AkshRahi world विजयसुत

Others

2  

AkshRahi world विजयसुत

Others

श्रावणातला रोकडोबा

श्रावणातला रोकडोबा

5 mins
143


अहो उद्यापासून श्रावण महिना चालू होत आहे ना., म्हणून गावी चाललोय. बेलपिंपळगावला.

सर्व कुटुंब एकत्रित बाहेर पडलेले पाहून विचारपूस करत असणाऱ्या निंबाळकर काकांना बाबा म्हणाले.


अच्छा.! पण श्रावण महिन्यामध्ये गावी काय हो विशेष.? निंबाळकर काकांनी कुतुहलाने विचारले.


अहो श्रावण म्हणजे आमच्या बेलपिंपळगाव मध्ये दुसरी दिवाळीच असते बघा., संपूर्ण महिनाभर गाव अगदी उत्साहात असतो. आमच्या गावाची ग्रामदैवतावर नितांत श्रद्धा आहे. आणि श्रावणामध्ये गावच्या देवळात भक्तिभाव अक्षरशः ओसंडून वाहतो. किती लांबून लांबून लोक दर्शनाला येतात म्हणून सांगू. आणि श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे, गावातील प्रत्येक घरचा एक दिवा म्हणजे असे हजारो दिवे संपूर्ण महिनाभर, अगदी चोवीस तास दिवस-रात्र देवळामध्ये प्रज्वलित असतात. आमच्या ही घरचा दिवा असतो., त्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येऊन देवळात दिवा प्रज्वलित करतात.. निंबळकर काकांना गावाबद्दल, देवळा बद्दल, गावकऱ्यांच्या भक्ती बद्दल सविस्तर माहिती सांगताना बाबांचा चेहराही अगदी दिव्यासारखाच प्रज्वलित झालेला दिसत होता.


अरे वा!! बरीच मोठी आख्यायिका दिसते तुमच्या ग्रामदैवताची. निंबाळकर काका म्हणाले.

कोणत्या देवाचा देऊळ आहे जरा सांगता का.?

निंबळकर काकांनी आतुरतेने विचारले.


मारुतीराया आहे आमचं ग्रामदैवत.. रोकडोबा मारुती.. बाबा म्हणाले.

बाबांच्या आवाजातून भक्तीची सरिता संथपणे वाहत होती.


बाबाss चला ना लवकर...

गाडीजवळ जाऊन उभा राहिलेला पवन बोलला. गावाला जायचे हे कळल्यापासून आपण कधी एकदाचे गावी पोहोचतोय असे त्याला झाले होते.


                •••


बाबा., आपण केव्हा पोहोचू गावी.?

मोटार गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या पवनने विचारले.


संध्याकाळ पर्यंत पोहोचू आपण बाळा.

ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या बाबाचे उत्तर ऐकून पवन स्वतःशीच बोलला., "संध्याकाळपर्यंत.!"


"यावेळेस पवनची शेरणी वाटून टाकुयात. योगायोगाने या वर्षी पवनची मावशीही येणार आहे बेलपिंपळगावच्या यात्रेला."

ड्रायव्हिंग सीटच्या शेजारील सीटवर बसलेली पवनची आई बोलली.


"हो..मीही तुला तेच म्हणणार होतो.."

बाबा एक स्मित हास्य चेहऱ्यावर आणून बोलले.


आता गाडी शहराच्या बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागली होती. गाडीने वेग धरला होता. गाडीच्या काचा बंद होत्या. बाहेर श्रावणाच्या आगमनाची संकेत देणाऱ्या पावसाच्या सरी बरसू लागल्या होत्या.


"बाबा., कशी असते हो गावची यात्रा.?, आणि तुम्ही निंबाळकर काकांना असं का म्हणाले श्रावण म्हणजे बेलपिंपळगाव मध्ये दुसरी दिवाळीच असते म्हणून.?"

प्रवासात पेंगाळलेल्या पवनने बाबांना प्रश्न विचारला.


पवनचा प्रश्न ऐकून बाबा जोरात हसले., आणि सांगू लागले.,

"बाळा श्रावणाच्या संपूर्ण महिनाभर गावात भक्तीचे वातावरण पसरलेले असते. आणि ही परंपरा अगदी माझ्या आजोबांच्या आजोबां पूर्वीपासून चालत आल्याचे सांगितले जाते."

पवनच्या प्रश्नांची उत्तरे देताना पवनचे बाबा त्यांच्या बालपणामध्ये हरवून गेले. त्यांच्या बालवयात त्यांनी पाहिलेला श्रावणातला रोकडोबा त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागला. श्रावण महिन्यामध्ये गावात जी मजा असायची ती आता शहरात अनुभवायला मिळत नाही याची त्यांना मनातून खंत वाटली. मी जेव्हा तुझ्या एवढा होतो तेव्हाची गोष्ट आहे, बाबा सांगू लागले.,


                  •••


"आरं मधुकर ( पवन च्या बाबांचे नाव ) चल झोप पाहू आता. उद्या पहाटं पोरांसोबत जायचंय ना तुला गोदावरीवर पाण्यासाठी.?"

आबा ( मधुकरचे वडील, पवनचे आजोबा ) म्हणाले.


"व्हय आबा.." मधुकर अंथरुणावर पडत बोलला.

"आक्का., मला पहाटंच उठून दे बरं चार वाजता.."

आक्का म्हणजे मधुकरची आई.

तोंडावर पांघरून घेऊन मधुकर झोपण्याचा प्रयत्न करु लागला. उद्या श्रावणाचा पहिला दिवस असल्याने मारुतीरायाला स्नान घालण्यासाठी गोदातीर्थ आणायला जायचंय, या उत्सुकतेने त्याला काही झोप येईना. कधी सकाळ होईल आणि आपण मित्रांसोबत पाण्याला जाऊ., या विचारात तो अंथरुणावर कूस बदलत होता.


"मधुकरs.. बाळा मधुकर..ss तुला जायचे ना गोदातीरी पाण्याला.? उठ पाहू.."

मधुकरच्या डोक्यावरून हात फिरवत मधुकरची आई त्याला उठवत होती.


"आक्का., चार वाजलेत का ग.?"

डोळे चोळत अंथरूणावर उठून बसलेल्या मधुकरने विचारले.


"व्हय.. ऊठ आता.."

आक्का म्हणाली.


नदीवर आंघोळ करून ओल्या वस्त्राने पाणी घेऊन यायचे असल्यामुळे मधुकरने आंघोळ न करता फक्त तोंडावर पाणी मारले, आणि दोन बाटल्या घेऊन दोरीच्या साह्याने कमरेला बांधल्या आणि तो घरातून बाहेर पडला.

"आक्काss येतो ग.."

एवढे बोलून मधुकर धावतच निघाला. मधुकर आणि गावातली त्याचे इतर सवंगडी पहाटेच्या अंधारात गोदावरीवर पोहोचले. सर्वांचे पाण्यात मनसोक्त पोहून झाल्यावर त्यांनी नदीतील पाण्याने आपापल्या बाटल्या भरल्या, आणि "बजरंग बली की जय..ss रोकडोबा हनुमान की जय..sss" अशा घोषणा देत सर्व बालगोपाळांची टोळी देवळाकडे निघाली. तासभरात ते सर्वजण देवळात पोहोचले. गावातील काही लोक चार-पाच दिवसांपूर्वी मारुतीरायाला स्नान घालण्यासाठी गंगातीर्थ आणायला गाड्या करून काशीला रवाना झाले होते. तसेच काही तरुण मंडळी नाशिकच्या त्रंबकेश्वर येथून गोदावरी नदीच्या उगम स्थानावरून जलतीर्थ घेऊन तब्बल तीनशे किलोमीटर पायी चालत आले होते.

पहाटेचे सहा वाजले असतील., गावातील बालगोपाळांनी आणलेले जलतीर्थ, काशीहून आणलेले गंगातीर्थ, आणि त्रंबकेश्वरहून आणलेले गोदामृत एकत्र करण्यात आले.

मंदिरामध्ये मंत्रोच्चाराचे लयबद्ध ध्वनी उमटल्याने वातावरण अधिक प्रसन्न झाले होते. पुजारी बुवांनी बालगोपाळांना गाभाऱ्यामध्ये बोलावले आणि मंत्रोच्चाराच्या गजरात रोकडोबा मारुतीला स्नान घालावयास सुरुवात केली.!दुधाचा अभिषेक झाला. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले जलतीर्थ मारुतीरायाला स्नानार्पण करण्यात आले. स्नानविधी आटोपल्यावर रुईच्या पानांची एक भली मोठी माळ मारुतीरायाला घालण्यात आली. हा सर्व विधी बालगोपाळांच्या हातून करण्याची परंपरा होती. त्यात मधुकरही होता.

एव्हाना गावातील सर्व घरातून एक - एक दिवा असे हजारो दिवे देवळात क्रमबद्ध ओळीने प्रज्वलित करण्यात आले होते. देवळातील वातावरण अत्यंत प्रसन्न व उबदार अशा चैतन्य शक्तीने भरून गेले होते.

आता रोकडोबा मारुतीच्या आरतीची वेळ झाली. देवळामध्ये, देवळा बाहेर प्रचंड गर्दी जमा झाली. प्रचंड मोठ्या संख्येने भाविक आरतीसाठी जमा होऊ लागले. देवळाबाहेर उभारण्यात आलेला भव्य मांडव गर्दीने भरून गेला होता. आरती चालू होताच श्रावणातील पहिली सर बरसली. लोकांमध्ये उत्साह संचारला. वातावरणात मारुतीरायाच्या आरतीचा सूर आणि श्रावणाच्या बहारदार सरी यांनी मिळून एक वेगळीच पहाट उगवल्याचे भासू लागले होते. सर्व गाव आणि गावात आलेले भाविक भक्तगण मारुतीरायाच्या आशीर्वादाने भारावून गेले होते. श्रावण पहाळे दिवसभर चालू होते, तरीही भाविकांची दर्शनासाठी ये-जा चालूच होती. अशाप्रकारे श्रावणातला पहिला दिवस हा आनंदाने, भक्तिरसाने माखून गेला होता.


आपल्या बालपणाचे दिवस, श्रावणामध्ये नदीवर पाण्यासाठी जाण्याची आतुरता, रोकडोबा मारुतीला स्नान घालण्याची मजा ह्या सर्व गोष्टी आठवून पवनचे बाबा रोमांचित झाले होते.


                  •••


"बाबा., माझी शेरणी वाटायची म्हणजे नेमकं काय करायचं हो.?"

बऱ्याच वेळापासून पडलेला प्रश्न पवनने विचारला.


त्यावर पवनची आई हसून म्हणाली.,

"अरे म्हणजे नवस पूर्ण करायचा. तुझ्या वजनाएवढे पेढे मंदिराच्या आवारात वाटायचे. तुझ्या जन्माच्या वेळेस रोकडोबा मारुतीला तुझी आजी नवस बोलली होती, तोच नवस आता पूर्ण करायचा."


बाबा सांगू लागले.,

"मला आजही आठवतं, मी लहान असतांना अशा हजारो भाविकांच्या शेरणी वाटल्या जायच्या आणि अजूनही दरवर्षी वाटल्या जातात. वजनाएवढा गूळ किंवा पेढे वाटले जातात. हा संपूर्ण श्रावण महिना म्हणजे आपल्या बेलपिंपळगावच्या गावकऱ्यांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते.."


आता पवन गाडीच्या काचेतून बाहेर बघू लागला. बाहेर पाऊस नुकताच थांबला होता. हवेत गारवा जाणवत होता. पवनला आता गाव कधी येईल याची उत्सुकता लागून होती. त्याला रोकडोबा मारुतीच्या स्नान विधीसाठी भल्या पहाटे उठून देवळात जायचे होते. शेरणी वाटपाचा प्रसंग पाहायचा होता. आजी-आजोबांना भेटायचं होतं. गावातील भक्तीच्या रसात बुडालेला श्रावण अनुभवायचा होता. श्रावणातल्या रोकडोबाचं दर्शन घ्यायचं होतं.


#ट्रॅव्हलडायरी


Rate this content
Log in