Sanika Yeole

Fantasy

3.9  

Sanika Yeole

Fantasy

काल्पनिक प्रवास

काल्पनिक प्रवास

3 mins
326


नाव थोडं अजब आहे ना! असणारंच! आजचा विषय तसा खास नाही पण असा मात्र खरंच खूप खास आहे. इच्छा म्हणा किंवा स्वप्न पण आपल्यातल्या प्रत्येकालाच या धावपळीच्या जीवनात चार निवांताचे क्षण हवेहवेसे वाटतातच. अर्थात फार कमी असे क्षण असतात जे आपण मनभरून जगतो. शाळेतलं शिक्षण घेऊन कॉलेजची मज्जामस्ती सगळं सुटल्यानंतर आपण कधी कायमचे वेळेशी बांधले जातो आणि कागदाच्या त्या चार नोटांमागे पैसे-पैसे करत पळू लागतो हे आपलं आपल्यालासुद्धा कळत नाही. आणि नंतर मग आपल्याला शोधणं, घडवणं कुठेतरी मागे पडतं. आयुष्यात कितीही माणसं आली तरी आपले खास आणि जवळचे फक्त आपणच असतो. पण नोकरी, जबाबदाऱ्या , कर्तव्य या सगळ्यात आपण असे अडकून जातो की आपल्या स्वतःप्रतिसुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत हे विसरूनच जातो. स्वतःला आपल्या नकळत आपण हरवून बसतो.. पण तरीही.. तरीही कुठेतरी आपण उरत असतो.... आपल्यातच!...स्वतःला आधीसारखं हसताना, हट्ट करताना, आरशासमोर नखरे करताना पाहावं, पुन्हा एकदा त्याच गृपमधला सगळ्यांचा लाडका सदस्य व्हावं असंही वाटत असतं. स्वतःच्या आवडी-निवडींना वेळ देणं, आपल्या छंदांना जोपासणं नव्याने सुरू करावसं वाटतं. कुठेतरी स्वतःसाठी वेळ द्यावा असं आपसूकच मनात येऊन जातं. आणि मग आपल्यातला अल्लडपणा जगता यावा म्हणून एक उनाड दिवस घेऊन सुरू होतो आपला एक अविस्मरणीय काल्पनिक प्रवास!!..


तो पूर्ण एक दिवस आपला असतो. सकाळी आरामात उठतो. गरम गरम चहाचा कप हातात घेऊन मोकळ्या-चोकळ्या बाल्कनीत हवेतला गारवा अनुभवत असतो. मग हळूच बाल्कनीत असलेल्या त्या झोपाळ्यावर नजर पडते आणि झुलण्याचा मोह झोपाळा झुलायला भाग पाडतो. झोपाळा झुलत-झुलत अचानक लहानपणीच्या बालगीतांची आठवण होते.. चाल लावून म्हटलेल्या त्या कविता आजही तशाच ओठांवर तरळत असतात. आणि मनसोक्त झोपाळा झुलल्यावर बाहेरच्या जगाची एक सैर करावी असं वाटतं. बाहेर जायचं म्हणजे सजणं-सवरणं आलंच. मग झोपाळा सोडून पाय आता बेडरूमकडे वळतात. कपाटातले ढीगभर कपडे सोडून एक जपून ठेवलेला सगळ्यात आवडीचा ड्रेस हातात येतो. ड्रेस कसा दिसतोय हे बघताना हाताची बोटं अलगद रेडिओचं बटन दाबून मोकळी होतात. मग त्या गाण्यांवर थिरकत थिरकत आपण तयार होत असतो. तयारीचा सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे आरसा!! आणि आरसा मुलींचा सगळ्यात आवडता असतो बरं का!!.. मग त्या आरशासमोर उभं राहून आपण स्वतःला न्याहाळत असतो, काय केलं म्हणजे सुंदर दिसू याच विचारात बरीच तयारी करतो. आरशासमोरून हलणार तितक्यात परफ्युमची आठवण होते आणि नकळत तो परफ्युम कपड्यांवर फुसफूसला जातो. त्यानंतर सुरू होतो बाहेरच्या जगाचा प्रवास!


