Ravindra Langote

Romance Others

4.8  

Ravindra Langote

Romance Others

गोड आठवण

गोड आठवण

9 mins
4.1K


 आता हे लिहिणं योग्य वाटत नाही पण लिहील्यावाचून राहवलं जात नाही. (२१ मार्च २०१० रोजी) काल औरंगाबादला गेलो होतो. मला मुलगी बघण्यासाठी. मुळात माझी एवढ्या लवकर हि प्रोसिजर करण्याची इच्छा नव्हती. पण सगळ्याचं म्हणणं ऐकावं लागलं. आणि मग गेलो. आता हे सगळं काही नवीन नाही, पण माझ्यासाठी हे नवीनच आणि पहिलाच अनुभव ‘असला’.

  आता कसे गेलो, कुठून गेलो, कधी गेलो, हे लिहिणं जमेल पण मुद्दामूनच लिहित नाहीये.

 

  औरंगाबादमध्ये एस.बी.आय. च्या एका शाखेत शिवाजी मामा, आईचे मावस भाऊ कामाला आहेत. त्यांनीच आम्हाला (मला) त्यांची मुलगी करावी अशी मागणी घातली होती. त्यानुसार मुलगी तर बघायला पाहिजे, हे गरजेचं. माझा होकार म्हणजे सगळ्यांचा होकार होता. हे नक्की, निदान आज आत्तापर्यंत तरी. पुढचं नाही सांगता येणार.

 बरं – औरंगाबादच्या ४-५ कि.मी. अंतरावर पडेगाव म्हणून ठिकाण आहे. तसं सिटी टचच आहे. असो त्याचं काही नाही. प्रशस्त मामांचा बंगला, बंगल्याला साधारण पिवळा रंग दिलेला, पाहण्यावरून एकमजलीच होता. बाहेर कंपाउंड, त्याला एक लोखंडी गेट, गेटबाहेर मामांची ओमनी गाडी उभी, कंपाउंडच्या आत १-२ नारळाची- आंब्यांची झाडे, आंब्याला कैऱ्या लागलेल्या. एकंदरीत घर छान. पहिल्यांदाच मामाचं घर पाहिलं या.

    खरं सांगायचं तर, मला अगोदरच बऱ्याच जणांनी सांगितलं होतं कि, मुलगी छान आहे. पण अंशतः लोकांनी सांगितले होते कि मुलगी चांगली नाही. पण बहुमत तर चांगली या शब्दालाच होतं. ठीक..

     आम्ही ९ लोक गेलो होतो. दारात गाडी लावली, आम्ही गाडीतून उतरलो, मामा लगेच आले. हातात हात मिळविला, नमस्कार वगैरे झाले. आम्हाला आत यायला सांगितलं. गेटमधून आत प्रवेश केला, बाहेरच हात-पाय धुण्याची व्यवस्था केलेली असल्यामुळे तो विधी आम्ही बाहेरच पूर्ण केला. त्यानंतर आम्ही घरात गेलो. दोन-पाच खुर्च्या, एक सोफासेट, खाली मॅट टाकलेली, मध्यभागी टीपॉय ठेवलेला त्यावर एक फुलदाणी ठेवलेली, हॅलो लोकमत पेपर ठेवलेला, सगळे खुर्च्यांवर बसले, मी पण बसलो एका कोपऱ्यातल्या खुर्चीवर. थंड पेय पाजण्यात आले. आमच्याबरोबर मामांच्या ओळखीची काही मंडळी देखील बसलेली होती.

     सर्व औपचारिक गप्पा झाल्या, हसणं झाल आणि महत्वाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. या अगोदर मी खूप घाबरलेलं फील करत होतो. छातीत खूप धडधडत होतं. काय होईल? कशी असेल? तिला बघताना इतर लोक बघतील ते काय विचार करतील? या आणि अशा नाना विचारांत मी गुंतलो गेलो होतो. मी ज्या चेयरवर बसलो होतो, तेथून मला सोप्यावर बसण्यास सांगितले. आता मात्र खूपच दडपण आल्यासारखं वाटत होतं. कारण तिला मी समोरून बघणार होतो. त्यासाठीच मला समोर बसण्यास सांगितले होते. तिला बसायला साधा पाट मांडला गेला. तिला प्रश्न विचारण्यासाठी शरद काका तिच्या समोर बसणार होते. आणि तेवढ्यात.... आतील खोलीतून बायकांचा आवाज आला. “ घाबरू नकोस, सगळे आपलीच माणसे अआहेत.” असं इतर बायका तिला सांगत होत्या. आणि तिने हॉलमध्ये प्रवेश केला. खूप घाईघाईने, घाबरत-घाबरत, गोंधळलेल्या अवस्थेत ती आली. आणि पाटावर बसली. येताना तिने एक तांब्या पाणी भरून आणलेलं होतं. रीतीनुसार. ती बसली, बसल्यावर काकांनी तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. 

प्र.१- “तुझे नाव काय?”

    “योगिता शिवाजी पारवे” जरा गोंधळूनच,

प्र.२- “काही छंद वगैरे?

    ती म्हणाली “आहे” (शुद्ध मराठीत)

प्र.३- कोणता ?

    तिला प्रश्न समजला/ समजला नाही पण ती उत्तरली, “job करायचा, दोनदा हेच म्हणाली.

  

     हे सर्व सुरु असताना मी मात्र तिचे नखशिखांत निरीक्षण करत होतो. तिने हॉलमध्ये प्रवेश केल्यापासून ते सर्व प्रश्नांची उत्तरे देईपर्यंत. तिने लाल- काळा रंग मिक्स, नक्षीदार चमकणारी साडी घातलेली होती. हातात बांगड्या, गळ्यात लोंबत्या मण्यांचा हार घातलेला होता. नाकात मुरणी का काय म्हणतात ती तिने घातलेली होती. ओठांना जरा साडीच्या रंगाला व तिच्या सावळ्या रंगाला मॅच होईल अशी लाली- लिपस्टिक लावलेली होती. हे सर्व बारकाईने नाही पण ओझरती नजर टाकून बघितले होते. तसं पहायला गेलं तर हे बारकाईनेच झालं म्हणाव लागेल.

    आता ती निघून चालली होती. आतल्या खोलीत. जाता-जाता तिला सगळे त्यांची मंडळी म्हणाली, “अगं , पाया पड सर्वांच्या”. ती पुन्हा गोंधळली आणि घाईतच, जरा हसत सर्वांच्या घाईघाईने पाया पडता- पडता माझ्या पायांजवळ आली, मी नाही म्हणेपर्यंत, पाय मागे खेचेपर्यंत तिने माझ्या पायांना स्पर्श केला आणि ती निघून गेली, जरा हसतच.... या आधी मी तिला कधीच पाहिलं नव्हतं. तिला एका क्षणी सुरुवातीला पहाताच मला ती आवडली होती. अर्थात ती कोणालाही आवडेल अशीच होती, माझ्या मते....! तिने मला पाहिलेलं नव्हतं, तिला हे देखील माहित नव्हतं कि आपल्याला बघायला आलेला मुलगा कोण आहे ते.


    हा सर्व पाहण्याचा कार्यक्रम ५-१० मिनिटांत उरकल्यानंतर आम्ही तितेच बसलेलो होतो. सर्व जण माझ्याकडे बघून हसत होते, गालातल्या-गालात. एकमेकांना खुणावत होते. खाणाखुणा करत होते. त्याचा मला राग येत नव्हतं, उलट त्यामुळे मी अधिकच सुखावलो जात होतो. प्रत्येक तरुणाबरोबर जे होत असते, तेच आज मी अनुभवत होतो.

   आता जेवणाची तयारी झाली होती. आम्ही सगळे हॉलमधून बाहेर मोकळ्या हवेत, सावलीला थांबलो होतो. तेवढ्यात अक्काने ( माझ्या आजीने) खिडकीतून मला आवाज दिला व घरात येण्यास सांगितले. योगीताच्या घरातल्या एका खोलीत आजी बसलेली होती. तिथे त्या खोलीत योगिता उभी होती. अक्काला मी विचारले, काय गं आक्का? कशाला बोलावलंस? आक्का म्हणाली, “अरे, योगीताने तुला पाहिलेलं नाही. ती म्हणत होती कि, मुलगा कोणता आहे, म्हणून तुला बोलवलं.” त्या खोलीत खाली एक चटई टाकलेली होती तिच्यावर मला बसण्यास सांगितले. मी गुपचूप, जरा हसत खाली बसलो. माझ्या हातात मोबाईल होता. त्या मोबाइलशी मी खेळत मान खाली घालून बसलो. योगिताला सुद्धा बसण्यास सांगितले. ती माझ्या एक हातभार लांब बसली. मी तिच्याकडे पहात नव्हतो पण ती माझ्याकडे पहात होती, हे मी ओझरतं पहात होतो. तिने दोन-तीन वेळा मान खाली-वर केली. मला व्यवस्थित पाहिलं होतं? माहित नाही. आता मला तिथे बसवेना. मी हळूच अक्काला म्हणालो, मी जाऊ का बाहेर? अक्काने ण बोलताच मानेने जाण्याचा इशारा केला. मी लगेच उठलो आणि तिच्याकडे न बघताच खोलीच्या बाहेर आलो. तेव्हा हॉलमध्ये जेवणाची तयारी चालू होती. सर्वजण बसले होते. मी सुद्धा बसून घेतले. जेवण वाढण्यात आले. मी घरूनच खूप जेवण करून गेलो असल्याने मला भूक नव्हती. पण बसावे लागले. बाकीची मंडळी जेवायला बसली. पण मला काय जेवण जाईनासे झाले होते. माझ्या मनात विचार तरंग सुरु होते. त्यात खरंच भूक नव्हती. सर्वजण मला आग्रह करत होते. खा.., काही होत नाही, मी खात होतो .( हळूहळू...) जेवणाच्या ताटात मटकीची भाजी, पोळी, पापड, लोणचे, दारात आलेल्या नवीनच कैऱ्यांच्या चिप्स, कांदा, मुळा, बित, एका वाटीत गुलाबजामून, डाळ- भात, एवढा मोठा मेनू होता. ते एवढं वाढलेलं होतं कि ताट भरलेलं पाहूनच मी हे खाऊ शकणार नाही असे बरोबर असलेल्या माझ्या दाजींना म्हणालो. पण आता परत थोडे करता येणार होते. खावं लागलं. शेवटी इच्छा नसतानाही मी जेवण केलं.

    आज तारीख २१/०३/२०१० या तारखेच्या सर्व अंकांची बेरीज ९ येते आणि माझी जन्मतारीख देखील ९ आहे. माझा जन्म रविवारी झालेला. आणि आज देखील रविवारच होता. म्हणजे एक्नादारीत सर्व पॉझीटीव्ह होणार हे नक्की. ( संख्या शाश्त्रावर माझा विश्वास आहे असं नाही.) हा विचार मी जेवतानाच मनात करत होतो.

    जेवण करून पुन्हा आम्ही घराच्या समोर आवारात आलो. सोफ वगैरे खाल्ली. निवांत खुर्चीवर सावलीत गप्पा मारत बसलो. शिवाजी मामांच्या परिचयाचे बर्वे साहेब माझ्या शेजारी येऊन बसले होते. मला गायन येते का? वाद्य संगीत येते का? असली काहीतरी बरीचशी प्रश्न मला विचारत होते. मी सुद्धा त्यांना त्यांची उत्तरे देत होतो. गप्पा चालू होत्या तेवढ्यात आतून आवाज आला. रवी इकडे ये, मी आत गेलो. तिथे आक्का व दिनकर मामा म्हणजे योगीताचे चुलते, हे दोघे बसलेले होते. योगीताही होती तिथे. मग मी अक्काला विचारले काय गं.? आक्का म्हणाली अरे तुम्हाला दोघांना जर काही बोलायचं असेल तर वर गच्चीवर हवेत जा. हे तर मनासारखेच होतं. त्यामुळे मी त्यास लगेच होकार दिला. योगीताला सुद्धा हेच हवे होते, असं मला वाटले. नवीन पिढी आहे म्हटल्यावर हे सगळं आता कॉमन झालं आहे. पण हे मला नवीनच.

