कथा - गजरा
कथा - गजरा


"ये ग मृदुला, आज थोडा उशीर झाला ना ऑफिस मधून यायला. असू दे जा पटकन हातपाय धुऊन ये, आणि देवाला नमस्कार कर. तोवर मी भाजणीचे थालीपीठ लावते. थालीपीठ चालतील ना गं?"
"अरे वाह, थालिपीठं का, मस्त गं आत्तु. चालतील नाही धावतील."
पोटभर जेवण झाल्यावर, ग्लासभर ताक प्यायलो तेव्हा तिलापण बरं वाटलं. किचनमधलं सगळं उरकून हॉलमध्ये येऊन बसलो आणि मी विषयालाच हात घातला.
"मृदुला मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे."
"आत्तु, तुलापण माझ्या लग्नाविषयीच बोलायचंय ना".
"हो गं, बोलू ना. चालेल ना तुला".
"आत्तु, अगं आई तर गेले काही दिवस माझ्याशी नीट बोलतच नाहीये जेव्हापासून तिला निखिलबद्दल मी सांगितलं."
"आई आहे ती, तिला काळजी वाटणारच. तिच्यावर रागावू नकोस. मिनलला तुझं सगळं चांगलं व्हावं एवढंच वाटतं, आणि कसं आहे ना मृदुला, संसार म्हणजे सगळंच आलं ग... सुख दुःख... ह्या सगळ्यात तग धरून राहायच असेल तर प्रेम, समजूतदारपणा, एकेकांविषयीचा आदर, विश्वास अशा अनेक गोष्टींची आवश्यकताअसते... एकमेकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समजून घेणं, त्यांच्याबरोबर जुळवून घेणं, सगळं जमलं पाहिजे, अर्थातच हे सहज रीतीने घडलं तर, आयुष्य नक्कीच सुखकर होईल... "
"बरं, ऐक मी काय म्हणते ते. तुला हे कदाचित लेक्चर वाटेल, पण मला काय म्हणायचं आहे ते त्याला एका उदाहरणातून सांगते..."
"माझे मिस्टर आमचं लग्न होऊन ९ वर्ष झाली नाहीत तो एका अकॅसिडेंटमध्ये गेले. माझ्या पदरात एक मूल होतं. मी तर कोसळलेच होते, पण मला मालुताई आणि मधू भाऊंनी धीर दिला. मी नोकरी करू लागले, पण मग निलेश ला सांभाळायचा प्रश्न उभा राहिला, कारण तेव्हा तो अवघा ४ वर्षांचा होता... पण मालुताईने तोही प्रश्न निकालात काढला... म्हणाली तू बिनधास्त जा नोकरीला, मी सांभाळीन निलेशला... आणि खरच निलेश तिच्याच हाताखाली लहानाचा मोठा झाला... त्या दोघांचं प्रेम आणि वात्सल्य पाहिलं कि डोळे पाणावत असत... कारण सगळे उपास तापास झाले, मेडिकल चेक अप केलं पण तिला मूल झालं नाही... हि एवढीच काय ती खंत... असो..."
"मूल होत नाही म्हणून त्या दोघांनी कधी बाऊ केला नाही, आयुष्यात जे मिळत गेलं ते आपलंसं करत गेले... त्यांचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहिला कि खरच नवं चैतन्य मिळत असे..."
"एक गम्मत सांगते... मधूभाऊ रोज संध्याकाळी मालुताईसाठी गजरा किंवा एखादं वासाच फुल आणत असत, अगदी न चुकता... आणि ते मिळेपर्यंत मालुताई संध्याकाळी देवापाशी दिवा लावत नसे... तो गजरा किंवा फुल केसात माळलं कि मालुताईला परिपूर्ण वाटत असे... मधुभाऊंना जेव्हा हार्ट ऍटॅक आला तेव्हा त्यांनी मालुताईकडून वचन घेतलं कि ते गेल्यानंतर ती स्वतः रोज एक गजरा किंवा फुल आणून ते केसात घालेल...
त्या संध्याकाळी होणारा सूर्यास्त होऊच नाही असं मालुताईला वाटत होतं... रोज सूर्यास्ताची वाट पाहणारी मालुताई, पण तिला कळून चुकलं होतं कि मधुभाऊंचा हा शेवटचा सूर्यास्त असेल आणि मालुताईसाठी कायमची हुरहुर लावणारा सुर्यास्त..."
"पण खरंच, शेवटच्या दिवसापर्यंत मालुताईने तिचा शब्द पाळला... हे सगळं इतकं जवळून पाहिलं आहे ना कि खरंच त्यांचं नातं काही वेगळंच होतं, ह्याची जाणीव होते... "
"मृदुला, प्रेम असं असावं... छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद आणि समाधान देणारं आणि त्या आनंदाची हक्कानं मागणी करणारं... आपल्या आयुष्यात अनेक सूर्यास्त येतील, पण त्यातच गुंतून न राहता, दुसऱ्यादिवशी येणाऱ्या सूर्योदयाच्या साक्षीने चांगली कार्ये करावीत..."
"काही पटलं तर घे, नाही तर सोडून दे... पण ह्या गोष्टीवर नक्की विचार कर... चल, झोपू या आता... "