एक प्रश्न होता
एक प्रश्न होता
येणार्या बसची वाट पहात मी बसस्टॉपवर उभा होतो. इतक्यात ! माझी नजर समोरून येणार्या त्या तरुणीवर स्थिरावली. तिच अप्रतिम सौंदर्य पाहून स्वतःला विश्वामित्र समजणारा मी ही क्षणभर विचलीत झालो. ती तरूणी जवळ येताच माझ्या शेजारीच येऊन उभी राहिली. तिने परिधान केलेल्या पिवळ्या पंजाबी ड्रेसमध्ये ती मला अगदी माझ्या स्वप्नातील परीसारखी दिसत होती. त्या दिवशी का कोण जाणे पहिल्यांदा कोणा तरुणीसोबत बोलण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती. इतक्यात समोरून बस आली, मी लगबगीने बसमध्ये चढून खिडकीजवळ जाऊन बसलो. माझ्या सुदैवाने ती तरूणीही हळूच माझ्या शेजारी येऊन बसली. ती माझ्या शेजारी येऊन बसल्यामुळे मला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटत होत. तशी ती मला थोडी बिलगूनच बसल्यामुळे मी थोडा ओशाळलो होतो कारण अशाप्रकारे काणा तरूणीला बिलगून बसण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. माझ्या तापट आणि तटस्थ स्वभावामुळे सहसा कोणी तरुणी माझ्या शेजारी बसत नसे. चुकून एखादी बसली तर बिलगून बसण्याची हिंमत करत नसे. तिकिट काढण्यासाठी कंडक्टर जवळ आला असता त्या तरूणीने बंदे रुपये पुढे केले आणि कंडक्टर तिच्यावर रागावला पण तिने तिच्याकडे सुट्टे पैसेच नसल्याचे सांगितल्यावर मी दोघांचीही तिकिट काढून एक तिकिट तिच्या हातात दिली असता गालात गोड हसून तिने माझे आभार मानले. तिच्या हातात तिकीट देताना नकळत तिच्या नाजूक हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि माझ्या संपूर्ण शरिरात एक अनाळखी लहर निर्माण होऊन गेली. त्या दिवशी आम्ही दोघे एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही. माझा बसस्टॉप जवळ येताच मी जागेवरून उठून दरवाजात गेलो. बसमधून उतरल्यावर मी सहज बसकडे पाहिल्यावर माझ्या जागेवर खिडकीकडे सरकून बसलेल्या तिने मला हाताने टाटा केला. मग ! नकळत मी ही माझा हात उंचावला. त्या दिवशी का कोणास जाणे कामावर माझं लक्ष अजिबात लागत नव्हत. तो संपूर्ण दिवस मी तिच्या आठवणीवर घालविला. त्या रात्री मला झोप अशी आलीच नाही. नराहून तिचा तो सुंदर मनमोहक चेहरा सारखा माझ्या डोळ्यासमोर येत होता.
दुसर्या दिवशी मी बसस्टॉपवर थोडा लवकरच गेलो कारण तिला पुन्हा एकदा पाहण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती. तिची वाट पाहात मी बसस्टॉपवर उभा होतो इतक्यात ती समोरून येताना दिसली आणि माझ्या जीवात जीव आला. माझ्याजवळ येताच माझ्याकडे पाहून ती तिच्या गुलाबी गालात गोड हसली. ती हसल्यावर तिच्या गालाला पडणारी सुंदर खळी मी कितीतरी वेळ पाहत होतो. त्या दिवशीही बसमध्ये ती माझ्या शेजारीच बसली पण यावेळी कंडक्टर जवळ येताच दोघांच्या तिकीट काढून तिने एक तिकीट माझ्या हातात टेकवली. मी ही ती निमूटपणे घेतली आणि तिचे आभार मानले. त्यावर तीही काही न बोलता गालात गोड हसली. पण तिच्या नाजूक हाताचा स्पर्श मात्र मला त्या दिवशीही अनुभवता आला. काही तरी बोलावं म्हणून तिनेच मला विचारल, तुम्ही कोठे कामाला आहात ? तिच्या या प्रश्नाला उत्तर देत मी म्ह्णालो, मी एका इंजिनिअरींग कंपनीत कामाला आहे. तुम्ही तिथे काय काम करता ? तिने केलेल्या या दुसर्या प्रश्नाला उत्तर देत मी म्ह्णालो, मशीन ऑपरेटर ! यावर तिला गप्प झालेलं पाहून तिला बोलत करावं म्ह्णून मी विचारलं तू कोठे कामाला आहेस ? माझ्या या प्रश्नाला तिने मात्र सविस्तर उत्तर दिलं ती म्हणाली, ‘ काही दिवसांपूर्वीच मी ग्रॅज्युएट झाले कॉम्प्युटर कोर्स अगोदरच केलेला असल्यामुळे आता एका खाजगी कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटर म्ह्णून कामाला राहिली आहे. अर्थात आज माझ्या कामाचा दुसरा दिवस आहे. इतक्यात माझा बसस्टॉप जवळ आला तिला बाय करून मी बसमधून खाली उतरलो आणि तिच्याकडे मागे वळून पाहिले माझ्याकडे पाहून ती गालात गोड हसली आणि हात उंचावून मला टाटा केला पण मी मात्र हात उंचावण्याच टाळ्लं. त्या रात्रीही मला झोप आली नाही ती एका वेगळ्याच कारणामुळे ती एका चांगल्या कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटर होती आणि मी मात्र दहावी नापास एका फालतू कंपनीत मशीन ऑपरेटर आहे, आमच्या दोघांचं मेल ते काय ? कहॉं गंगु तेली और कहॉं राजा भोज ! असे अनेक विचार माझ्या मनात येऊन मी अस्वस्थ होत होतो. पण शेवटी खूप विचार केल्यानंतर मी पुन्हा त्या तरुणीच्या भानगडीत न पडण्याचा निर्णय घेतला. दुसर्या दिवसापासून मी घरातून लवकर निघून मिळेल त्या बसनी कामाला जाऊ लागलो. असेच एक दोन आठवडे निघून गेल्यानंतर एक दिवस ती तरूनीच कोणाची तरी बसस्टॉपवर वाट पाहत उभी असल्याची दिसली . नाईलाजाने तिच्या जवळ जाताच चेह्र्यावर कोणताच भाव न आणता मी हाय ! केलं. बस येताच दोघेही बसमध्ये चढून एकाच सीटवर जाऊन बसलो. कंडक्टर जवळ येताच दोघांचीही तिकीट काढून मी खिडकीतून बाहेर पाहत राहिलो. मी बोलत नाही हे पाहून तिनेच बोलायला सुरूवात केली. हल्ली कंपनीत लवकर जाता वाटत ? तिच्या या प्रश्नाला मी मानेनेच होकार दिला. तुंम्ही संध्याकाळी किती वाजता सुटता ? तिच्या या प्रश्नाला मी सांगता येत नाही असं तुटक उत्तर दिलं पण तरीही ते तिच्या लक्षात येऊ नये म्ह्णून मी तिला विचारल तू किती वाजता सुटतेस ? पाच वाजता ! असं तिने सहज उत्तर दिलं . इतक्यात माझा बसस्टॉप जवळ आल्यामुळे मी बसमधून खाली उतरल्यावर तिच्याकडे जराही न पाहता रस्त्याने सरळ चालू लागलो.
संध्याकाळी बसमधून घरी येत असताना ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर बसलेली ती मला दिसली. तिनेही मला पाहिलं पण पाहून न पाहिल्यासारखे केले. तिच्यासोबत कोणीतरी तरूण मुलगा बसला होता, ती त्याच्यासोबत हसत- हसत गप्पा मारत होती आणि मधे - मधे माझ्याकडे चोरून पाहतही होती. पण मी मात्र तिच्याकडे पाहणे टाळ्ण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही तिघे एकाच बसस्टॉपवर उतरलो. खाली उतरल्यावर तिने एकदा माझ्याकडे मागे वळून पाहिले आणि गालात गोड हसली तेंव्हा रणांगणावर हरलेल्या श्रत्रियाप्रमाणे माझा चेहरा खाली पडला होता. त्या दिवशी मी बाजारातून जात असताना ती मला पुन्हा त्या बाजारात दिसली तिच्या एका मैत्रीणीसोबत गप्पा मारताना. मला वाटलं तिने मला पाहिलं नसावं म्ह्णून मी किंचित काढता पायच घेतला होता तोच तिने मला नावाने हाक मारली विजय ! तिने मला नावाने हाक मारली हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला कारण मी तिला माझं नाव सांगितल्याचे मला आठवत नव्हते इतकच काय मला तिचेही नाव माहित नव्हते. मी आवाक ! होऊन तिच्याकडे पाहत राहिलो ती धावत माझ्या जवळ आली आणि म्ह्णाली, सॉरी हं ! आज बसमध्ये माझा भाऊ सोबत होता म्ह्णून मी तुमच्यासोबत बोलले नाही. ते जाऊ दे तुला माझं नाव कोणी सांगितल ते पहिलं सांग ? त्यावर ती चटकण म्ह्णाली, कविताने ! मी पुन्हा अवाक ! होऊन तिच्याकडे पाहत राहिलो कारण कविताच्या माझ्या बहिणीच्या जवळ- जवळ सर्व मैत्रीणींना मी ओळखत होतो. पण हिला मी पाहिल्याचं मला आठवत नव्हत म्ह्णून मी तिला तीच नाव विचारल असता ती म्ह्णाली, सुकन्या ! सुकन्या हे नाव ऐकताच माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले कारण सुकन्या कविताची सर्वात आवडती मैत्रीण होती पण मी कधीही तिला प्रत्यक्ष भेटलो नव्हतो. कविता नेहमीच सुकन्येच्या गुणाची, हुशारीची आणि संस्कारांची स्तुती करत असते त्यामुळे तिला प्रत्यक्ष पाहण्याची माझ्या मनातही सुप्त इच्छा होतीच ! पण ती मला अशी भेटेल याची मी स्वप्नातही कल्पना केलेली नव्हती. मला अवाक ! झाल्याच पाहून माझ्या खांदयावर हळूच हात ठेऊन सुकन्या म्ह्णाली, तू मला ओळखत नसलास तरी मी तुला ओळखते. मी तुला आज नव्हे तर सात - आठ वर्षापूर्वीपासून ओळखते. कवितासोबत असताना मी कित्येकदा तुला दुरूनच पाहिले होते. मी जेंव्हा जेंव्हा तुला कोठे पाहायचे तेंव्हा तुझ्याशी बोलण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण व्हायची पण तुझा स्वभाव पाहता माझी हिंमत होत नसे. त्या दिवशी बसस्टॉपवर तुला पाहिले आणि त्या संधीचा फायदा घेण्याचा मी निर्णय घेतला. माझ्याजवळ सुट्टे पैसे असतानाही मी मुद्दामच बंदे पैसे पुढे केले आणि आपल्यात संवाद सुरू झाला. मी पदवीधर आहे हे कळल्यावर मला टाळण्यासाठी तू कामाला लवकर जायला लागलास. जर एखादी कमी शिकलेली मुलगी एखाद्या कमी शिकलेल्या मुलाच्या प्रेमात पडू शकते तर एखादी जास्त शिकलेली मुलगी कमी शिकलेल्या मुलाच्या प्रेमात पडली तर बिघडल कुठे ? तिच्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्ह्तं पण स्वतःसाठी माझ्याकडे एक प्रश्न होता की स्वतःला विश्वामित्र समजणार्या मलाही सुकन्येच्या रुपाने खरोखरच एक मेनका भेटली होती की कवितानेच तिला मेनका बनवून माझ्या आयुष्यात धाडले होते ?