" गोष्ट यशस्वी प्रेमाची "
" गोष्ट यशस्वी प्रेमाची "


नीता आणि निनाद च्या लग्नाचा २५ वा वाढदिवस, सर्व जवळचे नातेवाईक आणि त्यांचे कुटुंब सगळ्यांनी मिळून धडाक्यात साजरा केला. सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. नीताच्या डोळ्यातून आनंदाश्रु वहात होते.
रात्री बेडरूम मध्ये गेल्यावर नीता निनादला म्हणाली. निनाद आठवते का आपली पहिली भेट. शेजारच्या घरून मी कपबश्या, प्लेट आणि चमच घेऊन दाराशी पोहचले, मागून आवाज आला. चंद्रभान ठोसरांचे घर हेच का ? मी गोंधळून गेले ! मनात म्हणाले.
अरे देवा ! पाहुणे आले वाटतं ! पण इतक्या लवकर कसे ? ते तर अकरा वाजता येणार होते !
भानावर आले. म्हणाले हो ! हो !
हेच घर..! आणि नमस्कार करायला हात जोडले. पिशवीत असलेल्या कपबशीचा किणकिण आवाज झाला. हातातल्या प्लेट सावरत म्हणाले.
अरे देवा ! एखादी कपबशी फुटली की काय ? शेजारच्या काकूंच्या आहेत. तुम्ही हसलात.
मी म्हणाले, या बसा ! बाबांना पाठवते.
बाबा ते दोघे भाऊ आलेत ?
इतक्या लवकर कसे ?
बाबा गाड्या लेट असल्यामुळे आधीच्या गाडीने आले म्हणाले. बरं बरं. तू आईला सांग. आणि जास्त पुढे पुढे करू नको. मागच्या वेळी तुलाच मागणी घातली एकाने.
हो बाबा !
तेवढ्यात मातोश्री पोहचल्या.
काय ग ?
हे सामान घेऊन आलीस ते दिसले का त्यांना ?
हो आई !
अग कपबशी ती. आवाज करणारच ना !
हातात ह्या प्लेट !
मूर्ख पोरी !
मी तर त्यांना सांगितले सुद्धा. शेजारच्या आहेत म्हणून.
काय ?
कार्टे !
तुम्ही दोघे बोलत होतात..विशाल म्हणाला निनाद हीच मुलगी असेल का रे ? आवडली मला ?
घरात कांदे पोह्याचा सुगंध दरवळत होता. सविता ताई चहा पोहे घेऊन आली.बघण्याचा कार्यक्रम संपला. जातांना म्हणालात कळवतो.
तू म्हणालास,"थोड्या वेळापूर्वी बाहेर भेटल्या त्या कोण ? "
ती सविताची धाकटी बहीण नीता. बारावीला आहे.
अच्छा ! अच्छा !
तू हळूच म्हणाला. " विशाल तुला मोठी, मला धाकटी " बाबांनी ऐकले होते.
ताईचे लग्न झाले. तू मात्र मुद्दाम वहिनीच्या माहेरी येत होतास. मीटिंग चे निमित्त करून. मला डोळे भरून पाहायला.
ताई पहिल्या दिवाळीला येऊन गेली. सोबत तू सुद्धा आलास.
एके दिवशी दुपारी घरी येऊन बाबांकडे माझा हातच मागितलास. सगळे अवाक् होऊन बघतच राहिलो.
बाबा म्हणाले. अहो कसं शक्य आहे ? माझी मुलगी लहान आहे. तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. आणि माझ्या कडे पैसे नाहीत. जेमतेम फंडातले पैसे काढून सविताचे लग्न केले .
तू म्हणालास. तुम्ही रजिस्टर लग्न करून द्या. अहो पण ती अठरा पूर्ण नाही ना !
मग अठराची झाली की लगेच लग्न करू. माझा निश्चय पक्का . लग्न करेन तर नीताशी. जर तुम्ही नाही करून दिले. तर....
तर...काय ?
तर ती कॉलेजला जातांना पळवून न्यायला कमी करणार नाही ! सगळे सुन्न झालो.
त्या दिवशी तू हळूच बोललेल्या शब्दाचा बाबांना उलगडा झाला. " विशाल तुला मोठी,मला धाकटी "
घरात आता एकच विषय. पुढे काय ? शेवटी बाबा म्हणाले.
मुलगा इंजिनिअर आहे.पोरीच्या सुखाचा विचार करून मला वाटते लग्न करून द्यावे.
मी खूप रडले. बाबा ! मला शिकायचे आहे ! तुम्ही प्रॉमिस केले होते. बेटा तुझ्या लग्नाची घाई करणार नाही ! हवे तेवढे शिक ! तुम्ही प्रॉमिस मोडताय बाबा !
बाबांनी मला जवळ घेतले. म्हणाले बेटा ! निनाद इंजिनिअर आहे. माझ्या चामड्याचे जोडे करून झिजवले तरी इंजिनिअर मुलगा नाही शोधु शकणार !
हो नाही करून मी लग्नाला होकार दिला..
तुझ्या घरी या निर्णयाने संतापाची लाटच उसळली. त्यांनी स्पष्ट सांगितले तू इंजिनिअर आहेस, इतक्या गरीबाची मुलगी आता चालणार नाही. एक केली तेवढे बस.
घरच्यांचा विरोध पत्करून तू स्वतःचे लग्न केलेस. लग्नाला कुणीच आले नाही.
दोघांचा संसार सुरू झाला. खरतर लोक लग्न झाल्यावर हनिमूनला जातात. मी गावी जायचा निर्णय घेतला. अर्थात तुला तो पटला नाही. पण मान्य केलेस. संपूर्ण सुट्ट्या आपण तिथे घालवल्या.
सुरवातीला खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. पण मी इतक्या लवकर हार मानणारी नव्हते रे! सर्वांची मने जिंकून आणि आपल्या कृतीतुन सिद्ध करून दाखवले. तू म्हणालास...नीता माझ्या नजरेत तुझे स्थान खूप आदराचे झाले.
सुखाचे, आनंदाचे दिवस भु्रकन उडून जात होते. अशातच आपल्याला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली. मी तर पंख लावून उडत होते. तू माझी खूप काळजी घेत होतास.
आपण आई बाबा झालो. तू जेमतेम २४ चा आणि मी १९ वर्षाची...आपण एकमेकांच्या साथीने सगळे छान निभावून नेले.
चार वर्षांनी पुन्हा गरोदर राहिले. मला मुलगी हवी होती.
मुलगाच झाला. मी थोडी नाराजच झाले. तू सावरलेस मला .
दोघांच्या साथीने आपले प्रेम दिवसागणिक फुलत होते. मुलं मोठी झाली...मोठा इंजिनिअरिंग करतो, धाकटा बारावीला आहे. खरतर आजचा दिवस आपण या दोन मुलांमुळे बघतोय...त्यांचीच हि कल्पना...ह्या अश्या सोहळ्याची...
खरं सांगू मला मुलांचे हे सरप्राइज खूप आवडले.
आपले त्या वेळचे लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचे लग्न. तू माझ्याच घरी. एकाच घरात नवरा नवरी दोघे. आता कल्पना केली तरी हसू येते.
खर सांगू. एकमेकांवर प्रेम आणि विश्वास असेल तर संसार सुखाचाच होतो.
आपल्या तर लक्षात सुद्धा नव्हते...मुलांनी मात्र बरोबर लक्षात ठेवले...
आणि आगळीच भेट दिली...