स्वीकृती ची शक्ती
स्वीकृती ची शक्ती


आयुष्यात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. अणि असेच काही घडले मार्च 2020 या वर्षी अचानक कोरोना ही महामारी सर्व जगात पसरली आणि सगळं जिथे आहे तिथेच थांबलं. पूर्ण परिस्थिती बदलली.
पण या लॉकडाऊनमुळे आपण खूप काही शिकलो यात काहीच शंका नाही. सर्वात मोठी गोष्ट आपण जे शिकलो ते म्हणजे स्वच्छता कशी राखायची. पुरातन काळात आपल्याला आपले पूर्वज नेहमी शिकवायचे की आधी चपला बाहेर काढायचे. मग लगेच हात-पाय धुवावे. शौचातून आल्यावर हात-पाय धुवावे, कपडे बदलावे वगैरे. या सगळ्या गोष्टी लोकांनी मध्ये करायच्या सोडून दिल्या होत्या कारण कधी आळस नाही तर आधुनिक युगात आहोत म्हणून या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत असं समजायचे. पण या लॉकडाऊनकाळात परत तेच शिकलो.
मुंबई कधी ना थांबणारी शांत झाली. पूर्ण जग शांत झालं. लोकांना वाटलं थोडे दिवस चालणार मग सगळं काही बरोबर होईल. किती लोकांनी आराम केले. खूप दिवसाच्या धावपळीमुळे थकले होते.किती लोकांनी आपले छंद जोपासले. कोणी वाचन सुरू केले तर कोणी लेखन सुरू केले. कोणी चित्रकला दाखवली तर कोणी नृत्यकला सादर केल्या.फेसबुकवर खूप काही पाहिलं असेलच. कोणी स्केच बनवले तर कोणी पाककृती सादर केली.
पण आता मात्र तीन महिने झाले आणि आता घराच्या बाहेर जाऊन काम केल्याशिवाय पर्याय नाही.पण आता नवं जग बघायला मिळेल. सर्व काही बदलून जाणार आहे. याची भीती मात्र सगळ्यांना आहे.
पण आता मात्र आपली मानसिकता बदलायला हवी. पण ही स्वीकृतीची शक्ती कशी निर्माण होईल हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.
आज मी आपल्याला एक गोष्ट सांगते.एका गावात वामनराव आणि त्यांची पत्नी राहात होते. त्यांना तीन मुले होती. पहिल्याच नाव होतं रघु, दुसऱ्याचं नाव होतं दिघु, आणि तिसऱ्याचं नाव होतं जगू. वामनरावांनी मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही.पण एकदा त्यांची प्रकृती ढासळली आणि ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तुम्हाला आरामाची गरज आहे. त्यांनी एक एक करून सगळ्या मुलांना सांगितले की माझे काम आता तुम्ही करा. पण मुलांचं काही एकमेकांशी पटत नव्हते. शेवटी त्यांनी निर्णय घेतले की तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला पाठवायचे. वामनराव यांनी तिघांनाही पाठवून दिले.
रघु जेव्हा नवीन जागेत गेला तेव्हा त्याला तिथे काहीच आवडले नाही.त्याला खूप राग येत होता. रघुला नवीन जागेचं जेवण आवडतं नव्हते.त्याला असं वाटले का मी आलो इथे आणि तो खूप चीड चीड करायला लागला.
दीघु हा नवीन जागेत रुजण्याचा प्रयत्न करत होता पण मनापासून मात्र खुश नव्हता. त्याला वाटत होते की हे माझ्या वडिलांनी माझ्याबरोबर काही बरोबर नाही केलं. का बरं मला इथे नवीन जागेत पाठवले आणि तो मनाच्या मनात रडत बसे.
जगू मात्र त्याच्या नावासारखाच. तो लगेच नवीन ठिकाणी रुजून गेला, सगळ्यांशी मिळून मिसळून गेला.त्याने तिकडचे नियम आणि अटी सगळ्या मानायला सुरुवात केली. तो तिकडे आनंदात राहू लागला.
या गोष्टीत आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. आपल्याला आहे त्या परिस्थितीत जगायला शिकले पाहिजे. आपली मानसिकता बदलायला पाहिजे. नवीन नियम व अटी पाळून परत कामाला सुरुवात केली पाहिजे. आयुष्य म्हणजे तुमच्या सोबत जे घडतं ते 10% आणि उरलेले 90% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्या अनुसार सगळे घडते.
"विचार बदला....आयुष्य बदलेल...."