    मग योगिता पुढे मी तिच्या मागे चालू लागलो. तिने मला त्यांच्या किचनमध्ये नेलं. मी मनातल्या मनाट म्हटलो, इकडे कशाला. किचन मध्ये तिची आई व १-२ बायका काम करत होत्या. किचनला लागूनच एक रूम होती. ती बंद होती. योगीताने ती उघडली. मी तिच्यापाठोपाठ खोलीत शिरलो. खोलीचा दरवाजा तिने आतून लावला. खोलीत थोडासा अंधार होता. तिने लाईट लावली. खोलीत एक कॉट होतं. एका कोपऱ्यात टेबलवर कॉम्पुटर ठेवलेला होता. कॉम्पुटर पाहून आनंद झाला. आम्ही दोघेही उभेच एकमेकांकडे पहात होतो. तेवढ्यात योगिता म्हणाली, विचारा काय विचारायचं आहे ते. मी जरा गोंधळूनच म्हणालो, तुला काही विचारायचं असेल तर विचार. ती नाही म्हणाली. मग मी पी.सी. कडे बोट दाखवून तिला म्हणालो, येतो का तुला चालवता? ती म्हणाली येतं पण थोडं-थोडं मी म्हणालो मला येतं बऱ्यापैकी. मग मी कॉटवर बसलो. तिलाही बसण्यास सांगितले. तीही बसली. माझ्या शेजारीच. मला तिच्या नजरेत नजर भिडवता येत नव्हती. मी किंचित घाबरलो होतो. ती देखील थोडीशी. असे मला वाटले. मी तिला प्रश्न विचारला, मी तुला आवडतो का? ती म्हणाली, हो. मी तिला नाव विचारले, तिने सांगितले योगिता. माझे नाव तिला मी सांगितले. फर्स्ट इयरला आहेस का सेकंड इयरला., ती एस.वाय. एफ.वाय. असे उच्चारली. मी स्पेशल विषय कोणता ते विचारले, तिने मराठी, इंग्रजी अ...अ...अअअ.... असं सांगायला सुरुवात केली. मी तिला मध्येच थांबवले. आणि म्हटलं, अगं स्पेशल कोणता? ती उत्तरली हिंदी. ठीक आहे. मी माझ्या स्वप्नांबद्दल तिला थोडक्यात माहिती सांगितली. नंतर ती म्हणाली, स्वप्न सुद्धा पूर्ण होतील. मी म्हणालो नाही. आता नाही. आता फक्त शाळा आणि घर, बस्स...मला साधं राहणीमान खूप आवडतं. ती म्हणाली, मी काय जास्त मेकअप केलेला आहे का मग? नाही गं...! ती म्हणाली , मला जॉब करून द्याल का ? मी म्हणालो, ठीक ना. तुला शिक्षक व्हायला आवडेल का? ती म्हणाली हो. मी मेहंदी क्लास केलेला आहे आणि ब्युटी पार्लरचा पण करायचा आहे. ठीक आहे, मी कर म्हटले. मी म्हणालो, काल रात्री फोन आला, मग आम्ही येणार असं तुला कळले, मग काय रात्री विचार केला असणार ना? कि तो असा असेल तसा असेल वगैरे हम्म्म.... ती म्हणाली नाही. अस्सा काही विचार नाही केला मी खरंच. मी म्हणालो नाही खोटं.., विश्वास नाही बसत. अजून तर.... मी म्हणालो विनोद केला गं. ती म्हणाली, हम्म्म .. जायचं का आता, मी म्हणालो नाही, एक शेवटचा प्रश्न राहिला. ती म्हणाली, विचारा... हममम....लग्न म्हणजे काय? ती म्हणाली ते तसं काही मला त्यातलं माहिती नाही. मी सांगू का? ती म्हणाली सांगा ना..सांगा ना... जरा जवळ येऊन. मी म्हणालो हम्म .. लग्न म्हणजे दोन प्रेमळ मनाचं मिलन होय. ती म्हणाली, हे अस्स माहिती होतं मला. मी हसलो, तीही हसलो. ती खूप छान दिसत होती त्यावेळी. मला तिने भारावून टाकले होते तिच्या अदाकारीने व सौंदर्याने.

   मी तिला शेवटी माझा फोटो दिला. त्यावर माझे फोन नंबर दिले. ती म्हणाली, अक्षर खूप छान आहे तुमचं. ती म्हणाली माझ असंच आहे. मी हसलो फक्त. आणि म्हणालो वाटलं तर फोन कर. मग तिच्याकडे मी तिचा फोटो मागीतला. ती म्हणाली माझा.... मी म्हणालो हो. मला पाहिजे आहे. मग ती म्हणाली, माझे फोटो एवढे चांगले नाहीत. मी म्हणालो दे... ड्रेसवरचा देऊ का साडीवरचा? मी म्हणालो, साडी.... त्यानंतर आम्ही त्या खोलीतून बाहेर पडलो. त्यानंतर ती कुठे गेली ते मी पाहिलं नाही. पण मी मात्र हॉलमध्ये सोप्यावर येवून बसलो. मी आता खूप फ्री फील करत होतो. काकांनी तिला documents दाखवण्यास सांगितले. त्याची फाईल घेऊन ती आली. फाईलवर तिने तिच्या हस्ताक्षरात तिचे नाव टाकलेले होते. त्यावर मी हात फिरवला. तिने ते पाहिलं. मी तिच्याकडे त्यावेळी पाहिलं आणि हसलो. तिचे अक्षर एवढं काही खास नव्हतं. एक-एक सर्टिफिकेट मी पाहू लागलो. बरीचशी चित्रकलेचीच होती. मी म्हणालो, सगळी चित्रकलेचीच आहे का? ती म्हणाली मला आवड आहे. बस्स... आता निघायची वेळ झाली. आम्ही सगळे निघालो. गाडीत बसलो. ती काहीतरी कारण काढून घराच्या बाहेर आली. मी तिच्याकडे एकटक बघू लागलो. तीदेखील जराशी. मला असं-तसं बोलू लागले. तेवढ्यात ती आत गेली. मी तिला नजरेने शोधू लागलो. पण एवढ्या गोंधळात ती कुठे गेली मला दिसेना. ती एका खिडकीत उभी असल्यासारखी वाटली, पण तिच्याकडे बघण्यासाठी वेळच मिळाला नाही. बस्स... आणि तिचा चेहरा, बोलणे, स्मरणात ठेऊन आम्ही निघालो.


Rate this content
Log in

More marathi story from Ravindra Langote

Similar marathi story from Romance