दिव्यत्वापुढे नतमस्तक मी!
दिव्यत्वापुढे नतमस्तक मी!


"हॅलो...हॅलो आवाज येतोय का रे?? अरे ऐक ना मित्रा तुझा ब्लड ग्रुप कोणता आहे रे?" एक मुलगा दवाखान्याच्या बाहेर असलेल्या रक्तपेढीच्या बाहेर उभा राहून कुणाशीतरी फोनवर बोलत होता. तिथे कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तो जरा जोरातच बोलत होता म्हणून मला त्याचं बोलणं स्पष्ट ऐकू आलं. समोरून काय उत्तर मिळत होते ते मला समजत नव्हतं, पण तो खूपच परेशान होऊन तिथे येरझाऱ्या घालत होता आणि एका मागोमाग एक फोन लावत होता. खूप जणांना फोन करून झाला पण बहुदा त्याला हवा असलेला ब्लडग्रुपचं रक्त त्याच्या संपर्कातल्या व्यक्तींमधे कुणाचंच नसावं, असा एकंदरीत मी अंदाज लावला.
माझे जवळचे नातेवाईक तिथे ऍडमिट होते म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. माझं बाळ लहान असल्यामुळे मी हॉस्पिटलच्या बाहेरच त्याला खेळवत होते आणि नवरा मधे भेटायला गेला होता. मला त्या मुलाची तळमळ बघून खूपच अस्वस्थ वाटत होतं, वाटत होतं त्याला जाऊन विचारावं की कुठला ब्लडग्रुप हवाय? काय प्रॉब्लेम आहे? कोण ऍडमिट आहे वगैरे... पण हिम्मत होईना कारण आधीच दवाखाना म्हणजे माझ्या पोटात गोळा येतो त्यात जर अपघात वगैरे असं काही ऐकलं की अजूनच कालवाकालव होते. पण त्या मुलाची केविलवाणी अवस्थाही बघवत नव्हती.
एवढयात त्याचा पुन्हा फोन वाजला. त्याने उचलला आणि समोरून काय निरोप आला माहीत नाही तो धावतच हॉस्पिटलमधे गेला. माझी धाकधूक अजूनच वाढली, मनात काहीबाही विचार येऊ लागले. फक्त मी मनोमन त्याचे जे कुणी मित्र किंवा नातेवाईक ऍडमिट असतील ते सुखरूप असावे एवढीच अपेक्षा आणि प्रार्थना करत होते. सध्या तेवढंच हातात होतं माझ्या. विचारांचं काहूर माजलं होतं डोक्यात. धडधडत होतं काळजात. असं कुणाला हतबल बघून अजूनच मन अस्वस्थ होते.
जरा वेळाने तो मुलगा पुन्हा दिसला मला, मी नवऱ्याला फोन लावत होते की तो बोलेल त्या मुलाशी, त्याला विचारले नक्की काय प्रॉब्लेम आहे, कारण एकदम अनोळखी मुलाशी कसं डायरेक्ट बोलू मी... पण नवऱ्याचा फोन काही लागेना. शेवटी न राहवून मी बाळाला घेऊन गेलेच त्या मुलाजवळ, त्याला विचारल,"काय प्रॉब्लेम आहे भाऊ, कधीपासून बघतेय तुम्ही खूप परेशान दिसताय? कोण ऍडमिट आहे? आणि तुम्ही एवढं धावत का गेले थोड्या वेळापूर्वी? कुठल्या ब्लड ग्रुपचं रक्त हवंय?"
तर तो सांगायला लागला,"ताई, ए पॉझिटीव ब्लडग्रुप पाहिजे होता, वडील ऍडमिट आहेत, त्यांचा काल रात्री खूप मोठा अपघात झाला होता. डोक्याला जबरदस्त मार लागल्याने खूपच रक्तस्त्राव झाला होता, म्हणून कालपासून चार बाटल्या रक्त चढवलंय. पण दुर्मिळ रक्तगट असल्याने साठापण कमी होता. माझाही तोच आहे रक्तगट, मीही दिलं रक्त पण डॉक्टर आता नाही म्हणताहेत अजून ब्लड घ्यायला. शहरात खूप चौकशी केली पण मिळत नव्हतं रक्त कुठेच म्हणून परेशान होतो...!"
मला एकदम आठवलं की नवऱ्याचा ब्लडग्रुप सेम आहे, त्या मुलाला जो हवा तो. त्याला बोलले, "अहो माझ्या नवऱ्याचा आहे ए पॉझिटीव, तो रक्तदानही करत असतो नेहमी, मी फोन लावतेय त्याचा पण लागत नाहीत, येईलच तो आता, तो देऊ शकतो तुमच्या वडिलांना रक्त, मी विचारते त्याला... तुम्ही काही काळजी नका करू!"
त्यावर तो मुलगा म्हणाला,"नाही ताई आता झाला बंदोबस्त, मला त्यासाठीच फोन होता आईचा की डोनर मिळालाय, म्हणूनच धावत गेलो होतो. पण तुमचे खूप आभार ताई, तुम्ही अनोळखी असून एवढ्या आपुलकीने चौकशी केली आणि मदत करायलाही तयार झाल्या."
मी बोलले, "त्यात काय आभार, पण गरज लागली तर आहे आम्ही, सांगा तसं. आणि काळजी घ्या आईवडिलांची."
एवढं बोलणं होऊन तो मुलगा गेटच्या बाहेर निघून गेला.
बराच वेळ झाला नवऱ्याचा काही पत्ता नव्हता, वाट बघून कंटाळले होते मी. फोनही लागत नव्हता. लहान मुलांना आयसीयु सेक्शनमध्ये प्रवेश नव्हता म्हणून नाईलाजाने तिथेच थांबून राहिले. बाळही खूप त्रास देऊ लागलं होतं एव्हाना. अर्धा-पाऊण तासाने नवरा बाहेर आला. तो आला नाहीतर मी लगेच माझा तोंडाचा पट्टा चालू केला, किती वेळ? केव्हाची फोन लावतेय, टेन्शन आलं होतं मला, एवढा वेळ का लागला? सगळं ठीक आहे ना? वगैरे वगैरे...
तो म्हणाला,"अगं हो थांब जरा, सांगतो श्वास तर घेऊ दे... आपले काका बरे आहेत एकदम. डिस्चार्ज मिळतोय त्यांना. अगं एक एक्सिडेंट केस होती, एक गृहस्थ ऍडमिट आहेत, त्यांची बायको तिथे डॉक्टरची गयावया करत होती, नवऱ्याला वाचवा म्हणून... त्यांचं बोलणं कानावर पडलं म्हणून थांबलो. डॉक्टरला विचारणा केल्यावर समजलं की अर्जंट ब्लड द्यावं लागेल, आणि रक्त मिळत नाहीये, ते लोक प्रयत्न करताहेत. चौकशी करून समजलं की ए पॉझिटीव ब्लडग्रुपचं रक्त हवंय. क्षणाचाही विचार न करता मी म्हटलं... घ्या माझं रक्त, तुला फोन करत होतो पण मधे अजिबात नेटवर्क नव्हतं आणि अर्जंट होतं म्हणून लगेच गेलो रक्त द्यायला. काकांच्या मुलाला पाठवलं तुला निरोप द्यायला. पण बहुतेक डिस्चार्जच्या फॉर्मलिटीमधे विसरला तो सांगायला."
ते सगळं ऐकून किती सुखावले मी. मनोमन खूप कौतुक वाटलं नवऱ्याचं. मग त्याला घडलेलं इतिवृत्त सांगितलं. म्हटलं एक जीव वाचल्याचं समाधान तर आहे पण आता जर पुन्हा त्या मुलाच्या वडिलांना रक्ताची गरज असेल तर आपल्यालाही मदत नाही करता येणार.
आमचं बोलणं सुरूच होतं, तेवढ्यात तो मुलगा मागून आला आणि नवऱ्याला म्हणाला,"भाऊ खूप खूप आभार तुमचे. देवासारखे धावून आलात."
एव्हाना त्याने मला बघितलं तर चमकला, "अरे ताई, हेच ते भाऊ, ज्यांनी माझ्या वडिलांना रक्त दिलं..." मग नवऱ्याने त्याला माझी ओळख करून दिली, ही माझी बायको... आणि आम्ही सगळेच एकमेकांना बघून हसलो. तो नवऱ्याला अगदी हात जोडून नतमस्तक होऊन म्हणाला, "खरंच खूप खूप आभार तुम्हा दोघांचे..!" नवऱ्याने त्याचा फोन नंबर घेतला आणि सांगितले की, वडिलांच्या तब्येतीविषयी कळव आम्हाला आणि काळजी घे तर हो म्हणून त्याने आमचा निरोप घेतला.
तो मुलगा गेला तशी मी नजर भरुन नवऱ्याकडे बघू लागले. डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. ऊर गर्वाने भरून आला होता. त्याच्याकडे बघून दिव्यत्वाची प्रचितीच आली जणू. नकळत माझेही हात जोडले गेले त्याच्यासमोर.
म्हणतात ना... "दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती..!"