Suvarna Bagul

Tragedy Inspirational

3  

Suvarna Bagul

Tragedy Inspirational

आत्मतेजाचे सौंदर्य

आत्मतेजाचे सौंदर्य

5 mins
710


"आयुष्य जगा..फक्त घालवू नका! एकदाच मिळालेला आपल्याला हा मानवाचा जन्म असा व्यर्थ जाता कामा नये, कारण आपण सगळेच एक विशिष्ट उद्दिष्ट घेऊन आलोय,त्या विधात्याने प्रत्येकाला काही न काही रोल देऊन या पृथ्वीतलावर पाठवलंय..तो रोल आपल्यापेक्षा कुणीच सरसरीत्या करू शकत नाही..हे समजून जर आपण जगलो, तर नक्कीच आपल्याला जगण्यातला आनंद शोधण्यासाठी कुठल्याच भौतिक गोष्टीची गरज भासणार आणि किंवा कुठलंच शारीरिक अपंगत्व आपल्याला कमकुवत करू शकत नाही..कारण प्रत्येकाचं आपलं एक तेज असतं, एक सौंदर्य असतं!! ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही किंवा कुणीही त्या आत्मिक तेजाला धक्का पोहचवू शकत नाही!! तर मित्र मैत्रिणींनो उठा आणि दाखवून द्या जगाला कोण आहात तूम्ही!! आणि तुमचा रोल उत्तमरीत्या पार पाडा.."


व्हीलचेअरवर बसलेल्या ईराने तिचं भाषण संपवलं आणि टाळ्यांचा गडगडाट झाला.. सगळ्यांनी उभे राहून तिला सन्मान दिला..एका दिव्यांग आणि अपंग मुलांसाठी राबवण्यात आलेल्या कार्यक्रमात ती बोलत होती.. प्रमुख पाहुणे म्हणून तिला आमंत्रण देण्यात आलं होतं.. अगदी एकोणतीस तीस वर्षाची ईरा, दिसायला अतिशय देखणी, गोरीगोमटी, नाकी डोळी अगदी तरबेज, उंच सडपातळ बांधा, लांबसडक केस,गालावर खळी आणि तिच्या चेहऱ्यावरचं देदीप्यमान तेज.. अगदीच सुंदर होती ती..


जन्मतःच अपंग नव्हती हा... खूप साधारण कुटुंबात जन्मलेली पण हुशार होती. उत्तम वक्तृत्व हा तिचा प्लस पॉईंट होता.. तिला जर्नलिजम आणि मीडिया क्षेत्रात जाण्याची, काम करण्याची खूप इच्छा होती.. पण घरच्या आर्थिक परिस्थितमुळे आणि घरच्यांच्या मागासलेल्या विचारधाणेमुळे ती तिची आवड जोपासू शकली नाही..वीस वर्षाची झाली तशी तिच्या लग्नासाठी स्थळ शोधणे सुरू झाले.. सहा महिन्यातच अनुरूप स्थळ (घरच्यांच्या मताने) बघून लग्न ठरवून टाकलं.. 'चांगल्या मुली, आईवडिलांच्या विरोधात जात नाहीत, त्यांचे निर्णय आपल्यासाठी योग्यच असतात' हीच शिकवण तिच्या मनावर बिंबवली गेली होती अगदी लहान होती तेव्हापासून.. तीही तयार झाली लग्नाला.. लग्न पार पडलं..


नवरा दिसायला जेमतेम पण श्रीमंत घराणं होतं... अगदी सगळी भौतिक सुखं तिच्या पायाशी लोळण घेत होती. नवरा आधी काही दिवस चांगला वागला. नव्याचे नऊ दिवस असतात तसंच काही... नंतर दुर्लक्ष करू लागला हिच्याकडे... तिला वाटले कामं असतील, बिझी असेल तो म्हणून... पण त्याची चिडचिड हिच्यावर वाढतच होती. तिला वाटायचे कदाचित नवरा चांगला मिळाला तर तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकते मीडियामध्ये जाण्याचे... पण इथेही तिच्या पदरी निराशाच पडली.. सासरची परिस्थिती माहेरपेक्षाही वाईट होती. मग काय आपलं नशीब समजून आहे तसं मान्य करून जगत होती..


एके दिवशी गाडीतून बाहेर जात असताना अचानक गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे ईरा आणि तिच्या नवऱ्याच्या गाडीला भीषण अपघात झाला.. ड्राइवर सीटच्या बाजूचा दरवाजा एका भिंतीला आदळला गेल्यामुळे ते दार उघडलं आणि तिचा नवरा बाहेर फेकला गेला पण ईरा गाडीमध्येच अडकली आणि त्यानंतर ती गाडी आणखी दोन वाहनांना टक्कर देऊन खूप वेळा पलटी झाली.. इतका भयानक अपघात होता की ईराच्या शरीरातली अर्धी हाडं फ्रॅक्चर झाली होती, तिचा कंबरेखालचा पूर्ण भाग चिरडला गेला. भयंकर मार लागला तिला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती तशीच एक-दीड तास... तिचा नवरा बाहेर फेकला गेल्यामुळे त्यालाही बरंच लागलं होतं पण ईराचे अख्खा देह लाहीलाही होऊन निपचित पडला होता.. जरा वेळात रुग्णवाहिका आली आणि त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं...


अथक प्रयत्न करून डॉक्टरने तिचे प्राण वाचवले पण त्या अपघातामुळे तिचा कंबरेपासून खालचा पूर्ण भाग निकामी झाला होता..बऱ्याच शस्त्रक्रिया करून, टाके टाकून, अर्ध्या फ्रॅक्चर झालेल्या शरीराची हाडं कशीबशी जुळवली होती डॉक्टरने!! तिचा नवरा सुखरूप त्याच्यातून बाहेर पडला पण ईराला मात्र आठ महिने दवाखान्यात घालवावे लागले.. या आठ महिन्यात बऱ्याचदा ती देवाला विचारायची की मी जिवंत का आहे?? अक्षरशः स्वतःला संपवून टाकण्याची इच्छा व्हायची तिची... पण ते करण्यासाठीही तिच्या शरीरात त्राण नव्हते, कुणाच्या आधाराशिवाय हलूही शकत नव्हती ती. हळूहळू हात काम करू लागले, छातीचा पिंजरा आणि चेहऱ्याची हाड जुळली पण पाय निकमीच झाले होते. व्हीलचेअर हा शेवटचा पर्याय होता तिच्यासमोर.. तिने तो स्वीकारला.. नाईलाजच होता. अपंगत्वामुळे तिच्या नवऱ्याने आणि सासरच्यांनी तिचा त्याग केला. तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली, तिने विचार केला शारीरिक अपंगत्वावर मात करता येईल पण अशा मानसिक अपंगत्व असलेल्या माणसासोबत राहून आयुष्याची राखरांगोळी का करायची? तिने त्याला घटस्फोट दिला आणि सज्ज झाली आयुष्याचा खडतर प्रवास एकटीने करण्यासाठी..


साहजिक आहे, अपंग असल्यामुळे दुसऱ्या विवाहाचा तर प्रश्नच उपस्थित होत नाही. मग आईवडीलांनाही ओझं वाटू लागलं तिचं! ती घरबसल्या क्लासेस घेऊन थोडेफार पैसे कमवू लागली पण ते पुरेसं नव्हतं तिच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी! एक मोकळं आभाळ तिला उत्तुंग भरारी घेण्यासाठी आमंत्रण देत होतं!! गरूडभरारी घेण्यासाठी तीही जोमाने कामाला लागली. तिच्या वक्तृत्व आणि तडफदार व्यक्तिमत्वाच्या जोरावर मोटीवेशनल विषयांवर बोलायला सुरुवात केली. कुठंही सेमिनार, कार्यक्रम किंवा सामाजिक उपक्रमांमध्ये बोलण्यासाठी तिला संधी मिळवून द्यायला तिच्या कॉलेजच्या ग्रुपने खुप मेहनत घेतली, खुप सहकार्य केलं. त्यातून तिची उपजीविका सुरू होती. त्यानंतर तिने जर्नलिजम आणि मास मीडियाचे कोर्सेस केले आणि कॅम्पस सिलेक्शनमध्ये नावाजलेल्या न्यूज चॅनेलमधे तिला नोकरी मिळाली!! हुश्श... आकाशही ठेंगणे झाले तिच्या आनंदापुढे... तिच्या जिद्दीपुढे... नव्याने जगायला लागली... जगायला शिकली आणि लोकांनाही जगायला शिकवू लागली!!


तिच्या आयुष्याच्या खडतर प्रवासातून तिने स्वतःसाठी मार्ग शोधला... काही दिवसातच सुख, ऐश्वर्य तिच्या पायाशी नांदू लागलं... घर, गाडी सगळंच होतं आज तिच्याकडे... पण शेवटी एक स्त्रीच ना ती!!! तिची आई होण्याची इच्छा जागरूक झाली... लग्न करून कुणावर अवलंबून राहायचं नव्हतं पण मातृत्वही अनुभवायचं होतं तिला... डॉक्टरला भेटली... IVF किंवा दुसरा आणखी कुठलाही पर्याय असेल तर तिला स्वतःचं मूल हवं होतं... जे तिच्या शरीरात तिला वाढवायचं होतं. पुढं आणखी एक धक्का बसला तिला. अपघातात झालेल्या शरीराच्या नुकसानामुळे ती मुलाला जन्म देऊच शकत नाही. तिच्या गर्भात मूल जगूच शकणार नाही, असे डॉक्टरने तिला सांगितले. कशीबशी सावरलेली पुन्हा कोसळली ती. आता तिला स्वतःचा आणि देवाचा दोघांचाही राग येत होता. तिचं अंतःकरण अगदी भरून आलं होतं.. तोच बाहेर खूप गोंधळ चालू झाला.. डॉक्टर धावतच बाहेर आले, तीही पाठोपाठ बाहेर आली. एक खूप भीषण अपघात झाला होता.. त्यात रस्त्यात भीक मागत असलेल्या एका महिलेच्या अंगावरून गाडी गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता आणि गाडीतल्या लोकांनाही खूप लागलं होतं. जरा वेळात तिला कळले की गाडीतले लोक आता सुखरूप आहेत पण त्या भीक मागणाऱ्या बाईच्या मागे एक तीन-साडेतीन वर्षाची मुलगी अगदी टाहो फोडून रडत धावत होती. तिची मुलगी होती ती. तिच्या जवळ जाऊन ईराने विचारपूस केली तर समजले की वडील दोन वर्षे आधीच आजारपणात वारले आणि ह्या मायलेकी भीक मागून जगत होत्या. ती खेळत होती आणि आई सिग्नलवर गाड्यांच्या पुढे जाऊन भीक मागत होती त्यात या भरधाव आलेल्या गाडीखाली ती चिरडली गेली. 


त्या मुलीचं ह्या जगात आता कुणीही नव्हतं... ईराने पटकन मनाशी निर्णय केला.. मला मातृत्व जगायचं आहे आणि ह्या मुलीला पालकत्वाची गरज आहे. जरी मी शारीरिकदृष्ट्या अपंग आहे, मुलाला जन्म नाही देऊ शकत पण मी या मुलीची जबाबदारी नक्कीच घेऊ शकते. मातृत्व अनुभवायला जन्मच द्यावा लागतो असंही काही नाही ना... तिला तिच्या जगण्याचा उद्देश सापडला... परमेश्वराने तिला दिलेला रोल तिने अचूक हेरला आणि यशस्वीरीत्या तो पार पाडण्याचा निश्चय केला. तिने त्या बाईचे विधीपूर्वक अंत्यसंस्कार करून कायदेशीररित्या त्या मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव ठेवले,"तेजश्री"!!!!


तेजश्रीमुळे तिच्या आयुष्यात आणखीच बहार आली. या धाडसी निर्णयासाठी तिचा खूप आदरसत्कार झाला आणि आज ती मोटीवेशनल स्पीकर म्हणून काम करते! दोघी मायलेकी भरभरून आयुष्य जगताहेत.. एकमेकींना आधार देत, एकमेकींना सावरत प्रसंगी एकमेकींच्या प्रेरणा बनून सगळ्यांना जगण्याची नवीन उमेद नवीन चेतना देताहेत! 


कारण प्रत्येकाचं आपलं एक तेज असतं, एक आत्मिक सौंदर्य असतं... त्या तेजाने दुसऱ्याचं आयुष्य उजळवू या आणि त्या सौंदर्याने जगण्याकडे सुंदर दृष्टिकोनातून बघू या.. तेव्हाच दाखवता येईल जगाला तुम्ही कोण आहात ते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy