Dr Anjushree Metkar

Inspirational

4.1  

Dr Anjushree Metkar

Inspirational

दीड दिवसांचा खेळ

दीड दिवसांचा खेळ

7 mins
73


दिनांक १६ जुलै.

स्थळ-पुणे 

वेळ -संध्याकाळी ६:३३ची.


हॅलो डाॅक्टर, मी दिपिका बापट बोलते. मॅम मला तुमची मदत हवी होती. दिपिका खूपच घाबरलेली वाटत होती तिच्या बोलण्यावरून. तसं आमचे डाॅक्टर-पेशंट नात तिच्या आईपासून जवळपास ३० वर्षांपासून.


अगं बोल ना! काय झाले आहे?


पलिकडून आवाज आला, मॅम मला तुमच्या ओळखीने पास मिळवून द्याल का? माझ्या बहिणीला, रागिणीला तातडीने मुंबईला निघायचे आहे आणि आता नेमके लाॅकडाऊन लागले आहे. कृपा करून बघा ना, तुमच्या क्लिनिकमध्ये पोलिस खात्यातील बरेच रूग्ण नेहमीच मी बघते आणि काकांनाही विचाराल, ते सकाळनगर पोलिस डिस्पेंसरीला होते ना बरीच वर्षे त्यांचे ओळखीने काही जमले तर.


दिपिका अखंड बोलत होती श्वास गच्च दाबून हुंदके देतच. मी तिला मधेच थांबवत म्हटले, अगं आता काय काम आहे मुंबईला एवढे तातडीचे, ते तर सांगशील?


तशी ती सांगू लागली, रागिणीचे यजमान सुनिल हे टिटवाळ्याला फ्लॅटवर एकटेच असतात आणि रागिणीही मुलीसह थेरगावला आई-बाबांबरोबर राहते. सुनिलना गेल्या ४-५ दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला झाला आहे. स्थानिक डाॅक्टरांकडून त्यांनी औषधोपचारही करून पाहिले पण काहीच फरक पडला नाही. तेव्हा डाॅक्टरांचे सल्ल्यानुसार त्यांचे शेजारी त्यांना x-ray काढण्यासाठी घेऊन गेले होते. त्या शेजारच्याच काकांनी फोन करून सांगितले की case serous आहे. तर ताबडतोब येऊन तुमच्या यजमानांना येथून घेऊन जा. मी दुपारपासून सगळीकडे प्रयत्न करून थकले पण लाॅकडाऊन कडक असल्याने कुणी पासचे नावही काढू देत नाही, आम्ही फार चिंतेत आहोत. अचानक आई म्हणाली डाॅक्टरांना फोन करून विचार.


तेवढ्यात माझ्या डोक्यात विचार आला आणि मी तिला म्हटले, थांब बघते पण पासचे काम नाही झाले तरी त्यांना कुठे ऍडमिट करायचे जमते का ते बघुयात. मी माझा वर्गमित्र एसीपी सुरेंद्रला फोन लावला आणि घाईने त्याला सर्व प्रकार कथन केला. त्याला हेही सांगितले की, रूग्णाचा x-ray माझ्याकडे आला आहे. ते बघून रूग्णाची अवस्था जरा अत्यवस्थ दिसते तो Covid-19 suspect वाटतो मला. तू इतकी वर्षे मुंबईला होतास तर तुझ्या ओळखीने आपण रूग्णाला ऍडमिट करू शकतो का? रूग्णाची पत्नी मुंबईला पोहोचेपर्यंत एखाद्या मोठ्या हाॅस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट चालू झाली तर बरे होईल आणि तसं जर जमणार नसेल तर पासची काय पोझिशन तेही मला सांग. पण कसंही करून तुझ्या परिचयाच्या व्यक्तींशी संपर्क साधून तू याबाबतीत काय मदत करू शकशील ते कृपा करून मला तत्काळ कळवशील.


तसा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरेंद्र मला म्हणाला, अंजली तू रूग्णाचे पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर सारे मला तातडीने पाठव. आपण पेशंटला ऍडमिट करावयाची व्यवस्था करूयात पण पासचे नावही काढू नकोस. मी तुला व्यवस्था झाली की कॉल करतोच.


मी थोडी निश्चिंत झाले पण दिपिकाला सदर माहिती तातडीने माझ्याकडे पाठव आणि मी प्रयत्नात आहेच तुमचेही प्रयत्न चालू असू देत असे सांगत फोन ठेवला आणि सुरेंद्रकडे माहिती पोहोच करत माझा मोर्चा पुढील कामाकडे वळवला. 


एवढ्यात डाॅकला त्याच्या ठाण्याच्या डाॅक्टर मित्राची आठवण झाली. त्याने डाॅक्टर राजन पोरेंना फोन लावला आणि डाॅकने त्यांना state control room चा नंबर विचारला control room मधून msg गेल्यास रूग्णाची लवकर मदत होईल हा विचार होता त्याचा. समोरून डाॅक्टर पोरे आवाक् होत विचारू लागले, अरे तू आता निवृत्त झालास तर तुला कशाला हवा आहे हा नंबर?


तेव्हा घडला प्रकार डाॅकने डाॅक्टर पोरेंना विदीत केला. डाॅ. पोरेंनी म्हटले, तुला माहिती आहेच मुंबईची परिस्थिती किती अवघड आहे ते. कोरोनाची साखळी दिवसेंदिवस वाढतेच आहे पण तू मला ५ मिनीटे दे मी बघतो, असे म्हणून डाॅक्टर पोरेंनी फोन ठेवला.


५ मिनीट पूर्ण व्हायच्या आतच मला, प्रमोद नांदगावकरचा फोन आला. हे प्रमोद नांदगावकर स्वत:ची नोकरी सांभाळून समाजसेवा म्हणून अडल्या-नडलेल्यांना योग्य ती मदत पोहोचवणारे गृहस्थ. डाॅक्टर पोरेंनी निवृत्तीनंतर समाजसेवा करण्यासाठी red Swastik ही ंसंस्था join केली तेथेच त्यांची या नांदगावकरांबरोबर ओळख झाली होती. मी नांदगावकरांना माझा अल्पपरिचय करून देत रूग्णाची परिस्थिती अत्यवस्थ असल्याचे विदीत केले व लवकरात लवकर रूग्णाला ऍडमिट करणे गरजेचे असून रूग्ण एकटाच असल्याने काळजी व्यक्त केली. रूग्णाची सर्व माहिती देवून x-ray नांदगावकरांना forward केला. नांदगावकरांनी थोड्याच वेळात आपल्याला update करतो म्हणत फोन ठेवला. 


नांदगावकरांनी तो x-ray डाॅ. नितीन इंगळेंना दाखवला. तेव्हा कोविड तज्ज्ञ डाॅ. इंगळेंनी हा रूग्ण खूप अत्यवस्थ असून त्याला तत्परतेने रूग्णालयात भरती करण्याची आवशकता प्रतिपादीत केली. तसेच या रूग्णास कल्याण, डोंबिवली येथील एखाद्या अद्ययावत हाॅस्पिटलला नेण्याची गरजही बोलून दाखवली तसेच रुग्णाचा x-ray काढून बराच वेळ गेला असल्याने आता रूग्णाची परिस्थिती अधिकच गंभीर झाली असण्याची शक्यताही बोलून दाखवली. कल्याणला एखाद्या हाॅस्पिटल जेथे व्हेंटीलेटरसहीत बेड रिकामे असेल त्याची position पाहून तुम्हाला लगेच कळवतो, असे नांदगावकरांना सांगितले.


नांदगावकरांनी रूग्णाच्या पुण्यातील कुटूंबाशी संपर्क साधला आणि रूग्णाच्या बायकोला सर्व परिस्थितीची कल्पना देत तुम्ही वेळ न दवडता असाल तशा निघा व पास नसल्याने वाटेत तुमची कार पोलिसांनी अडवल्यास मला लगेच फोन करा मी पोलिसांशी बोलेन, असे आश्वासन दिले व स्वत: नांदगावकर रूग्णाच्या दिलेल्या पत्त्याच्या दिशेने रवाना झाले. या सगळ्या फोनाफोनीत आणि प्रयत्नात नांदगावकर रूग्णाचे घरी पोहोचण्यात ४-५ तासांचा अवधी निघून गेला होता. मुंबईतला धुवांधार पाऊस, तेथील दमट हवामानामुळे रूग्ण अधिकच अत्यवस्थ झालाच होता.

 

दरम्यान, मला सुरेंद्रचा फोन आला दोन माणसे रूग्णांचे घरी पाठवतो ते रूग्णास ऍडमिट करतील असे त्याने सांगताच रुग्णाची ऍडमिशनची व्यवस्था झाली असून काही मदत लागली, अडचण आल्यास तुला कळवते असे सांगून मी फोन ठेवला. मला तर कधी एकदा रूग्ण ऍडमिट होऊन त्याला योग्य ती मदत मिळते, औषधोपचार चालू होतात असे झाले होते. रूग्णाला वेळेत मदत मिळणे गरजेचे होते. आपण स्वत: डाॅक्टर असूनही या परिस्थितीत काही करू शकत नाही याचे वैषम्य वाटत होते.


माझा नांदगावकरांशी रूग्णाच्या नातेवाईकांशी सतत संपर्क चालूच होता. विशेष म्हणजे रूग्णाचे सख्खे भाऊ-बहिणी कल्याण, डोंबिवली, कोपरखैरणे, पनवेल येथे वास्तव्यास असूनही रूग्णाचे पत्नीने परोपरीने त्यांना विनवूनही तुम्ही कृपा करून रूग्णास ऍडमिट करा मी पोहोचतेच आहे, असे फोन करूनही रूग्णाचा एकही भाऊ-बहीण मदतीसाठी पुढे सरसावले नाहीत ही अतिशय खेदाची गोष्ट निदर्शनास आली. काय वेळ आणली होती या कोविडने! सख्खी, रक्ताची माणसे विचारायला तयार नाहीत, पुढे होऊन मदतीचा हात द्यायला तयार नाहीत हा किती मोठा दैवदूर्विलास, किती दुर्भाग्यकारक आहे हे. आणि हे नांदगावकर नावाचे गृहस्थ केवळ पोटतिडकीने समाजसेवेच्या अत्यंतिक आवडीने स्वत:चा कामधंदा सांभाळून पुढे येतात रूग्णांचे नातेवाईकांना आधार देतात, त्यांना रूग्ण ऍडमिट करण्याचे आश्वासन देतात. नांदगावकरांसारख्या व्यक्तींमधून आजही या भयावह परिस्थितीत माणुसकीचे दर्शन घडते, जणू परमेश्वरच माणसाचे रूपात प्रकट होतो आहे, अशी जाणीव झाली आणि विश्वास “पानिपत“ मधे मारला गेला असे म्हणणे उचित नाही याचाही प्रत्यय आला.

 

रात्री साडेबारापर्यंत आमची फोनाफोनी चालूच होती. मी न राहवून रागिणीला झाला का रूग्ण ऍडमिट म्हणून फोन केला तेव्हा ती म्हणाली, मॅम मी मुंबईचे वाटेवर आहे, कल्याण येथील “विठ्ठलकृपा हाॅस्पिटल”मध्ये बेड रिकामे असून नांदगावकरानी ते reserve केले असून स्वतः नांदगावकर ambulance मध्ये सुनिलबरोबर निघाले आहेत असा त्यांचा फोन आला होता. तुम्ही काळजी करू नका मी admit केल्यावर तुम्हाला msg करीनच. संध्याकाळपासूनच्या फोनाफोनीमुळे व मनावरच्या ताणामुळे मलाही श्रांत झाल्यासारखे वाटत होते रात्री १ नंतर मीही शांत झोपून गेले.

 

सकाळी ६ वाजताच मला जाग आली. मी उठल्याबरोबर दिपिकाला फोन केला. दिपिका म्हणाली, मी रात्रीच तुम्हाला मेसेज पाठवला आहे. माझे यजमान रागिणीबरोबर गेले आणि ते तिला हाॅस्पिटलमध्ये सोडवून परतही आले. जिजूंना रात्री दीड वाजताच ऍडमिट केले आहे पण त्यांची oxygen level ५० पर्यंत खाली आली होती आणि आताही खूप अस्थिर आहे. जिजू अत्यवस्थ आहेत, असे डाॅक्टराचे म्हणणे आहे. आम्ही खूप काळजीत आहोत.


मी नित्य दिनक्रमाला सुरुवात केली पण मनात विचार रूग्णाचेच चालू होते. Oxygen level एवढी कमी होत असेल तर रूग्ण वाचणे कठीणच होते हे कळत होते तरी मी दिपिकाच्या प्रत्येक फोनला तिला होईल बरे, होईल बरे म्हणून आश्वस्त करत होते. दुपारी दोनच्या सुमारास मला नांदगावकरांचा फोन आला रूग्ण खूपच अत्यवस्थ असून डाॅक्टरांनी त्यांना Wockhardt hospital ला ऍडमिट करा असे सांगितले आहे. थोड्याच वेळात रागिणीनेही मला डाॅक्टरांचा तातडीने मोठ्या हाॅस्पिटलला हालवण्याविषयीचा निर्णय सांगितला व माझे मत विचारले. डाॅक्टरांनी खूपच घाई केली रूग्ण हलविण्याची म्हणून मीही तिला सल्ला दिला की, आधी ventilator bed कोणत्याही हाॅस्पिटलमध्ये रिकामे आहे का हेबघूनच रूग्णास हलवा. मग पुन्हा एकवार आमची मुंबईस्थित डाॅक्टर मित्रांकडे फोनाफोनी सुरू झाली. एखाद्या हाॅस्पिटलमध्ये असे ventilator सहित bed उपलब्ध आहे का ते आजमावण्यासाठी पण व्यर्थ. शेवटी रूग्णाला सायन हाॅस्पिटलला घेऊन जावे लागले. रूग्णाला व रूग्णांचे नातेवाईकांना तेथील अनुभव काही चांगला आला नाही. कोरोनाच्या या संकटात कक्षसेवक, तातडीच्या सेवेचे डाॅक्टर्स यांच्या भावनाशून्य कृतीचे वर्णन ऐकून मन मात्र विषण्ण झाले. त्यांचे रूग्णांप्रतीचे सौहार्द नष्ट झाल्याचे ऐकून खूप वाईटही वाटले. अत्यवस्थ अवस्थेमुळे आमच्या पेशंटचे प्राणोत्क्रमण मात्र झाले. इतक्या प्रयत्नांनंतरही रूग्ण वाचू शकला नाही याची बोच मात्र जीवाला लागून राहिली.


एक मात्र खरे, कोरोनाने आपली माणसे दूर ढकलली गेली व दूरची जवळ आणली. What’s up, Fb च्या या तंत्रकुशल जमान्यात माणसं माणसांपासून दूर गेली. पण कोरोनाच्या या लॉकडाऊनमुळे ती घरात एकटी कोंडली गेली तेव्हा त्यांना एकमेकांना भेटण्याची तीव्र ओढ निर्माण झाली. आपले सुख-दु:ख शेअर करण्याची गरज वाटू लागली. सामाजिक जाणीवा वाढीस लागल्या. एकमेकांना मदत करण्यासाठी मदतीचा हात सरसावू लागले. आतापर्यंत self cantered जगणारी माणसे मी नि माझे या मनोवृत्तीतून बाहेर पडताना दिसत आहेत. मग ते गरीबांना मदत करणे असो, संकटात सापडलेल्यांना साथ देणे असो नाही तर मुक्याप्राण्यांची सेवा करणे असो.


Friend in need friend indeed हे मात्र खरेच आहे. कोरोनाचे काळात अशी अनेक उदार, दिलदार माणसे मला बघायला मिळाली. एरवी “परदु:ख शितल असते“ असे म्हणणारी माणसे मात्र दुसऱ्याचे दु:ख आपले समजून एकमेकांसाठी झटताना पाहून खूप समाधान वाटले. “मला काय त्याचे?“ या मानसिकतेतून समाजमन बाहेर पडताना पाहून खूप आनंदही वाटतो. घरातील वृद्धांची काळजी घेणे, त्यांचेबरोबर वार्तालाप करणे, त्यांचेबरोबर सुख-दुःख वाटणे या गोष्टी घराघरात घडताना पाहून, वृद्धांचे हासरे भाव पाहून मन सुपाएवढे मोठे झाले. पाल्य-पालक सामंजस्यही या कोरोनाने वाढीस लावले. आपल्या लहानग्यांना आपल्या प्रेमाची, मायेची गरज आहे, आपल्या पैशांची किंवा महागड्या खेळण्यांची नाही याची जाणीव पालकांच्या मनांत रूजू लागली आहे. हा तर नात्यांसाठी सुगीचा काळच म्हणावा लागेल. सहवासाने प्रेम वाढते या लाॅकडाऊनमुळे सहवास वाढला आणि नात्यांचे पदर एकएक करून मोकळे होऊ लागले. जीवनाची अशाश्वतता या कोरोनामुळे अधिकच गडद झाली. त्यामुळे जाती, धर्म, पंथाचे पगडा बहिष्कारून लोकांमध्ये माणूस म्हणून माणसाप्रती आस्था निर्माण झाली. “लहू का एक रंग, चलो साथ चले संग संग” हे ब्रीदवाक्य झाले तर आयुष्य आनंदी होईल विसाव्या शतकाचे उंबरठ्यावर.


कोरोनामुक्त स्वयंसिद्ध, उत्कट मानवतावादी, दिलदार अशा भारताची पहाट किती सुखकर असेल ना मित्रांनो.

“रात्रीचे उदरात वसे उद्याचा उष:काल.” ही पहाट पाहाण्यास तयार आहात ना मित्रांनो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational