Amrut Birbale

Fantasy Inspirational Others

3.2  

Amrut Birbale

Fantasy Inspirational Others

धोंडा खावा की घालावा!?

धोंडा खावा की घालावा!?

4 mins
43


भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक मैलांवर रुढी परंपरा - रिती -बदलते. अशा या विविधतेने नटलेल्या माझ्या मायभूमीत वर्षानुवर्षे संस्कृती जपली जाते आहे. जो तो आपला धर्म आपल्या परंपरा, आपली भक्ती ही भगवंताच्या चरणी अर्पण करत आला आहे. अशा या धर्तीवरती रूढी परंपरा ह्या वर्षानुवर्षे चालत आले आहेत, मग यासारखा आनंद दुसरा काय तो! तर मग अशा वैविध्यततेत एकात्मता असलेला आणि रूढी परंपरा वर्षानुवर्ष जपत असलेला दुसरा कोणता देश नसेल‌.

आता आपला देश हा चंद्रावर तिसऱ्यांदा पोचला आहे. तेथील माहिती देखील गोळा करत आहे, आपल्या देशातील सीमारेषा आतील सेक्युरिटी, इंटरनेटचे जाळे व इतर अशा अनेक गोष्टींत एवढी प्रगती झाली आहे की या देशाचे कौतुक करावे तेवढे कमीच. अहो एवढेच काय तर आपला भारत देश तिन्ही लोकात म्हणजे धरती, आकाश, पाताळ किंवा जल या सर्व ठिकाणी अग्रगण्य स्थानावर आहे असे म्हटले तरी चालेल. 

परंतु ते का उगीच नाही बरे याचे सर्व श्रेय हे सासरेबुवांना जाते, असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. आता तुम्ही म्हणाल मी हे काय बडबड करत आहे? अहो तुम्हीच पहा ना, कन्यादान करताना तिच्या आई-वडिलांनी जर त्या कन्येला एखादा हुशार सुशिक्षित, घरंदाज आणि संस्कारी, प्रामाणिक जावई मुलगा हा जर शोधला नसता किंवा करून दिला नसता तर हे शक्य झाले असते का? मग तुम्हीच मला सांगा मी काय चुकीचे बोलत आहे का? नाही ना ,मग मला सांगा त्या कन्येला उत्कृष्ट पती मिळावा ह्यासाठी मुलाच्या आई-वडिलांनी कमी परिश्रम घेतले असतील काय? अहो आई-वडिलांनी मुलाला उत्कृष्ट शिक्षण दिले. उत्कृष्ट संस्कार दिले सुशिक्षित केले आणि समाजासाठी घडविले देखील आणि उत्कृष्ट कन्या देखील मिळवून दिली, जी सुशिक्षित शिकलेली रूपवान गुणवान आणि घरंदाज आहे अशी. हे वर्षानुवर्ष प्रत्येक कुटुंबामध्ये सुरळीतपणे किती छान पणे चालू आहे बरे. असे दुसऱ्या देशामध्ये आपणास क्वचितच पाहायला मिळेल. यामुळे आपला देश परंपरेने आणि संस्काराने किती महान आहे हे कोणास सांगायला नको.

मग आता आपण थोडीशी दुसरी बाजू किंवा सत्यता पडताळून पाहूया, आता एवढे सर्व छान असताना अचानक आपला समजूतदारपणा, वैचारिकपणा कुठे हरवतो काही कळतच नाही बुवा. सुशिक्षित जावईदेखील भला मोठा हुंडा मागतो आणि सुशिक्षित सासू-सासरे देखील ते निमुटपणे देतात. सरकारने हुंडा प्रथा थांबविण्यासाठी कायदा केला आहे म्हणून बरे. म्हणून तर उघड उघड असे काही होत नाही परंतु हे चालूच आहे, असे म्हणायला ही काही हरकत नाही. काही अंशी तरी का होईना याला आळा बसला आहे असे म्हणायला हरकत नाही. परंतु अजूनही जावई रुसून बसतोच. आता यामध्ये दोन्ही बाजूंनी समान दोष आहे, असे मला वाटते.

आता यात तीन वर्षातून येणारा अधिक मास किंवा धोंड्यांचा महिना, आणि तोच श्रीविष्णूंच्या चरणी भक्ती अर्पण करायचा महिना तो ह्यावर्षी देखील आला आहे. आता हा महिना म्हणजे सर्व जावयांसाठी मुली- सुना बाळांसाठी लेकींसाठी एक सुवर्णपर्वणीच असते. कारण येथे जावयांची खरी लॉटरी लागत असते, हो पण ती परंपरेच्या नावाखाली बरे. 

मग प्रतिष्ठा,चढाओढ,संस्कृती,परंपरा,महानता, इगो,मीपण अशा एक ना अनेक गोष्टी अवतरतात. जावयाला धोंडा दान दिले जाते. कुठे सोन्याची चैन,अंगठी तर कोठे सोन्याची पेढे, ३३ अनारसे मग कुठे अजून काय काय आहे. खरे तर मी परंपरेत काय देतात आणि काय नाही हे लिहण्याइतका सुज्ञ नाही. पण एवढे मात्र नक्कीच ठाऊक जेथे जावयाला श्रीहरी विष्णूचा रूपात पाहून सोन्या नाण्याचा, कपड्यालत्याचा आहेर दिला जातो. ही नक्की श्रीहरी ची इच्छा नसेल येथे अजून बरेच नातेवाईक सुद्धा जोडले जातात म्हणे मानसन्मानाला . ज्या मुलीच्या पित्याने कर्जबाजारी होऊन भला मोठा खर्च कन्यादानासाठी केलेला असतो. तो पिता पुन्हा प्रतिष्ठेसाठी मान-अपमानासाठी,मुलीच्या सासरचे काय म्हणतील,आपले, परके ,ते चार लोक, काय म्हणतील म्हणून कर्ज काढतो आणि जावयाचा पाहुणचार करतो व रात्री चिंतेत रडत बसतो. दोन वेळेचे जेवण एक वेळवर येते,पण मुलीचा स्वाभिमान वाचवला म्हणून त्या आशेवर पुढील दिवस काढतो. हे त्या विष्णू देवाचरणी खरच पोचत असेल का? ही भक्ती पुण्यवान असेल का? अशा कित्येक खर्चिक रूढी- परंपरा आहेत, याचा काही इतिहास आहे का? आणि हे सर्व होत असताना सुशिक्षित जावई देखील रुसून बसतो. तेथे काही ठिकाणी समजूतदार जावई व कुटूंब अपवाद असतीलच म्हणा. परंतु येथे काही कन्या देखील आहेत‌‌, आई- बापाला पतीचा मान सन्मान करा म्हणून मागे लागणाऱ्या कशासाठी स्वतःच्या मोठेपणासाठी का तिच्या घराण्याच्या दिखाव्यासाठी... बर दुसरी बाजू मुलाच्या घरचे सुद्धा आई-वडील असतील.आमच्या मुलाला काय केले? हे विचारायला किंवा मुलीचे आई- वडील असतील स्वतःचा मोठेपणा दाखवायला. खरंच हे सुशिक्षित जावयाला पटते का? हा धोंड्याच्या नावाखाली छुपा हुंडा घेणे नव्हे का? बरं ज्याची ऐपत आहे तो करेल,पण ते पाहून आपल्याच समाजातील आपले नातेवाईक,भावकी ज्यांची परिस्थिती नाही त्यांना खिजवतील, हे कधीपर्यंत चालणार? मग तुम्ही केलेली सुशिक्षित कन्या किंवा सुशिक्षित जावई, घरंदाज घराणे, उच्चभ्रू घराणे याला काही अर्थ उरतो का? मग अशा वेळेत जर एखाद्या शिकलेला जावई, सुशिक्षित घराण्यातला जावई,कन्या, सासू-सासरे,आई-वडील ,भाऊ-बहीण, मेहुणा मेहुणी, नणंद,भावजय,शेजारी-पाजारी,आत्या,मावशी,काका-काकू,गल्री,गाव,तालुका,राज्य,देश जर प्रवृत्त करत असेल तर ह्या लोकांना धोंडा खायला द्यावा की डोक्यात धोंडा घालावा, असा प्रश्न पडतो. आपली संस्कृती महान आहे. परंपरा नक्कीच जपल्या पाहिजेत. परंतु त्या वैचारिक दृष्टिकोनाने आणि ना की अंधश्रद्धेने आणि आडमुठेपणाने..!! आपणच आपल्या येणाऱ्या पिढीचे आदर्श आहोत. विचार बदलणे गरजेचे आहे. तेच जावयाचे दान हे गरजू,अनाथ,उपाशी,विद्यार्थी,शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना आणि अशा गरजू लोकांना द्यावे. तेव्हाच खरे श्रीहरी विष्णू व लक्ष्मी माता प्रसन्न होतील. येथेच जावयाने आपण ठाम निर्णय द्यावा जेणेकरून ह्या गोष्टींना आळा बसेल. माझा कोणाच्या परंपरेला वा प्रथेला विरोध नक्कीच नाही आणि कोणाच्या भावनांना ठेच पोहचाविण्याचा हेतू देखील नाही. एक जावई म्हणून एक आई-वडिलांचा संस्कारी सुशिक्षित मुलगा व समाजाचे देणे म्हणून हे भाष्य केले आहे. तरी चूक भूल माफी असावी.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy