इतिहासाचे साक्षीदार गड-किल्ले
इतिहासाचे साक्षीदार गड-किल्ले
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये असणारे गड -किल्ले इतिहासाची साक्ष देत अखंडित उभे आहे, हे केवळ दगडामातीचे गड-किल्ले केवळ वास्तू नाहीत. देशाच्या इतिहासाला कलाटणी दिलेल्या असंख्य प्रसंगांचे ते मूक साक्षीदार आहेत. पराक्रमाची जाज्ज्वल्य परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा वारसा तर सर्वांनाच प्रेरित करतो.
या किल्ल्यांच्या संवर्धनाचा खरा अर्थ राज्य पुरातत्व विभाग अन् दुर्ग संवर्धन समितीला कळावा अशीच इतिहासप्रेमींची अपेक्षा आहे. ‘महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग संवर्धन समिती स्थापन झाली खरी, पण कामाला म्हणावा तसा वेग नाही. किल्ल्यांच्या दिवसेंदिवस ढासळत असलेल्या बुरुजांची अवस्था बघवत नाही. महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य इतिहास जतन करावा आणि नव्या पिढ्यांना आदर्श परंपरा सांगावी. ऐतिहासिक स्थळांच्या माहितीचा अभाव व कामाबाबत उदासीनता दिसते. नाकर्तेपणामुळे गड-किल्ल्यांची अतोनात हानी सुरू आहे.
राजस्थानचे अवघे पर्यटन किल्ल्यांवर अवलंबून आहे. प्रत्येक किल्ल्याचे जतन करण्यासाठी राजस्थान सरकारने कमालीची मेहनत घेतली. देश-विदेशातील पर्यटक या किल्ल्यांच्या प्रेमात पडतोच, इतके काम लक्षणीय आहे. उलट स्थिती महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवरायांचे वास्तव्य असलेल्या वास्तू पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात. पण, किल्ल्यांची अवस्था पाहून निराश होतात. सुस्थितीतील किमान दोनशेपेक्षा अधिक किल्ल्यांची पडझड वेगाने सुरू आहे. या प्रकाराची ना कुणाला खंत ना खेद. महाराष्ट्रात पर्यटक अजिंठा-वेरूळ लेणी, मुंबई, कोकणातील निसर्ग व समुद्रकिनारे पाहतो असे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
किल्ल्यांची कुणाला माहितीच नसल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. शिवाय सर्वपरिचित किल्ले संवर्धनाला प्राधान्य आहे. त्यामुळे इतर प्रदेशातील अनेक किल्ले उपेक्षितच राहण्याची शक्यता जास्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अंतूर, जंजाळा, वेताळवाडी या दुर्गम किल्ल्यांपर्यंत कुणीच पोहचत नाही. तर कंधार, नळदुर्ग, उदगीर, परंडा किल्ल्यांची दूरवस्था वर्णनापलीकडची आहे. इतिहासाचे साक्षीदार मूकपणे मातीत एकजीव होत असताना आपल्याला त्याचे सोयरसुतक नाही.
या दगडामातीच्या किल्ल्यांमध्ये इतिहासपुरूष वास्तव्यास आहेत. देशाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या असंख्य प्रसंगांचे किल्ले साक्षीदार आहेत. म्हणूनच हा वैभवशाली वारसा तळमळीने जपणे आवश्यक आहे.
