कोरोना काळातील संघर्ष 🧫
कोरोना काळातील संघर्ष 🧫
🌺 आणि पंधरा दिवसांत कोरोनाला चारीमुंड्या चीत करून माझा 'विजय' झाला...! 🌺
मला आपली ढासळलेली आरोग्य व्यवस्था, त्यामुळे होणारे मानसिक खच्चीकरण यावर इथे बोलायचं नाहीय, पण बेड मिळून सुद्धा उशिरा दाखल झाल्याने किंवा डायबिटीज किंवा तत्सम आजारामुळे कोरोना झाल्यावर खालावत जाणारी ऑक्सिजन लेव्हल आणि नंतर ती जिवलग व्यक्ती गमावणे हे अनेकदा जवळच्या लोकांच्या बाबतीत घडताना पाहिलंय. सध्या सर्वत्र कोरोनाची अनावश्यक भीती, त्यातुन होत असलेल्या मृत्यूंचे अतिरंजीत चित्र समाजासमोर मांडले जात आहेत. यामुळे होते काय आहे की, भीती व मानसिक दडपणामुळेच काहीजण स्वतःला कोरोना पेशंट समजत आहेत. कोरोना होवू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेतलीच पाहिजे, याबाबत दुमत नाहीच; पण कोरोना झाला म्हणजे सारे काही संपले असा गैरसमज करून घेऊ नका. तुमची प्रतिकार शक्ती व कोरोनाशी लढण्याची जिद्द, त्याच बरोबर वैद्यकीय उपचार यांमुळे कोरोनावर मात करता येते हे विसरता कामा नये.
नमस्कार.. मी कुलदिपक जीवन पुस्तोडे. स्मार्ट सिरेगावबांधचं माझं कुटुंब. बारावीचं वर्ष असल्यामुळे कोरोनाचा कहर असताना देखील आणि घरच्यांचा विरोध असूनसुद्धा मला शिक्षणासाठी शहराकडे जावे लागले. नंतर वर्षभर योग्य तितकी काळजी घेत सर्व सुरळीत चालू असतांना tution complete व्हायच्या शेवटच्या दिवशी रात्रीला होमवर्क पूर्ण करून सकाळीच कॉलेजला जाऊन एक विशेष कार्य करायचं म्हणून ठरवलंही होतं. पण अचानक त्याचदिवशी (8 एप्रिल, 2021 रोजी) सायंकाळच्या दरम्यान बाजारातून आणलेले काही फ्रुट्स खाल्यानंतर एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. ताप आणि डोकेदुखी व्हायला लागली. थोडाफार चाललं-लिहलं की थकवा यायला लागला. त्या रात्री कसंतरी जेवण करून Paracetamol ची गोळी खाऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशीही सकाळी ताप काही उतरत नव्हता. जोराची थंडी वाजत होती. कॉलेजला जायचं कॅन्सल करून दवाखान्यात जाऊन body temperature, oxygen level checkup करून डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या. ती औषधें तसेच इतर घरगुती उपचार करून देखील कसलाही फरक जाणवला नाही. उलट अंगदुखीचा त्रास वाढू लागला. नंतर सायंकाळच्या सत्रात आणखीन काही तपासण्या केल्या, त्यातही काही विशेष बिघाड नव्हता. औषधें बदलून घेतली तरी त्रास कमी झाला नाही. नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना टेस्ट करायच ठरवलं.
दुसऱ्या दिवशी (10 एप्रिलला) सकाळी ग्रामीण रूग्णालयात जाऊन टेस्ट केल्यावर कळलं की आपण कोरोनाबाधित झालोय. पॉझिटिव्हची रिपोर्ट हातात घेताना मात्र मानसिक धक्का जाणवत नव्हता. तिथल्याच मोफत गोळ्या घेतल्या आणि संक्रमणाची तीव्रता मध्यम असली तरी पुढे इन्फेक्शन वाढून इतर शारीरिक अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून खोब्रागडे सर तसेच गुरूनानी सरांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ भंडाराच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. मात्र तिथल्या उपचाराची भरमसाठ फीस ऐकून आणि तेथील तोबा गर्दी पाहता एक क्षण काळजात चर्र झाले. नव्हे या लोकांमुळे तर आपल्याला आणखीन जास्त इफेक्शन होणार नाही ना! या भीतीने पुढचा पाय मागे घेत बसस्थानकावर परतलो. तिथे चौकशी केल्यावर कळलं की पुढचे दोन दिवस सर्व शासकीय बस बंद असणार आहेत. इतर प्रायव्हेट साधनावालेही मर्यादा पलिकडचे पैसे लुटण्याचा प्रयत्न करत होते. नातेवाईकांच्या इथं थांबायचं म्हटलं तर कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारामुळे दोन दिवसांचा त्रास देणं उचित नव्हतं. त्यामुळे मग भांडाऱ्यापासून ते लाखनी पर्यंतचा (25 km) अंतर पायी चालून पार करायचं ठरवलं. धावता-धावता वैनगंगा नदीच्या जवळही पोहचलो. पण म्हणतात ना, संकटसमयी कोणत्या ना कोणत्या मार्गाने देव कुठल्यातरी रुपात येतोच! तसंच काहीसं घडलं माझ्याबाबतीत. लिफ्ट न मागताही एका मोठ्या मनाच्या दिलदार व्यक्तीने देवरूपानं येऊन माझ्यासमोर फोर्व्हिलर उभी केली. शारीरिक अंतर पाळत मागच्या शीट वर बसून मला लाखनी पर्यंत सोडून दिलं.
आई माझ्या तब्येतीची जास्तच चिंता करायची, आणि त्या दिवशी घरी कथेचा कार्यक्रम असल्यामुळे "दोन दिवसांनी रिपोर्ट मिळाल्यावरच कळणार" असं सांगून कोरोनाची लक्षणे पाठ झाली असल्याने मी स्वतःला रूमवरच आयसोलेटेड करून घेतलं. परंतु मुक गिळून बसायला व माणुसकीहीन जगायला कोरोनाने धडे द्यायला सुरुवात केली होती. पंचेंद्रियाचे महत्व तेव्हाच पटले जेव्हा जीभ व नाक संपावर गेले. म्हणजेच तोंडाची चव व वास ह्या दोन्ही इंद्रियांनी काम करणे बंद केले. कशासाठी? पोटासाठी एवढेच काय ते अन्न भक्षण चालू होते. घरमालिक काकाजींना माझी दशा पाहावली नाही. त्यांनी माझ्या खाण्यापिण्याची तसेच राहण्याची उत्तम सोय उपलब्ध व्हावी, यासाठी माझ्या घरच्यांना सर्व प्रकार सांगून टाकले. नंतर माझे बाबा नि रोशन दादा दोन टुव्हीलरनी मला गावी न्यायला आले. गावी पोहचायच्या आधीच माझ्यासाठी विलगीकरण कक्षापासून ते खाण्यापिण्याची सगळी अरेंजमेन्ट करून ठेवलेली होती. गावी यायला पूर्ण अंधारच पडला. सकाळपासून काहीच न खाल्यानं कितीतरी दिवसांनी उपाशीपोटी असल्यासारखे व आधाशा सारखे त्या रात्री जेवण केलं. Home quarantine राहून आपल्या माणसांपासून दूर राहणे, अगदी कुष्ठरोगी (नकळत वाळीत टाकल्यासारखे) व अस्पृश्य (त्याकाळचे) वाटत होते. अतिशय जीवघेणा प्रकार होता तो..
दुसऱ्या दिवशीपासून थोडा जास्तच अशक्तपणा जाणवत होता, जेवण जात नव्हतं, डोळे आग करत होते, घसा प्रचंड दुखत होता, बोलायला गेलं की खूप त्रास होत होता. पाचव्या दिवसापासून तर नाक वाहायला सुरवात झाला. सातव्या दिवशी कोरोनाचा विषाणू हृदयापर्यंत पोहचून जोराचा खोकला यायला लागला. सर्वसामान्य आजारपण वेगळे असतं पण कोरोनाचा इफेक्ट थोडं वेगळंच जाणवत होतं. 14-14 तास झोपूनच राहावं वाटायचं. ताप सकाळ-दुपार-संध्याकाळ 102 F पर्यंत असायचा. परंतू आक्सिजन लेव्हल 87 वर खाली आली, तरी मला किंचित पण दमा लागला नव्हता. कारण त्यावेळेस माझ्या शरीरात आक्सीजनची पातळी कमी असली तरी मी अजिबात घाबरलो नाही. सकारात्मक विचार करत, न घाबरता परिस्थितीला सामोरे जात राहिलो. माझ्याकडे काकांनी दिलेलं ऑक्सीमीटर असल्याकारणाने मला सतत ऑक्सीजन लेव्हल मोजायला कामी पडत होते. तसेच वाचनासोबत सकस प्रोटीन युक्त आहार घेतला. लिंबूपाणी, वाफारा, काढे, औषधं, गिलोय सोड्याचे नस्य, हळद दूध जितके काय-काय म्हणून उपाय सापडतील तितकेे सर्व करून पाहिलेत.
एका आठवड्यानंतर व्यवस्थित सर्व स्थिरस्थावर होत गेलं. सर्वांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायततर्फे आयोजित केलेल्या लसीकरण शिबिरात एका टोकनवर पूर्ण फॅमिली, अरे वा तेही फुकट! मग काय विचारता अख्खे कुटुंब टेस्टसाठी लढायला सज्ज झाले, जसे मावळे येतात तसे. एक पूर्ण दिवस फक्त टेस्टमध्येच गेला. सगळं कसं मन सुन्न करून टाकणारे होतं. परंतु एकदा घशात हात टाकला की हाडूक काढूनच बाहेर यायचं होतं आणि मग एकदाचा नंबर लागला की खिडकीजवळ येऊन जेव्हा आतून निगेटिव्ह असा शब्द ऐकू येई तेव्हा मात्र आभाळ ठेंगणे वाटायला लागे. सर्वांच्या रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर कोणाला कशात आनंद उपभोगता आला पाहिजे हे मात्र गूढच होतं. मग सगळे युद्ध जिंकून आल्यासारखे विजयी घोडदौड करीत घरी परतले.
सर्व प्रकाराला 14 दिवस उलटून गेल्यावर आता मात्र माझ्यात बरं होण्याची उमेद जाणवू लागली. माझ्यात हुशारी-तर्तरी येऊन सर्व लक्षणे नाहीशी होत गेली. एप्रिल 23 तारखेपर्यंत मी एकदम स्वस्थ झालो. मला थोडाफार खोकला येत होता, तोही बंद झाला. ताप ही पूर्णपणे निघून गेला. योग्य औषधोपचार, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी वर्ग तसेच आशावर्कर स्टाफचे विशेष सहकार्य, कुटुंबातील लोकांचे प्रेम, काळजी यामुळे लवकरात लवकर बरा होऊ शकलो. गेली जवळपास 15 दिवस चार भिंतीच्या आत घालवून, थोडक्यात सगळं निभवून घेतलं आणि पुन्हा प्रायव्हेट हॉस्पिटलचं तोंड बघण्याची गरज नाही पडली यातच धन्यता मानली. कारण सिरीयस नसतांनाही चांगले 20 हजारांपर्यंत बिल काढणारे डॉक्टरांचे अनुभव मित्रांकडून ऐकले होते. ग्रामपंचायतीने दिलेल्या विहित कालावधीतील होमक्वारंटाईन पिरेड पूर्ण करून पुरेसा आराम करून कोरोना या जीवघेण्या आजाराचा सामना करत त्यातुन सहीसलामत बाहेर पडून आज आपल्या स्वगृही परतल्यावर घरी येण्याने सर्व परिवाराने अतिशय आंनदात हर्ष उल्हासात माझे स्वागत केले.
आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतलो आहे, परंतु लढाई अजून संपलेली नाही.. "कोरोना मुक्त शहर व गाव करणे" हेच आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. करोनाला तुम्हीही घाबरून जाऊ नका. हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. आपणच आपली काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. सद्या इतकंच सांगू इच्छितो– शक्य तितकी काळजी घ्या. कामानिमित्त घराबाहेर जावंच लागतं, अनेक व्यवहार करावे लागतात. पण हे सगळं सांभाळून मास्क-सॅनिटायजर चा वापर, सोशल डिस्टन्सचे पालन, सार्वजनिक कार्यक्रम टाळणे आणि घरातील बाल-वृद्ध लोकांचा इतरांशी कमीत कमी संपर्क असेल असे पाहणे… अश्या काही गोष्टी प्रकर्षाने पळूयात.
आपण या संकट काळात माझ्या व कुटुंबाच्या आरोग्याच्या काळजी पोटी मला फोन वर, एस एम एस वर, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून धीर दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. स्वतःची तब्येत बरी नसतांनाही मदत करायला सक्रिय असलेले माझे लाडके काका-काकू, नेहमीप्रमाणे पाहाडासारखे खंबीर सोबत असलेले आई-बाबा, ताई-आजी-दादा यांचा सतत सबळ पाठिंबा राहिला. मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईक सोबत होते म्हणूनच कोरोनावर अल्पावधीत मात करणं शक्य झालं. जिवलग, नातलग आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व धन्यवाद. कोरोना सारखे हजारो शत्रू मला हरवायला माझ्या समोर तळ देऊन सैन्य घेऊन उभे आहेत. त्यांना वाटतंय हा कुलदिपक आता हरेल, तेव्हा हरेल. पण प्रत्येक परिस्थितीत त्यांना शह बसतोय माझा. मी अभ्यास करणं सोडणार नाहीय. मी लढत-झगडत-झुंजत राहणार आहे. कोरोनाने सध्या तरी माझं कंबर्ड मोडलं असलं तरी त्यावर मलमपट्टी, फ्रॅक्चर वर बँडेज लावायचं काम युद्धाच्या वेगाने सुरु आहे. मी परत आयुवेगाने भराऱ्या मारण्यासाठी सिद्ध होतोय. फक्त तुम्ही सोबत राहा बस. तुमची पाठीवर थाप मारून, फक्त बाळा लढत रहा इतकंच म्हणणं पुरेसे आहे. बाकी हा पठ्ठ्या आहेच, भल्या-भल्या वादळांशी भिडायला...!
🤝💝👑🦠😷🥰🙏
✍️ Date :- 23/04/2021
___________________________________
ज्याच्या प्रेरणेचे ऋणी असणारे माझे कर्तव्य, ज्यांचे अनंत उपकार मला जगण्याची उर्जा देणारे आहेत असे माझे अखंड उर्जास्त्रोत असणारे माझ्या काळजातल्या आई-वडिलांचे आदर्श ठेवत माझी वयाची 18 वर्षे पूर्ण होताच, मी आज बजाज कॅम्पलेक्स मुस्लिम लायब्ररी चौक भंडारा येथे जाऊन आदरणीय आमदार नरेंद्रभाऊ भोंडेकर साहेब, तसेच या शाखेतील आजी/माजी पदाधिकारी, शिवसैनिक आणि रक्तपेढी रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत बी पॉझिटिव्हीचा प्लाझ्मा गरजू कोव्हीड रुग्णांसाठी 'आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो' या प्रामाणिक भावनेने खारीचा वाटा म्हणून प्लाझ्मादान केलाय.. जे दान म्हणून आलं तेच दान देऊन टाकलंय. प्लाझ्माचं काय? ते तर एका दिवसात पुन्हा शरीरात साचणार आहे...
पोस्ट टाकण्यामागचा उद्देश हाच की कोरोना बाधित रुग्णांना प्लाझ्मा थेरपीमुळे पॅसिव्ह इम्युनिटी (दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात निर्माण झालेल्या विषाणू विरोधक अँटीबॉडीज) मिळते. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण हा कमी कालावधीत बरा होतो. Covid-19 संसर्गातून बऱ्या झालेल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की, कृपया जवळच्या ब्लड बँक मधे जाऊन प्लाझ्मा डोनेट करा आणि इतरांच्या उपचाराकरिता हातभार लावून आरोग्य विभागास मदत करावा...
वाढदिवस म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यातील आनंद वाढवणारा दिवस. आयुष्याच्या रेखीव मार्गावर कौतुक करून घेण्यास लाभलेला एक अल्पविराम! किती जगलो, कसे जगलो, काय मिळवले, काय कमावले, काय आत्मसात केले याचे सिंहावलोकन करण्याचा दिवस... वाढदिवसानिमित्त ज्यांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या, ज्यांनी मनात असूनही नाही दिल्या, ज्यांनी मनात नसूनही दिल्या, ज्यांना अजूनही शुभेच्छा देऊ की नको हा पेच सोडवता नाही आला अशा सर्वांना लब्यु.. असेच प्रेम नेहमी राहू द्या अशी अपेक्षा ठेवतो. तुम्ही कायम हृदयात आहातच, कधीही कोठेही माझी गरज पडली तर फक्त हाक द्या...
पुन:श्च एकदा सर्वांचे मनःपूर्वक अनंत आभार...!!
🙏तुमचाच स्नेहांकीत🙏
✍ जीवनबाऴ ✍
(कुलदिपक जीवन पुस्तोडे)
📞 7796558327
✍️ Date :- 27/07/2021
