tanaya pathak

Inspirational

2  

tanaya pathak

Inspirational

देशभक्ती

देशभक्ती

3 mins
103


          भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे; माझा भारत देश महान आहे. आपण हे गर्वाने बोलतो, पण हे बोलताना आपण याचा अर्थ समजतो का? माझ्या या भारत देशावर माझे प्रेम का आहे? भारत का महान आहे? याची उत्तरे आपणास माहीत आहेत का? की, आपण हे फक्त बोलायचे म्हणून बोलतो, सगळे बोलतात म्हणून. मला असे वाटते, की कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा, घटनेचा आणि अनुभवाचा दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे. त्यातले चांगले, वाईट समजून घेतले पाहिजे. प्रश्नच जर समजून नाही घेतला तर उत्तर कसे देणार, म्हणून भारतामध्ये किंवा भारतीयांमध्ये अजून काय त्रुटी आहेत हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे.


       स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली, तरी भारतामध्ये आजही मूलभूत समस्या होत्या तशाच आहेत, गरिबी, निरक्षरता, भ्रष्टाचार, बेरोजगारी, जाती आणि वर्ण व्यवस्था. आजही आपण आरक्षणासाठी भांडतोय. आतंकवाद, परराष्ट्र धोरण या सारख्या समस्या वर तोडगा काढणे तर लांबच राहिले. भारतातील शिक्षण व्यवस्था चांगली नाही; इथे खेळ, क्रीडा, इतर कलागुणांना वाव मिळत नाही, फक्त गुण आणि श्रेणीवर भर दिला जातो. निरक्षरता आणि गरिबी एकत्रच राहतात; योग्य शिक्षण आणि नोकरीच्या साहाय्याने गरिबी मिटवता येते. शिक्षण हा एकमेव मार्ग आहे ज्याने भारतातील गरिबी मिळवता येऊ शकते.


        सरकारी आणि खाजगी क्षेत्रातही भ्रष्टाचार होतो; अवैध सावकारी, कर चोरी यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहचते. दुष्काळ पडतो, गरीब शेतकरी आत्महत्या करतोय; चांगल्या सिंचन प्रणालीचा अभाव आहे. या आणि अश्या हजार अडचणी भारतात आहेत. 


      या सर्व अडचणी, समस्या सोडवाव्या लागणारच. योग्य सरकार निवडली पाहिजे, त्या सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. दुसऱ्याला दोष देणे सोपं असत, स्वतः जबाबदारी घेणं कठीण असते, म्हणून सगळे सरकारकडे बोट दाखवून शांत बसतात. आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. सरकार, अधिकारी कार्यप्रणालीला त्यांचे काम करावे लागणारच पण आपणही आपल्या संविधानिक जबाबदाऱ्या पार पाडव्याचा लागतील.


         जसे आपले संविधानिक हक्क आहेत, तसेच आपल्या संविधानिक जबाबदाऱ्या ही आहेत. आपण जसे आपल्या हक्कासाठी लढतो त्याच जोमाने आपल्या जबाबदाऱ्याही पार पाडव्या लागतील. कुठलाही देश परिपूर्ण (परफेक्ट) नसतो, तो बनवावा लागतो आणि माझ्या या प्रिय भारतात ती क्षमता आणि सामर्थ्य आहे, गरज आहे ती फक्त तरुण रक्त सळसळण्याची. 


      भारत अजूनही खूप मागे आहे, आजही छेडछाड किंवा बलात्काराच्या भीतीमुळे एकटी मुलगी रात्री घराबाहेर जाऊ शकत नाही; बालकांना शाळेत पाठवण्याऐवजी बळजबरीने कुठेतरी काम करायला भाग पाडले जाते; ज्या देशाने राणी लक्ष्मीबाई, बचेंद्री पाल, सरोजिनी नायडू यांना जन्म दिला, तिथेच स्त्री-भ्रूण हत्येच्या घटना होत असल्याचे आपण पाहतो; कित्येक मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहतात; लोकसंख्येतील मोठ्या वर्गाला अजूनही प्राथमिक आरोग्य सुविधा मिळत नाहीत आणि अशी समस्यांची यादी आणखी कितीतरी पुढे जात राहते. हे समीकरण बदललेच पाहिजे. या साठी आपण आपल्या देशावर प्रेम असणे गरजेचे आहे, हीच भावना देश घडवायला मदत करते. मग अमेरिका असो, चीन किंवा फ्रांस ते सारे देशप्रेमी आहेत, देशासाठी त्यांनी मेहनत घेतली आणि विकसित देश झाले आहेत. मलाही माझ्या देशाला विकसित झालेले पाहायचं आहे, गर्वाने बोलायचे आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आणि हे फक्त युवा करू शकतात, तुम्ही आणि मी. तर चला नवा देश घडवूयात, चला खरोखर भारताला महान बनवूयात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational