झैऱ्याचा बापू
झैऱ्याचा बापू
मध्यरात्र उलटून गेली होती. एव्हाना पावसाने चांगलाच जोर धरला होता. विजांच्या कडकडाटाने महादेवाची टेकडी लख्ख उजळून निघत होती. टेकडी वरून येणारा वारा पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्याच्या शेजारील घनदाट जंगलामध्ये एखाद्या सळसळणाऱ्या नागीनी सारखा शिरून थैमान घालत होता. उंचच - उंच झाडांनी दाटलेल्या जंगलाने विक्राळ रूप धारण केलं होतं. श्वापदांच्या नेहमी कानावर येणाऱ्या क्रुद्ध किंकाळ्या आज कुठेतरी वळचणीला दडून बसल्या होत्या. रातकिड्यांचा काय तो तेवढा कर्णकर्कश आवाज वातावरणाच्या भयावहतेत भर घालत होता.
अशा या मरत्या रात्री पाड्यातील सर्व लोक आपापल्या झोपड्यांमध्ये एकमेकांना बिलगून भयाने थरथरत पडली होती. जेमतेम ३० ते ४० झोपड्यांचा काय तो आदिवासी पाडा.! पाड्यामध्ये विज तर सोडाच, परंतु रोजच्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावयाची असल्यास महादेवाची उंच टेकडी पार करून पलीकडील मोठ्या गावी जायला लागायचं. ना वैद्यकीय सुविधा, ना शिक्षणाची कसली सोय.! अशा या मागासलेल्या आदिवासी पाड्याला छोट्या-मोठ्या वादळांची - तुफानांची सवय होती. आजचं तुफान मात्र जणू वेडावलेल्या हत्तीवरच स्वार होऊन आलं होतं.
या मुसळधार पावसात हनुमंता झोपडीच्या बाहेर ताटकळत उभा होता. पावसाच्या पाण्याने चिंब भिजलेला हनुमंता महादेवाच्या टेकडीकडे बघत हात जोडून काहीतरी पुटपुटत होता. मधूनच झोपडीच्या दाराकडे बघत होता. त्याची ही घालमेल चालू असतांनाच झोपडीचं दार उघडलं गेलं. दारामध्ये एक वयोवृद्ध म्हातारी जिला संपूर्ण पाड्यातील लोक 'माई' म्हणून ओळखायचे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर किंचितसा आनंद होता, परंतु डोळे पाण्याने डबडबले होते. हनुमंताकडे बघत तिने डोळ्याला पदर लावला
"माई समदं ठीक हाय ना वं..?"
हनुमंताने पुढे होत विचारलं.
माई काहीच न बोलता डोळ्याला पदर लावून हुंदके देत होती.
"माई.ss काय झालंया.? काई वंगाळ तर नाय ना झालं.? कशापाई रडायलीस तू.?"
माईचे दोन्ही खांदे धरून हनुमंता विचारत होता.
"लेकरू झालया.! सुखरूप हाय. पण.,"
हनुमंताकडे बघत गहिवरल्या आवाजात माई बोलली.
"पण.? पण काय.? बोल माई.. सांग मले काय झालंया.?"
भयाने ग्रासलेला हनुमंता विचारत होता.
"आपली रकमा पोरगं आपल्या पदरात टाकून आपल्या समद्यास्नी सोडून गेलीया बघ. "
दोन्ही हातांनी डोकं धरून रडत - रडत माई म्हणाली.
हनुमंता उभ्या जागी थिजून गेला त्याचं सर्वांग जणू बधीर झालं. एव्हाना पावसानेही उघडीप दिली होती.
घोंगावणारे वादळही आता शांत झाले. जंगलातली झाडे स्थिर उभी होती. पानांवरुन पावसाचे थेंब ओघळत होते.
रखमा गेली आणि तुफानही.!
•••
"अजून उंच..ss बापू अजून उंच..sss मले त्या ढगामंदी जायाचंय.. अजून उंच..sss"
झोके देणाऱ्या हनुमंताला त्याचा मुलगा झैऱ्या ओरडून सांगत होता. त्याच्या जन्माच्या वेळेस त्याची आई रखमा परलोकात गेली. हनुमंतानेही दुसऱ्या लग्नाचा विचार न करता झैऱ्याला कधी बाप होऊन तर कधी त्याची आई होऊन तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. सहा वर्षाचा झैऱ्या जणू हनुमंताच विश्वच होता. झैऱ्यावर त्याचं जीवापाड प्रेम होतं.
"बापू., तू मले जोरात झोका देतच नाय बघ.. इतक्या हळूच झोका दिल्यावर कसा मी ढगात जाईन..?"
झोपडीकडे चाललेल्या हनुमंताच्या खांद्यावर बसलेला झैऱ्या नाराजीच्या स्वरात बोलला.
"बरं बाबा., उद्या तुले जोरात झोका देइन हं.."
हनुमंता हसत हसत म्हणाला.
"पण काय रं झैऱ्या.,"
मध्येच थांबून झैऱ्याला खांद्यावरून खाली उतरवत हनुमंताने विचारलं.,
"कशापाई जायचंय तुला ढगामंदी..?"
"तू म्हणला व्हता ना बापू , मही माय त्या ढगामंदी राह्यते म्हणून..! तिलाच आणाया जायचंय.."
लडिवाळपणे हसून झैऱ्या म्हणाला.
झैऱ्याचं उत्तर ऐकून हनुमंताने झैऱ्याला एकदम छातीशी कवटाळलं. गहिवरल्या आवाजात तो बोलू लागला.,
"झैऱ्या.,मह्या लेकरा.. तू कुटं बी नाय जाणार..!
तुह्या बापूला सोडून कुटं बी नाय.."
हे बोलताना हनुमंताचे डोळे भरून आले. झैऱ्याला मात्र हनुमंताच्या रडण्याचं कारण कळालं नाही. आपल्या छोट्या हातांनी हनुमंताचे अश्रू टिपत झैऱ्या म्हणाला.,
"नाय बापू , तुले सोडून म्या नाय जाणार.. रडू नगं बापू..
कुटं बी नाय जाणार म्या.."
झैऱ्याने हनुमंताला मिठी मारली.
सूर्य मावळतीला चालला होता. मावळतीच्या तांबूस किरणांनी जणू आभाळ कुंचल्याने रंगविले होते. हनुमंता झैऱ्याला पुन्हा आपल्या खांद्यावर घेऊन झोपडीच्या दिशेने चालू लागला. हनुमंता झैऱ्याला काहीतरी सांगत होता, झैऱ्याचे मात्र हनुमंताच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते.
झैऱ्या पहात होता त्या उंच ढगांकडे.!
•••
"बापू , उद्या पहाटं मले त्या महादेवाच्या टेकडीवर घेऊन जाशीन.?"
बिछान्यावर उठून बसत शेजारी झोपलेल्या हनुमंताला उठवत झैऱ्याने विचारले.
"का रं.? असं अचानक महादेवाच्या टेकडीवर जायाचा इचार कसा आला तुह्या डोस्क्यात.? "
हनुमंताने हसतच झैऱ्याला विचारले.
"असंच बापू.! मले जायाचं महादेवाच्या टेकडीवर. माई सांगत व्हती., टेकडीवर मोट्ट महादेवाचं मंदिर हाय म्हणे, मोट्टी पाण्याची टाकी हाय, उंचच उंच बेलाची झाडं हाय.
मले पाहायचंय बापू.! चलशीलना मले उद्या पहाटं घेऊन.?"
झैऱ्या विनवणीच्या स्वरात बोलत होता.
"पाहू सकाळच्याला., आता झोप पाहू.."
हनुमंता म्हणाला.
"नाय बापू.. आधी व्हय म्हण..
मले घेऊन जाशीन टेकडीवर., तरच झोपल म्या.."
झैऱ्या आपल्या शब्दावर अडून बसला होता.
"व्हय बाबा जाईन घेऊन., आता तरी झोपणार हायेस की नाई.?"
हनुमंता झैऱ्यापुढे हात जोडून हसतच म्हणाला.
"तू लई चांगला हायेस बापू.."
हनुमंताच्या कुशीत लडिवाळपणे शिरत झैऱ्या म्हणाला.
शेजारी असलेल्या कंदिलाची वात कमी करून हनुमंता झैऱ्याला आपल्या जवळ घेऊन बिछान्यावर पडला.
थोड्याच वेळात झैऱ्या शांत झोपी गेला. हनुमंता आणि झोपडीचं छत मात्र बराच वेळ एकमेकांकडे टक लावून पाहत होते.
•••
"ओम नमः शिवाय..ss हर हर महादेव..sss"
मंदिराच्या गाभार्यामध्ये शिवलिंगा समोर हात जोडून नमस्कार करत हनुमंता म्हणाला. हनुमंताकडे पाहून झैऱ्यानेही त्याचे अनुकरण केले. कडक उन्हाळ्याचे दिवस असूनही मंदिराच्या गाभार्या मध्ये कमालीचे थंड वातावरण होते. शिवलींगा समोर जळत असलेल्या धूपाचा सुगंधीत दरवळ संपूर्ण गाभाऱ्यामध्ये पसरला होता. गाभार्याच्या चारही कोपर्यात चार समया प्रज्वलित झालेल्या होत्या. समयांच्या मंद प्रकाशाने गाभार्यात एक वेगळेच चैतन्य निर्माण केले होते. शिवलिंगाच्या अग्रस्थानी बिल्वपत्र ठेवलेले होते. वर लटकत असलेल्या ताम्हणातून शिवलिंगावर पाण्याची संथ धार पडत होती. शिवलिंगामधून शांत लहरी निघून जणू वातावरणात पसरल्याचा आभास होत होता. टेकडीवरील महादेव ध्यानस्थ बसलेला होता.
"काय., आवडली का महादेवाची टेकडी.?"
पाण्याच्या टाकीजवळ बसलेल्या हनुमंताने झैऱ्याला विचारले.
"व्हय बापू.! लय आवडली.! अन मंदिर बी लय झाक हाय.. माईनं सांगितलं व्हतं अगदी तसंच..
नाय नाय.., त्याहून लय भारी हाय.!"
झैऱ्या उत्साहाने हनुमंताला सांगत होता.
झैऱ्याला आपल्याजवळ बसवत हनुमंता बोलू लागला.,
"झैऱ्या, बाळा.. आता तू मोट्टा झाला हाईस. साळात तुहं नाव घालायचा इचार करतुया. झैऱ्या, लेकरा.. तू शिकून लय मोट्टा माणूस व्हावं यवढी एकच इच्छा हाय बघ माही. जाशील ना पोरा साळात.? मन लावून करशील ना आभ्यास.? मोट्टा माणूस बनशीन ना.?"
झैऱ्याचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन हनुमंता झैऱ्याला विचारत होता.
"व्हय बापू.. जाईन म्या साळात.!"
झैऱ्याने हसत हसत चटकन उत्तर दिले.
"पण बापू., आपल्या पाड्यामंदी कुणी बी साळात जात नाय.. आपल्या इथं तर साळा बी नाय.!"
प्रश्नार्थक चेहऱ्याने झैऱ्याने विचारले.
"पोरा, मले ठाव हाय आपल्या इथं साळा नाय ते.
पर टेकडीच्या खाली त्यो मोट्टा गाव दिसतुय ना.?
तिथं साळा हाय बघ. मास्तरांना भेटलो व्हतो म्या., त्यांनी तुहं नाव साळात टाकायची कबुली दिली हाय.."
टेकडीच्या पायथ्यापासून दूर काही अंतरावर पसरलेल्या गावाकडे पहात हनुमंता म्हणाला.
"बापू., मोट्टा माणूस व्हायला साळात का जावं लागतं. साळात नाय गेलं तर म्या मोट्टा नाय व्हणार तुह्या यवढा.?"
झैऱ्याने मनातली शंका हनुमंताला विचारली.
झैऱ्याचे प्रश्न ऐकून हनुमंता हसू लागला.
"आरं बाळा., फकस्त शरीरानं आण उंचीनं मोट्टे तर समदेच व्हत्यात बघ. जे साळात जात्यात ते बी, आण जे नाय जात ते बी.! पर जे साळात जाऊन शिक्षाण घेत्यात ना वं, ते मोट्टे साह्यब व्हत्यात. त्यांना संमदीकड मान सम्मान असतुया. लोक त्यांच ऐकत्यात. तू बी शिकून मोट्टा साह्यब व्हशील ना तेव्हा तुहं बी लोक ऐकत्याल.!
आपल्यासारख्या मागासलेल्या लोकांस्नी कोण इचारतंय म्हणा. पर तू शिकून मोट्टा साह्यब झाला ना, तर तुला बी मान सम्मान मिळल बघ."
हनुमंता झैऱ्याला सांगत होता. झैऱ्या लक्षपूर्वक हनुमंताचे बोलणे ऐकत होता. त्याची नजर हनुमंताच्या डोळ्यावर स्थिरावली होती. हनुमंताच्या डोळ्यात कधीही न दिसणारी एक वेगळीच चमक अवतरली होती.
"झैऱ्या ते बघ टेकडीखाली ते मोट्ट गाव हाय ना.,"
हनुमंता पुढे बोलू लागला.,
"त्या गावात येक पोर राहायची. संगी नाव व्हतं तिचं. लहानपणापासूनच आभ्यासात लय हुशार व्हती म्हणत्या ती पोर.! पर कालेजाची दोन वर्ग पाह्यली अन घरच्यांनी दिलं लगीन लावून. सासरच्यांनी लय छळ केला तिच्यावाला. अवघ्या दोन महिन्यात देली माह्यरी धाडून तिला. पर तिचा लहानपणचा मैतर शहरातून डाक्टर व्हऊन आला व्हता. त्यानं तिला दिल्लीला धाडली. पुढचं शिक्षाण घेण्यासाठी. पोरगी शिकली.. कल्याक्टर झाली.. कल्याक्टर.!"
हनुमंताने संगितलेल्या संगीबद्दल झैऱ्याला फारसं काही कळालं नाही. पण झैऱ्या आत्मविश्वासाने हनुमंताकडे पाहून म्हणाला.,
"बापू , म्याबी साळात जाईन. म्याबी कल्याक्टर व्हईन.!"
सूर्य डोक्यावर आला होता. ऊन चांगलं तापायला लागलं होतं. महादेवाची टेकडी उंचावर असल्याने उन्हाच्या गरम झळ्या वेगाने वाहत होत्या. बेलाची झाडे वाऱ्याच्या तालावर हिंदोळे घेत होती. मंदिराच्या शिखरावर बिल्वपत्रांचा अविरत अभिषेक होत होता. झैऱ्याला खांद्यावर घेतलेला हनुमंता अनवाणी पायाने पाड्याच्या दिशेने निघाला होता.
•••
गाडीने शिट्टी दिली, त्याबरोबर हनुमंता विचार तंद्रीतून खडबडून बाहेर आला. डोळ्यात जमा झालेले अश्रू खांद्यावरील उपरण्याने टिपून तो खिडकीच्या बाहेर पाहू लागला. बघता-बघता रेल्वेस्थानक मागे पडू लागले. गाडीने पुन्हा शिट्टी दिली. रुळावरून गाडी आणि हनुमंताच्या डोळ्यासमोरून आठवणी वेगाने धावू लागल्या. हनुमंता पुन्हा आठवणींमध्ये बुडून गेला.
"माई.ss माई माह्या झैऱ्याची काळजी घे. माह्याशिवाय त्याला दुसरं कुणी बी नाय. पोरगं लहान हाय अजून. त्याचा बापू निर्दोस हाय सांग त्याला. माई म्या खून नाय केला.. नाय केला म्या खून.!"
जिल्हा न्यायालयासमोर हातात बेड्या ठोकलेला हनुमंता हात जोडून माईसमोर रडत उभा होता. माई हनुमंताच्या खांद्याला धरून त्याला धीर देत होती. एवढ्यात दोन हवालदारांनी हनुमंताच्या हाताला धरून त्याला गाडीत बसविले. हनुमंता गाडीच्या जाळीदार खिडक्यांमधून माईकडे पाहून हात जोडत होता. रडत होता. त्याच्या तोंडून वारंवार एकच शब्द निघत होता., "झैऱ्या..ss"
•••
झैऱ्याचं शालेय शिक्षण सुरळीत व्हावं, या हेतूने हनुमंताने पाड्याजवळ असलेला एक छोटासा जमिनीचा तुकडा विकून टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मोठ्या गावामध्ये राहायला जायचं ठरवलं. लागलीच त्याने जमिनीचा व्यवहार करून त्यातून आलेले पैसे मोठ्या गावातील एका वृद्ध इसमाला दिले. त्या बदल्यात त्याने गावामध्ये दोन खोल्याचे छोटेसे घर मिळविले. आता इथेच गावात राहून काहीतरी कामधंदा करावा, आणि झैऱ्याला खूप शिकवावं. असं हनुमंताने ठरविलं.
"झैऱ्या समद्या सामानाची आवराआवर करून घी. म्या चार-पाच घंट्यात येतू लगेच गावात जावून. उद्या पहाटच्याला आपल्याला पाडा सोडून मोट्टया गावात राहायाला जायचंय.."
हनुमंता आनंदी होता. झैऱ्याला तयारी करायला सांगून तो झोपडीच्या बाहेर पडला.
महादेवाच्या टेकडीवर आल्यावर हनुमंताने महादेवाचे दर्शन घेतले. शिवलिंगा समोर हात जोडून उभा असलेला हनुमंता बोलत होता.,
"महान महादेवा., आता समदं काई ठीक व्हईल. फकस्त तुहा आशीर्वाद असू द्ये.! झैऱ्याला बुद्धी दे.. झैऱ्या शिकून मोट्टा साह्येब व्हईल.. हर हर महादेव..ss"
देवळातून बाहेर येऊन हनुमंता गावच्या दिशेने चालू लागला.
सूर्य अस्ताला चालला होता. वातावरणात एक वेगळीच उदासीनता जाणवत होती. वारा शांत होता. शिखरावर बिल्वपत्रांचा अभिषेक होत नव्हता. काहीतरी अघटित घडणार होते.! गावातील वृद्ध इसमाच्या घराभोवती पाच-सहा जणांचा घोळका उभा होता. हातात लाठ्या-काठ्या असलेल्या या टोळीने वृद्ध इसमाला बेदम मारहाण केली होती. तेवढ्यात हनुमंता तिथे जाऊन पोहोचला. तो वृद्ध इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तरीही त्या टोळीतील एक इसम त्याला शिव्या हासडत बोलत होता.,
"हलक्या जातीच्या आदिवासी माणसाला गावात राहायाला जागा देतुस काय रं.? ते बी आमच्या घराशेजारी.? आरं ह्ये आदिवासी जनावरं गावच्या बाहीरच चांगली दिसत्यात. त्यांसनी गावात आणून गावचं पावित्र्य भंग करतुस काय तू.?"
हे सर्व बोलत असतांना त्याची नजर हनुमंताकडे गेली.
"कोण रं तू.?"
हातात लाठी असलेल्या एका इसमाने विचारले.
"जी., जी म्या हनुमंता.."
हनुमंता पुढे होत जरा दबकतच बोलला.
"कुठल्या गावचा.?"
इसमाने विचारले
"म्या.,म्या.."
हनुमंता अडखळत होता.
"अरं बोल की.."
टोळीतून एक इसम पुढे होऊन जरा दटावणीच्या स्वरात बोलला.
"म्या टेकडीच्या पलीकडील पाड्यावरचा.."
हनुमंता खाली मान घालून म्हणाला.
तसं एका दांडग्या इसमाने पुढे होत हनुमंताच्या कानशिलावर एक थप्पड लगावली.
"तूच काय रं त्यो.? गावात राहायला यायचं व्हय रं तुला.?
आरं तुम्ही आदिवासी जनावरं.! तुमची लायकी हाय व्हय गावात आमच्याबरोबर राहायची.?"
असं म्हणून त्याने पुन्हा एक थप्पड लगावली.
हा सर्व प्रकार चालू असतांना मागे असलेला टोळीतील एक जण ओरडतच आला, आणि हनुमंताला दम भरणार्या इसमाला उद्देशून बोलू लागला.,
"पाटील.ss पाटील त्यो म्हातारा..ss"
धावत आलेल्या इसमाचा घाबरलेला चेहरा पाहून पाटलाने पुढे होत विचारले.,
"काय झालं.?"
"अवं त्यो मेला ना वं.!"
घाबरलेल्या इसमाने चटकन सांगितले.
"काय..!?"
पाटलाचं अर्ध अवसानच गळून गेलं. तेवढ्यात हनुमंता तेथून पळत सुटला.
"आरं..ss आरं धरा त्याला..ss जाऊ नगा देऊ., आपल्यांसनी महागात पडंल नाय तर.."
पाटील ओरडून म्हणाला. त्याचबरोबर तेथील दोन-चार जण हनुमंताचा पाठलाग करत त्याच्या मागे धावत सुटले.
"आता काय करायचं.?"
एका इसमाने पाटलाला विचारले. थोडा विचार करत पाटील म्हणाला.,
"चल माह्याबरोबर.."
"कुटं.?"
त्या इसमाने विचारले.
"पोलीस थाण्यात.!"
पुढे होत पाटील म्हणाला.
पोलिसाचं नाव ऐकून तो इसम तर अजूनच घाबरून गेला. परंतु पाटील काहीतरी विचार करूनच निर्णय घेतील, हे त्याला ठाऊक असल्याने तो पाटलासोबत निघाला. तिकडे हनुमंता महादेवाच्या टेकडीवरून पाड्याच्या दिशेने धावत सुटला. तोच आपल्यामागे चार-पाच जण धावत येत असल्याचे त्याला दिसले. त्यासरशी तो वाट बदलून घनदाट जंगलामध्ये शिरला. अनवाणी पायाने काट्या-कुट्या तुडवत हनुमंता धावत होता. एव्हाना तो बर्याच अंतरावर जंगलामध्ये आत आला होता. एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी तो टेकून बसला. पायामध्ये काटे रुतले होते. रक्त निघत होते. सर्वांग घामाने चिंब भिजले होते. सर्वांगामध्ये भीतीची एक शिरशिरी उठली होती. तसाच झाडाच्या बुंध्याशी दब धरून तो बसला होता. तेवढ्यात मागून त्याच्या डोक्यावर लाठीचा एक जोरदार प्रहार झाला, आणि हनुमंता शुद्ध हरवून खाली कोसळला.
•••
"व्हय साह्येब.! ह्योच त्यो.! आम्ही याला रातच्याला रंगे हात धरलया त्या म्हातार बाबाचा खून करतांना. आम्हाला विव्हळण्याचा आवाज ऐकू आला अन आम्ही धावत गेलो. बघतो तर काय.! ह्यो माणूस म्हातार बाबाच्या डोक्यावर काठीनं तडाखे देत व्हता. त्ये बिचारं म्हातारं रक्ताच्या थारोळ्यात पडलं व्हतं. आमांस्नी पाहून तिथून पळाला व्हता ह्यो., पर आम्ही धरून तुमच्याकडं घेऊन आलो बघा या बेण्याला.."
पोलीस ठाण्यात उभा असलेल्या हनुमंताकडे बघत पाटील पोलिसांना पटवून देत होता. हनुमंतानेच त्या म्हातार्या वृद्ध इसमाचा खून केला आहे, असं वारंवार सांगत होता.
तेवढ्यात ठाण्याचा मुख्य पोलिस अधिकारी आपल्या खुर्चीवरून उठला. पाटलाकडे पाहून रहस्यमय हसत त्याने जरबेच्या आवाजात हवालदारांना सूचना केली.,
"धरा रे त्याला.. टाका लॉकरमध्ये.."
हनुमंता धाय मोकलून रडत होता. खून पाटलानी केला आहे असं वारंवार सांगत होता. पण त्याचं म्हणणं ऐकून घेण्याची गरज तिथे कोणालाही वाटली नाही. पाटलाने चांगलाच डाव खेळला होता. पैशापुढे गरिबी पुन्हा हरली होती. तिकडे झैऱ्या रात्रभर बापू घरी नाही आला म्हणून झोपडीच्या दाराशी बसून होता. एका रात्रीत सर्व काही बदललं होतं.
•••
पाड्यामध्ये शांतता पसरली होती. काळोखाच्या कुशीमध्ये संपूर्ण पाडा पहुडला होता. रातकिड्यांचा आवाज वातावरणात घुमत होता. जंगलातील प्राण्यांचा चित्कार शांत वातावरणात भयावह वाटत होता.
"माई..ss महा बापू कुटं हाय.? समदे म्हणत्यात, तुहा बापू खुनी हाय.. पोलिसानं धरून नेलय त्यास्नी.."
झैऱ्या रडत-रडत माईला विचारत होता. माईचेही डोळे पाणावले होते. त्याला जवळ घेऊन त्याच्या चेहर्यावरून हात फिरवत ती त्याचं सांत्वन करीत होती.
"मले माह्या बापूकडं जायचं.. माई मले बापूकडं जायचं.. बापू..ss"
रडून-रडून झैऱ्याचा चेहरा लाल झाला होता. माई झैऱ्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन त्याला निजवण्याचा प्रयत्न करीत होती. बापू लवकरच घरी येईल, असं त्याला वारंवार सांगत होती. सत्य परिस्थिती मात्र वेगळीच होती. दहा वर्षासाठी हनुमंताला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
मध्यरात्रीचा प्रहर सुरू झाला. झैऱ्याचं रडणं आता शांत झालं होतं. माईचाही बसल्या जागी डोळा लागला होता. झोपडीचं दार उघडलं गेलं. झैऱ्याने मागे वळून माईकडे बघितलं. झैऱ्या मनोमन बोलला.,
"माई., म्या माह्या बापूला हुडकून परत घेऊनच येईन.."
आणि झैऱ्या काळोख्या रात्री झोपडी बाहेर पडला. घनदाट जंगलातून महादेवाच्या टेकडीकडे जाणाऱ्या वाटेकडे झैऱ्याची पावले चालू लागली.
•••
जंगलातून काट्याकुट्याची वाट तुडवत हनुमंता पाड्याच्या दिशेने वेगाने चालला होता. अंगातील सदरा फाटला होता, दाढी वाढलेली होती. याच जंगलात पाटलाच्या माणसांपासून वाचण्यासाठी दहा वर्षापूर्वी तो जीवाच्या आकांताने धावत होता. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आज हनुमंता दहा वर्षानंतर पाड्याकडे चालला होता. पाड्याकडे नाही., खरं तर त्याच्या काळजाच्या तुकड्याकडे.. झैऱ्याकडे..
"झैऱ्या आता लय मोठा झाला आसंल.! झैऱ्याच्या शिक्षाणाचं काय झाला आसंल.? माईनं झैऱ्याला साळात घातलं आसंल की नाई.? झैऱ्या मले खुनी म्हणून महा तिरस्कार तर नाय ना करणार.? त्याचा बापू निर्दोस व्हता ह्ये त्याला ठाव आसंल का.?"
असे असंख्य प्रश्न हनुमंताच्या मनःपटलावर सैरावैरा धावत होते. पावले यंत्रागत झपाझप उचलत होती. जंगल संपून आता आदिवासी पाडा हनुमंताच्या दृष्टीस पडला, तसा हनुमंता झैऱ्याला आवाज देत वेगाने धावतच पाड्याकडे निघाला. पाड्यातील त्याच्या झोपडीजवळ येताच त्याचे पाय जमिनीत रुतले. डोळे विस्फारले. छातीची धडधड जणू बंद झाली. डोकं सुन्न झालं. हनुमंता आणि झैऱ्या राहत असलेल्या झोपडीचं छप्पर मधोमध तुटून झोपडीमध्ये पडलं होतं. मातीच्या भिंती कोसळल्या होत्या. झोपडीचा दरवाजा मोडलेला होता. हनुमंताच्या डोळ्यासमोर झोपडी नव्हती., होता फक्त उजाडलेला संसार.!
