बुरुज
बुरुज


“बाजी! तो बुरूज तसा का?”
“राजे! त्या बुरूजाला वेताळाचा बुरूज म्हणतात.ती जागा बाधक आहे.पण बुरूजाची जागा सुरक्षित आहे.” विठोजी म्हणाला.
“अस्स”! राजे त्या बुरूजाच्या दिशेने जात होते.बाजींनी सांगितलं त्यात काही खोटं नव्हतं. बुरूजाखाली सरळ उतरलेला कडा डोळे फिरवत होता.राजे शांतपणे वळले.त्यांनी बाजींना हुकूम सोडला.
“बाजी, या बुरूजाला खणती लावा”…
“खणती!” विठोजीचे डोळे विस्फारले. तो आश्चर्याने म्हणाला,
“राजं! तसं करू नगा! पाया पडतो तुमच्या. दर आवसेला आनि पुनवेला नारळ फोडून दिवा लावतो.चुकून राहीलं तर, राती मशाल फिरताना दिसतीया.वराडनं ऐकु येतंया”
“अस्स!म्हणजे जागृत वेताळ आहे तर!” राजे उद् गारले,
“बाजी आत्ता ह्या गडाचं जायपाड गड नाव राहीलं नाही.या मोहन गडावर यापुढे वेताळाची सत्ता राहणार नाही.बाजी, या बुरूजाला खणती लावा.”
साऱ्यांच्या चेहऱ्यावर भीती उमटली होती.त्या वेताळ बुरूजाच्या भीतीनं भर दिवसा देखील कोणी माणसं तिकडे फिरकत नव्हती.राजांच्या बोलण्याने भीतीग्रस्त झालेली सारी अचंब्यानं उभी असता,राजांचे बोल साऱ्यांच्या कानावर पडले,
“विठोजी,काल तुमच्या वाड्यात आम्ही निद्राधीन झालो असता आम्हाला देवीचा दृष्टांत झाला.”
“देवी…?”
“हो, जगदंबा! तिने आम्हाला हा बुरूज दाखवला.त्यात धन आहे असं सांगितलं.”
राजांच्या बोलण्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता.कोणी खणती लावायला पुढे धजत नव्हता.राजांच्या ध्यानी सारी परिस्थिती आली ते नेताजींना म्हणाले..
“नेताजी, आपले मावळे बोलवा.येताना खणतीची अवजारे आणायला सांगा.”
नेताजी तातडीने गेले.राजांच्या चेहऱ्यावर स्मित होतं.पण बाकी सर्वांच्या मुद्रा गंभीर होत्या.राजे विठोजीना म्हणाले,
“एकंदरित तुमचा वेताळ बुरूज जागता दिसतो.”
“व्हय राजे!” विठोजी आशेने म्हणाला,”आजवर लई जनास्नी बाधा झालीया.खोटं सांगत न्हाई.पन भर उनाचंबी कोना मानसाची या जागंत पाय ठेवायची टाप न्हाई.”
“अस्स!” राजांच्या चेहऱ्यावर तेच स्मित होतं.
“विठोजी, तुम्ही रात्रीच्या वेळी कधी मशाली बघितल्यात?”
विठोजीनं नकारार्थी मान हलवली.
“कधी किंकाळ्या, ओरडणं ऐकलंत?”
विठोजी नकारार्थी मान हलवत म्हणाला,
“म्या ऐकलं न्हाई, पन लई ऐकलंय”
“काय ऐकलंत?”
“जवा का गड बांधला,तवा ह्या तटावर बुरूज उभा ऱ्हाईना. तवा आमदानी निजामशाहीची व्हती.बुरूज उभा ऱ्हाईना म्हणून एका बाळंतणीला पोरासकट या बुरूजात गाडली.तवा बुरूज उभा ऱ्हायला.ती बाळंतीन अजुन बी राखन करतीया.”
“अस्सं!राजे म्हणाले…
“एकंदरीत बराच जागृत बुरूज दिसतो हा.मग आम्हांला देवीनं दृष्टांत का दिला?”
तोवर राजांचे मावळे आले होते.पहारी,कुदाळी त्यांच्या हातात होत्या.राजांनी बुरूजाकडे बोट दाखवलं.हुकूम केला.
“त्या बुरूजाला खणती लावा”
बुरूजाचे दगड ढासळत होते.राजे शांतपणे ते दृष्य पाहात होते.पाच पंचवीस मावळ्यांनी बुरूजाला हात घातला होता.पहार, कुदळ आणि कोसळणारे दगड यांचे आवाज सोडले,तर दुसरा आवाज उमटत नव्हता.बुरूज निम्मा ढासळला आणि एका पहारीच्या रूतण्यात खणकन आवाज उमटला.
साऱ्यांच्या मुद्रा बदलल्या. उत्सुकता वाढली.काळजी पुर्वक माती, दगड काढले जात होते.आणि काही वेळानं खणती करणाऱ्यांना आतली भांडी दिसू लागली.
लहान हंड्याच्या आकाराची मोहोरबंद केलेली दोन भांडी बाहेर काढण्यात आली.भांडी वजनदार होती.राजांच्या समोर ती भांडी आणली गेली.
साऱ्यांची उत्सुकता शीगेला पोहोचली होती.राजांनी हुकूम सोडला…”उघडा…”
दोन्ही भांड्यांची शिसाची कडी फोडली गेली.भाड्यांची तोंडे उघडली भान विसरून विठोजी उद् गारला,
“मोहरा!”
सारे राजांच्याकडे कौतुकाने पहात होते.राजे विठोजीला म्हणाले,
“काय विठोजी! आमचा दृष्टांत खरा ठरला ना!”
“व्हय राजं! देवी खरंच तुमच्यावर परसन् हाय बघा.”
बाजी आश्चर्यानं तो सारा प्रकार पाहात होते.काय बोलावं हे त्यांना सुचत नव्हतं.
राजांनी सांगितलं…”हे हंडे सदरेकडे घेऊन चला.”
आणि बाजींच्या कडे वळून राजं म्हणाले” बाजी, बुरूज बांधून घ्या.आणि ह्या बुरूजाचे नाव ‘दौलती बुरूज’ ठेवा.”
मावळ्यांनी मोठ्या उत्सहाने सांगड करून भांडी तोलली.
“जय जगदंब !”
म्हणून ती भांडी घेऊन ते सदरेकडे जाऊ लागले.
संध्याकाळी राजे आणि बाजी सदरेवर बसले असता न राहावून बाजी म्हणाले,
“राजे,एक विचारू?”
“विचारा ना! आम्हाला माहीत आहे, तुम्ही काय विचारणार ते.”
बाजी पुन्हा संभ्रमात पडले. बाजींचं ते विचारग्रस्त रूप पाहून राजे स्मितवदनाने म्हणाले,
“आम्हाला खरोखरंच दृष्टांत झाला होता का, हेच विचारणार होता ना”
“जी” बाजींनी सांगितलं…
“दृष्टांत वगैरे काही झाला नव्हता. ही दृष्टी आम्हाला तालमीत मिळाली.
चाणक्य काळापासुन राजनितीत ही गोष्ट आहे.गडाचा खजिना जेव्हा सुरक्षित राखायचा असतो, तेव्हा हीच पध्दत अवलंबली जाते “
“कसली पद्धत” बाजींनी विचारलं…
“गडावर अशाच सुरक्षित जागेवर बुरूजाची निवड केली जाते.त्यात मोजक्या माणसांकरवी रात्रीच्या वेळी धन पुरलं जातं.ती माणसं दोनपेक्षा जास्त नसतात.धन पुरून झाल्यानंतर ती माणसं परतत असता त्यांनी काय केलं हे माहीत नसणाऱ्या मारेकऱ्यांमार्फत त्यांचा वध केला जातो.त्यांची प्रेते बुरूजाच्या नजिक टाकली जातात.दुसरे दिवशी गडावरची माणसं ती प्रेते पाहतात, दचकतात, भितात.त्यांचं दफन तिथंच केलं जातं.काही दिवसांनी रात्री अपरात्री दिवट्या नाचवल्या जातात आणि त्या बुरूजाचं नाव वेताळ बुरूज असं पडतं…
अंधश्रद्धा बाळगणारे कमी नसतात. त्या बुरूजाच्या कथा तयार होतात. त्या बुरूजाकडे जायला कोणी धजेनासे होते. त्यामुळे असा बुरूज पाहीला की, आम्हाला त्यातले धन दिसु लागते. याचं प्रत्यंतर आम्हाला तोरण्यावर आलं होतं….”दूरदृष्टी माझ्या राजची