खाणार काय?
खाणार काय?


‘तुम्ही स्वतः तुमच्या मित्राचं लवमॅरेज लावलेलं असूनही आमच्या प्रेमामध्ये मात्र अडथळे का आणताहात?’ संध्याकाळी ऑफिसमधून बसस्टॉपवर पोहोचलो तोच, अचानक माझ्या समोर आलेल्या एका वीस-बावीस वर्षांच्या मुलीने मला खडसावलं. आधी मी भांबावलो खरा, पण लगेचच माझी ट्यूब पेटली.
‘समोर भेळ खातखात निवांत बोलायचं का आपण?’ रस्त्याच्या दुसर्या बाजूला असणार्या भेळेच्या गाडीकडे बोट दाखवत मी विचारलं. काहीही आढेवेढे न घेता ती तयार झाली यावरून तिला माझ्याशी बोलण्याची निकड जाणवत होती. रस्ता क्रॉस करतांना प्रदीपला मेसेज पाठवला. उत्तराएवजी त्याने फोन केला आणि तिच्या भेटीची पार्श्वभूमी माझ्या लक्षात आली.
दहा वर्षांपूर्वी अजय ह्या आमच्या जिवलग मित्राचा प्रेमविवाह प्रदीप व आम्ही इतर मित्रांनी मोठ्या विरोधानंतर घडवून आणला होता. हा अनुभव घेतल्यानंतर प्रदीपने इतर प्रेमी जिवांचे मिलन घडवून आणण्याचा विडा उचलला, त्यासाठी त्याने दोन-चार समविचारी मित्र मिळून एक संस्थाही उभारली होती. कुणाला प्रेमविवाह करायचा आहे याचा शोध घेऊन ही संस्था त्या प्रेमी जोडप्याला कायदेशीर, आर्थिक आणि गरज पडली तर दंडभुजा थोपटून मदत करायची. मात्र त्याच्या संस्थेला जमेल तेवढी आर्थिक मदत करण्यापलीकडे मी त्या भानगडीमधे कधीच इंटरेस्ट घेतला नाही. तो मात्र नवीन जिवांचे संसार उभे करण्यापासून संसाराच्या झळा बसायला लागल्यावर त्यांच्या सुरू होणार्या कुरबुरी सोडवण्यापर्यन्त सगळे उद्योग करायचा. नंतर नंतर प्रेमविवाह करण्यास इच्छुक जोडपी कमी यायला लागली अन त्याची संस्था (म्हणजे तो एकटाच, बाकी सभासद कॉलेजनंतर आपापल्या उद्योगांना लागले होते) आधी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांच्या एकमेकांत होणार्या वादविवादातच अडकून पडली. शेवटी काही प्रकरणं डिवोर्स पर्यन्त जाऊन पोहोचली, पण प्रदीप खरा कोलमडला तो प्रेमविवाहानंतर दोन वर्षांनी एका मुलीने केलेल्या आत्महत्येनंतर. तो प्रेमविवाह त्यानेच घडवून आणला होता. भयंकर मनस्तापात त्याने आपली संस्था कायमची बंद केली त्या गोष्टीलाही आता चार वर्ष झाली.
तर अशा ह्या प्रदीपच्या बायकोचा रवी हा सख्खा भाऊ, आणि रवी नावाच्या त्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमपाखराची एबीसीडी नावाची ही प्रेयसी, आपली पाणीपुरी भराभरा संपवल्यानंतर माझी पाणीपुरी संपायची डोळे वाटारुन वाट पहात होती.
“मी एबीसीडी”. शेवटी तिचा संयम संपलाच.
“माहितीये मला. खाणार काय?” मी आधीची पाणीपुरी घशाखाली लोटून दुसरी कोंबण्याआधी विचारलं.
“अहो काका, मी काय म्हणतेय? तुम्हाला फक्त खायचीच पडलिये का?” एबीसीडी अजूनच रागावली.
“लग्नानंतर... लग्नानंतर खाणार काय ते विचारलं मी? रवीसोबत लग्न करायचंय ना तुला? समज झालं. पुढे काय?” मी एवढं बोलेपर्यंत पाणीपुरी माझ्या हातातच फुटली.
“तुम्हाला काय त्याचं? आमचं आम्ही बघून घेऊ”. ती आढ्यातखोरपणे म्हणाली.
“तुझी कोण काळजी करतंय इथे? मला फक्त रवीची पडलिये. तो काही कामधंदा करत नाही. शिक्षणाच्या नावानेही बोंबाच मारणार असं दिसतंय. तू नोकरी करून त्याला सांभाळणार आहेस का लग्नानंतर?” मी पुढच्या प्लेटची ऑर्डर दिली.
“का? तो वडिलांना मदत करतो की दुकान सांभाळायला. व्यवहारज्ञान आहे त्याला. चांगला इन्कम सुद्धा आहे त्यांच्या होलसेल स्टेशनरी शॉपचा”. तिचा आवाज आता थोडा नॉर्मल झाला होता.
“त्याच्या बापाचं दुकान? वेडी आहेस का तू? मी चांगला ओळखतो माझ्या मित्राच्या सासर्याला. अजून त्यांच्यापर्यन्त तुमचं प्रकरण पोहोचलं नाही म्हणून ठीक आहे. जेव्हा माहीत पडेल ना, त्याच्या पुढच्या क्षणी लाथ मारून घराबाहेर काढतील ते रवीला. रवी हा एकुलता एक मुलगा असला तरी त्या म्हातार्याची विचारसारणी ठाम आहे. तेव्हा रवी हा तुला रस्त्यावर सापडलेला अनाथ प्रियकर आहे असं समजून पुढचा विचार कर”. माझी प्लेट आली होती आणि माझा बॉम्बपण जबरदस्त होता. त्यामुळे आख्खी प्लेट संपेपर्यंत एबीसीडीने मला डिस्टर्ब केलं नाही.
“का? काय झालं?” मी आंबटतिखट ढेकर देत विचारलं.
“ का.. काहीच नाही. पण म्हणून काय झालं. तो दुसरं करेल की काहीतरी काम. पण आम्ही लग्न करणारंच आहेत. आमचं खूप खूप प्रेम आहे एकमेकांवर”. ती आता थोडीशी चाचरली होती.
“प्रेमाबद्दल कोण शंका घेतंय इथे? मी फक्त खाण्याबद्दल बोलतोय. चल, आईस्क्रीम खाऊ”. मी बाजूच्या गाडीकडे मोर्चा वळवला.
“तर रवी हा चार मोठ्या बहीणींनंतरचा नवसाने झालेला लाडोबा आहे. स्वत:च्या बापाच्या दुकानात आरामशीर गल्ल्यावर बसण्यापलीकडे त्याला कामाची फारशी सवय नाही. तुम्ही दोघं एकाच कॉलेजला असल्याने त्याचं अभ्यासात खरंच किती लक्ष आहे आणि त्याला डिग्री मिळून नेमकी काय लायकीची नोकरी लागेल हे तुला आमच्यापेक्षा जास्त चांगलं माहीत असणार. म्हणून विचारतोय खाणार काय? आणि ते कमावून नेमकं कोण आणणार? तू काय तुझ्या बापाला 5-50 लाखांचा चुना लावून रवीला एखादं दुकान थाटून देणार आहेस का? तुझ्या घरची परिस्थिती मला माहीत नाही पण तसं असेल तर उत्तम. तू बिनधास्त त्याच्याशी लग्न करू शकतेस. हवं तर सह्या करायला मी येतो”. कपामधे पाघळणार्या आईस्क्रीमकडे माझं लक्ष गेलं.
“तुम्ही उगाच घाबरवताय मला. आमचे लग्न होऊ नये असंच वाटतंय ना तुम्हाला? पण मी खंबीर आहे. मला आत्ता नोकरी लागू शकते. रवीसुद्धा करेलच काहीतरी कामधंदा. प्रेम सगळं शिकवतं माणसाला. त्याच्या वडिलांनी काढलं तर काढू देत त्याला घराबाहेर”. असं म्हणत तिने आईस्क्रीमचा रिकामा कप डस्टबिनमधे फेकला. आता पर्यायच नव्हता. आईस्क्रीमचे पैसे देऊन मी चिल्लर खिशात घातली व आम्ही पुन्हा बसस्टॉपकडे निघालो.
“रवी चार दिवसांपासून कॉलेजला का आला नाही? माहीत नसेलंच ना तुला?” मी विचारलं.
“नाही. पण त्यांच्या घरी नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार, हे त्याचा फोन कंटीन्युअस बंद यायला लागला तेव्हा मला कळून चुकलं. म्हणून तर मी सरळ प्रदीपजींच्या ऑफिसमधे जाऊन धडकले. त्यांनी मला रवीबद्दल काहीही सांगायला नकार देऊन तुमच्या मैत्रीचे संदर्भ दिले फक्त. त्यामुळेच मला कळालं की तुम्हीही एकेकाळी तुमच्या मित्राचं लवमॅरेज लावलेलं आहे. तुम्ही ‘हो’ म्हणालात तर ते सुद्धा आमच्या लग्नाला परवानगी देतील म्हणे. जसं काही आम्ही तुमच्यावरंच अवलंबून आहोत”. एबीसीडीच्या माझ्यावरच्या रागाचं खरं कारण आता मला कळालं. प्रदीपने जरा जास्तच दीडशहाणेपणा करून ठेवलेला दिसत होता.
“बरं आता लक्ष देऊन ऐक. एक मुलगी म्हणून मला फक्त तुझीच काळजी वाटतेय हे समजून घे. चार दिवसांपूर्वी वडील गावाला गेलेत हे पाहून रवीने त्याच्या आईला तुझ्याबद्दल सांगितलं. त्याला वाटलं लहानपणापासून आपले सगळे लाड पूर्ण होत आलेत, हा सुद्धा पूर्ण होईल. त्याच्या आईने लेक-जावयाला बोलावून घेतलं. प्रदीपच्या बायकोने रवीचे चांगलेच कान उपटले तेव्हापासून तो ‘तुम्ही म्हणाल तसंच वागेन मी. फक्त एबीसीडीला समजावून सांगा’ असं म्हणतोय. तुला भेटायची त्यांच्या घरात कुणाचीच ईच्छा नसल्याने शेवटी हे काम माझ्यावर सोपवण्यात आलं. तू प्रदीपच्या ऑफिसवर जाऊन धडकली नसतीस तरी येत्या शनिवारी मी तुला शोधत येणारच होतो.
तुला भेटण्याआधी रवीचं नेमकं म्हणणं तरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्याच्याकडे गेलो. तिथली परिस्थिती तापलेली आहे. रवीचा मोबाईल त्याच्या बहिणीने काढून घेतलाय आणि त्याला घराबाहेर पडण्यास मनाई आहे. घरच्यांकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा नसल्याने रवी एकदम ढेपाळून गेलाय. रागावू नकोस, पण मी सुद्धा भरपूर झापलं त्याला आणि एकच ऑफर दिली. त्याने ती स्वीकारली असती तर... मनापासून सांगतो, मी स्वत:च तुमचं लग्न लावून दिलं असतं”. मी म्हणालो.
“ऑफर काय होती?” एबीसीडीने विचारलं.
“तुझ्याशी लग्न करायचं असेल तर आत्ताच्या आत्ता स्वत:च्या हिमतीवर घराबाहेर पड’. असं मी त्याला सांगितलं”.
“मग? मग काय म्हणाला तो?” बिचारीचा जीव टांगणीला लागला होता.
“काहीच नाही. तो फक्त क्षुब्ध नजरेने आढ्याकडे पहात बसला. तुला प्रामाणिकपणे सांगतो, ‘माझं जिवापाड प्रेम आहे त्या मुलीवर. मी लग्न करेन तर तिच्याशीच. तिला तरी स्वीकारा किंवा मला तरी विसरा’ असं म्हणून तो त्याच क्षणी घराबाहेर पडला असता ना, तर मी त्याच्या घरच्यांचं मन वळवून तुमच्या लग्नाला होकार मिळवला असता. पण त्याच्या लटपटनार्या पायांमध्येही बळ नव्हतं ना त्याच्या अडखळनार्या जिभेमधे. तो तसाच बसून राहिला अन मी तुझी भेट घ्यायचं नक्की केलं.
प्रेम करणं ठीक आहे बेटा, पण संसार थाटून तो पूर्णत्वास नेणं हे फारंच मोठं दिव्य असतं. लग्न झाल्यावरंच प्रेमाची खरी परीक्षा सुरू होते. प्रेमविवाहातली मोठी अडचण अशी की, ही परीक्षा देणार्या दोघांच्याही पायात घट्ट बळ असावं लागतं. सगळया जगाशी लढण्याची ताकद ठेवावी लागते स्वत:च्या मनगटांत.
आता मला सांग, स्वत:चं प्रेम पूर्णत्वास नेण्यासाठी ज्याच्या स्वत:च्या धमन्यांमधलं रक्त उसळत नाही, अशा परोपजीवी मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवून तू संसाराच्या महाभारतात उतरणार आहेस का? आणि काळजी करू नकोस. उद्यापासून पुन्हा पाठवतोय मी रवीला कॉलेजमधे. फक्त आज रात्रभर मी जे सांगितलंय त्यावर शांतपणे विचार कर आणि मगच त्याला भेट.
महत्वाची सूचना, आपली भेट झालीये हे कळू न देता त्याला नेमकं काय म्हणायचंय ते समजून घे. कुठलाही निर्णय घ्यायची घाई करू नकोस. सगळया शंकांचं निरसन करण्यासाठी मी आहेच. मला भेटण्यासाठी कुठलाही किंतु-परंतु नको. अयुष्य तुझं आहे आणि निर्णय तुझाच असेल हा माझा शब्द आहे. आणि हो, पुढच्या वेळी घरी ये. आमच्या जॉइन्ट फॅमिलीमधे मन रमेल तुझं. मोकळा श्वास घ्यायला आणि अयुष्य बदलणार्या वळनांना सामोरं जाण्यासाठी उत्कृष्ट वातावरण असतं जॉइन्ट फॅमिली म्हणजे. अहंकार बाजूला ठेवून मन मोकळं करता आलं पाहिजे फक्त”. एवढं सांगून मी एबीसीडीचा निरोप घेतला. ती बसमधे चढत असतांना ‘ह्या एवढ्याशा मुलीला हे सगळं पचनी पडेल का?’ याचा मी विचार करत होतो.
“पण साल्या, तू तुझ्या स्वत:च्या डोक्यावर का पापं मारून घेतोयेस? उद्या समजा ‘तुला नेमकं काय म्हणायचंय ते त्या मुलीला खरोखरंच समजलं’ तर होणार्या प्रेमभंगाला तूच जबाबदार असशील”. अजय पोटतिडकीने बोलत होता.
“मी तिला परिस्थिती समजावून सांगतोय फक्त”. मी हात वर केले.
“पण तुला गरजच काय? आणि किती जणांना समजतं रे तुझं एवढं खोलवर तत्वज्ञान? प्रेम आंधळं असतं रे राजा. एकतर तुम्ही त्यांचं प्रेम पूर्ण करायला सपोर्ट केला पाहिजे अन्यथा थोबाड बंद ठेवायला पाहिजे. नाहीतर प्रेमाचे शत्रू असलेल्या जगात तुमची गणती झालीच म्हणून समजा”. अजय म्हणाला.
“स्वत:च्या अनुभवावरून सांगतोहेस ना?” मी मोठयाने हसत त्याच्या पाठीवर थाप मारली.
“तसं म्हण हवं तर, माझं अन अनूचं लग्न झालं त्याआधी मला असंच वाटायचं. सपोर्ट करणारे तुम्ही मोजके मित्र सोडले तर बाकी आख्ख्या जगाला आग लावायची तयारी होती त्यावेळी”. त्याने प्रांजळपणे काबुल केलं.
“इतकं महत्वाचं असतं का रे प्रेम पूर्ण होणं? नाही, म्हणजे सगळ्या जगाला आग लावण्याइतपत?” मी विचारलं.
“तुझाच घोगरा आवाज माझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय मित्रा. अजूनही झुरतोस ना तिच्यासाठी?” अजय सहानुभूतीने म्हणाला.
