खेळ
खेळ
माझं बालपण मुंबईत गेलं, आम्ही अंधेरीत राहायचो. मुंबईत तेंव्हा चाळ होत्या. आम्ही पण चाळीत राहायचो, फक्त सहा घरं होती. आम्ही ६ नंबरच्या खोलीत राहायचो.
५ नंबरच्या खोलीत श्री मोहन राव यांचं कुटुंब राहायचं, त्यांना ५ मुलं होती कुशला, उषा, प्रतिमा अशा ३ मुली व सुधीर आणि अजित अशी २ मुलं.त्यांचे वडील एअर इंडियात नौकरी करीत असे. मी एकुलता एक.
३ मुली साधारण माझ्या वयाच्या होत्या, त्यात प्रतिमा माझ्या वयाची. माझं तिच्याशी खूप जमायचं, पण त्या तिघी शाळेत जायच्या व माझा जन्म ऑक्टोबर मधला असल्यामुळे शाळेत दाखला मिळायला विलंब झाला.
मला जे काही अंधूकसं आठवतं काही एक दोन वर्षा नंतर श्री मोहन राव ह्यांना ऑफिसनी राहायला जागा दिली. आम्ही त्यांच्या नविन जागेत पूजेसाठी गेलो होतो, खूप मोठी जागा होती. लपाछपी खेळायला खूप चांगली जागा होती. लपायला ऐसपैस जागा होती. आम्ही सगळेच खूप खेळलो अगदी मनसोक्त.
मला आठवतंय शेवटचा डाव, माझ्यावर राज्य होतं, आम्ही सगळेच शेवटचा डाव खेळत होतो ह्याची कोणालाच माहीत नव्हती.
त्या दिवशी मी लपाछपीच्या खेळात सर्वांना शोधळं ते शेवटचं. त्या नंतर आम्ही परत खेळलोच नाही, शोधायचं प्रश्नच येत नाही. ते कुटुंबच गायब झालं. बालपण हरवलं, लपाछपीचा खेळ कायम स्मरणात राहिला.
असा विचित्र खेळ झाला की आज मी ६० वर्षाचा आहे आणि ते कुटुंब सापडलं नाही. लपाछपीच्या खेळात कायमच लपलं अन् राज्य माझ्यावरच राहिले.
