा,
म्हणून आजही झुकतोय माथा,
माँ जिजाऊ चरणी भारतीयांचा.
Il धन्य धन्य माँ जिजाऊसाहेब ll