एखाद्या अनाथाश्रमात जाऊन तिकडच्या लहानग्यांशी आपण त्यांच्याएवढे होऊन खेळ खेळतो. वृद्धाश्रमातल्या त्या सुरकुतलेल्या हातांचा आधार होतो, त्यांची सेवा करतो. मनसोक्त बागडून झाल्यानंतर अवखळलेल्या मनाला शांत करण्यासाठी आपण समुद्रकाठी जातो. तिकडच्या त्या वाळूमध्ये बसतो..... एकामागून एक येणाऱ्या लाटांना बघत! त्या अथांग पसरलेल्या समुद्राचा पलीकडचा तीर आपल्या एवलुश्या डोळ्यांनी शोधत बसतो. त्या लाटांचा आवाज आपल्या मनाला हळूहळू शांत करत असतो. आपल्या डोक्यावर असणाऱ्या अमर्यादित आकाशाला बघत रंगीबेरंगी फुगे आकाशात उडवत आपण सगळ्या इच्छा, चिंता, स्वप्नं, आयुष्यातल्या सगळ्या अडचणी उधळून लावत असतो. आपण एकटेच त्या विश्वाचा आनंद घेत असतो. आणि नंतर एक सकारात्मक ऊर्जा घेऊन पुन्हा निघतो पुढच्या प्रवासाला.. आता हळूहळू सूर्य मावळणार असतो, त्यामुळे घराची ओढ तर लागणारच.. थोडीफार शॉपिंग करून लांब लांब असणाऱ्या रस्त्यावर आपण एकटेच चालत असतो. मग काय होतं?.. रस्त्याच्या कडेला दिसते पाणीपुरीची गाडी... अहाहा! आता मन आवरणं कठीणच नाही का? त्या पाणीपुरीचा आस्वाद घेतल्यानंतर थोडे दूर गेल्यानंतर थंडगार आईस्क्रीम खात खात आपण घरी येतो... आणि त्याच थकलेल्या अवस्थेत बेडवर बसतो.. मग आवडीचं एक पुस्तक वाचता वाचता कधी डोळे लागतात ते कळतच नाही.. आणि आपण परत एकदा निघतो दिवसभर स्वतःसोबतच घालवलेल्या एका खास दिवसाच्या प्रवासाला...


या दिवशी आपण थकत नसतो उलट या दिवसाला स्वतःसोबत जगत असतो... मनसोक्त-मनासारखं! कल्पना केली तरी चेहऱ्यावर हास्य उमलल्याशिवाय राहत नाही. मग खरंच असं जगलो तर??... माहीत नाही असं खरंच कधी जगता येईल की नाही, पण काही गोष्टी कल्पनेतच इतक्या सुंदरतेने जगता येतात की त्याची सर खऱ्या आयुष्यातही मिळत नाही -


उगाच वाटे आज क्षणभर,

मनासारखे जगून घ्यावे,

गारवा घेत अंगावरती,

झोपाळ्यावर झुलून घ्यावे,

आरशासमोर सजून थोडे,

स्वतःस मग न्याहाळून घ्यावे,

लहानांसंगे लहान होऊन,

मीही थोडे हसून घ्यावे,

वृद्धांमध्ये बसून जरावेळ,

मी माझे भविष्य जाणून घ्यावे,

अथांग समुद्र आणि खळखळत्या लाटांनी,

मन माझे अलगद शांत करावे,

चिंता, दुःख, काळजी सारेच मी,

फुग्यांसवे उधळून द्यावे,

मोकळ्या त्या आकाशाला,

उराशी माझ्या कवटाळून घ्यावे,

लांब लांब रस्त्यावरूनी,

मी घराकडे निघावे,

जिभेचे चोचले पुरवत,

माझेच हट्ट मला कळावे,

आठवण घेऊन या दिवसाची,

मी शांत निद्रेत जावे,

असावी सोबती मीच स्वतःची,

असे आयुष्यभर मी माझ्यात उरावे!


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy