चक्षू भेट
चक्षू भेट


सातारा – आसगाव हा प्रवास माझ्या आयुष्यात मी खूप वेळा केला, पण हा प्रवास पुन्हा घडवा असं वाटण्याचं कारण एकच 'ती'.
नेहमीप्रमाणे फलाटावर गाडीची वाट पाहत उभा होतो. ( आता फलाटाचं वर्णन करणारा तो रटाळ साचेबद्धपणा माझ्यासारख्या नवख्या लेखकाकडून न होणे. असो ) पावसाची रिमझिम चालूच होती. मी छत्री असूनदेखील देहांगाचा कण अन् कण पावसापासून वाचला पाहिजे यासाठी स्वत:शीच कसरत करत होतो. माझा हा खेळ चालू असताना बस आली. सातारा बस आगाराचे वैशिष्ट्य म्हणजे, अधिकारी मंडळाला जवळच्या पल्ल्याच्या बसना ही बस कुठे जाते हे स्पष्ट आणि ठळकपणे सांगण्यास काहीच स्वारस्य वाटत नाही. त्यामुळे आपल्या नेहमीच्या सवयीनुसार चालकाने खाली उतरल्यावर खिश्यातून चुन्याची डबी काढली. मग आपण जणू काही शेषनागावर चढणारे श्रीकृष्ण आहोत या अविर्भावात बसच्या पुढच्या बम्परवर चढला आणि स्पष्ट दिसेल अशा (?) अक्षरात ‘सातारा रोड’ असं लिहिलं. मी अजूनही गाडीत चढलो नव्हतो. कारण माझा पूर्वानुभव असं सांगतो की, जोपर्यंत चालक बम्परवरून खाली उतरत नाही तोवर ती गाडी कुठे जाईल सांगता येत नाही. ( मला सातारारोड गाडीने एकदा बोरखळला सोडलं होत. )
मी खात्री केल्यावर गाडीत चढलो आणि बाकावर जाऊन बसलो. साधारण तिसरा-चौथा बाक असेल. कारण मी बाक मोजले नव्हते. त्याचं असं आहे की, गणित फार येतं म्हणून ते कुठेही वापरण्याचे चाळे मी करत नाही. चालक-वाहक या जोडगोळीचे चहापान होत होते तोवर गाडी फलाटावरच उभी होती. मी खिडकीतून बाहेरची ‘हिरवळ’ पाहण्यात मग्न झालो. मी डाव्या बाजूच्या रांगेत बसलो होतो, पण खिडकीशेजारी नाही. पावसाळ्यात मी खिडकी टाळतो.
थोड्या वेळाने बस चालू झाली. वाहकाने त्याचे काम चालू केले. सुट्ट्या पैशांच्या कमतरतेमुळे आवाजांचे आरोह-अवरोह होत होते. मी एखाद्या नम्र प्रवाशासारखे तिकीट घेतले. पण तिकीट घेताना, मागे एकदा आपण वाहकाच्या नाकावर टिच्चून विनातिकीट प्रवास केला होता, ही सुखद आठवण आली. मग बराच वेळ त्या सुखद आठवणीने स्वतःचे मनोरंजन करत राहिलो. एव्हाना खिडकीत बसलेला माझा सहप्रवासी निद्रादेवतेच्या अधीन झाला होता. मला प्रश्न पडतो, काही महाभागांना खड्डे असलेल्या रस्त्यांवरदेखील निद्रादेवता कशी काय प्रसन्न होते?
इतक्यात गाडी एका बस थांब्यावर थांबली. माझी नजर दरवाज्याकडे वळली. त्यावेळी कुणी मला मोठ्याने ओरडून काहीतरी बोल असं सांगितल असतं, तर मी फक्त दोनच शब्द उच्चारले असते, ‘अप्रतिम लावण्या’ !!!! काळेभोर डोळे, पावसाने थोडेसे भिजलेले पण भिरभिरणारे केस, डोळ्यांवर आलेली बट, कपाळावर आणि गालावर लुसलुशीत हिरव्या गवतावर पडलेल्या दवबिंदूप्रमाणे पडलेले जलबिंदू, सोनेरी रंग, नजरेत थोडासा राग (बहुतेक पावसाबद्दल) आणि तोल सावरण्यासाठी तिच्याकडून होणारे केविलवाणे प्रयत्न... तिचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतायत.
ती गाडीत चढल्यापासून मी फक्त आणि फक्त तिच्याकडेच पाहत होतो. जणू काही मी आणि ती शून्यात आहोत आणि भोवतालची दुनिया विरून गेली आहे. मी तिच्याकडे एकटक पाहत होतो. ती बसण्यासाठी सीट शोधत होती (अर्थात एकही नव्हती) आणि तिची नजर माझ्यावर गेली. माझ्या काळजाचा ठोका चुकला. तिला थोडंसं विचित्र वाटलं कारण तिच्या चेहऱ्यावरून तसं जाणवलं. मी लगेच नजर हटवली. तरीही मी (माझ्या त्याबाबतच्या हट्टी स्वभावामुळे) अधूनमधून तिच्याकड पाहत होतो आणि पुन्हा एकदा तोच निसटलेला क्षण आणि चुकलेला ठोका. डोळ्यांना डोळे पुन्हा भिडले. तिने झरकन् मन फिरवली, तद्वत मी देखील. धडधड वाढू लागली. तिच्याकडे पहायचेही धाडस होत नव्हते आणि ते मनाला पटतही नव्हते. थोड्यावेळाने मला जाणवले की, कदाचित तीही मला नजरेच्या कोपऱ्यातून शोधत होती. का तो माझा भास होता? अलबत!! ती खरचं पाहत होती. बहुतेक तिचेही धाडस होत नव्हते. दोघांचा डोळ्यांच्या कोपऱ्यातून एकमेकांना पाहण्याचा खेळ चालू होता.
अचानक, असं काहीतरी घडलं की ज्याची मी ध्यानीमनीसुद्धा कल्पना केली नव्हती. चक्क माझा सहप्रवासी बाकावरून उठून दरवाज्याकडे चालू लागला. (आपण म्हणाल यात विशेष ते काय?) त्याचा थांबा आला होता हे समजण्याइतपत मी मूर्ख नाही. (एव्हाना समजलंच असेल) पण बसमध्ये आता एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. एकच उभा ‘प्रवासी’ आणि बसायला फक्त एकच सीट, तीही माझ्या शेजारची!!!
मला जणूकाही ढगांमधून स्वैर विहार करण्यात गुंग असणाऱ्या, मदमस्त, बुभुक्षित गरुडासारख वाटायला लागलं. जो भक्ष्यासाठी वणवण करत हिंडत आहे आणि भक्ष चक्क त्याच्या डोळ्यांसमोर, चोचीसमोर आहे. मी माझ्या ऊतू जाणाऱ्या भावनांना वेसण घातली आणि खिडकीशेजारी सरकलो. जेणेकरून ती चट्कन माझ्या शेजारी बसेल. काय सांगावं, कदाचित् खिडकीशेजारची भिजलेली सीट पाहून बसायला नकार दिला तर!! उगाच दुधात विरजण पडायला नको आणि अगदी माझ्या विचारप्रणालीप्रमाणे ती माझ्या शेजारी येऊन बसली.
माझी अवस्था जंगलात हरवलेल्या काळविटाच्या पिल्लाप्रमाणे झाली. मी स्वप्नात आहे की सत्यात, भूतलावर आहे की स्वर्गात, काहीच सुचत नव्हत. डोळ्यासमोर फक्त तिचा चेहरा, आणि मेंदू ओरडून सांगत होता "ती तुझ्याच शेजारी बसलीये”. धडधड, धडधड, धडधड!!!
मी अशा अवस्थेत बसलो की, तिला वाटावं मी खिडकीतून बाहेर पाहतोय पण मला मात्र ती नखशिखांत दिसावी. (अर्थात, मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी असल्यानं याबाबतीत जरा जास्तच प्रवीण आहे.) माझी डावी पापणी फडफडायला लागली, तेव्हाच समजलं काहीतरी वेगळं होणार आणि झालंच. माझा उजवा हात दोन्ही सीटच्या मधल्या लोखंडी दांड्यावर होता. माझ्या सुदैवाने आणि चालकाच्या प्रयत्नाने गाडी कर्कश आवाज करून थांबली आणि तिने तोल सावरण्यासाठी तोच लोखंडी दांडा पकडला. त्या चालकास मी आजही कोटीकोटी धन्यवाद देतो आणि हो, ज्या महान विभूतीच्या वात्रट गाडी हाकण्याने आमची गाडी थांबली, त्याचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावासा वाटतो.
स्पर्श, तो हळुवार स्पर्श. आजही तो मी विसरलो नाही. काही क्षण दोघांनाही कळत नव्हतं, काय होतंय. गाडी प्रकाशाच्या वेगाने पळावी असं वाटू लागलं. (गाडी प्रकाशाच्या वेगाने धावत असेल तर आतल्या प्रवाशांची घड्याळं बंद पडतात, असं ‘आईन्स्टाईन’ म्हणतो.) मला हात मागे घ्यावा असं जराही वाटत नव्हत. पण ते होणारच होतं. तिने हात मागे घेतला. हात मागे घेताना हळूच माझ्याकडे पाहिलं, मी तिच्याकडच पाहतो होतो. (अर्थात ) पुन्हा नजरानजर, पुन्हा मान फिरवणं आणि पुन्हा तिचं डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला हळुवार न्याहाळणं. मला विलक्षण आणि अद्भूत वाटायला लागलं. असं वाटत होतं हा प्रवास कधी संपूच नये. ती माझ्यापासून दूर जात आहे ही कल्पनाच सहन होत नव्हती.
पण मनात पाल चुकचुकली होती. काळजात धस्स झालं, धरती दुभंगून मी त्यात विलीन व्हावं, असं वाटू लागलं. ती उठून दरवाज्याकडे चालू लागली. मला ओरडून सांगावंसं वाटत होतं, “हे, राजहंसाप्रमाणे शुभ्र आणि पवित्र वनबालिके, माझं हृदय तुझ्याविना छिन्नविछिन्न होऊन जाईल.” पण हे वेडे शब्द ओठातूनच मागे परतले. मी आसुसलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत होतो. दरवाज्याजवळ जाताच तिन समारोप घेण्यासाठी माझ्याकडे पहिले, पण माझ्या डोळ्यात आलेले प्राण पाहून ती चपापली आणि मागे न पाहता तशीच निघून गेली. मी तिच्या पाठमोऱ्या देहाकडे टक लावून पाहत होतो. जशी गाडी थोडी पुढे गेली, तशी मला तिच्या ओठांची हालचाल दिसली. तिच्या चेहऱ्यावर नाजुकसे स्मितहास्य दुरूनही शोभून दिसत होते.
पण नंतर मनाला रुखरुख वाटू लागली. का? का मी तिच्याशी बोललो नाही? माझा माझ्यावरच संताप होऊ लागला. पण मी स्वतःची समजूत काढली. कदाचित तिची साथ ही फक्त पंधरा मिनिटांचीच होती. नशिबाने ती पुन्हा भेटलीच तर तिचे नाव तरी नक्कीच विचारेन, हा मी मनोमन निश्चय केला.
आज पाच वर्ष उलटली या घटनेला, पण मला ती नंतर कधी भेटलीच नाही. अगदी मी त्याचवेळी, त्याच रस्त्यावरून असंख्य वेळा प्रवास केला, कदाचित ती पुन्हा भेटेल. पण ते नियतीच्याच मनात नाही.
आजही, आत्ता, या क्षणी हे लिहिताना माझ्या अंगावर काटे येतायत. डोक्यात विचारांचं काहूर माजलंय, शब्द मी-मी करू पाहतायत. पण थकलो मी... थकलो मी या शब्दांची सांगड घालण्यात. आता थांबावं म्हणतो!!!