लाँकडाऊनमध्ये काय शिकलात
लाँकडाऊनमध्ये काय शिकलात
गेल्या कित्येक महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान माणसाचे जगणेच बदलले आहे. कधी न ऐकलेले असे विषाणू ज्यावर कोणत्याही प्रकारची औषध नाहीत अशांचा सामना या पृथ्वीवरील सर्व लोक करीत आहेत. कोरोना हे नाव प्रथमच आम्ही ऐकले व याचा प्रकोप असा असणार ही एक गंमतच वाटली होती. आधी बाहेरच्या देशातून येणाऱ्या बातम्यांवर काही भरवसाच बसत नव्हता. पण जेव्हा हळूहळू त्याचा प्रकोप वाढत गेला आणि आपल्याही देशात या कोरोनाची जेव्हा लागण पसरत गेली तेव्हा कळलं की जेवढे आपण सहज घेत आहोत तेवढं सामान्य नाही. आयुष्यात अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे सर्वांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचे आम्ही अनुभव घेतले आहे. त्यात मी माझे अनुभव सांगत आहे.
जेव्हा पहिला जनता कर्फ्यु एका दिवसाचा लागला तेव्हा मजा आली की सर्व आपल्या घरात राहतील कोणीही बाहेर निघणार नाही. जो निघेल त्याला पोलीस पकडून नेतील अशी धारा लावून ठेवली होती. त्यावेळी दहावीचे पेपर सुरु होते. ज्या दिवशी जनता कर्फ्यु होता तो दिवस रविवार २२ मार्च होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी दहावीचा बोर्डाचा शेवटचा पेपर भूगोलाचा होता व तो रद्द झाला होता व त्या दिवसापासून (दिनांक : २३/०३/२०२०) १४४ कलम लागू झाले होते. मग दिनांक : २५/०३/२०२० पासून पहिला लॉकडाऊन सुरु झाला होता. तो दिनांक : १४/०४/२०२० पर्यंत होता. त्यानंतर हळूहळू त्याचे स्तर वाढत गेले व आजपर्यंत लॉकडाऊनच्या या काळात अनेक अनुभवातून आम्ही निघालो आहोत. या काळात सुरुवातीस आम्हाला मोठं नवल वाटत होतं की हे काय चाललंय? कारण आमच्या जिल्ह्यापर्यंत कोरोनाची झळ पोहोचली नव्हती.
लॉकडाऊनमुळे ट्रेन, बस जेव्हा बंद झाल्या तेव्हा आणखीनच चमत्कार झाल्यासारखे वाटले. कारण याच्या आधी कधी आम्ही ट्रेन, बस बंद होताना बघितले नव्हते. नंतर कळले की विमानसेवाही बंद झाल्या. हे सर्व एकप्रकारे चमत्कारीक वाटू लागले. आधी तर कोणी अफवा तर पसरवित नाही असे वाटले. पण जेव्हा सर्व बंद झाले तेव्हा त्याचे महत्व हळूहळू कळायला लागले. देऊळ बंद, शाळा-महाविद्यालये बंद, परीक्षा बंद, बाजार बंद, दुकाने बंद, पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद. हे सर्व बंद झाल्यामुळे असे वाटायला लागले की आता काय होणार? किराणा, भाजीपाला, दुध, औषध हे कसं मिळणार? सुरुवातीला हे सगळं बघून तर काही लोकांची तर घाबरुन प्रकृतीच खराब झाली.
