Deepak Tamboli

Others

4.0  

Deepak Tamboli

Others

आलिया भोगासी

आलिया भोगासी

8 mins
204


जाँगिंग ट्रँकवर दहा राऊंड मारुन मी घामेजलेल्या अवस्थेत बाकावर बसलो.एक साठी उलटलेले ग्रुहस्थ तिथे अगोदरच बसलेले होते.बऱ्याच दिवसापासून मी त्यांना या उद्यानात पहात होतो.अर्थात आमचं बोलणं कधी झालं नाही.शहरात हीच समस्या असते कोणी कुणाशी स्वतःहून बोलत नाही.प्रत्येकजण आपापल्या कोषात गुरफटलेला.नाही म्हणायला जेष्ठ नागरिकांचे बरेच ग्रुप्स उद्यानात फिरतांना दिसायचे.पण हे ग्रुहस्थ मात्र एकटेच दिसायचे.ते त्या ग्रुपमध्ये का सहभागी होत नाहीत याचा मला नेहमीच प्रश्न पडायचा.आज मात्र मी स्वतःहूनच त्यांच्याशी बोलायचं ठरवलं.

"नमस्कार सर"

माझ्या बोलण्यावर ते एकदम दचकले.कदाचित मी त्यांच्याशी बोलेन अशी त्यांना अपेक्षाच नसावी.

"नमस्कार नमस्कार"

ते हात जोडत म्हणाले.

"सर बऱ्याच दिवसांपासून या बाकावर तुम्हाला बसलेलं पहातोय.म्हंटलं आज तुमच्याशी ओळख करुन घ्यावी.कुठे नोकरी करत होतात सर?"

"मी सायन्स काँलेजला प्राचार्य होतो.तीन वर्ष झालीत रिटायर्ड होऊन."

" अच्छा!मुलं काय करतात?लग्नं होऊन गेली असतील ना त्यांची?"

"हो.मुलगा नासामध्ये सायंटिस्ट आहे.मुलगी कंप्युटर इंजीनियर आहे.बंगलोरला असते एका कंपनीत.तिचे मिस्टरही साँफ्टवेअर इंजिनियर आहेत.तेही बंगलोरमध्येच नोकरी करतात"

"अरे वा खुप छान" 

मी चांगलाच प्रभावित झालो.एकंदरीत पुर्ण परीवारच उच्चशिक्षित दिसत होता.

त्यांनी माझा परिचय विचारला.मी माझ्या नोकरीची माहिती दिली.

"मग सध्या आरामच करताय की इतर काही व्यवसाय ?" मी विचारलं

" नाही.घरीच असतो.आयुष्यात खुप काही केलं.आता काही करायची इच्छा नाहिये "

" वेळ मिळत असेल तर आणि हातपाय चालताहेत तोपर्यंत 

प्रवास करुन घ्या सर.जग फार सुंदर आहे "

मी त्यांना सुचवलं.

" अहो खुप फिरलोय.वेगवेगळ्या परीषदांकरीता मी आजपर्यंत ४१ देशात जाऊन आलोय.आणि भारतातील म्हणाल तर सर्वच राज्यं पायाखाली घातली आहेत.अजुनही काही काँलेजेस सन्मानाने व्याख्यानाला बोलवतात.त्यावेळीही प्रवास होतोच"


मी शाँक्ड झालो.माणसाच्या चेहऱ्यावरुन त्याच्या कर्तृत्वाचा अंदाज येत नाही हेच खरं.४१ देशातील संस्था त्यांना व्याख्यानाकरीता बोलवतात याचा अर्थ सर खुप मोठे विद्वान होते यात शंकाच नव्हती.सरांपुढे मी अगदीच नगण्य असल्याची भावना मला छळू लागली.थोड्या गप्पा झाल्यानंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.तो पुर्ण दिवस मी सरांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखालीच होतो.


 त्यानंतर वारंवार आमच्या भेटी होऊ लागल्या.सर अनेक विषयात तज्ञ होते त्यामुळे कोणताही विषय काढला की ते त्यावर माहितीपूर्ण बोलायचे.त्यांना राजकारणातही रस होता आणि राजकारण हा माझ्यासह अनेकांचा आवडीचा विषय.त्यामुळे आम्ही सहसा राजकारणावरच बोलायचो.


   एकदा दोन तीन दिवस सर दिसले नाहीत.म्हणून मग चौथ्या दिवशी माझ्याच बाकावर बसलेल्या काही रिटायर्ड लोकांना मी विचारलं

"काहो ते देशमुख सर आजकाल दिसत नाहीत"

"कोणते देशमुख सर?तीन चार देशमुख आहेत.त्यापैकी कोणते?"

मला त्याचं सुरुवातीचं नाव माहीत नव्हतं.

"ते नाही का सायन्स काँलेजचे प्राचार्य होते.त्यांचा मुलगा अमेरिकेत नासामध्ये आहे आणि मुलगी बंगलोरला कंप्युटर इंजिनियर........"

माझं वाक्य पुर्ण होण्याच्या आतच हास्याचा स्फोट झाला.सगळे सिनियर सिटीझन्स जोरजोरात हसत होते.

"का?काय झालं?एवढं हसताय का?"

मी आश्चर्यचकित होऊन विचारलं

"तुम्हालाही त्यांनी तेच सागितलेलं दिसतंय"

"म्हणजे?मी नाही समजलो"

मी अजूनच कोड्यात पडलो.

"अहो कसलं नासा आणि कसलं बंगलोर.त्यांचा मुलगा नंदूरबारला कोर्टात शिपाई आहे आणि मुलगी एका रिक्षावाल्यासोबत पळून गेलीये. ती आता परभणीला असते "

मला जबरदस्त धक्का बसला

"काय?पण ते तर म्हणत होते की ते प्राचार्य होते म्हणून!मग तेही खोटंच का?"

" नाही नाही. ते खरंच प्राचार्य होते.फार हुशार माणूस.चाळीसएक देशात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पेपर प्रेझेन्टेशन केलं असेल.शंभरवर पुरस्कार मिळालेत त्यांना.पण नशीब बघा दोन्ही मुलं नालायक निघाली.बापाचा एकही गुण घेतला नाही त्यांनी"

"पण मग ते असं खोटं का सांगतात मुलांबद्दल?"

मी थोडंस चिडूनच विचारलं.

" अहो एवढा मोठ्या नावाजलेल्या काँलेजचा प्राचार्य आणि एवढा बुध्दिमान माणूस ज्याला देशविदेशातून सन्मानाने व्याख्यानासाठी बोलावलं जायचं,असा माणूस ज्याचे हजारो स्टुडंट्स मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत,तो आपल्या अशा नालायक मुलांबद्दल खरं कसं सांगू शकेल?त्याच्याजागी आपण असतो तर आपणही तेच केलं असतं.खरं की नाही?" 

  

 मला ते पटलं.याच कारणासाठी ते बहुतेक इतर समवयस्कांमध्ये मिसळत नसावेत.मुलांचा विषय निघाला की साहजिकच त्यांना लाजीरवाणं होत असावं. मला सरांबद्दल सहानुभूती वाटायला लागली.पण सरांशी एकदा बोलल्याशिवाय मनाला समाधान मिळणार नव्हतं. आठवड्याने सर परत त्या बाकावर बसलेले दिसले.मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी मुद्द्यावर आलो.

"सर तुमच्या मुलांबद्दल ऐकलं .फार वाईट वाटलं"

मला काय म्हणायचंय हे त्यांच्या लगेच लक्षात आलं असावं.ते गंभीर झाले.

" शेवटी तुम्हाला कळलंच तर!"

" हो सर.पण सर असं झालंच कसं?तुम्ही इतके हुशार,नावाजलेले....."

" ती एक फार मोठी शोकांतिका आहे.सविस्तर सांगतो.मी ग्रँज्युएट झाल्याबरोबर वडिलांनी माझं लग्न त्यांच्या खेड्यातल्या मित्राच्या मुलीशी लावून दिलं.मुलगी दहावी नापास होती पण देखणी होती.त्यातून वडिलांचा आग्रह. शिवाय ' आपण तिला पुढे शिकवू.कमीतकमी ग्रँज्युएट तरी करु 'असा मलाही आत्मविश्वास वाटत होता.म्हणून मी ते लग्न केलं.मात्र लग्नानंतर बायको अगदीच सुमार बुध्दीची आहे हे माझ्या लक्षात आलं.तिला शिकण्यात अजिबात रस नव्हता आणि दहावीपर्यंत ती केवळ वशिल्याने पास होत गेली हे मला नंतर कळलं.तिचे गावातल्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते हेही ऐकण्यातं आलं पण ते वयच वेडं असतं असं म्हणून मी मोठ्या मनाने तिला माफ केलं.मी पोस्ट ग्रँज्युएट झाल्यावर एका काँलेजात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो.बायकोला शिकवण्याचा मी खुप प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी.शेवटी मी नाद सोडून दिला आणि पीएचडीच्या तयारीला लागलो.नंतर मुलं झाली.मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं.इकडे मुलं वाढत होती.तिकडे माझ्या करिअरचा ग्राफ उंचावर जाऊ लागला.मी मुलांना चांगल्या शाळेत टाकलं.पण शाळेतून येणाऱ्या रिपोर्ट्सवरुन लक्षात आलं की मुलांनी दुर्दैवाने आईची सुमार बुद्धी घेतली होती.चांगले क्लासेस,माझं मार्गदर्शन असूनही ती मोठ्या मुष्किलीने पास होत होती.शेवटी मी त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून करिअरवर भर देऊ लागलो.संशोधनं,जागतिक स्तरावरच्या परिषदांमध्ये सहभाग यात मी गुंतून गेलो.शेकडो पुरस्कार जिंकले.इकडे मुलं काँलेजला गेली आणि त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली.मुलीच्या भानगडींना त्रासून मी तिला पुण्याला शिकायला पाठवलं.काँलेजला यायला जायला रिक्षा लावून दिली.तर ती रिक्षावाल्यासोबत पळून गेली.मी माझं वजन वापरुन दोघांना पकडून आणलं .पण मुलगी सज्ञान असल्यामुळे काहीच करु शकलो नाही.शेवटी दोघांनी परभणीला जाऊन रजिस्टर लग्न केलं.आता ती तिथेच आहे.तिचा नवरा तिथेही रिक्षाच चालवतो.इकडे मुलगाही काही कमी नव्हता.लहान वयातच त्याला सगळी व्यसनं लागली.बारावीतच तो चार वेळा फेल झाला.त्याचे रंगढंग बघून त्याच्या मामाने त्याला नंदूरबारच्या कोर्टात शिपाई म्हणून लावून दिलं.तिकडेच त्याने एका परजातीय मुलीशी लग्न करुन टाकलं.माझं दुर्दैव बघा की मला अनेक लग्नात प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रण असायचं.पण माझ्या दोन्ही मुलांनी मला न सांगता, न बोलावताच लग्नं केली.मी प्राचार्य झालो.कुलगुरुपदासाठीही मला आँफर आल्या.पण मी त्या स्विकारल्या नाहीत इतका मी कौटुंबिक परिस्थितीने खचून गेलो होतो." बोलता बोलता सरांना गहिवरुन आलं.

" तुमच्या मिसेसने कधी मुलांना सुधारण्याचा प्रयत्न केला नाही?"मी विचारलं

"तोच तर मुख्य प्राँब्लेम होता.तिने कायम मुलांना पाठीशी घातलं.माझ्यावर तिचं प्रेम कधीच नव्हतं.त्यामुळे माझ्या बुध्दीमत्तेचा तिने कायम दुस्वास केला.माझ्या प्रगतीचं,प्रसिद्धीचंही तिने कधी कौतुक केलं नाही.मुलांच्या मनातही ती माझ्याबद्दल विषच कालवत राहिली.त्यामुळे मुलांनीही माझा रागरागच केला.माझी फार इच्छा होती मुलाने सायंटिस्ट होऊन नासामध्ये जावं तर मुलीने कंप्युटर इंजिनियर व्हावं पण मुलांनी माझ्या तोंडाला काळं फासलं.मला माझ्या मित्रमंडळीत,समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही "

" आता तुमचे कसे संबंध आहेत त्यांच्याशी?"मी विचारलं.

"पुर्णपणे तुटले आहेत.मी त्यांना घरी येण्यास मनाई केली आहे.तेही मला कधी बोलवत नाहीत.त्यांची घरं,त्यांचे संसार मी अजून बघितलेले नाहीत "

"अरेरे!"

मला आँफिसला जायचं असल्याने मी त्यांचा निरोप घेतला.पण संपूर्ण दिवसभर मी त्यांचाच विचार करत होतो.


  सरांशी परत भेट झाली तेव्हा मी त्यांना म्हंटलं

"सर तुमच्या मुलांनी तुमच्या ज्ञानाचा, बुध्दीमत्तेचा, अनुभवाचा काहीच उपयोग करुन घेतला नाही.पण अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना या सर्वाची गरज आहे."

"म्हणजे?मी नाही समजलो."

"सर अनेक गरीब मुलांना एमपीएससी, युपीएससीच्या परिक्षा देण्याची इच्छा असते पण एकतर चांगले कोचिंग क्लासेस नसतात आणि असले तरी त्यांची महागडी फी गरीब मुलांना परवडणारी नसते.अशा मुलांना तुमच्या ज्ञानाचा,अनुभवाचा नक्कीच चांगला फायदा होईल."

सरांचे डोळे चमकले.खुष होऊन ते म्हणाले "वा छान कल्पना आहे.मी अशा मुलांना मोफत शिकवायला तयार आहे"

"नाही सर.मोफत शिकवलं तर त्यांना त्याची किंमत वाटणार नाही.अगदी नाममात्र शुल्क घेऊन तुम्ही शिकवू शकता"

"चालेल. पण असे विद्यार्थी मिळणार कसे?"

"सर तुमची प्रसिद्धी करण्याचं आणि तुम्हाला विद्यार्थी मिळवून देण्याचं काम माझं ".

"वा वा मग तर फारच छान!"

सरांचा चेहरा आनंदाने फुलून गेला .ते पाहून मी पुढे म्हणालो.

"सर अजून एक! राग मानू नका पण तुमची आयुष्याची आता फार वर्षं नाही राहीली.ही उरलेली वर्षं आनंदात का घालवू नये?"

"हो बरोबर.पण मी काय करायला हवं"

"सर तुमच्या मुलांच्या बाबतीतली वस्तुस्थिती तर आपण टाळू नाही शकत! आपले संत म्हणून गेलेत 'आलिया भोगासी असावे सादर'.मुलांबाबतीतले भोग तुम्ही भोगून चुकलात.झालं गेलं गंगेला मिळालं.आता नव्याने सुरुवात करायला हवी"

"म्हणजे काय करायला हवं?"

" तुमच्या मुलामुलीला घरी बोलावून घ्या.लहान नातवांशी खेळायचे हेच तर तुमचे दिवस आहेत.नातवंडं मोठी व्हायच्या आत तो आनंद तुम्हाला घ्यायचा आहे"

नातवंडाच्या ओढीने सरांचे डोळे भरुन आले.

"तुम्ही म्हणताय ते मला कळतंय हो.पण ते वळणार कसं?त्या दोघांनी मला प्रचंड त्रास दिलाय.जीव नकोसा करुन टाकलाय.आता मीच त्यांच्याकडे नाक घासत जायचं का?"

"तुमचं म्हणणं बरोबर आहे.पण ते तुम्हांला करायची गरजच नाही.तुमची परवानगी असेल तर मी ते काम करायला तयार आहे"

सरांचा चेहरा उजळला

"अहो परवानगीची काय गरज?तुम्ही आजोबा नातवंडांची भेट घालून देताय.त्याच्यासारखं पुण्याचं काम नाही"

 

  त्यानंतरचा पुर्ण महिना धावपळीत गेला.सरांना मी वीस विद्यार्थी मिळवून दिले.त्यांच्या बंगल्यातच क्लासेस सुरु झाले.सरांच्या शिकवण्याच्या पध्दतीने खुश होऊन त्या वीस विद्यार्थ्यांनी आणखी तीस विद्यार्थी आणले.क्लासची व्यवस्था लागल्यावर आता सरांच्या मुलांकडे बघायचं होतं.मी परभणीला सरांच्या मुलीकडे गेलो.वडिलांचं नाव काढल्यावर सुरुवातीला ती चिडली पण मी तिला म्हणालो

" बघा ताई,मुलगी ही वडिलांची जास्तच लाडकी असते.तुम्हीही नक्कीच असाल.आपल्या या लाडक्या मुलीने चांगलं शिकावं,जमल्यास चांगली नोकरी करावी,एखाद्या चांगल्या घराण्यातल्या सुशिक्षित मुलाशी लग्न करुन सुखात रहावं एवढीच माफक अपेक्षा एका बापाची असते.तुम्ही कंप्युटर इंजीनियर व्हावं अशी तुमच्या वडिलांची इच्छा होती.त्यासाठी त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले.पण तुम्ही त्यांच्या अपेक्षा पुर्ण न करता पळून जाऊन लग्न केलंत.त्यांच्या मनाला,त्यांच्या समाजातील प्रतिष्ठेला किती मोठा धक्का दिलात याचा जरा शांततेनं विचार करा.तरीही ते सर्व विसरुन तुम्हांला,तुमच्या मिस्टरांना बोलवताहेत याचा अर्थ तुमच्यावर त्यांचं अजुनही खुप प्रेम आहे " बराच वेळ समजावून सांगितल्यावर तीला आपली चुक कळून आली.आपण प्रेमात वेडे झालो होतो आणि त्या वेडात आपण चुकीचं वागलो हे तीने मान्य केलं.आपलं माहेर आपल्याला परत मिळतंय याचा तिला आनंद झाला.पुढच्या महिन्यात असलेल्या सरांच्या वाढदिवसाला नवरा,मुलांना घेऊन जरुर येईन असं तिने मला वचन दिलं.


त्यानंतर मी नंदूरबारला सरांच्या मुलाकडे गेलो.सरांचं निमंत्रण त्याने साफ नाकारलं.बापाचं तोंडही पहायची इच्छा नाही असं म्हणाला.त्याच्या बहिणीला जसं समजावलं तसं त्यालाही मी समजावण्याचा प्रयत्न केला.म्हणालो

" बाकी सगळं जाऊ द्या.तुमच्या वडिलांनी त्यांची सर्व कर्तव्यं व्यवस्थित पार पाडली.ते कुठं चुकले याचा तुम्ही शांततेत विचार केला तर त्यांच्यापेक्षा तुमच्याच चुका तुम्हांला आढळून येतील.तुम्ही त्यांची स्वप्नं पुर्ण केली नाहीत हे ते विसरायला तयार आहेत.आता म्हातारपणी नातवंडांशी खेळायची त्यांची शेवटची इच्छा तर पुर्ण करा "

तरीही तो ऐकेना.तेव्हा मी माझं शेवटचं अस्त्र बाहेर काढलं. 

"बघा.तुम्ही येणार नाही पण तुमची बहीण येणार आहे.ते पाहून कदाचित सर त्यांची करोडोंची संपत्ती तिच्या नावावर करुन टाकतील किंवा तुमचा हिस्सा समाजसेवी संस्थांना दान करुन टाकतील.मग तुम्हांला हात चोळत रहाण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय शिल्लक रहाणार नाही. बघा विचार करा" त्याच्या हुशार बायकोच्या ते लक्षात आलं असावं.तिने त्याला आतल्या रुममध्ये नेऊन समजावलं.शेवटी तोही तयार झाला.मला खुप आनंद झाला.


 सरांच्या विशेष निमंत्रणावरुन मी त्यांच्या वाढदिवसाला गेलो.जंगी पार्टी होती.सरांची मुलगी आणि मुलगा सहकुटूंब हजर होते.उद्यानात सरांना हसणारे सगळे ज्येष्ठ नागरिक, सरांचे विद्यार्थी ही उपस्थित होते.सर खुप आनंदी आणि समाधानी दिसत होते.माझी सर्वांशी ओळख करुन देतांना सरांनी मला जवळ घेतलं.म्हंटले 

"हा माझा दुसरा मुलगा.याच्यामुळेच आयुष्य कसं जगावं हे मी शिकलो.आजचा आनंदी दिवस याच्यामुळेच आपल्याला पहायला मिळतोय " 

सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.सरांनी मला मुलगा म्हंटल्याने सरांची बायको,मुलगा,मुलगी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पहायला लागले.त्यांच्या मनातले संशयाचे भाव ओळखून मी माईक हातात घेतला आणि म्हणालो

"घाबरु नका सरांच्या प्रॉपर्टीतला एक रुपयासुध्दा मी घेणार नाहीये"

हास्याचा एकच स्फोट झाला.मी पाहीलं सर आपले आनंदाश्रू पुसत होते.


Rate this content
Log in