Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Deepak Tamboli

Inspirational


4.3  

Deepak Tamboli

Inspirational


जीवनसंग्राम

जीवनसंग्राम

8 mins 248 8 mins 248

भल्या पहाटे मार्केटमध्ये जाऊन लिलावात घेतलेली भाजी कमलाने टोपलीत टाकली आणि ती जड टोपली डोक्यावर घेऊन ती भाजी विकायला निघाली.काल म्हणावा तसा धंदा झाला नव्हता."आज तरी चांगली कमाई व्हायला पाहीजे"अशी मनाशीच बडबडत ती "भाजी घ्या होsss मेथी, पालक, भोपळा, भेंडी,मिरची,कोथिंबीर "असं ओरडत गल्ल्यागल्ल्यातून फिरु लागली.फिरतांना पाय चालत होते पण तिचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं.मनात सतत येणारे विचार ती थांबवू शकत नव्हती.नुकतीच बाळंतीण झालेली तिची मुलगी घरी आली होती.दुसरी मुलगीच झाली म्हणून तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिला घरी आणून टाकलं होतं.जावयाची तिनं खुप मनधरणी केली होती.त्याच्या पाया पडली.जावई थोडा नरमला.पण सासू महाहलकट होती.ती जावयावरच भडकली "नातू झाल्याशिवाय इस्टेटीतला एक रुपया पण देणार नाही" अशी धमकी दिल्यावर जावई घाबरला.शेवटी कमलाच्या मुलीला आणि दोन्ही नातींना तिथंच सोडून निघून गेला.आता मुलासाठी तो दुसरं लग्न करणार होता.एका बाईलाच दुसऱ्या बाईचा जन्म नकोसा का होतो हे कमलाला कळत नव्हतं.वंशाला दिवा पाहिजे म्हणे!वंशाचा दिवा असणाऱ्या तिच्या नवऱ्याने काय दिवे लावले होते हे काय तिला माहित नव्हतं?कमलाच्या पोटी दोन मुलांना जन्माला घातलं हाच काय त्याचा पराक्रम.


त्यानं जन्माला घातलेला दुसरा वंशाचा दिवा,कमलाचा चोवीस वर्षांचा मुलगा काहीच काम न करता एका राजकीय पुढाऱ्याच्या मागेमागे फिरायचा.रात्री अकराबारा वाजेपर्यंत त्याचा पत्ता नसायचा.कोंबडी खायला मिळते आणि दारु प्यायला मिळते म्हणून त्याने आपलं आयुष्य असं बरबाद करावं हे काही तिला पटत नव्हतं.पुढाऱ्याने त्याला नगरसेवक बनवण्याचं आश्वासन दिलं होतं.पण तो अशी स्वप्नं सगळ्याच तरुण पोरांना दाखवून त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरुन घेत होता हे कमलाला कळत होतं.तिनं ते पोराला अनेकवेळा समजावून सांगितलं होतं.पण पोरगा ऐकत नव्हता.पोराने शिकून मोठं व्हावं अशी कमलाची फार इच्छा होती.पण दहावी तीन वेळा नापास झाल्यावर त्याने शिक्षणच सोडून दिलं.टवाळखोर पोरांच्या संगतीत राहून तो अजूनच बिघडला.त्यामानाने मुलगी चांगली होती.बारावीत चांगल्या मार्कांनी ती पास झाली होती.सरकारी नोकराचं स्थळ आलं म्हणून कमलाने तिचं लग्न अठराव्या वर्षीच उरकून टाकलं.लग्न होईपर्यंत तिनं आईला खुप साथ दिली.कमला बाहेगांवी गेली किंवा आजारी असली की भाजी विकायचं काम तिच्याकडेच होतं.नवरा वारल्यानंतर कमलानंच मुलांना जमेल तसं मोठं केलं होतं.


तसाही नवऱ्याचा तिला काहीच उपयोग नव्हता.रोज दिवसा पत्ते खेळत बसायचं,रात्री दारु पिऊन तमाशे करायचे आणि कमलाने विरोध केला की तिला मारहाण करायची हेच त्याचं रोजचं काम.त्याची अशी थेरं पाहून लग्नानंतर दोनच वर्षांत कमलाने भाजीची टोपली हाती धरली होती.नवऱ्याने तिला पोसायच्या ऐवजी तिनंच नवऱ्याला पोसलं होतं.शेवटी तिच्या कुंकवाचा धनी होता ना तो!नवरा लिव्हर खराब होऊन मेला तेव्हा ती लोकलाजेस्तव रडली होती.पण खरं तर तिला खुप हायसं वाटलं होतं.आता मुलगा मोठा झाला की तो काहीतरी कामधाम करुन घरात पैसे आणेल आणि आपलं हे असं उन्हातान्हात, थंडीपावसात दारोदारी फिरुन भाजी विकणं बंद होईल अशी तिला आशा वाटत होती.ती मुलाने फोल ठरवली होती.शेवटी तो बापाच्याच वळणावर जातो की काय अशी कमलाला भिती वाटायला लागली होती. 


विचारांच्या गर्दीत ती किती गल्ल्या फिरली तिचं तिलाच कळलं नाही.उन्हाचे चटके बसायला लागले तशी ती भानावर आली.आज अजूनही बोहनी झाली नाही हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती धास्तावली.अजून बंगलेवाल्यांची काँलनी बाकी आहे हे पाहून ती त्या काँलनीत शिरली. खरंतर तिला या काँलनीत यायला आवडायचं नाही.लाखांच्या गाड्या उडवणारे आणि नवीन वर्षाला हजारोंची दारु पिणारे हे बंगलेवाले तिच्याशी पाचदहा रुपयांसाठी घासाघीस करायचे,वाद घालायचे.बाईच बाईचं दुःख समजू शकते असं ती नेहमी ऐकायची पण या बंगल्यातल्या बायकांना कधीही तिची दया आल्याचं तिच्या अनुभवाला आलं नव्हतं.उन्हाळ्यात साधं पाणीसुध्दा पाजायला त्या नखरे करायच्या.


उन्हाच्या चटक्यांनी आणि थकव्याने कुठेतरी बसून पाणी प्यावं असं तिला वाटू लागलं.एका बंगल्याच्या सावलीत ती बसली.टोपलीतून गरम झालेली बाटली काढून तोंडाला लावून ती पाणी पिणार तेवढ्यात तिथं एक आलिशान कार येऊन थांबली.गाडीतून एक तरुण बाई उतरली.कमलाला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"काय आहे?कशासाठी रस्त्यात बसलीये?" ती जोरात कमलावर खेकसली

"ताई काही भाजी हवी अशीन तर घ्या.भोपळा आहे,भेंडी आहे,मेथी,मिरची......"

"काही नको.तू जा इथून "


कमला उठून जायला निघणार तेवढ्यात " अग अशी काय करतेस?" असं म्हणत एक तरुण तिच्या मागून येत म्हणाला "परवा आपल्याकडे कार्यक्रम आहेच. त्याला लागेल ना भाजी!मावशी सांगा कितीची होईल ही सगळी भाजी?"


तो सगळी भाजी घेतोय यावर कमलाचा विश्वास बसेना तरी तिनं हिशोब लावला.तो भाव करेल या विचाराने तिने शंभर रुपये वाढवून पाचशे रुपये सांगितले.पण त्याने काही न बोलता लगेच पाकिट काढून तिला पाचशे रुपये दिले.गडी माणसाला बोलावून टोपली रिकामी करुन दिली.

"अरे आपण मार्केटमधून आणली असती.स्वस्त मिळाली असती.दारावर येणाऱ्या या बायका खुप महाग देतात "

त्याच्या बायकोची कटकट अजून सुरुच होती.


"जाऊ दे गं.मावशींकडची भाजी चांगली फ्रेश असते आणि वीस पंचवीस रुपयाकडे काय बघायचं?बिचाऱ्या मावशींना एवढ्या कडक उन्हात उगीचची पायपीट करावी लागते.वीसपंचवीस रुपये त्यांनी जास्त घेतले तर बिघडलं कुठं ?" तो तिला आत नेत म्हणाला. कमला खुश झाली.बोहनी झाली तीही दणदणीत पाचशे रुपयाची!आणि तीही एका फटक्यात!आनंदाने ती रिकामी झालेली टोपली घेऊन सरळ घरी आली.स्वयंपाक करुन मुलीला,नातीला जेवू घातलं.मग नातींशी खेळताखेळता झोपून गेली.


उन्हात फिरल्याने संध्याकाळी तिला सणकून ताप चढला.ती नाही नाही म्हणत असतांनाही मुलीने तिला डाँक्टरकडे नेलं.सकाळी झालेली सगळी कमाई डाँक्टरची फी आणि औषधात साफ झाली.आता उद्या भाजी विकता येईल की नाही या चिंतेने आणि मुलांच्या काळजीने तीला रात्रभर झोप लागली नाही.


दुसऱ्या दिवशीच काय नंतरचे तीन दिवस तिला तापामुळे भाजी विकायला घराबाहेर पडता आलं नाही. तीन दिवसांनी तिचा ताप उतरला.तिन्ही दिवस ती घरीच होती.प्रचंड अशक्तपणा आला होता.उन्हातान्हात भाजीची जड टोपली घेऊन फिरायचं त्राणही तिच्या शरीरात राहीलं नव्हतं.एकीकडे मुलगा काही कमवत तर नव्हताच पण तिच्याकडेच सतत पैशांची मागणी करुन तिला त्रास देत होता आणि दुसरीकडे लेकुरवाळी पोरगी उरावर येऊन बसली होती.सगळीकडे अंधार पसरला होता.आशेचे किरण कुठंच दिसत नव्हते.कमलाला आता खचल्यासारखं वाटू लागलं.या जबाबदाऱ्यांचं ओझं तिला पेलवेनासं झालं.कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं वाटू लागलं.छताला लटकून मरुन जावं अशीही भावना तिच्या मनात डोकावू लागली.


नैराश्याच्या या अवस्थेतच संध्याकाळी शेजारच्या बायका तिला बळजबरी किर्तनाला घेऊन गेल्या. किर्तनकार सांगत होते

'देवांनासुध्दा स्वतःसाठी युध्दं करावी लागली.सीतामाईला आणण्यासाठी प्रभु रामचंद्रांना स्वतःला लंकेला जाऊन युध्द करावं लागलं.दुष्ट कंसमामाला मारण्यासाठी क्रुष्णाला स्वतः कंसाशी लढला.महिषासुराला मारण्यासाठी देवीला स्वतः युध्द करावं लागलं.आपण तर शुद्र मानव आहोत.आपल्या आयुष्यात लढाईचे,युध्दाचे प्रसंग वारंवार येतात.दुसरं कोणीतरी येऊन आपली लढाई लढेल ही अपेक्षा सोडून द्या. तो देव आपल्याला मार्ग नक्की दाखवेल पण आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे हे लक्षात ठेवा.तुम्ही देवांचे फोटो बघितले असतील.प्रत्येकाच्या हातात धनुष्यबाण, गदा,तलवार अशी शस्त्रं आहेत.आपण सामान्य माणसं अशी शस्त्रं बाळगू शकत नाही.संयम,धैर्य, चिकाटी आणि हुशारी हीच आपली शस्त्रं आहेत.त्यांचा वापर करुन आपल्याला आपली लढाई जिंकायची आहे "


ते ऐकून कमला शहारली.आपली परिस्थिती तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली.आशेचे किरण असे सहजासहजी दिसणार नाहीत.त्यांच्या मार्गात येणारे अडथळे आपल्यालाच प्रयत्नांनी दुर करावे लागतील हे तिच्या लक्षात येवू लागलं "आपल्यालाबी आता लढलं पाहिजे.असं हातपाय गाळून कसं चालेल?"तिनं मनाला समजावलं आणि तिला थोडासा का होईना हुरुप आला.


दुसऱ्या दिवशी ती तिच्याकडून नियमित भाजी घेणाऱ्या वकीलीण बाईकडे पोहचली.वकीलसाहेब घरीच होते.कमलाने मुलीचं प्रकरण त्यांच्यासमोर मांडलं.दोनतीन वर्ष का होईना नियमित पैसे देणारं अशील मिळालं या कल्पनेने वकीलसाहेब खुष झाले.

"ठिक आहे.आपण तुमच्या मुलीच्या नवऱ्याला नोटीस पाठवू.तरीही त्याने जर नाही ऐकलं तर आपण कोर्टात केस दाखल करु.पण त्या अगोदर तुमच्या मुलीला रितसर पोलीस स्टेशनला सासू आणि नवरा छळ करत असल्याची तक्रार करावी लागेल"

कमला गोंधळली.पोलिस, कोर्ट या शब्दांनी तिला कापरं भरलं.ती वकीलसाहेबाला म्हणाली

"साहेब ते नोटीस, पोलिस ,कोर्ट मले काय बी म्हाईत नाई.पोलिसात गेलो तर माह्या जावई आनखीनच डूख धरीन.दुसरं करता यीन का?"

"खरंच हो!ते नोटिस,पोलिसात कंप्लेंट,कोर्टकचेऱ्या यात तर अनेक वर्ष निघून जातील.आणि ही गरीब बाई एवढा खर्च कुठून करणार?दुसरं काही करता येत असेल तर सांगा बिचारीला "


बायकोच असं म्हणायला लागल्यावर वकीलसाहेबांचा चेहरा पडला.मग त्यांनी कमलाला महिला दक्षता समितीला भेटायला सांगितलं.त्यांचा फोन नंबर आणि पत्ताही दिला आणि आपली जबाबदारी झटकून टाकली.दुसऱ्या दिवशी त्यांनी दिलेल्या पत्यावर कमला हिंमत करुन मुलीला घेऊन पोहचली. त्या तिला घेऊन पोलिस सुपरिटेडंट साहेबांकडे गेल्या.एस.पी.साहेब कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक असले तरी दयाळू होते.कमलाच्या मुलीची हकिकत ऐकून त्यांना तिची दया आली.त्यांनी फोन उचलला.कमलाचा जावई ज्या गावात रहात होता तिथल्या पोलिस ठाण्याला आदेश दिले.चक्रं फिरली.दोन तासात कमलाचा जावई आणि त्याच्या आईला पोलिस स्टेशनला उचलून आणल्या गेलं. आयुक्तांनी दोघांना सज्जड दम भरला.पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं तर जेल होईल आणि जेल झाली तर आहे त्या सरकारी नोकरीला मुकावं लागेल अशी धमकी दिली.तो थरथर कापू लागला.महिला पी.एस.आय.ने सासूला ताब्यात घेतलं.मुलगा किंवा मुलगी जन्माला घालण्यात बाईच जबाबदार नसते हे तिला समजावून सांगितलं.पण म्हातारी मोठी चिकट होती.म्हणाली

"ते मले काय बी माहित नाय.मले नातू पाहिजे म्हणजे पाहिजे "

" मावशी तुम्हाला मुलं किती?"

"एक पोरगा आणि दोन पोरी "

" त्या दोन पोरी तुम्ही का बरं जन्माला घातल्या?त्यांच्याऐवजी पोरांना का नाही जन्म दिला ?"

म्हातारी गडबडली.चिडून म्हणाली

"आता ते काय माह्या हातात हाये?"

" आम्हीही तेच म्हणतोय.पोरींना जन्म देणं तुमच्या सुनेच्या हातात होतं का?आणि मला सांगा या सुनेला फारकत देऊन तुम्ही दुसरी सुन आणली आणि तिलाही पोरीच झाल्या तर?मग तिलाही फारकत देऊन तिसरी सुन आणली आणि तिलाही पोरीच झाल्या तर तुम्ही काय सुनाच बदलत रहाणार का?"

आता मात्र म्हातारीला हसू आलं.महिला पी,एस.आय.म्हणाली

" आणि हे बघा मावशी.तुमची सुन चांगली आहे म्हणून तिनं अजून लेखी तक्रार केलेली नाही. तिने तशी तक्रार केली रे केली की आम्ही तुम्हांला आणि तुमच्या पोराला सुनेचा छळ केल्याच्या आरोपावरुन अटक केलीच समजा "

म्हातारी घाबरली.दुसऱ्याच क्षणी जवळच उभ्या असलेल्या कमलाच्या पोरीला म्हणाली

"चाल वं सरले,घरला चाल"


पुन्हा मुलावरुन बायकोचा छळ करणार नाही असं आश्वासन कमलाच्या जावयाने दिलं.मग कमला दोघांना घेऊन घरी घेऊन गेली.झणझणीत मटन करुन जावयाला आणि त्याच्या आईला खाऊ घातलं. संध्याकाळी मुलगी मुलींना घेऊन जावयासोबत सासरी गेली.कमलाने सुटकेचा निश्वास सोडला.एक लढाई तिने जिंकली होती.आता पोराचा निकाल लावायचा होता.तिने सरळ मुळावर घाव घालायचं ठरवलं.


दोन दिवसांनी ती पुढाऱ्याला जाऊन भेटली.त्याला कळवळून म्हणाली

"सायेब माह्याकडून आता हे भाजीचं काम होत नाही. पोराने लई सेवा केली तुमची.आता त्याला कामधंद्याला लावून द्या "

पुढारी महाबेरकी होता.असे आपले कार्यकर्ते कामधंद्याला लागले तर आपल्यामागेमागे कोण फिरेल,आपली चमचेगिरी कोण करेल असा विचार करुन तो कमलाला टाळण्याच्या द्रुष्टीने म्हणाला

" मावशी दोन वर्ष थांबा.दोन वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत.त्याला तुमच्या वार्डाचा नगरसेवकच बनवतो.एकदा नगरसेवक बनला की मग काय पैसाच पैसा "

कमलाने पुढाऱ्याचा डाव ओळखला.ती उसळून म्हणाली

"अवो साहेब नगरसेवक बनण्याची त्याची लायकी तरी हाये का?दोन मुस्काटात मारल्या चड्डीत मुतेल तो.तो काय नगरसेवक बनतो.आणि नगरसेवक बनायला करोडो रुपये खर्च कराया लागत्यात.हायेत का त्याच्याजवळ करोडो रुपये?ते काही नाही साहेब आता म्या त्याला कामधंद्याला लावणार.ते भाजी मार्केटमधी एक दुकान हाये.ते घेऊन द्या.लई मेहरबानी होईन तुमची "

कमला काही ऐकत नाही हे पाहून पुढाऱ्याने फोन उचलला.त्या दुकानाची चौकशी केली.फोन ठेवून म्हणाला "पाच लाखाचं दुकान आहे.जमेल?"

"साहेब माझं सोनंनाणं विकून दोन लाख जमतील.तीन लाखाचं कर्ज द्या.आम्ही दोघं मिळून फेडू"

पुढारी काही बोलेना.कमलाने त्याच्या मनात काय चाललंय ते ओळखलं.ती म्हणाली

" साहेब काही काळजी करु नका.गरज लागीन तवा पोराला बोलवा.तुमच्यासाठी त्याला कवा बी हजर करीन "

आता मात्र पुढारी हसला.कमलाचं काम झालं.


आठवडाभरात दुकान मिळालं.सुरवातीला पोरगा दुकानात बसायला तयार होईना.सारखा दुकान बंद करुन पळून जायचा.मग ती स्वतःच त्याच्यासोबत बसायची.त्याला जागचा हलू द्यायची नाही.कमलाच्या नशिबाने एक चांगली गोष्ट घडली.एका खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर असलेल्या पुढाऱ्याला सजा झाली.तो तुरुंगात गेला.आपल्यावरही कारवाई होऊ नये या भितीने त्याचे चमचेही राजकारण सोडून कामधंद्याला लागले.कमलाचा पोरगाही मग हळूहळू धंद्यात रमला.तो रमला हे पाहून कमलाने परत भाजी विकायला सुरुवात केली.कामाची सवय असल्याने असंही तिला घरात करमत नव्हतंच.


भाजीची टोपली घेऊन कमला मंदिराजवळ आली.बाहेरुनच तिने देवाला हात जोडले.'आपली लढाई आपणच लढायची'हे ती देवाकडून तर शिकली होती.तिच्या मनात आलं.'अजून लई लढाया बाकी आहेत.पोराचं लग्न,येणाऱ्या सुनेशी जमवून घेणं,सुनेची बाळंतपणं,तिचं स्वतःचं म्हातारपण,त्यासोबत येणारे आजार.हा जीवनसंग्राम होता.कधी चांगली माणसंं भेटतात कधी वाईट.पण युद्ध करणं टळत नाही हेच खरं! 

त्याशिवाय आयुष्यात मजाही नाही.देवा मला लढण्याची शक्ती दे रे बाबा "

कमलाने टोपली उचलली आणि ती चालू लागली.पण आता तिच्या पावलात आत्मविश्वास भरला होता आणि जीवनसंग्रामाला तोंड देण्याचं सामर्थ्य!


Rate this content
Log in

More marathi story from Deepak Tamboli

Similar marathi story from Inspirational