कोणाचा बी.पी.वाढला, तर कोणाचा शुगर लेवल वाढला. सुरुवातीला ज्यांना कोरोना झाला ते कोरानामुळे कमी तर घाबरुन मृत्यु पावले असेच म्हणायला काही हरकत नाही. लोक जिथल्या तिथं फसून राहिले, जे विद्यार्थी घराबाहेर शहरात शिक्षण घ्यायला गेले होते ते ही तिथंच राहीले, त्यांना घराची ओढ लागली होती. कारण कॉलेज बंद, मार्केट बंद, हॉटेल्स बंद, त्यामूळे त्या विद्यार्थ्यांना मिळणारं जेवणसुद्धा बंद झालं होतं. अशा अवस्थेत कसं करावं हेही त्यांना कळत नव्हतं. जे कोणतेही मुलं-मुली होळीच्या सणानिमित्त घरी आले होते व दोन-चार दिवस राहून पुन्हा जाणार होते त्याच वेळेस लॉकडॉऊन सुरु झाल्यामूळे ते घरीच राहिले. जे होळीला आपल्या घरी आले नव्हते ते आपल्या त्याच शहरात राहिले. त्यांची खूपच फजिती झाली. मोठ्या शहरात काम करायला गेलेले मजदूरांनी लाखोच्या संख्येने आपल्या स्वतःच्या गावी जे साधन मिळेल त्याच्याने परतण्याचा प्रयत्न केला. पण सगळे साधन जेव्हा बंद झाले तेव्हा ते आपल्या छोटया मूलांना व बायकांना घेऊन पायी पायी प्रवास करुन आपल्या घरी परतले. हजारो किलोमिटर पैदल चालले. हे सुद्धा न विसरण्यासारखे कृत्य होते.
मुख्य रस्त्यांनी जेव्हा हे जात होते तेव्हा पोलिसांनी अडवणं सुरु केलं म्हणून ते रेल्वेच्या पटरीने पायी चालून जात होते. त्याच काळात काहींचा ऍक्सीडेंट होऊन मृत्युमुखी पडले तर काहींनी भूकेने व्याकूळ होऊन आपला जीव सोडला. काहींना समुहात येऊन त्यांना कोरोनाची लागण झाली. पूर्ण देशाचंच नव्हे तर अख्ख्या जगाचं हे दृश्य होतं. हे पाहून आता आपली सर्व पृथ्वी नाहिशी तर होणार नाही ना असं वाटू लागलं. याच वेळेत काही ठिकाणी भूकंपाचे झटकेसुद्धा जाणवले. देशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ आले. त्यातूनही खूप नुकसान झाले. चीन व पाकिस्तानच्या कुरापती सुरु झाल्या व देशाचे लक्ष कोरोनावरून देशाच्या सीमेवर लागले. व्यवसाय करणाऱ्यांचे ही हाल झाले. त्यांनाही फार नुकसान झालं. लहान दुकानदार किंवा इतर व्यवसायींना भुकेचा सामना करावा लागला. याचे एक उदाहरण मी देतो. माझी मुलगी दिल्लीला शिकत होती. तीही होळीच्या वेळेस गावाला आली होती. तिला जो व्यक्ती जेवणाचा डबा देत होता त्याचा मला मागच्या महिन्यात फोन आला की आपण माझी मदत करा. मला खायला काहीही नाही. त्याच्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्याच्या मोबाईलवरुन तो मदत मागत होता. म्हातारा माणूस होता. असे अनेक प्रसंग या वेळेत आम्ही बघितले.
लोकांनी एकत्र येऊन गरीब लोकांना मदतीचा हात दिला. उपाशी लोकांना खाऊ घातलं. कितीतरी जे रोज कमवून खात होते त्यांना लोकांनी, काही संघटनांनी तर काही मिळून सर्वांनी मदत केली. असेही दिवस पाहायला मिळतील अशी कल्पनासुद्धा कोणी केली नव्हती. याच काळात पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले. त्यामुळे ट्रान्सपोर्टींगचे ही भाव वाढले व त्यामुळे सर्व सामानांचे भाव वाढले. जे नोकरी होते त्यांची ही आर्थीक मंदी झाली. जे प्रायवेट नोकरीत होते त्यांना नो वर्क नो पे झाले तर सरकारी नोकरीच्या लोकांचे ही काही टक्के रक्कम सरकार जमा झाली. अशा वेळेत लोकं आपआपल्या घरात राहू लागले व विजेचे बिल सुद्धा वाढले. बील वाढून तर आले पण जमा करण्यासाठी लोकांजवळ पैसे नव्हते. अशा अनेक अडचणींना तोंड देत खूप लोकं मानसीक तणावात जगत आहेत. काहींनी तर मानसिक दबावाखाली आत्महत्यासुद्धा केली आहे. कितीतरी लोकांची मेडीकलमधून फसवणूक सुद्धा करण्यात आली. शेतीच्या पेरणीसाठी केलेले बियाणं उगवलेच नाही. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली. या कोरोनाच्या काळात सर्वांची काही ना काही फजीती झाली आहे.
पण याच्यातून आपण काय शिकलो ?
ज्यांना संयम राहत नव्हता ते संयमाने राहायला शिकले. लोकांना अन्नाची किंमत समजली. स्वच्छतेची गरज कळली. लोक या बिमारीपासून वाचण्यासाठी स्वतःला व आपलं घर-परिसर स्वच्छ ठेवू लागली. पंतप्रधानांच्या सांगण्यावरुन भारत आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न घराघरापासूनच सुरु झाला. जे लोक काहीही काम करीत नव्हते ते ही या काळात जे मिळेल ते काम करायला तयार झाले. साधी राहणी यावर भर देऊ लागले. त्यामुळे जीवनशैली फार सामान्य झाली. हॉटेल बंद झाल्यामुळे बाहेर काहीही खायला मिळत नाही म्हणून जे घरात शिजेल तेच खातात. त्यामुळे माणसाच्या स्वास्थ्यामध्येसुद्धा सुधार झालेला आढळला. घरी राहणे, गरम पाणी पिणे, घरचं शुद्ध शाकाहारी जेवण करणे, घरी बनविलेलेच पदार्थ खाणे या सर्वामूळे लोकं बिमार झालेच नाही. ट्रॅफिक नसल्यामुळे नैसर्गिक वातावरण शुद्ध झाले. लोकांना ब्युटी पार्लरची जी सवय होती ती तुटली. लोकं साधे बिना मेकअपने राहू लागले. घरच्याघरी आपली काळजी घेऊ लागले. बाहेर न निघाल्यामुळे रस्त्यावरील ऍक्सीडेंटचे प्रमाण कमी झाले. दवाखान्यात कोरोनाच्या पेशंटशिवाय बाकीच्या पेशंटची संख्या फार कमी होऊ लागली. आता लोकांना आयुष्याची किंमत कळू लागली. या लॉकडाऊनच्या काळात जमलेले खूप सारे लग्न कमी खर्चात होऊ लागले. कारण त्यांना फक्त २५ लोकांचीच परवानगी मिळत होती. ना बॅण्ड, ना पंडाल, ना बाजा. लोकाचे बारावा, तेरावा ही सामुदायीक झालेच नाही. कमी संख्येत अंत्यसंस्कार झाले. आपल्याच घरात राहिल्यामुळे आपल्या घरातील लोकांशी संवाद वाढला. एकमेकांना समजून घेताना एकदुसऱ्याचे विचार कळले. विनाकारण बाहेर जाण्याची बंदी असल्यामुळे आता घराबाहेर विनाकारण जाण्याची इच्छाच होत नाही. टी.व्ही.वरील बातम्या ऐकणे व त्यावर घरातील लोकांशीच चर्चा करणे हे व्हायला लागले. क्षणाक्षणात नष्ट होणारे जीवन आता माणूस आपल्या जीवनाचे प्रत्येक क्षण जगू लागला आहे. निसर्ग व पर्यावरण शुद्ध झाल्याने त्याचे रक्षण करणे माणसाला समजू लागले. माणूस कठिण समयी माणसाच्याच कामात पडतो हे दिसले. सर्व मंदिर बंद असून, सर्व प्रार्थनास्थळे बंद असून आता कोणी कोरोनापासून बिमार होते किंवा कोणत्याही आजारापासून बिमार होते तर त्याला वाचविण्यासाठी फक्त डॉक्टर आणि दवाखानाच दिसतो.
आता माणूस माणसांवर प्रेम करायला शिकला आहे. कोणी कितीही बदमाश असला तरी याकाळात त्याची निसर्गावर बदमाशी चालली नाही. सर्वांना कळून चुकलं की मनुष्य हा निसर्गासमोर काहीच करु शकत नाही व त्याला एक न एक दिवस या पृथ्वीवरुन जावंच लागेल म्हणून जास्त जगणे हे महत्त्वाचे नसून आपण कशा पद्धतीने जगतो यावर प्रत्येकजण भर देत आहे. एक नवीन समाज, नवीन विचार, नवीन आचार हे सर्व या लॉकडाऊनमध्ये लोक शिकले आहेत. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत.