#गजरा
#गजरा


आज दोन वर्षांनी ते एकमेकांना भेटले. वाटा वेगळ्या आहेत हे पक्क माहित असूनही एकमेकांतल्या त्या शेवटच्या सुवासाला शेवटचं अनुभवण्यासाठी. तो खिडकीच्या ओट्यावर जाऊन वारा झेलत होता. ती त्याच्या पुढ्यात पाठमोरी होऊन बसली.
ती - हा गजरा सोडवशील का रे केसातून जरा?
तो - कसा सोडवू?
ती - बघ फुलं तोडून काढ किंवा दोऱ्याच्या गाठी सोडवून काढ.
त्याने हळूच तिच्या केसात हात फिरवला.
ती - फुलं तोंडायचंच ठरलं तुझं तेवढ्यात तर मग फुलांचा रस हातावर अन गंध मनावर भिनु दे थोडा. गाठी सोडवणार असशील तर पकड एक धागा, ओढ ती निसर गाढ जी बांधली गेलीये आपल्यात उगाच...
किंवा
नखांच्या कलाकुसरीने सैल कर हळूहळू आठवणींच्या गाठी. जेव्हा पाकळ्या पसरतील कुशीत तुझ्या त्या ठेवशील ना रे एखाद्या पुस्तकात जपून वर्षानुवर्षे??
तोवर त्याने गजरा सोडवला होता, तिच्या लांब केसात हात फिरवून पाकळ्याही मोकळ्या केल्या होत्या... त्याला आता पुस्तकं अन तिचं मन वाचायची सवयच उरली नव्हती.
"अत्तरांना श्वास होते जेव्हा तुला मी वाहिले मोगराही रुक्ष आहे स्पर्शात तुझीया जाणिले..."