भूक
भूक
तिकडच्या झाडाखालची जागा मला फार आवडते. कंटाळा आलाय आता मला इथेच बसून. तिथे मस्त गार वारा वहातो. इथे माशा फार घोंघावतायत. त्रास होतोय मला. मी हा असा अशक्त, नाइलाजाने इथे बसलोय वर डोळ्याला ही जखम झालीय. काय राव! तुम्ही येताय, बघताय, म्हणता चूक माझीच आहे. सगळं कळतंय मला. पण माझाही विचार करा जरा. भूक अनावर झाल्यावर तुम्ही काय कराल?
त्या दिवशी मी ठरवलं होतं तिकडे जाऊन काहीतरी खायचं. मी फारसा फिरत नाही. आता वय झालंय. तेवढी ताकदंही नाही राहिली. त्यामुळे उगाच इकडेतिकडे जायला मला आवडत नाही. पण दररोज तेच तेच खाऊन तुम्हीही कंटाळताच ना? तसंच झालं माझं.
सावकाश निघालो. हळूहळू चालत. कसलीही घाई नव्हती. घाई करून जायचंय कुठे म्हणा. खायला आणलं की आरामात बसून थंड वाऱ्यावर मजेत चवीने खायचं. नुसत्या विचारानेच माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. काय खायचं हे नेमकं नव्हतं ठरवलं. म्हटलं बघू काहितरी मिळेलंच. याआधी मी माझ्या आईबरोबर एक दोन वेळा तिकडे गेलो होतो. त्यामुळे अगदीच अनोळखी ठिकाणी जात होतो अशातला भाग नाही. मला गर्दी अजिबात आवडत नाही. आई नेहेमी म्हणायची. काम थोडंच पण सावकाश, नीट विचार करून करावं. त्यामुळे त्या कामावर आपल्याला संपूर्ण लक्ष देतां येतं. मी देखील रहदारी थोडी कमी झाल्यावरंच निघालो. तिकडे गेल्यावर मला कळेचना. इतक्या दिवसात किती बदललं होतं सगळं. नाही म्हटलं तरी थोडा भांबावूनंच गेलो. परत एकदा पाठी वळून बघितलं. जाताना रस्ता चुकायला नको. सगळ्या खुणा नीट बघून घेतल्या. मगंच पुढे निघालो. थोडं पुढे खूप मोठा रस्ता होता. तिकडे गाड्याही जोरजोरात धावत होत्या. म्हणून इथेच काही मिळतंय का ते बघत होतो. हा रस्ता थोडा कच्चा होता. मोठ्या रस्त्यापलीकडे जास्तंच मोठी वस्ती दिसत होती. त्यामानाने इथे थोडी कमी वस्ती आणि शांत वाटत होतं. नक्की कुठे जायचं हे ठरवावं म्हणून एका झाडाखाली थांबलो आणि बघतो तर काय ...
तसे माझ्याबरोबर सगळेच खेळतात आणि मी लहान म्हणून मला त्रासंही देतात. पण तो तसा नाही. तो माझा खरा मित्र आहे. आम्ही दोघंच असलो की खूप मजा येते. उड्या मारणं, धावणं किंवा एकमेकांशी मस्ती नुसती धम्माल असते. माझी आई नेहेमी म्हणायची आपल्या मित्रासाठी आपण काहीही करावं वेळप्रसंगी जीवंही द्यावा. गेली ती बिचारी. समोरचा रस्ता ओलांडताना गाडीखाली आली. त्या दुष्टाने गाडी थांबवलीही नाही. आता मी एकटाच असतो. दिवसभर इकडे तिकडे करतो. संध्याकाळी मात्र मित्राबरोबर खेळायचं हे ठरलेलं आहे. मग रात्रीचं जेवण त्याच्याकडेच. तुम्हाला सांगतो मला आवडणारी कोंबडी, मासेही मला मिळतात. तो आणि त्याचे आई बाबा तिघच आहेत. तिघंही माझे लाड करतात.
तो दिवस नेहेमीसारखाच. आम्ही भरपूर खेळलो. दोघेही खूप दमलो. अंधार केव्हा पडला कळलंच नाही. माझ्या मित्राला त्याची आई सारखी बोलावत होती. पण आम्हाला दोघांनाही अजून थोडं खेळावं असं वाटत होतं. खेळता खेळता मित्राने बाॅल जोरात मारला तो दूर जाऊन पडला. मित्र माझ्याकडे बघत राहीला. त्याला वाटलं मी जाऊन आणेन. पण मीच का जावं. मी देखील दमलो होतो. खूप भूकही लागली होती. मी नुसताच बसून राहीलो. तिकडे मित्राची आई बोलावत होतीच. शेवटी तोच तिकडे गेला. क्षणभरातंच मला जोरात ओरडल्याचा त्याचा आवाज ऐकू आला. मी उठून धावतंच तिकडे गेलो आणि बघतो तर काय ...
मला अजूनही आठवत नाही नक्की काय झालं. नुसता विचार आला तरी अंगावर शहारा येतो. आई म्हणते मी बेशुद्ध पडलो होतो. देवाच्या कृपेनेच वाचलो. मी आईला म्हणालो देवाची कृपा कशी? तिथे तर माझा बडी धावून आला मदतीसाठी. त्यावर तिचं म्हणणं आहेच की म्हणे देवानेच त्याला तशी बुद्धी दिली. पण माझा बडी वाचेल ना? त्याला हाॅस्पिटल मध्ये घेऊन गेलेत. त्याच्या पोटाला खूप मोठी जखम झालीय म्हणे. मी इथे आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलोय. खूप भूक लागलीय पण आईने इथून उठून जाऊ नये म्हणून गप्प बसलोय. आत्ता आई माझ्याजवळ हवी बास.
खरंच ती कितीवेळ मला बोलावत होती मी तिचं ऐकायला हवं होतं. हे सगळं घडलंच नसतं. खरंतर आज मी किती आनंदात होतो. शेवटचा पेपर झाला. दिवाळीची सुट्टी सुरू झाली. चांगले दोन आठवडे पेणला जाणार आजीआजोबांकडे म्हणून मी खूश. यावेळी बडीलाही न्यायचं म्हणून आईला आधीच सांगून ठेवलं होतं.
त्याच्याबरोबर खेळताना खूप दमलो. आता अंधारंही लवकर पडतो म्हणून आई सारखी बोलावत होती. पण आठंही वाजले नव्हते म्हणून आम्ही खेळतंच राहिलो. आता खेळ संपवावा म्हणून मी बाॅलला जोरात एक किक मारली. बडीला म्हटलं घेऊन ये आणि माझ्याबरोबर चल जेवायला. पण त्याचा मूड नव्हता. तोही दमला असावा. दोनतीन वेळा सांगूनंही ऐकेना तेव्हा मीच गेलो. गवतावरून पार मागच्या कंपाऊंड पर्यंत गेलो तिथे झाडाखालीच दिसला. उचलण्यासाठी थोडा वाकलो आणि मी जोरात किंचाळलो. नंतर काही क्षणात जे घडलं तेवढंच आठवतंय. माझ्या आवाजाने काही दरवाजे खिडक्या उघडल्या असाव्यात आई धावत आली. रामसिंग लांबून पळत आला पण थोड्याच अंतरावर थांबला. पण माझा बडी जोरात धावत आला, जोरात उडी मारली आणि बघतो तर काय ...
काय सांगू राव तुम्हाला! त्या पिल्लाने जी उडी मारली ती मला आधी कळलीच नाही कारण माझं लक्ष एकदम समोर होतं. माझ्या अगदी चेहऱ्याजवळ आल्यावर फटका मारण्यासाठी मी हात उगारला. त्याला लागलं असेलंच पण तोपर्यंत त्याने माझ्या डाव्या डोळ्याचा चावा घेतलाच. तितक्यात सगळीकडे एकदम दिवे लागले आवाज यायला लागले. मग मी हळूच पाय मागे घेतला आणि परत आलो.
दुसऱ्या दिवशी दुपारी या लोकांनी मला पकडलं आणि इकडे आणून टाकलं. हरकत नाही मला जखम झालेली आहे. त्यावर औषधंही लावलंय यांनी. मागे माझ्या आईला पकडलं तेव्हा ती खूप चिडली होती. मग यांनी तिला सोडलंच नाही. म्हणून जखम बरी होईपर्यंत मी एकदम शांत रहाणार. मग कदाचित मला तिकडे लांब आतमध्ये नेऊन सोडतील. संधी पाहून परत मी एकदा तिकडे जाईन. ते मला खूप आवडलं. कधी एकदा त्या पिल्लाची लुसलुशीत मान जबड्यात धरतोय असं झालंय.
नाही नाही ते नाही हो! त्या तुमच्यासारख्याच दोन पायांच्या पिल्लाबद्दल बोलतोय मी!