बिस्किटाचा पुडा
बिस्किटाचा पुडा
कामवाली बाई सलग तीन दिवस आली नाही म्हणून तिच्या घरी गेले होते. जाताना एक बिस्कीटपुडा घेऊन गेले. बाकीची चौकशी करून झाल्यावर पुडा तिच्या लहान मुलीच्या हातात ठेवला. तिथे एकुण तीन लहान मुले होती. उरलेली दोन मुले जिच्या हातात पुडा होता त्या मुलीकडे पाहू लागली. ती वयाने सर्वांत लहान होती. ती आईला चहा बिस्कीटे मागू लागली. मी जायला निघाले. मला गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत सोडण्यासाठी बाई पण बाहेर आली. पण बाहेर येण्यापूर्वी तिने लहान मुलीच्या हातातला पुडा काढून घेतला. वरती फळीवर ठेवून दिला. आल्यावर वाटून देते असं म्हणून लेकरांना पाच मिनिटं थांबायला सांगितलं. राग, नाराजी आणि दु:ख सारं काही त्या लहानीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. आपल्या हातात दिलेला खाऊ इतरांसोबत वाटून घ्यायची तिची अजिबात इच्छा दिसत नव्हती.
तिच्या घरी एकूण किती मुलं आहेत याचा मला अंदाज नव्हता. या प्रसंगानंतर मला माझ्या घरी आणली जाणारी आणि कधीकधी न खाताच वाया जाणारी बिस्कीटे आठवली. कधी आठवण नाही म्हणून, कधी आवडली नाहीत म्हणून तर कधी जुनी झाली म्हणूून किती बिस्कीटं टाकून दिली असतील काही हिशोबच नाही. माझे मन अस्वस्थ झाले. एके दिवशी कामावरून येताना मी खूप सारे वेगवेगळे बिस्कीटपुडे खरेदी केले. कामवाल्या बाईच्या घरी गेले. ती घरी नव्हती. मला पाहून तिची मोठी मुलगी कुठुनतरी धावत आली. आई सकाळीच कामावर गेल्याचं सांगू लागली. मी तिला तिच्या भावंडांना बोलावून आणायला सांगितलं. तिन्ही लेकरं जमा झाली. मोठ्या मुलीनं मला ग्लासभर पाणी दिलं. मी
प्रत्येकाचं नाव, वर्ग, शाळा याची चौकशी केली. म्हटलं चला आता खाऊ आणलाय तुमच्यासाठी तो खाऊ या. पिशवीतले सगळे पुडे बाहेर काढले. मुलांची तोंडं आनंदानं चमकली. म्हटलं घ्या तुम्हाला पाहिजेत ते. मोठ्या मुलीनं पहिल्यांदा छोटीला त्यातला आवडीचा पुडा घेऊ दिला. मग मधल्या मुलानं घेतला. सर्वांत शेवटी मोठ्या पोरीनं मला विचारलं की, "एवढे कशाला आणले मॅडम?" मी म्हटलं, "सहज आणले गं." लहान मुलीनं तिच्या वाट्याचे दोन पुडे तिच्या लहानशा हातात पक्के पकडले होते. ती मला म्हणाली, "हे बंदे माजेच ना?" मी म्हटलं, "हो त्यातली सगळी बिस्कीटं आता तुझी एकटीची. अगदी सगळी तुझीच."
आजकाल आपली मुलं बहुधा एकुलती एक असतात. घरी आणलेला सगळा खाऊ त्यांच्या एकट्याच्याच मालकीचा असतो. तो कधीही खाल्ला तरी दुसरं कोणी त्याला हात लावत नाही. एखाद्या वस्तूवर आपली आणि फक्त आपलीच मालकी असण्याची भावना आत्यंतिक सुरक्षिततेची असते. आपलं घर, आपले पैसे, आपलं शेत, आपली माणसं सर्व काही. शेअरिंग वगैरे बोलायला ठीक आहे पण प्रत्यक्ष जीवन जगताना आपल्या खास आवडत्या वस्तू, लाडकी माणसं इतकंच काय काही विशेष प्रसंगसुद्धा कुणाशी शेअर करायला आपल्याला आवडत नसते. ज्या गोष्टींचे आपल्याला फारसे महत्व नसते त्याच गोष्टी शेअर करणे आपण पसंत करत असतो.
ज्यांच्याकडे यातलं काहीच नाही त्यांना कधीकधी आपण एखादा साधासा आनंद नक्कीच देऊ शकतो. एखादा संपूर्ण बिस्कीटपुडा देऊन. हात न पोहोचणाऱ्या ऊंच फळीवर ठेवलेला खाऊ आपण त्यांच्या हातात पोहचवू शकतो.