दृष्टिकोन
दृष्टिकोन
सामान्यतः सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन दृष्टिकोन आपल्याला दैनंदिन आयुष्यात बघायला मिळतात. सकारात्मक दृष्टिकोन मानसिक संतुलन टिकवून ठेवतो तर नकारात्मक दृष्टिकोनामुळे आपली मनाची शांती भंग पावते.
वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे दृष्टिकोन अंगिकारावे लागतात, कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्या निर्णयाच्या परिणामाबद्दल सकारात्मक तसेच नकारात्मक दोन्ही दृष्टिकोनातून विचार करूनच निर्णय घेणे फायद्याचं ठरते. कधी परिस्थिती अशी असते की निर्णय घेणे आपल्या हातात नसते , वाट बघण्याशिवाय जेव्हा हातात काहीच नसते तेव्हा पॉजीटिव्हली विचार केलेला बरा,म्हणजे आपलं मानसिक संतुलन टिकून राहते.
उदाहरण म्हणजे परीक्षेची तयारी करायची असेल तर फक्त सोपेच प्रश्न येतील अशी पॉजीटिव्ह थिंकिंग करण्यापेक्षा कठीणातील कठीण प्रश्न येउ शकतात तसेच आऊट ऑफ कोर्स प्रश्न सुद्धा येऊ शकतात असे निगेटिव्ह थिंकिंग करून अभ्यास करणेच फायद्याचे ठरते. एकदा राम आणि श्याम या दोन मित्रांची परीक्षा असते ते दोघेही अभ्यास करायला लागतात, श्याम सकारात्मक विचार करून सोप्या प्रश्नांचा अभ्यास करतो तर राम नकारात्मक विचार करून कठीण प्रश्नांचा अभ्यास करतो, परिणामी रामला श्याम पेक्षा उत्तम गुण मिळतात.
पुढे राम आणि श्याम त्यांच्या मुलांचे लग्न जुळवायला एका गावात जातात तिथे श्याम च्या मुलासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो त्यात सगळं चांगलं असते फक्त मुलगी काहीच बोलत नाही तर तिचे आईबाबा मुलगी लाजाळू आहे असं म्हणतात, श्याम पॉजिटीव्ह दृष्टिकोन वाला असतो त्यामुळे तो निगेटिव्ह विचार करत नाही आणि श्यामच्या मुलाचं लग्न ठरते.
नंतर ते त्याच गावात राम च्या मुलीसाठी मुलगा बघायला जातात तर मुलगा अमेरिकेत कंपनीत काम करतो असे त्यांना सांगण्यात येते,राम पॉजिटीव्ह निगेटिव्ह दोन्ही दृष्टिकोनातून विचार करणारा असतो त्यामुळे तो मुलाबद्दलची माहिती पडताळून पाहतो आणि त्याला कळून येते की मुलगा अमेरिकेत तर नाही पण अमळनेर ला शाळेत चपराशी आहे, चपराशी असणं गुन्हा नाही पण खोटी माहिती देणे हा नक्कीच गुन्हा होता. अशा रीतीने राम फसण्यापासून वाचतो.
इकडे श्यामच्या मुलाचं लग्न झालेले असते आणि नवरी मुलगी लाजाळू नसून मुकी असल्याने बोलत नव्हती हे श्याम ला समजते. आता श्यामला पश्चाताप होतो पण मुळातच त्याचा स्वभाव पॉजिटीव्ह थिंकिंग करणारा असल्याने,’ बरं झालं मुकी तर मुकी कमीतकमी बडबड करून माझ्या मुलाचं डोकं तरी खाणार नाही, जे होते ते चांगल्यासाठीच’ असं तो म्हणतो आणि पुढे जातो.
‘जे होते ते चांगल्या साठीच’ ही बिरबलाची गोष्ट बऱ्याच जणांच्या परिचयाची असेल. बिरबलाला सवय असते, ‘जे होते ते भल्यासाठीच’ असं तो नेहमी म्हणायचा, एकदा शिकार करताना राजाचा अंगठा कापल्या गेला तेव्हा बिरबल म्हणाला होता ‘जे होते ते भल्यासाठी’ राजाला त्याचा फार राग आला पण काही दिवसांनी पुन्हा राजा शिकारीला गेला असता त्याची वाट चुकली आणि तो जंगलात भरकटला.
तिथे असणाऱ्या आदिवासी लोकांच्या तावडीत तो सापडला,त्यांनी त्यांच्या देवाला राजाला बळी देण्याचं ठरवलं आणि आता राजाच्या मानेवर घाव घालणार तेवढ्यात त्या आदिवासी लोकांच्या म्होरक्याला राजाचा तुटलेला अंगठा दिसला.
त्याने त्यांच्या भाषेत आपल्या लोकांना सांगितले की अंगठा तुटलेला व्यक्ती बळी साठी चालत नाही आणि त्यांनी राजाला सोडून दिले. राजा जीव मुठीत धरून राजवाड्यात आला तिथे त्याने बिरबलाला सगळं सांगितलं आणि जे होते ते भल्यासाठी हा बिरबलाचा दृष्टिकोन बरोबर होता ते राजाला पटलं.
अंगठा होता तुटला म्हणून राजा मृत्यूच्या जबड्यातून सुटला.
एकदा असाच किस्सा माझ्या परिचयातील कुटुंबासोबत झाला, झाले असे की त्यांना मुंबईला एका लग्नाला जायचे होते,पावसाळ्याचे दिवस होते,ट्राफिक मुळे आधीच उशीर झाला होता त्यात एक्सप्रेस वे च्या सुरुवातीलाच त्यांची गाडी बंद पडली मग मेकॅनिक ला बोलावणे त्याने गाडी ठीक करणे यात बराच वेळ गेला.
त्यात त्या कुटुंबीयांचा फारच विरस झाला. त्यांची मुलगी तर फारच नाराज झाली कारण लग्न हुकलं होतं आणि तिला आता मिरवायला मिळणार नव्हतं. तेवढयात बातमी येऊन थडकली की पुढे एक्सप्रेस वे वर मोठ्ठी दरड कोसळली आहे आणि आता हा रस्ता प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात येत आहे.
त्या कुटुंबीयांनी तिथेच त्यांच्या कुलदेवतेला नमस्कार केला कारण देवाच्या कृपेने ते वाचले होते. त्यांची कार जर बंद पडली नसती तर ती कोसळणारी दरड नेमकी यांच्या कारवर कोसळली असती.
‘जे होते ते भल्यासाठी’ याचा त्यांना प्रत्यय आला होता. अशा पद्धतीने निर्णय घेताना दोन्ही दृष्टिकोनातून निर्णय घेऊन पुढे येईल त्या परिस्थितीला ‘जे होते ते भल्यासाठीच’ अशा दृष्टिकोनाने सामोरे जाणेच फायद्याचे ठरते.
