हल्लीच असं झालं होतं...
हल्लीच असं झालं होतं...


बराच वेळ दूरून न्याहाळत बसलेला तो मी खिडकीजवळ जाताच थेट पुढ्यात येऊन धडकला... त्याची ती रोजचीच सवय होती. माझी वाट बघत बसून राहायचं असं रिकामटेकड्यासारखं आणि मी खिडकी पाशी गेले की पुढ्यात धडकायचं.. आता ही आला.. थोडी मान तिरकी बिरकी करुन नेहमीच्या बेफिकीरीनं पाहिलं.. पण आज त्याचं ते पाहणं नेहमीच नव्हतं..तसा थोडा नाटकी ही आहेच म्हणा. कदाचित आमच्या बरोबर राहून हे अवगत केलेले गुण असावेत. मी भावनगरी शेव पुढे केली तरीही शांत.. मग मीच निघून जायला पाठ वळवली तसा पठ्ठ्यान कलकलाट सुरू करुन सगळ्या काक वर्गाला आमंत्रण देऊन शेवेचा फडशा पाडला.. मग मीही तो नियमित गोंधळ बघत थांबले.. आवडतं म्हणून.. सगळी शेव संपली. सगळे कावळे पांगले हा मात्र थांबलेलाच..
''हल्ली रोज घरी दिसतेस..!'' थोडं चाचरतच त्यानं विचारलं. ''हो'' मी दिर्घ उसासा सोडून उत्तर दिलं. ''रोज साफसफाई... पुसापुशी.. जोरात असते.. काही विशेष.. तसं हल्ली सण वगैरे जवळ नाहीत मग.. इतर मंडळीही घरी दिसत आहेत.. आणि कोरो..'' त्यानं काहीतरी अर्धवट बोलून सोडून आता विषय वाढवला होता आणि बराच वेळ दूर ठेवलेली वाढत वाढत जाणारी काळजी माझ्या चेहर्यावर नकळत आली ही. ती पाहून तो म्हणाला ''ठिक आहे.. नसेल सांगण्यासारखं तर असू दे'' आणि उगाच उडतो बसतो करून कडमडायला लागला. पक्षी असला तरी त्याला ही उत्सुकता असतेच ना..तेव्हा तीच काळजी- चिंता माझ्या बोलण्यातून पाझरू लागली.." अरे जगावर महाभयंकर संकट आलं आहे कोरोना नावाच्या विषाणूचं.. त्या पासून बचाव म्हणून आपला देश आज लाॅकडाऊनमध्ये आहे..'' तसा मध्येच चोच घालून "लाॅकडाऊन" हे काय नवीन...? हा प्रश्न समोर टाकला. ''अरे.. आम्ही माणसं तुम्हा प्राणी पक्षांना आमच्या आवडीखातर नाही का पिंजऱ्यात डांबतो. तुमचा स्वैर विहार, आहार यावर बंधन घालतो.. तशी आमची आज अवस्था आहे.. हा आजार फोफावत चालला आहे.. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आम्हाला घरातच राहायला सांगितले आहे.. आमच्या आरोग्यासाठी, समाजाच्या सुरक्षेसाठी.. '' तो मान थोडी तिरकी करून ऐकत होता.. चोच कडक असल्यामुळे तिचा चंबू वगैरे करणं त्याला जमल नव्हतं कदाचित.. '' अच्छा.. एकंदरीत असा प्रकार आहे का हा! ..तरीच हल्ली कोणत्याही घराच्या खिडकीत बसलं तरी टिव्ही वर हा कोरोना धुमाकूळ घालताना दिसत आहे.. रस्त्यावरही शांतता.. म्हटलं आम्हीच नव्या जगात आलो की काय.. एवढी शांतता की आमचाच आवाज आम्हाला ऐको साऊंडसारखा ऐकायला येतो हल्ली.. परवा आजोबाही सांगत होते, त्यांच्या आजोबांच्या लहानपणी म्हणे असं शांत वाटायचं.. पण काय गं! इतकी पण शांतता बोअर करते ना.. आणि असं बंदिस्त होण म्हणजे कसं वाटत ना!!'' त्यानं हा प्रश्न केला की उपहास तेच मला कळलं नाही.. मी काय उत्तर देणार मी मख्खपणे बघत राहिले..
"आणि तरीच ती आमच्या शेजारची चिमणी बाई आणि तिच्या मैत्रिणी हल्ली सकाळ पासून चिवचिवाट करून पिलांना हैराण करत असतात.. काही खाल्लं तर चोची धुवा म्हणे.. कुठे जाऊ नका.. पंख झाडूनच घरात या..!! अरे किती सुचना नुसता चिवचिवाट.. त्यांना आणि त्यांच्या घरट्याला तुमच्या व्हाट्सअपवर.. मोबाईल गॅलरीतही जागा दिली आहे म्हणे.. आधीच ती ट्विटर पण आहेच टिव टिव करत..आणि इथे मी आज ही घरासाठी जागा शोधून हैराण होत आहे. आपलं घरटं सोडू नका.. सुरक्षित रहा.. अशी पोस्ट आली आहे म्हणे.. आणि मी काय फक्त तुम्हाला पितृपक्षात आठवणार का गं? मग टाकता काय वाटेल त्या पोस्ट.. काय गं कावळ्याला इथेही टाळलत ना! " हे ऐकून माझ्या भुवया नकळत उंचावल्या..." अरे.. चिवचिवाट काय म्हणतो.. हल्ली फार बरं वाटतं रे! सकाळी तुम्हा पक्षांची किलबिल ऐकायला.. एक आत्मिक समाधान मिळत आहे या तणावपूर्ण वातावरणात.. "
तसा तो जरा नूर पालटून म्हणाला "तणाव तर आम्हालाही आला आहे पण पोटाला.. सगळं सगळं बंद!!! खायचे वांदे झाले आहेत आमचे.. परवा मनीताई रविवार म्हणून मोठय़ा आशेने मासळी बाजारात गेली होती मिशा खाली टाकून परत आली बिचारी.. काळू कुत्रा आणि मंडळ माॅर्निग वाॅकवाल्यांच्या जीवावर रोज सकाळी नियमित अगदी भुरकत दूध बिस्किटं खायचे.. शिळ्यापाक्याला तोंडही लावत नव्हते.. आता तुमचं माॅर्निग वाॅकही बंद मग यांचं भुरकणंही बंद, आता असतात इकडेतिकडे काही मिळतं का बघत..'' नशीब कावळयाला ओठ हा प्रकार नसतो.. नाही तर मला तेव्हा ओठ मुरडणारा कावळा दिसला असता.. तसा आताही नजरेसमोर पटकन आलाही होता..
"अरेरे... बरेच हाल झाले आहे रे तुमचे.." तसा थोडा आर्जव करतच तो मला म्हणाला.. "हो आम्हा प्राणीवर्गाचे हालच झाले आहे.. तुमचं आणि आमचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं आहे बघ. बरं! तुम्ही माणसं या सोशल मीडियावर काहीही व्हायरल करता म्हणे.. तर मग एक काम होतं.. या लाॅकडाऊनच्या दिवसात आम्हाला पण थोडं अन्न पाणी सोईच्या ठिकाणी ठेवायला सांगणारी पोस्ट कराना व्हायरल.. आणि यावेळी माझा फोटो टाक बरं का आठवणीनं"
आता मी हलकसं हसले, मोबाईल हाती घेतला आणि त्याचा एक छानसा फोटो काढला..