पाड्यातील सर्व लोक हनुमंताकडे पाहून आपापसांत कुजबुजत होती.,
"व्हयं., हनुमंताच हाय त्यो.. खून करून पळाला व्हता.. तुरूंगातून सुटून आलाया की पळून कुणास ठाव.?"
अशी काहीतरी चर्चा पाड्यातील लोकांमध्ये चालू होती.
एवढ्यात पाठीमागून आपल्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचे हनुमंताला जाणवले. तसे त्याने चटकन मागे वळून पाहिले. थरथरत्या हातांनी काठीचा आधार घेत माई उभी होती. माईला पाहून हनुमंता रडत-रडत बोलू लागला.,
"माई.ss ह्ये काय झालं.? माहं घर.! माई झैऱ्या कुटं हाय.? कुटं हाय माहं लेकरु.?"
माई समोर उभा असलेला हनुमंता जोराजोराने रडत विचारत होता.
माईचं अंग अधिकच थरथरायला लागलं. हातातील काठी गळून पडली. त्यासरशी माईचा तोल जाऊन माई देखील जमिनीवर कोसळली. तसा हनुमंता पुढे होत माईला सावरण्याचा प्रयत्न करू लागला. माई जमिनीवर बसून दोन्ही हात छातीला लावून धाय मोकलून रडू लागली. काहीतरी अघटित घडल्याच्या जाणिवेने हनुमंताच्या अंगातील त्राण निघून गेला. तरी देखील तो माईला झैऱ्याबद्दल विचारत होता.
"हनुमंता..ss आपला झैऱ्या..ss"
माई रडत-रडत बोलू लागली.,
"तुले पोलीस घेऊन गेलं त्या राती झैऱ्या रातभर रडत व्हता. म्या कसंबसं पोराला शांत करण्याचा प्रयत्न केला पर रातच्याला महा डोळा लागला, अन आपला झैऱ्या..ss"
माईचं रडनं अनावर झालं होतं.
"काय झालं.? काय झालं मह्या झैऱ्याला.?"
हनुमंता माईला पुन्हा पुन्हा विचारत होता..
"झैऱ्या रातच्याला कव्हा बाहेर पडला मले ठाव नाय.,"
माई पुन्हा बोलू लागली.,
"जणू पोर तुले सोधाया निघालं व्हतं. दुसर्या दिशी पहाटं लोकांना झैऱ्या जंगलात सापडला. जंगली जनावरान आपल्या झैऱ्याला संपवलं रं हनुमंता..ss आपला झैऱ्या..ss म्या तुही गुन्हेगार हाय हनुमंता.. म्या झैऱ्याची काळजी नाय घेतली.."
एवढं बोलून माई ओक्साबोक्शी रडू लागली.
आता मात्र हनुमंता उभ्यानेच जमिनीवर कोसळला. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. घसा कोरडा पडला. कपाळ पांढरफटक पडून सर्वांगाला दरदरून घाम फुटला. झैऱ्याचा जन्म, झैऱ्याचं बालपण, त्याचा हट्ट, रुसणं, हसणं, हनुमंताच्या खांद्यावर बसून रानात फिरणारा झैऱ्या या सर्व-सर्व आठवणी हनुमंताच्या भोवती गिरक्या घेऊ लागल्या. हनुमंताचं मन इतकं सुन्न झालं, की त्याच्या डोळ्यांतून अश्रू देखील येईना.
हनुमंता तसाच उठला, कुणाकडेच न बघता तसाच जंगलाच्या दिशेने चालू लागला. डोळ्यांना रस्ता अस्पष्ट दिसत होता. पाय मात्र महादेवाच्या टेकडीकडे निघाले होते. पायात काटे रुतत होते, मात्र हनुमंताला वेदनाही जाणवत नव्हती. काही वेळात तो महादेवाच्या टेकडीवर पोहोचला. त्याला पाण्याच्या टाकी जवळ झैऱ्या बसलेला दिसला. धावत जाऊन त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न हनुमंताने केला, परंतु पुढच्याच क्षणी तो भास असल्याचे त्याला जाणवले. हनुमंता देवळाच्या पायर्यावर बसला. बसल्या ठिकाणाहून त्याला शिवलिंग दिसत होते. आता मात्र हनुमंताने हृदयातील दुःखाला डोळ्यांची वाट मोकळी करून दिली. दुःख डोळ्यांतून अश्रू बनून बाहेर पडू लागले. हनुमंता हमसून हमसून रडू लागला.
"महादेवा..ss माह्याच नशिबात का ह्ये समदं.? आधी माही बायको रकमा गेली., अन महा झैऱ्या.. झैऱ्या..ss"
हनुमंता देवळाच्या पायर्यांवर जोराजोराने हात आपटत होता. रडत होता. दुःख अनावर झाले होते. त्याचा घसा कोरडा पडला होता. अंगभर मुंग्या फिरत असल्याचा त्याला भास होऊ लागला. रडता-रडता आपली शुद्ध हरवून तो देवळाच्या पायरीवर ग्लानी येऊन पडला.
•••
दुपार उलटून गेली होती. ऊन उतरणीला लागले होते. हनुमंता मूर्च्छित होऊन देवळाच्या पायऱ्यांवर तसाच पडलेला होता. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या चेहर्यावर थंड पाण्याचे शिपकारे मारले. हनुमंता खडबडून जागा झाला. रडल्याने त्याचे डोळे सुजले होते. अंग जड झालं होतं. डोळ्यासमोर अजुनही अंधार दाटला होता. थोडा वेळ तसाच बसून राहिल्यावर हनुमंताने वर बघितले. एक सहा-सात वर्षांचा मुलगा हातात पाण्याने भरलेले मडके घेऊन उभा होता. त्याने हनुमंताला पाणी प्यायला दिले, हनुमंता पाणी प्यायला. तो मुलगा हनुमंताच्या शेजारी बसला. थोडावेळ कुणी काहीच बोललं नाही.
हनुमंताकडे पहात लहान मुलाने विचारले.,
"इथं का झोपलासा.? तुम्हाले बी घर नाय का.?"
"व्हतं.,घर व्हतं.! आता नाई.."
पाड्याच्या दिशेने बघत हनुमंता बोलला.
"मले बी नाय घर., म्या बी इथंच झोपतो.."
मुलगा थोडासा हसतच हनुमंताला म्हणाला.
"अन तुही माय.? तुहा बापू.?"
हनुमंताने विचारले.
"मले कुणी बी नाय.! माय-बापू ढगात गेली दोघं.."
ढगांकडे पाहत मुलगा बोलला.
"अजून उंच..ss बापू अजून उंच..ss मले त्या ढगामंदी जायाचंय.."
हनुमंताच्या कानामध्ये झैऱ्याचे ते शब्द घुमू लागले.
"नाव काय हाय तुहं.? साळात जातू की नाय.?"
हनुमंताने मुलाला विचारलं.
"मले नाव नाय., कुणी काय बी म्हणतं. कुणीकुणी तर भाडखाव बी म्हणतं.."
मुलगा हसत हसत सांगत होता.,
"साळात बी नाय जात., दिसभर कचरा गोळा करतुया. थोडं पैकं मिळत्यात. मंग कायतरी खाऊन रोज रातच्याला देवळात येऊन झोपतो या टेकडीवर.."
मुलाने खुलासा केला.
हे ऐकून हनुमंताचे डोळे पुन्हा पाणावले. मुलाचा चेहरा ओंजळीत घेऊन हनुमंताने विचारले.,
"म्या तुले झैऱ्या म्हणू.?
मुलगा हसायला लागला, हसत हसत म्हणाला.,
"व्हय., म्हणा.. चालल.."
"म्या तुम्हाले काय म्हणू.?" मुलाने लागलीच विचारले.
"मले बापू म्हणशील.?" हनुमंतानं विचारलं.
मुलाने हनुमंताकडे पाहिलं. त्याच्या चेहर्यावर गोड हास्य होतं. हसऱ्या चेहऱ्याने तो हनुमंताला म्हणाला.,
"बापू.!"
"माह्याबरोबर चालशील.? तुले म्या साळात घालन, नवीन कापडं घेऊन देईन.. राहशील माह्याबरोबर.?"
हनुमंताने दबकत दबकत विचारले.
हनुमंताचा प्रस्ताव ऐकून मुलाने गाभाऱ्यातील शिवलिंगाकडे बघितले, त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. हनुमंताकडे पाहून त्याने मानेनेच होकार दिला.
पक्षांनी परतीचा प्रवास सुरू केला होता. पश्चिमेकडे आकाश लाल, तांबुस रंगाने रंगून गेलं होतं. हवेमध्ये गारवा जाणवत होता. टेकडीवरील संथ हवेच्या आज्ञेने बेलाचे वृक्ष मंदिराच्या शिखरावर बिल्वपत्रांचा अभिषेक करत होते. सूर्य मावळतीला चालला होता. हनुमंताचं आयुष्य पुन्हा मागे गेल्यासारखं वाटत होतं. त्याच्या आयुष्यात झैऱ्या पुन्हा आला होता. त्यानं एक दीर्घ श्वास घेतला आणि वर बघितलं.
वर.. त्या उंच ढगांकडे..!
© लेखक - अक्षय शिंदे ( विजयसुत )
