Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win
Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win

Prachi Mulik

Others

2  

Prachi Mulik

Others

आठवणींची गाडी

आठवणींची गाडी

2 mins
111


रिपरिप पडत राहणारा पाऊस, धुक्याची धुसर आळसवलेली लाट, मोकळा प्लॅटफॉर्म.. शून्य मिरवत लटकणारी इंडीकेटर आणि डोळे लांब लांब गेलेल्या रूळावरून ट्रेनची वाट पहात टोकाला पोहोचलेले..अन् तिथेच टेकू घेऊन थांबलेले.. इतर वेळी हे विशेष वाटलं असतं.. पण आज नक्कीच नाही. आज ट्रेन काही येत नव्हती. पावसाच्या रिपरिपीने रात्र गाजवून आता दिवसाचा कब्जा घेतला होता. मनाला घरीच रेंगाळत ठेवून हा देह आॅफीसला जायच म्हणून इथे उभा होता. इतक्यात चक्क डोळ्यांना हूल देऊन, कशी कुठून काही कळायच्या आतच आठवणींची गाडी अशी धीम्या गतीने समोर आली. तशी तिची गती नेहमी धीमी असते हे विशेष. हळूहळू जवळ आली, तशी कोणत्या आठवणींनी पक्की जागा घेतली होती ते लक्षात येत गेलं. नाही तर लांबून येणारी ट्रेन जशी बाहेर लटकणाऱ्या माणसांनी गच्च भरलेली दिसते ना! तशीच आठवणींची धीमी ट्रेन ही दिसते. बऱ्याच आठवणींना लोंबकळत घेऊन येते, मग जवळ आली की इतर आठवणींना विरळ करत आपली जवळची आठवण तेवढी स्पष्ट करते.


या आठवणींच एक गुपित असतं बरं का.. आठवणींना एक चेहरा असतो. शाळेची आठवण आली की नेमक्या कडक शिस्तीच्या बाई आधी येतात मग वात्रट पोरं येतात, घंटा वाजवून तास संपल्याची वर्दी देणारा शिपाई येतो. या आठवणी त्या त्या व्यक्तीचे चेहरे घेऊन येतात. नुसते वर्ग, मैदान असं काही थेट येत नाही आणि खास आठवण काढून चाचपडल्या शिवाय शाळेतले शांत चेहरे आठवत ही नाहीत. आता नुसती कधी एखाद्या सहलीची आठवण आली तरी तिथला निसर्ग वैगरे नंतर पण आधी डोळ्यासमोर येतात ते आपल्याला त्या क्षणी साथ सोबत करणारेच. एखाद्या फोटो ही नुसता निसर्ग असेल ना त्यापेक्षा सोबत एखादी व्यक्ती असेल तर अधिक बोलका भासतो. एखादी आठवण मनात जपली जाते ती त्या क्षणाला उपस्थित असणाऱ्या व्यक्तीचा चेहरा घेऊनच. मग ती आठवण सुखद असो किंवा वेदनादायी. त्या भावनांचा क्षण आठवणी जणू गोठवून जपून ठेवतात अगदी चेहऱ्यासकट. म्हणूनच मग आठवणींना तो चेहरा मिळतो.


नाहीतर काय कधी उगाच काही आठवेल का? आठवणींची गाडी कधी न सांगता येईल का? कधी कधी खूप आठवून ही काही आठवत नाही कारण कुणाचा चेहरा कदाचित आठवणींनी जपलाच नसतो. म्हणून आपणही आठवण होऊन राहण, आठवणींच्या धीम्या ट्रेनचा एक खास डबाच होणं किती सुंदर आहे कारण आठवणी चिरतरुण असतात, मनाला तजेलदार करुन जाणाऱ्या असतात आणि आठवण येणं यावर मनाचं तर आठवणं यावर मेंदूच नियंत्रण असतं. म्हणजे आपली गाडी थेट मनाच्या स्थानकावरूनच सुटेल.


आठवणींची गाडी पुढे पुढे सरकत जात होती.. इतक्या डोळ्यांनी पुन्हा माझ्याकडे झेप घेत.. हिला जरा एकटं सोडलं की लागलीच हिची तंद्री अशी तक्रार करत, ट्रेन आली चला! असा हुकूमच दिला.


Rate this content
Log in