क्रांती
क्रांती
आपल्या लेकीला विशेष कामगिरी बजावल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पदक मिळाल्याचा आनंद व अभिमान सरदेशमुख दाम्पत्याचा चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. स्वानंद पण आपल्या लहान बहिणीच्या या कर्तृत्वावर जाम खूष होता . औरंगाबाद येथे पहिल्यादांच पोलीस आयुक्त या पदावर रुजू झाल्यानंतर विदेशी पर्यटक व काही स्थानिक यांचे संगमतीने चालत असलेले ड्रग रॅकेट उध्वस्त करून अनेक तरुणांचे जीवन उध्वस्त होण्यापासून तीने वाचवले होते. याच कामगिरी बद्दलचे हे पदक होते.
लेकीचे हे कौतुक पाहतानाच सरदेशमुख दाम्पत्याचे मन गत काळात गेले. पोलीस आयुक्त असलेल्या आपल्या क्रांती सरदेशमुख या लेकीने ती १० वी मध्ये शिकत असतांना "तुम्ही मला नाव दिलंत मी हे नाव एका उंचीवर नेऊन ठेवेन " हे बोल खरे करून दाखविले अनाथ आश्रमातून १ वर्षाच्या क्रांतीला आणतांना ती एवढया मोठया पदावर जाईल व अशी कामगिरी बजावेल असे तेव्हा वाटले देखील नव्हते. त्यांच्या कुटूंबात एवढया मोठया पदावर कोणीही गेले नव्हते. क्रांतीने तिच्या नावाप्रमाणेच क्रांती केली होती .
आनंद सरदेशमुख हे स्वतः एका बँकेत मॅनेजर होते तर सौ सरदेशमुख या शिक्षिका होत्या. आनंद सरदेशमुखांना नोकरी सोबत सामाजिक कार्याची देखील आवड होती. विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. लग्नाअगोदरच पहिले मुलगा झाला तर नंतर मुलगी दत्तक घ्यायची व मुलगी झाली तर मुलगा दत्तक घ्यायचा असा त्यांनी निश्यय केला होता. हा मानस त्यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला देखील सांगितला. होणाऱ्या पत्नीने त्यास होकार दिला . यथावकाश सरदेशमुखांचे लग्न थाटामाटात पार पडले. पाटलांची शिक्षिका असलेली नंदा सौ सरदेशमुख झाली.
आनंद व नंदा यांच्या संसार वेलीवर स्वानंद नावाचे फुल उमलले . दोघेही त्याच्या बाललिला पहाण्यात त्याला वाढवण्यात व आपापल्या नोकरीत पुरती गुंतली होती. स्वानंद आता पाच वर्षाचा झाला. आनंदने नंदाकडे पहिले मुलगा असल्याने आपसूकच मुलगी दत्तक घेण्याचा विषय काढला . कारण हीच ती योग्य वेळ होती . परंतु नंदा हा विषय टाळत होती. झाले तर स्वतःपासूनच दुसरे मूल व्हावे , दत्तक मुलीला आपण स्वानंद सारखे प्रेम देऊ शकू का? ती मुलगी आपल्याला आई म्हणून स्वीकारेल का ? स्वानंद तिला बहीण म्हणून स्वीकारेल का ? भविष्यात काही या संबधी समस्या तर निर्माण होणार नाही ना ? असे अनेक प्रश्नाचे काहूर तिच्या मनात माजले. आनंदने तिच्या प्रत्येक प्रश्नाचे योग्य प्रकारे निरसन केले . तेव्हा कोठे ती राजी झाली.
"आई" म्ह्णून नंदाला त्या निरागस मुलीने मारलेली हाक नंदाचे सर्व प्रश्न माग
े सोडून गेली. दोघांनी एक मोठा कार्यक्रम करून तिचे नाव क्रांती असे ठेवले. स्वानंदला दादा झाल्याचा आनंद झाला. तो क्रांतीला मोठ्या भावाच्या मायेने खेळवू व सांभाळू लागला. 'निरागस मनात कोणतीही शंका नसते हेच खरं'. आनंद व नंदा या दोघांना वाढविण्यात मग्न होती. क्रांती हि दत्तक मुलगी आहे हे कालांतराने ते विसरलेही, इतके ते तिच्याशी समरस झाले .
यंदा क्रांती दहावी मध्ये होती. आधी ठरविल्याप्रमाणे बाहेरून कोठून कळल्यापेक्षा आपण क्रांतीला ती दत्तक मूल आहे हे सांगायचे असे आनंदने व नंदाने ठरविले. क्रांती पहिल्यांदा भावनाविवश झाली पण दोघांनी प्रेमाने समाजविल्यानंतर ती सावरली. कारण तिच्या अनुभवात होते कि स्वानंद व तिला वाढवतांना आनंद व नंदाने तिळमात्र फरक केला नव्हता. त्यांच्या प्रेमात कोणतीही कसर नव्हती. आपणही आपल्या आई-बाबांचे हर एक स्वप्न पूर्ण करावयाचे हे तीने ठरविले.
आपल्या एका तरी मुलाने आय.पी.एस. ऑफिसर व्हावे असे आनंदचे स्वप्न होते. कारण त्याच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व योग्य मार्गदर्शनाच्या अभावी हे स्वप्न स्वतः बाबतीत तो पूर्ण करू शकला नव्हता आपले हे स्वप्न मुलांवर मात्र तो कदापि लादणार नव्हता. स्वानंद व क्रांती दोघेही अभ्यासात हुशार होती . मुलांच्या योग्य वयात त्याने हे आपले स्वप्न त्यांना सांगितले. स्वानंद व क्रांती यांनी आनंदाने त्या दिशेने तयारीही सुरु केली . पण काही मार्काने स्वानंदला अपयश प्राप्त झाले, परंतु त्याच सोबत दिलेल्या बँक ऑफिसर च्या परीक्षेत त्याला यश प्राप्त झाले व स्वानंदने समजविल्यानंतर त्याने ते पद स्वीकारले.
स्वानंदने आपले अपयश क्रांतीच्या यशाने धुवून काढण्याचे ठरविले व त्याचा हा निश्चय क्रांतीने खरा करून दाखविला. पहिल्या प्रयत्नातच ती यू.पी.एस. ची परीक्षा पास झाली. खडतर प्रशिक्षण व काही ठिकाणी जोरदार कामगिरी केल्यानंतर तिची कामगिरी पाहून तिला औरंगाबाद येथे स्वत्रंतपणे पोलीस आयुक्त हे पद दिले गेले . ती औरंगाबादची पहिली महिला पोलीस आयुक्त होती व आज राष्ट्रपतिच्या हस्ते पदक मिळवून तिने आपली एक विशेष छाप सोडली.
क्रांतीने या यशानंतर प्रसार माध्यमांना बोलतांना आवर्जून आपल्या दत्तक असण्याचा व आपल्या आई-बाबांच्या त्यागाचा व भावाच्या प्रेमाचा व खंबीर पाठींब्याचा उल्लेख केला. सरदेशमुखातील सर्व सदस्यांनी जसे कि आनंद व नंदा यांनी क्रांतीला दत्तक घेऊन, स्वानंदने आपल्या लहान बहिणीला प्रोत्साहन व पाठींबाही देऊन व स्वतः क्रांतीने आई-बाबांचे स्वप्न पुंर्ण करून विशेष कामगिरी करत एक प्रकारची क्रांतीच केली होती.