“झुरतो असं नाही. पण येते कधी कधी आठवण. कुठलातरी कप्पा अडवूनच बसलीये ती काळजाचा. त्याला आता ती तरी काय करणार अन मी तरी काय करणार? चालायचंच. पण त्यासाठी मी जगाला आग लावली नाही ते एक बरंच झालं. नाहीतर वैशाली सारखी प्रेमळ बायको अन अर्णव – अर्पिता सारखे गोड पिल्लं कुठून मिळाले असते?” मी आवाज व विषय दोन्हीही बदलला.
“विषय बदलू नकोस साल्या. एकदातरी बोलायला हवं होतं रे तिच्याशी. कायमस्वरूपी एकतर्फी झुरणं पत्करलंस. कसले ते तुझे भंकस इथिक्स. स्वत: पण काही केलं नाही, अन आम्हाला पण मदत करू दिली नाही. तुझ्यासाठी जान पण हाजिर होती रे”. तो पोटतिडकीने म्हणाला.
“हाच तर मुद्दा आहे. जीव देण्या-घेण्या इतपत काहीच महत्वाचं नसतं रे, आणि प्रेम तर नाहीच नाही. जे प्रेम तुम्हाला जगायला शिकवत नाही ते प्रेम काय कामाचं?” बराच वेळची शांतता मी भंग केली.
“झालं तुझं तत्वज्ञान पुन्हा सुरू. ‘तू तुझ्या स्वत:च्या डोक्यावर का पापं मारून घेतोयेस?’ एवढाच मुद्दा आहे”. अजय पुन्हा मूळपदावर आला.
“मी सगळी परिस्थिती समोर मांडायचं काम करतो फक्त. प्रेमाला सपोर्ट किंवा विरोध याच्याही पलीकडे बरंच काही असतं रे. प्रेमीयुगुलासमोर ते सगळं आलं पाहिजे. प्रेमविवाह करून आपण ‘काय मिळवणार किंवा काय काय सोडणार’ यावर विचार करून मगच खंबीरपणे कुठलाही निर्णय घेतला जायला हवा. आपल्या निर्णयाबद्दल आयुष्यात पुन्हा कधीच अपराधी वाटता कामा नये. इतकी साधी सरळ विचारसारणी आहे माझी”. मी म्हणालो.
“हे सगळं मान्य केलं तरी, इतका विचार करायचं वय नसतं बाबा ते. प्रेम करायच्या वयात या सगळ्याचा विचार करणारा आख्ख्या पृथ्वीतलावर तूच एकटा नमुना असशील”. अजय मोठयाने हसला.
“नाही मित्रा. आणखीही आहेत. तुझ्या बायकोने प्रेमात आंधळं होऊन नाही लग्न केलेलं तुझ्याशी. तुमच्या प्रेमविवाहाला सपोर्ट करण्याआधी मी सविस्तर बोललो होतो अनूशी. त्यानंतरही तिने तुझ्याशी लग्न केलं, याचा अर्थ ती सुद्धा एक मोठाच नमुना आहे”. आता हसायची माझी पाळी होती आणि अजयचे डोळे खोबणीतून बाहेर पडण्याइतपत आश्चर्याने मोठे झाले होते.
“अनू? म्हणजे तू अनूला तुझी सगळी बकवास आमच्या लग्नाआधीच ऐकवली होती? साल्या, माझं लग्न मोडलं असतं म्हणजे?” त्याने माझ्या पाठीवर थाप मारत नवीन माहिती खेळीमेळीने घेतली.
“तुझं नाही मोडलं, पण ‘दुसरे बरेच प्रेमविवाह नाही होऊ शकले माझ्या बोलण्याचा विचार केल्यानंतर’ एवढं मात्र खरं”. मी कबुली दिली.
“नाहीच होणार ना. संन्यास घेतला असेल सर्वांनी तुझं प्रवचन ऐकल्यावर. आज कळालं मला, अनू लग्न झाल्यापासून एवढी संत कशी झाली ते”. अजय गमतीने म्हणाला आणि आम्ही निरोप घेतला.