Vasudev Patil

Tragedy Others

2  

Vasudev Patil

Tragedy Others

छपऱ्याची मंजा२

छपऱ्याची मंजा२

8 mins
694



       भाग::-- दुसरा


  सब-स्टेशनच्या गेटजवळ सकाळी सकाळीच एवढी गर्दी पाहून आॅपरेटर मंजिरी दातेनं पुढे जात पाहिलं असता तिच्या अंगाचा थरकाप उडाला. एका वर्षांपासून ती सहसा कुणाच्याही भानगडीत न पडता आपापलं काम पाहत राहत होती. गजा पाटील नाव ऐकताच याच्याच मळ्यातील विहीरीत मागच्या वर्षी छगनराव व गटलू ......

होय एक वर्ष झालं तरी तो आघात आपण विसरू शकलो नाही.घातकी गेला तर गेला गटलूसही घेऊन गेला. निदान गटलू राहिला असता तर जिवनाचा आधार तरी..! 

"मॅडम रात्री गव्हास पाणी भरण्यासाठी गेला होता मळ्यात नी अचानक गेला बिचारा! लोक म्हणताहेत कि कालच्या देवीच्या भंडाऱ्याचं मटण बाधलं." शिपाई विचारतंद्रीत हरवलेल्या मंजिरी मॅडमला सांगत होता.'मटण' शब्द ऐकताच तिची विचारतंद्री तुटली. मटणावरुन तर झालं होतं नी गेला कुंकवाचा नामधारी असलेला! काल भंडाऱ्यात मटणाच्या कढाणी पाहूनही तिला छगन व गटलूविषयी मनात कढाचा उकळ फुटलाच होता.नी आज ज्याच्या मळ्यातल्या विहीरीत दोघे गेले तोच मरुण पडलाय!तोही नेमका आपल्या आॅफिस समोर? कालचा भंडारा व आजचा प्रकार काय संबंध असावा आपल्या जिवनाशी?... मंजा विचाराच्या वावटळीत गुंतली.

  दिवसभर नंतर तिचं चित्त कामावरही थाऱ्यावर नव्हतं.सारखे तेच तेच विचार येत होते.कढाणीत रटरट शिजतं मटण, सुटलेला वास, नी छगन! मटणासाठी हपापलेला छगन!खाताना साऱ्या जगाचा विसर पडलेला छगन.आपली तर त्याला सुधबुध ही नव्हती.नाहीतरी आपणही कुठं त्याला...! मंजा कढाणीतल्या बोकडाच्या मटणानं शिजत शिजत वरखाली फिरावं तशी भुतकाळ वर्तमानात फिरू लागली. त्याच तंद्रीत तिनं रजेचा अर्ज रखडला व केंद्रातल्या क्वाॅर्टरवर आली.

  रुममध्ये घुसताच तिला मटणाचा वास आला.आणि मग तिचं डोकं जास्तच भणाणलं.नेमकं काय बिनसलं की एका वर्षात पुन्हा आपणास छगन,गटलू आज पुन्हा पुन्हा स्मरताहेत.ती पडल्या पडल्या विचार करू लागली.डोळ्याच्या पाणावू लागल्या.आपल्या आयुष्याच्या कॅनव्हांसवर चितारणारा येतो नेमकं त्यावेळीच घोळ का व्हावा... ? दोष कुणाचा?नंदन नायकाचा? वडिलांचा?छगनचा? की ..त्या नराधमाचं तर नाव ही नको! मग आपल्या प्रारब्धाचा?की आपलाच? गाठीत गाठी अडकू लागल्या.ती गाठी सोडू लागली पण गुंथनकाला वाढू लागला.

  मंजिरीचं आय टी.आयमधील इलेक्ट्रीशियनचं दुसरं वर्ष. होस्टेलमध्ये राहुन ती राहिलेले चार महिने काढू लागली.मैत्रिणीच्या गावाचाच रंजन गाडेकर काॅलेजसमोरील इंजिनिअरिंग काॅलेजला डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला होता. दोन्ही काॅलेजला लागुन असलेल्या कॅन्टीनला अधुनमधून नजरेस पडू लागला.मैत्रिण त्याच्याच गावची म्हटल्यावर तिला चहा काॅफीसाठी आग्रहानं बोलवू लागला.घरची परिस्थिती गडगंज .चहा काॅफीवरून रविवारी सुटीला बाहेर जेवणासाठी आग्रह होऊ लागल्यावर मंजिरीनं साफ धुतकारत मैत्रिणीलाच टाळलं. मंजिरी होस्टेलवरच थांबत मैत्रिणीला बाय बाय केलं.पण रंजन माघार घेणारा नव्हता.

 शहरात चिकनगुणीयाची साथ सुरू झाली.त्यात पावसाळाही सुरू झाला.परिक्षा जुलै अखेरीस होणार होत्या.मंजिरी तापानं फणफणली.त्यात जवळ पैसे ही नव्हते.हाता पायाचे सांधे दुखू लागले.तिला उठणं ही मुश्कील झालं.मैत्रिणीनं रंजनच्या मदतीनं तिला अॅडमीट केलं.पुढचे दोन दिवस सारं रंजननच पाहिलं.सर्व धावपळ बिलींग सारं त्यानच केलं.नंतर गावाहून वडिल आले व त्यांनी आठ दिवस गावाला नेलं.पण त्या उपकारानं मंजिरीचा रंजनबाबतचा ग्रह बदलला.आता ती मोजकं का असेना पण बोलू लागली. नंतर मात्र परीक्षा होईपर्यंत रंजननं मोहिनीच टाकली.

  परिक्षा संपली.सर्व मित्र मैत्रिणींनी घाटात हिल स्टेशनवर एक दिवशीय रेनी ट्रिप ठरवली .मंजिरीनं नकार दिला पण तरी रंजन व मै्त्रीणीपुढं हार मानत ती निघाली. रंजननंच घरून आणलेल्या गाडीनं सर्वजण निघाले.

  घाटाचा वळणा. वळणाचा रस्ता गर्द झाडोऱ्यानं वेढलेला. नदी घाटावरून खाली फेसाळत उतरत होती तर रस्ता काठाकाठानं घाट चढत होता. पावसानं तर तुफान फटकेबाजी लावलेली. घाटाच्या पायथ्याला गाडी लावत तेएथून भाड्यानं बुलेट घेतल्या.रंजनच्या बुलेटवर मंजिरी मागं बसली. थंडगारर वाऱ्यात पाऊस अंगाला झोंबत होता.वळणावळणावरर कच्चकन ब्रेक दाबताच मंजिरीचा ओलेता स्पर्श रंजनच्या काळजाचा ठाव घेत गाडीप्रमाणच धाडधाड ठोके वाढवतत होता.पूर्ण ओल्या कपड्यात तर मंजिरीच्या सौंदर्यात उठाव निर्माण होत होता. वरती पोहोचल्यावर साऱ्यांनी थांबत एका ठिकाणी चहा घेतला.चहावाला रंजनच्या ओळखीचा असावा.रंजननं त्याच्या कानात काहीतरी सांगितलं.तो हसतच मध्ये गेला.मंजिरीला आलं टाकलेल्या चहाची वेगळीच चव लागली पण थंडीनं गारठलेल्या मंजिरीनं तो घोटला.नंतर वरती बऱ्याच ठिकाणी फिरत आडोशाला फोटोसेशन करत धबधब्यावर मनसोक्त भिजले.मंजिरीला कैफ जाणवू लागला. फिरून आल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी सर्वांनी जेवण घेतलं.नी घाटात दरड कोसळल्यानं रस्ताच बंद झाला.नाईलाजास्तव साऱ्यांना रात्र तिथंच घालवावी लागणार होती.घाटावर स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड करत पावसाचा फायदा उचलला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच घाट सुरू होताच सारी परतली.मंजिरीचं डोकं, अंग ठणाणू लागलं.

 मंजिरी गावाला आली.रंजन एम.टेक साठी गुवाहाटीस गेला.मध्यंतरी दाजीबा दातेची चुलत बहिण -मंजिरीची आत्या दाजीबाकडं आपल्या पुतन्यासाठी मंजिरीला मागणी घालायला आली.चुलतबहिणीचं हंबर्डीला दोन तीन एकर शेत होतं.पण तिला मुलबाळ नव्हतं.आपला पुतण्या छगनला तिनं आपले दिर जाऊ गेल्यावर सांभाळलं व त्यालाच दत्तक घेतलं.त्याच छगनसाठी आपली भाची सुन म्हणून करण्यास ती आली होती. पण एकुलती एक आय टी आय झालेली मंजिरीस आपल्या वेडपट गयबान्या चुलतभाच्यास देण्यास दाजिबानं साफ नाकारलं."आक्के माझी एकुलती एक परीसारखी शिकलेली लेक सोडून तू काहीही मांग मी नाही म्हणणार नाही पण पोरीचं नाव नको काढूस.आली आहेस सुखानं दोन चार दिवस रहा.पण पोरीचं जमणार नाही.तुला राग आला तरी चालेल.चुलत बहिण तोऱ्यातच निघून गेली.तिचीही मजबुरी होती की पुतण्या छगन पुरता गयबान्या असल्यानं दुसरी मुलगी मिळणं दुरापास्त होतं.

 घाटावरील पठारावर पेरली गेलेली ज्वारी आता छातीस लागत होती.व पुढील बहर पेलण्यासाठी ती पोघ्यात आली.

   मंजिरी ला आपल्यातले बदल जाणवू लागले.तिनं मैत्रिणीकडुन रंजनचा नंबर मिळवत संपर्क साधला. रडत रडत तिनं रंजनला घाटावर चहा, जेवनात काय मिसळलं व नंतर.... सारं विचारत आता काय म्हणून प्रश्नाचा भडिमार केला. रंजनला लगेच निघून येण्या विषयी परोपरीनं विनवलं.सुरवातीस रंजन तिला झुलवू लागला.मंजिरीची लक्षणं व बदलती वागणुकीनं दाजिबा हादरला. त्यानं प्रेमानं पोरीला विश्वासात घेत सारं विचारताच मंजिरी नं रडतरडतच वडिलांना सत्य कथन करत आपल्याला न कळत कसं फसवलं ते बया केलं. दाजिबाचा उभा देह होळीसारखा पेटू लागला.त्यानं रजनच्या घरच्यांची भेट घेत सारा प्रकार कथन केला. पण दामोजी गाडेकर एक बडी असामी. त्यांनी हसतच दाजिबाला उखडून लावलं.

"दाजिबा!त्याचं काय असतं,पोर नी रानातली बोर सारखीच.त्याची रखवाली व्यवस्थित करणं हे बापाचं काम!तरी बघतो आमचे रंजनराव काय म्हणतात."

"रंजनराव काय म्हणतील पेक्षा तुम्ही निर्णय घ्याना दामोजीराव!" दाजिबा काकुळतीला येत म्हणाला.

"मारत्या तुला गाडी काढायला लावली ना!मी रिकामा वाटतोयय का तुला!"दामोजीराव संतापून बोलताच दाजिबाकाय ते समजले व उठून चालायला लागले.

मंजिरीनं रंजनला नंतर संपर्क करत बरंच विनवलं पण त्यानं साफ उडवून लावत "हवं तर काय खर्च येतोय तो लगेच पाठवतो पण आता लगेच लग्न मला तरी शक्य नाही. या घडीला मला लग्नापेक्षा करिअर महत्वाचं आहे. नी एक मंजिरी,तु सांगतेय पण घाटात माझ्याकडून काही घडलंच नाही तर मी जबाबदारी का घेऊ..."

मंजिरीला या वाक्यानं तर तप्त कढईत आपल्याला कुणीतरी तळतंय असाच भास झाला. दिवस भराभर जाऊ लागले.गावात भब्रा होऊ लागला.दाजिबानं आता काही निर्णय घेतला.त्यांनी बहिणीस निरोप पाठवला.

"मंजिरी अजुनही रंजन तयार असेल तर माझी ना नाही.पण आता मात्र लवकरच काही तरी निर्णय घेणं मला भाग आहे.पोरी"

"......."मंजिरीच्या तोंडाऐवजी डोळेच बोलू लागले. खाली ओघळणारे आसवे हीच मूक संमती समजत दाजिबा उठला.

एव्हाना आत्याच्या कानावर सारा प्रकार जाऊनही ती धावतच आली.त्याला कारण थकलेलं वय व आपला गयबान्या पुतण्या.

"दाजिबा शहाण्या माणसांनं जातीचं लेकरू काळं का गोरं पाहू नये!नाहीतर बघ असं शेण खाण्यापेक्षा माझा छगन्या इज्जतदार आहे!" आत्यानं येता येताच दु:खावर डागण्या दिल्या.

दाजिबा उ की चू नाही, शांत घुम्यासारखा ऐकू लागला.

आठच दिवसात चाफेकळी नाकाची,दोन्ही गालावर चंद्ररकोरीच्या आकाराच्या खळ्या पडणारी,चवळीच्या शेंगेगत शेलाटी,गोरीपान मंजिरीचं छगनशी लग्न ठरत लागलं.लग्नाआधी आत्याचा पुतन्या गयबान्या आहे हे मंजिरी ऐकून होती पण पाहिला नव्हता.व तो किती गयबान्या आहे हे तिला अक्षता पडण्याआधी साफ कळलं.अंतरपाट खाली करत छगन "काकी लगीन ,ढिंच्याक ढिच्यांग करत मंजिरीकडं पाहत नाचू लागला. मंजिरीला आपल्या नकळत चुकीची इतकी कठोर शिक्षा मिळेल याची स्वप्नातही कल्पना नव्हती.तरी आपलं पाप माथी घेतोय म्हटल्यावर छगनचं कुंकू तिनं माथी लावलं.

आत्या जणू पुतन्याच्या लग्नासाठीच थांबली असावी या न्यायानं लग्नानंतर दोन महिन्यांनीच घाई घाईत देवाघरी निघून गेली‌ .

 छगन सकाळी सकाळीच दोन तीन शेळ्या ,म्हैस सोडून चरायला घेऊन जाई.दुपारी आला की भरगच्च पोटाला तडस लागेपर्यंत खाई.जेवण करतांना मंजिरीसाठी उरेल की नाही याचं त्याला सोयरसुतक नसायचं.रात्रीही तसच.जेवण उरकलं की मस्त मारतीच्या पारावर झोपायला गोधड्या घेऊन निघून जाई.जातांना मात्र गल्लीला ऐकू जाईल अशा आवाजात "मंजा जातो गं पारावर झोपायला,ऊशीर होतोय!"असा पुकारा करी. मंजिरीला मग रात्र खायला उठे.सारी रात्र ती तळमळत काढी.नी मग रंजनचा दगा तिला नागागत डसे.आता साऱ्या आयुष्याचाच विस्कोट झालाय या जाणिवेनं तर ती आणखी जास्तच सुन्न होई.गटलूचा जन्म झाला.मंजिरीला तर त्याकडं पहावसं ही वाटेना.मात्र छगनला गटलू झाल्याचा कोण आनंद झाला.तो दुपारी जेवायला आला की त्याला उचलून आनंदानं घरात जोजवी.यानं मंजिरीला जास्तच घिण येई.असल्या नवऱ्यासंग आयुष्य काढायचं या विचारानं घिण येत तिचं मस्तक भणके.पण नंतर मग भर निघून गेल्यावर त्याची कीव वाटे.

  छगनला ती शिकवायचा प्रयत्न करी.सकाळी दात घासण्यापासुन तर बोलणं चालणं,उठणं बसणं.पण सारं व्यर्थ.जेवतांना त्याला बघणं तर तिला ओकारीच येई.त्यात भरमसाठ खातांना पाहिल्यावर तर पाहणंच नको.

 गटलू चार पाच महिन्याचा झाला.मंजिरीनं पदरी पडलं नी पवित्र झालं या न्यायानं व आपली चुकच म्हणावी,नकळत का असेना;त्याची शिक्षा समजून ती छगनच घर उठवू लागली.आत्याचं दोन तीन एकर शेत जे पडून होतं तीन चार वर्षापासून ते मंजूनं कसायला घेतलं.ती सकाळीच पोराला घेत शेतात निघे.मागून छगन शेळ्या म्हैस घेऊन चाले.ते दृश्य पाहणाऱ्यास वेगळंच वाटे.कारण मंजू लावण्यवती तर छगन पुरता गयबाना.

"काय रे छगन्या कुठं निघालास?"एखादा तिरसट मुद्दाम डिवचे.

"शेतात चाललो"

"कोण घेऊन चाललंय ,म्हैस?"हसू दाबत तो खोडा घाली.

"च्याक,म्हैस कशाला!मंजा!"छगन वेडपट हसत उत्तरे.

"बायो,मजा मग छगनराव!"नी मग हशाचा कल्लोड उठे.

मंजिरी खाली मान घालून रस्ता कापे.

मात्र पाहणाऱ्यास हा लवाजमा पाहतांना मजा वाटे.

  दिवस जात होते.

रात्री जेवण आटोपलं.बाहेर आभाळ कुंद होतं.पाऊस बरसूनही येण्याची चिन्हे.

"गटलू,तुझ्या मंजा मायला सांग मी चाललो मारतीच्या पारावर!उशीर झाला." छगननं नेहमीप्रमाणं पुकारा दिला.

"अयss,आज इथंच पडा !कुठं चाललेत पावसाचं" मंजिरीनं दम भरला.

"गटलू झोपतो.पण तुझ्या मंजा मायला सांग काकी गेली तेव्हापासुन मटण झालंच नाही.कधी आणणार मटण" छगन रुसल्यागत बोलला .

मंजिरीला आपण काय सांगतोय नी याला खायची पडलीय.पण एक तेही खरच सकाळी आणू मटण यांचेसाठी असा विचार करत ती गटलूस झोपवू लागली.बाहेर पडणारा पाऊस गारवा टिपकवत होता तर मंजिरीच्या मनात आग. अकरा वाजले.मंजिरी उठली‌.छगन पावसापेक्षाही जोरात घोरत होता.त्या ही स्थितीत त्याच्या तोंडाची व अंगाची दुर्गंधी मंजिरीच्या नाकात किळस आणत होती.ती त्याकडं दुर्लक्ष करत गारवा शोधू लागली.छगन उठला.आणि हसतच गोधडी घेत पडत्या पावसात मारतीच्या मंदिरात पळाला.मंजिरी मात्र पडत्या पावसात पाणी अंगावर घेत भिजत राहिली.पण वरूण राजाही तिला हवा असलेला गारवा देण्यास असफल राहिला.

 मंजिरीनं सकाळी छगनलाच पाठवत अर्धा किलो मटण आणलं.मटण शिजू लागलं तसा छगन जिभल्या चाटत चुलीभोवती भिंगरू लागला.शिजताच त्यानं जेवायला सुरुवात केली.वाढता वाढता मंजिरी थकली.तिनं सरळ मटणाचं पातेलं व भाकरीची दुरडीच छगनजवळ ठेवून गटलूस पलंगावर झोपवू लागली.सारं मटण फस्त करत छगननं ढेकर दिला व बाहेर गेला.मंजिरीनं दुरडीत उरलेली चतकोर भाकर तेलतिखट सोबत खात मटणाच्या उलट्या पातेल्याला सुलट करत संतापात घासलं. लग्नानंतर रात्रीचा प्रसंग व आणि आताचं छगनचं वागणं पाहून वडिलांना आठवत तिनं आक्रोश मांडला.दुपारच्या चार वाजेपर्यंत ती रडतच होती.नी चारच्या गाडीनं दाजिबानं पोरीच्या लग्नानंतर पहिल्यांच हंबर्डीत पाय ठेवला.बहिणीला पोहोचवायलाही तो आला नव्हता.पण सरतेशेवटी पाठ नाही पण पोटा (लेक)साठी त्याला यावंच लागलं.


क्रमश:



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy