कोर्टाची पायरी भाग १
कोर्टाची पायरी भाग १
D.E.S विधी महाविद्याय पुणे येथे १ ऑगस्ट २०१९ रोजी LL.M साठी प्रवेश घेतला. सुरुवातीचे काही महिने त्या शहरी वातावरणात रमून गेल्यानंतर ९/१२/२०१९ पासून शिवाजीनगर जिल्हा न्यायालय पुणे येथे ज्युनिअर शिप चालू केली. सप्टेंबर महिन्यात LL.M अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक सादरीकरण सुरु झाले व group leader म्हणून माझ्यावर दावा सादरीकरणासाठी विषय निवडायची जबाबदारी आली.
रोजच्या न्यायालयातील अनुभवावर विषय घ्यावा असे ठरवले व आजवर अनुभवलेले प्रसंग आठवू लागलो. ..... फेब्रुवरी महिना साधारण ३:३० दुपारची वेळ आमचे सिनियर बायकोच्या बाजूने व आमच्याच office चे अनुभवी ज्युनिअर नवऱ्याकडील बाजूने असा एक घटस्फोटाचा दावा होता व त्याचा निकाल लागला होता. घटस्फोट मंजुर झाला होता, आम्ही ४-५ वकील आणि त्या बाई बाहेर थांबलो होतो. त्यांच्या कडेवर ५-६ वर्षाची मुलगी होती. तिचे बाबा बाहेर आले तशी ती त्यांना जाऊन बिलगली. त्या लहान मुलीला काय माहित की तिचा ताबा आईला भेटल्यामुळे ती ठराविक वेळीच बाबांना भेटू शकणार होती....इथपर्यंत ठीक होते, पण जेव्हा नवरा बायको ची नजरा नजर झाली तेव्हा तो माणूस खुप भावुक झाला, ती बाई पण चोरून त्याचाकडे पहात होती व हळूच अश्रू पुसत होती, अस वाटत होतं की यांचा घटस्फोट उगीच झाला.
मला त्यांचा खुप राग आला. हीच बाई ३-४ महिने आमच्या office मधे येऊन सांगायची की तो माणूस खुप वाईट आहे.....मला आता त्याच्याबरोबर रहायचे नाही.... माझ्या मुलीवर वाईट संस्कार होतील.. इत्यादी आणि आज घटस्फोट मिळाला तर एकमेकांपासन दूर जाऊ शकत नव्हते. मग घेतलाच कशाला घटस्फोट?
नंतर वातावरण शांत करण्यासाठी आमचे सिनियर म्हणाले चला चहा घेऊ. आम्ही वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारल्या तेव्हा ती बाई म्हणत होती मला खूप दुःख होत आहे की माझा संसार उध्वस्त झाला, मी त्याला धडा शिकवला...पण माझं मन २०-२५ हजार पोटगी घेऊन त्याच्याशिवाय न राहण लवकर स्वीकारणार नाही. आमचे सिनियर त्यांना समजावत म्हणाले, म्हणून तर म्हणतात - शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये...!
