श्रीयुत रोडकरी
श्रीयुत रोडकरी
एका नगरात एक नगरसेवक राहात होता. एके दिवशी तो अचानक मेला. लोकांनी त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरु केली. मोठ्या थाटामाटात यात्रा निघाली. त्याच्या वॉर्डातले रस्ते अतिशय खराब होते. लोक जीव मुठीत धरून खड्ड्या- खड्डय़ातून कसाबसा रस्ता पार करत होते. चौघांच्या खांद्यावर बसलेल्या नगरसेवकाला भयंकर हिसके बसू लागले. हादरे बसून बसून त्यांची हाडं खिळखिळी झाली. स्वर्गात पोहोचल्यानंतर तो देवाला म्हणाला की माझं अंगांग दुखत आहे. काही तरी उपाय करा. परमेश्वर म्हणाला, ठीक आहे. देवाने चार सुंदर अप्सरा त्याच्या मसाजसाठी पाठवून दिल्या. त्या अप्सरांनी त्याच्या अंगाचा मसाज करून दिल्यानंतर त्याला खूप बरे वाटू लागले. तो मनात म्हणू लागला की मी इतके काय पुण्य केले की मी सरळ स्वर्गात आलो. पण त्यानंतर थोड्या वेळाने त्याला घराची आणि आपल्या वॉर्डाची आठवण येऊ लागली. तो देवाला म्हणाला, मला परत पृथ्वीवर पाठवा माझे अजून खूप कार्य बाकी आहे. देव म्हणाला, "ठीक आहे जा, तथास्तू!" आणि मग तो परत पृथ्वीवर आपल्या वॉर्डात परत आला.
सुगंधी तेलाने मालिश केल्यामुळे त्याला फार छान वाटत होते. त्याच्या तोंडून शब्द निघाले "आहाहा, किती सुगंध, आहाहा! किती सुगंधी तेल! किती बरं वाटत आहे." अचानक कुणीतरी त्याला गदागदा हलवू लागले. तो दचकून उठला. त्याची बायको म्हणाली, "प्रचारसभेला जायचं आहे ना? उठा लवकर." तो खडबडून जागा झाला. बघितलं तर त्याची पत्नी तयार होऊन अंगावर परदेशी अत्तराचा फवारा मारत होती. त्या सुगंधाने त्याला जाग आली होती. काल प्रचंड प्रचार केल्यामुळे तो खूप थकून झोपला होता, आणि मसाज वगैरे सर्व भयंकर थकल्यामुळे पडलेले निव्वळ एक स्वप्न होते. आपण जिवंत आहोत हे पाहून त्याला फार आनंद झाला. शिवाय स्वप्नात केलेल्या मसाजमुळेसुद्धा त्याला फार ताजेतवाने वाटत होते. याही निवडणुकीत तो बहुमताने विजयी झाला. पण आता त्याच्यात प्रचंड बदल झाला होता. त्याने ठरवले की आपल्या वॉर्डातील रस्ते सुंदर करून टाकायचे. कोणाही मेलेल्या माणसाला शेवटच्या यात्रेला जाताना हिसका बसता कामा नये. तो जोमाने कामाला लागला. वॉर्डातले सगळे रस्ते त्याने चकचकीत डांबरी आणि सिमेंटचे बनवले. त्याचे काम आणि धडाडी पाहून लवकरच तो मंत्री झाला. त्यानंतर त्याला असे वाटले की, माझ्या शहरातले रस्ते ही सुंदर झाले पाहिजेत. मंत्री झाल्यानंतर त्याने आपल्या शहरातले सगळे रस्ते चकाचक-सुंदर करून टाकले. त्यानंतर त्याचे काम पाहून त्याची केंद्रात बढती झाली. मग त्याने त्याच्या राज्यातील रस्ते सुधारण्याचे काम हाती घेतले. दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता आणि त्याचे काम दोन्हीही चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत वाढत गेले. त्यानंतर त्याने देशातील सगळे रस्ते सुधारण्याचे काम हाती घेतले. आज तो "श्रीयुत रोडकरी" म्हणून अखिल भारत खंडात प्रसिद्धीस पावला आहे.