Vinay Dahiwal

Inspirational Others

4  

Vinay Dahiwal

Inspirational Others

भाषण

भाषण

10 mins
308


याकथे मधील सर्व पात्र काल्पनिक आहेत. त्याचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.

लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय सदर कथेचे पूर्ण अथवा अंशतः वाचन, सादरीकरणं, रूपांतरण करू नये. तसे केल्यास "भारतीय कॉपी राईट ऍक्ट" नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. न्यायालयीन कार्यक्षेत्र "माढा" राहील.


आज कॉलेज मध्ये जणू रंगांची उधळण व्हावी अशी पटांगण फुललेलं होतं. कॉलेज मध्ये वार्षिक स्पर्धाचं वातावरण होतं. प्रत्येकान ज्याच्या त्याच्या ऐपती नुसार चांगले कपडे घालून स्वतःला सजवलं होतं. एरवी काकू बाई सारख्या दिसणाऱ्या मुलींनी सुद्धा आज ओठांवर लिपस्टिक फिरवली होती, डोळ्यांच्या कडा मस्कराने सजवल्या होत्या. त्यातला काहींना सवयच नसल्याने मस्करा त्यांच्या डोळ्यांचं सौदर्य वाढविण्यापेक्षा डोळ्यात लाली आणि त्याची सोबत करायला पाणी भरत होता. काही मुली विश्वास बसणार नाही इतक्या सुंदर दिसत होत्या तर काहिंना पाहून यांनी का मेकअप केला असा प्रश्न सर्वांना पडत होता. आता सूत्र संचालन करणारे पोर पोरीं मात्र जाणीवपूर्वक पारंपरिक वेशभूषेत आलेले होते. त्यात एका दोघांनी हौसेने नसलेलं धोतर सारखं त्यांची साथ अर्ध्यावर सोडत होतं. मग काही चाणाक्ष मंडळींनी त्यांना सल्ला दिला आणि जिवाभावाच्या मित्रांनी स्वतःच्या कमरेचा बेल्ट सोडून मित्रांची अब्रू वाचवली. त्यात काही गुणवंत विद्यार्थी या सर्वांना निरीक्षण करून हेरत होते आणि स्वतःच मनोरंजन करून घेत होते. आज वक्तृत्व, कथाकथन स्पर्धा होती आणि ती पण मराठी, हिंदी आणि इंग्रजी मधून. सूत्र संचालन करणारे सूत्र संचालक स्वतःची तयारी, म्हणजे भांग नीट आहे का? चेहरा तेलकट तर झाला नाही ना? धोतर जागेवर आहे ना? यामध्ये व्यग्र होते तर काही स्पर्धकांचा आपल्या भाषणावर एक शेवटचा हात मारणं सुरु होतं.

नान्या मात्र एकटा कॉलेजच्या टेरेस वर हातात भाषणाचा कागद घेऊन मोठमोठ्याने भाषण पाठ करत होता. अधून मधून पोरींचा गाडगी ढासळण्या सारखा खिदळण्याचा आवाज त्याची तंद्री मोडत होता. तर मधूनच कोणी तरी वर यायचा आणि "नान्या योगीला बघितलं का?? काय दिसती राव आज" असं म्हणून त्याची साधना भंग करीत होत. नान्या भायनक टेन्शन मध्ये होता. काही केल्या त्याच भाषण काही पाठ होत नव्हतं. कागद समोर आला की सगळं पाठ आहे असं वाटायचं, आणि कागद नजरे आड गेला की दुसरं वाक्यच आठवत नसायचं. नान्या आज 'खेळाचं माणसाच्या आयुष्यातील महत्व' याविषया वर भाषण करणार होता. ते पण इंग्रजी मधून. सबंध कॉलेज मध्ये इंग्रजी भाषेत भाषण करण्याचा विडा फक्त आणि फक्त नान्याने उचलला होता. पाणी ला पानी म्हणणारा नान्या आज इंग्रजी मध्ये भाषण करणार होता. त्यामुळे सगळ्यांना खूप उत्सुकता लागली होती. काही मित्राचं उर त्यानं भाषण करण्यापूर्वीच भरून आलं होतं. एरवी भांडण , मारामारी मध्ये अग्रस्थानी असणारा, मराठी भाषेतील शिव्यांचा स्वतंत्र शब्दकोश असलेला आपला मित्र इंग्रजी मध्ये बोलणार हि भावनांचं त्यांना खूप सुखावह होती. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकत होता तसतसा नाण्याच्या हृदयाचा वेग वाढत होता. आणि त्या टेन्शन मध्ये पाठ झालेली दोन तीन वाक्य पण नान्याला विसरायला होत होती. आज कधी नव्हे ते नान्या खूप घाबरल्या सारखा वाटत होता. टेन्शन फक्त पाठांतराचं नव्हतं. काल रात्री साडे अकरा वाजता नान्याला वाटलं की आपण हटके काही तरी करावं. मराठीत सगळेच भाषण करणार, आपण इंग्रजी मध्ये करावं. मग काय साडे अकरा वाजता मनात आलं, पुढच्या दहाव्या मिनिटात नान्याची गाडी इंग्रजीच्या मास्तरच्या दारात. बरं, हे महाप्रतापी महाशय एवढ्या रात्री आपल्या दारी पाहून मास्तर टेन्शन मध्ये. पण नान्या ने असल्या नसल्या तेवढ्या कसोशीने अतिशय विनम्र होऊन मास्तरांना आपल्याला एक इंग्रजी भाषण लिहून देण्याची विनंती केली होती. आता नान्या सारखा पोरगा, एवढ्या रात्री, तेही घरी येऊन विनंती करतोय म्हटल्यावर अंगातला आळस कोपऱ्यात गुंडाळून ठेवत त्याला एक पानभर भाषण खरडून दिलं. त्या भाषणाची घडी घालून नान्या घरी पोहचला तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते. झोपेन डोळे सुमारल्या सारखे झाले होते. तशाही परिस्थिती मध्ये नान्या भाषण वाचू लागला. पण अक्षर दोन दोन दिसू लागली. शेवटी उद्या सकाळी लवकर उठायचं आणि भाषण असं पाठ करायचं कि मास्तरांनी आपली पाठच थोपटली पाहिजे असा विचार करत कधी गोड स्वप्नात नान्या रमला त्याच त्यालाही समजलं नाही. सकाळी डोळे उघडले तर घड्याळात साडे सात वाजले होते. ,घड्याळ पाहिलं आणि नान्याची झोप खाडदिशी उडाली. स्पर्धा दहा वाजता होती..... तोंड खंगाळून अंघोळ न करताच कॉलेज गाठलं होत. शेवटी शेवटच भाषण न पाहता वाचण्याचा प्रयत्न केला टेरेस वर. बऱ्यापैकी यशस्वी झाला अस वाटत होतं. बाकी प्रोत्साहन द्यायला मित्रांची कमतरता नव्हतीच. त्यामुळे दुर्दम्य विश्वासात हि स्वारी टेरेस वरून खाली आली. ठरलेल्या खोलीत नान्या आणि त्याचे मित्र शिरले. आत शिरल्या वर उगाच एकाला विचारलं, ते इंग्रजीच्या भाषणासाठीची रांग कोणती. वस्तुतः अशी कोणतीही रांग नव्हती पण आपण इंग्रजी मध्ये भाषण करणार याची उगाचच जाता जाता त्यानं जाहिरात केली. आख्खा वर्ग रिकामा असताना सुद्धा मागचा बाक कधीही न सोडणारा नान्या आज दुसऱ्या बाका वर बसला होता. पहिल्या बाकावर शिक्षक होते म्हणून त्याने नाईलाजने आज दुसऱ्या बाकावर बसायचा निर्णय घेतला होता. आता मराठी मधील शेवटच भाषण संपल होतं. ते संपताच एक सुबक ठेंगणी, बसक्या नाकातील मोठाली नथ आणि पायात येणारा नऊवारी चा काष्टा सावरत पुढच्या डायस वर आली. आणि पुस्तकातील धडा 'आता मराठीच्या स्पर्धा संपल्या, आता इंग्रजीच्या सुरु. इंग्रजी मध्ये फक्त एकच स्पर्धक आहे नानासाहेब सुतार. नाना....' असं छापील वाक्य बोलत परत तोलून मापून पावलं टाकत एका कडेच्या पहिल्या बाका वर मानांन विराजमान झाली. आणि या वाक्य बरोबर जो काही जल्लोष नाना समर्थकांनी केला की क्षणभर नान्याला आपण नगरसेवक झाल्याचा भास झाला. अगदी विजयी मुद्रेत नान्या उठला, फिल्मी स्टाईल मध्ये हात वर करून सगळ्यांना अभिवादन केलं. तसा समर्थकांना आणखी जोर चढला. नान्या या जल्लोषाच्या नशेतच डायस वर चढला. समोर वर्ग गच्च भरलेला. काहीजण नान्याला प्रोत्साहन द्यायला आलेले तर काहीजण त्याची मजा पहायला. पहिल्या बाका वर सर्व शिक्षक होते. त्यांच्या मागे दाराकडे असलेल्या दोन रांगा महिला वर्गासाठी राखीव होत्या. बाकीच्या वर्गात सगळी पोरं. एका बाकावर तिघे तिघे तर सगळ्यात मागच्या बाकाला बाल्कनीच स्वरूप आलं होतं. नान्याच्या अगदी समोर इंग्रजीचे पाटील मास्तर बसले होते. मास्तरांच्या डोळ्यातली उत्सुकता सुद्धा सहजा सहजी समजत होती. ज्या तडफदार पणे नान्या डायस वर पोहचला होता ते पाहून पाटील मास्तरांना सुद्धा वाटलं की हा पोरगा आज जिंकणार. अर्थात त्याने भाषण पूर्ण केलं, अगदी कसही तरी पहिला नंबर नान्याला मिळणार हे फिक्स होत कारण या स्पर्धेत फक्त एकच स्पर्धक होता.... नान्या.

आता जल्लोष थोडा कमी झाला होता. नान्या भाषणाची सुरुवात आठवू लागला.आणि नशिबाने ती आठवली. आणि.... नान्याच्या भाषणाला सुरुवात झाली. 'रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डियर स्टुडंन्ट फ्रेंड्स..... टुडे.... आय एम गोईंग टू टेल यु दि इंपोर्टन्स ऑफ स्पोर्ट्स इन अवर लाईफ.......' खर्जातल्या आवाजातून आलेल्या या वाक्यांनी सगळ्या मित्रांना पुन्हा एकदा जोश आला. पाटील मास्टर सुद्धा प्रभावित झाले. आणि पुन्हा वर्ग टाळ्या आणि शिट्टयांनी दणाणून गेला. आणि यावेळी नान्या या गलक्यात गुंगून गेला..... हळूहळू गलका शांत झाला. आणि नान्या पुन्हा उरलेल आपलं भाषण आठवू लागला. पण यावेळी मात्र काही केल्या नान्याला पुढचा एकही शब्द आठवेना. हळूहळू वर्ग इतका शांत झाला की टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल. पण नान्याच्या तोंडून शब्द बाहेर पडेना. नान्या मस्त पॉज घेऊन भाषण करतोय असं वाटणाऱ्या मित्रांना सुद्धा त्याचा हा इतका मोठा पॉज खटकू लागला. आता नान्याच्या चेहऱ्यावर थोडीफार भीती झळकू लागली. कपाळावर घामानं ओलावा आणला होता. आता त्याची गंमत पहायला आलेल्या पोरांनी त्याला डिवचायला सुरुवात केली. आधीच थोडा गोंधळला नान्या अजून जास्त गोंधळून गेला. त्याला काही केल्या भाषण आठवेना.आता वर्गात पुन्हा गलका झाला पण तो नान्याची टिंगल करण्यासाठी. यासगळ्या प्रकारामुळे नान्या पुरता गोंधळून गेला आणि शेवटी 'बसं...... एवढंच पाठ आहे' असं म्हणाला आणि पाटील मास्तर कडे न पहाताच खाल मानेन वर्गा बाहेर पडला. पाटील मास्तर पण भ्रमनिरास होऊन बाहेर पडले. नान्या ने भाषण पूर्ण केलं नाही म्हणून त्याला बक्षीस मिळण्याचा प्रश्नच नव्हता.

संध्याकाळ चे सहा वाजले असतील. पाटील मास्टर आराम खुर्ची मध्ये बसून छानसं पुस्तक वाचत बसले होते. नान्याला गेट मध्ये पाहिलं आणि मास्तरांनी पुस्तक बाजूला ठेवलं. आज नान्याची नजर खाली पायाच्या अंगठ्याकडे होती. कधी नव्हे ते नान्याचे डोळे पाणावले होते. हे अश्रू बक्षिस मिळालं नाही म्हणून नव्हते तर, पाटील मास्तरांचा विश्वास आपण सार्थ करू शकलो नाही यासाठी होते. सुरुवातीला त्याच्या पायाशी बसून फक्त अश्रू ढाळत होता. शेवटी मास्तरांनी डोक्यावरून हात फिरवत त्याची समजूत काढली. ' माणसानं पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल अशी आशा बाळगू नये. मी तर म्हणतो की प्रत्येकाला सुरुवातीला अपयश यावं. कारण पहिल्या प्रयत्नात मिळालेलं यश तुम्हाला पंगू बनवत. तुमच्यातील शिकण्याची ईच्छा, ईर्षा मारून टाकत. तुमच्या मधला विद्यार्थी मारला जाण्याची भीती जास्त असते. उलट चार पाचशे मुलां मधून तू एकट्याने इंग्रजी मध्ये भाषण करायची तयारी दाखवली, सर्वांसमोर भाषण करायचा प्रयत्न केला तेच कौतुकास्पद आहे' सर अगदी शांतपणे बोलत होते, नान्या मात्र नजर जमिनीवर ठेवून तल्लीन होऊन मास्तरांचा प्रत्येक शब्द जणू हृदयात कोरून ठेवत होता. पण सर मी खूप प्रयत्न केला पाठ करायचा. काही केल्या पाठच झालं नाही. सर, मला तुमच्या सारखं इंग्रजी बोलायला शिकायचं आहे. कान बंद करून तुमचं इंग्रजी ऐकलं कि वाटत नाही एखादा वाडीतला मास्तर इंग्रजी बोलतोय. एखाद्या फॉरेनर ला ऐकतोय असं वाटतं. मला शिकवा सर तुमच्या सारखं इंग्रजी बोलायला. वाटल्यास फी घ्या, पण शिकवा सर.... प्लीज्' पाटील मास्तरांनी एक मंद हास्य दिलं आणि म्हणाले 'तू पाठ केलं, म्हणून भाषण पाठ झालं नाही. भाषा, विषय, संकल्पना कोणतीही असो तुम्ही पाठ केलं तर पोपट व्हाल, विद्वान नाही. कोणताही विषय आधी समजून घे. नेमकं काय आहे हे ओळख. आपल्याला नेमकं काय सांगायच आहे हे मनाशी पक्क असलं ना, कि ऐनवेळी सुद्धा कोणत्याही विषयावर आणि कितीही लोकां समोर बोलू शकशील. पोपटपंची केली तर लोकं काही काळ टाळ्या वाजवतील ,तुम्हाला डोक्यावर घेतील पण एक लक्षात ठेव मुलामा निघून गेला की पितळ उघड पडतंच. त्यामुळं सोनं व्हायचा प्रयत्न करायचा कि पितळच रहायच हे तुझं तू ठरव. राहिला प्रश्न माझ्या शिकवणी देण्याचा तर ती मी नाही देणार. कारण माणूस स्वतः जेवढं शिकू शकतो तेवढं त्याला कोणीही शिकवू शकत नाही. हां.... पण एक नक्की सांगेन, माझ्या सारखे उच्चार शिकायचे असतील तर इंग्रजी वर्तमानपत्र वाच, तुझा शब्दकोष वाढेल, शद्ब समजला नाही तर डिक्शनरी वापर. इंग्रजी बातम्या, सिनेमे पहा, निरीक्षण कर.' मास्टर बोलतच राहिले आणि नान्या ऐकतच राहिला. शेवटी अंधारून आलं तेव्हा एका प्रचंड आत्मविश्वासा सह नान्या मास्तरांच्या घरातून बाहेर पडला.

पुढे, बारावी संपली आणि नान्याला इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतलं. आता पाटील मास्टर, कॉलेज मधले मित्र मागे राहिले होते. जग रहाटी नुसार हे बदल नान्या मध्ये पण झाले. इंजिनियरिंग ला ऍडमिशन मिळालं तरी नान्याच्या राहणीमाना मध्ये आणि भाषा शैली मध्ये काहीही बदल झालेला नव्हता. डिपार्टमेंट मध्ये नान्या म्हणजे फुल गावठी माणूस, शिवराळ भाषेत बोलणारा एक गुंड प्रवृत्तीचा मुलगा असंच काहीसं इंप्रेशन होतं. पण नान्याला त्याच काहीच सोयर सुतक नव्हतं. आता इंजिनियरिंग च्या तिसऱ्या वर्षाला गेला होता नान्या. यावर्षी वर्गातल्या सगळ्या मुलांना एक विषय घेऊन एक सेमिनार करणे बंधनकारक होत कारण अभ्यासक्रमाचा तो एक भाग होता. नान्या बद्दल इथल्या मास्तर लोकांचं पण काही जास्त चांगलं मत नव्हतं. मुळात हा गावठी आपला सेमिनार इंग्रजी मध्ये देईल का याबद्दलच शंका होती सगळ्यांना. त्यात नान्याला जास्तीत जास्त कसा त्रास देता येईल हे सगळे पहायचे. कारण, नान्या एखाद्या चुकीच्या गोष्टी बद्दल बोलताना कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसायचा.आणि मास्तर लोक याला स्वतःचा अपमान समजायचे. आजपण नान्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम त्याचा नंबर शेवट ठेवला होता. नान्याने विचारणा केली तर विभाग प्रमुखाने सांगितलं की प्रिन्सिपल सरांना तुझा सेमिनार ऐकायचा आहे त्यामुळे तुझा सगळ्यात शेवटी ठेवला आहे. यानिमित्ताने नान्या किती नालायक आहे हे प्रिन्सिपल सरांना दाखवून देणे हा एक उद्देश होता. अजून एक दोन सेमिनार राहिले असतील नसतील तोच प्रिन्सिपल सर आले. आत्ता पर्यंत झालेले सेमिनार चे विषय हे खूप जुने, सगळ्यांच्या अति परिचयाचे होते त्यात नाविण्य असं काहीच नव्हतं. आता विभागप्रमुख पूर्ण तयारीत होते. नान्याला नेमके कोणकोणते प्रश्न विचारायचे, नान्याला कसं अनुत्तरित करायचं याची सगळी गणितं त्यांनी मनातल्या मनात मांडली होती. सरते शेवटी नान्याचा नंबर आला. नेहमी प्रमाणे वर्गात काही समर्थक होते तर काही त्याची मजा करायला बसले होते. नान्या समोर आला आणि भाषणाची सुरुवात केली 'फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू एक्स्टेंड माय डीप अपोलोजी टू ऑल माय डियर फ्रेंड्स. आय नो..... माय टुडेज सेमिनार इज दि मोस्ट अवेटेड सेमिनार...... भाषणाची हि सुरुवात ऐकूनच विभाग प्रमुख निम्मे गार झाले. नान्याच्या बोलण्याची पद्धत, देहबोली मधून झळकणारा आत्मविश्वास, इंग्रजी भाषे वर असलेलं प्रभुत्व आणि अस्लखित शब्दोच्चार. त्याचा सेमिनार ऐकताना प्रत्येकाला वाटायचं की हा नान्या आज पहिल्यांदा पहातोय. आज पर्यंत चा नान्या आणि हा, यामध्ये जमीन आस्मान चा फरक आहे. नान्या ने एकदाही काढलेल्या नोट्स पहिल्या नाहीत, तयार केलेलं प्रेझेंटेशन पाहिलं नाही. पूर्ण मुद्दे व्यवस्थित आणि सुटसुटीत समजावून सांगितले. आज आख्खा वर्ग या नान्याच्या प्रेमात पडला होता म्हणण्यापेक्षा नान्याने त्यांना तसं करायला भाग पाडलं होतं. नान्या बद्दल ग्रह दूषित करण्यासाठी बोलावले गेलेले प्रिन्सिपल सर प्रचंड प्रभावित झाले होते. नान्याचा सेमिनार संपला आणि नियमानुसार कोणाला काही शंका आहे का असा त्याने विचारलं. संपूर्ण वर्ग शांत होता. सेमिनार पूर्वी मनातल्या मनात मांडलेली विभाग प्रमुखांची सगळीच गणित चुकली होती. कारण नान्या ने निवडलेल्या विषया बद्दल विद्यार्थी सोडा, विभाग प्रमुख सोडा खुद्द प्रिन्सिपल सरांना सुद्धा जास्त ठाऊक नव्हतं. सगळ्या रताळवाण्या विषयांमध्ये हा एकच विषय अतिशय नवीन होता. विभाग प्रमुख मात्र मनातल्या मनात खजील झाले होते. कदाचित 'नेव्हर जज या बुक बाय इट्स कव्हर' हे वाक्य त्यांच्या डोक्यात आज फिट्ट बसलं असावं. प्रिन्सिपल सर उठले आणि त्यांनी पुढे जाऊन नान्याची पाठ थोपटली. तोंड भरून कौतुक केलं. विशेषतः त्याच्या इंग्रजी शब्दोच्चाराच, त्याच्या विषया बद्दल असलेल्या सखोल ज्ञानाच आणि सर्वात महत्वाचं त्याच्या आत्मविश्वासाच. कौतुक सोहळ्या सोबतच आजचा सेमिनार चा कार्यक्रम पण संपला होता. सगळेजण पांगत होते तर जवळचे भिडू मात्र नान्या वर कौतुकाचा वर्षाव करत होते. नान्या पण चांगलाच रमला होता सगळ्यात. तेवढ्यात नान्याच्या पाठीवर हात पडला. विभाग प्रमुख होते. 'अपेक्षित नव्हतं रे हे मला. तू आणि इतकं सुरेख इंग्रजी??? माझा अजूनही विश्वास बसत नाही..... आय एम सिंपली प्राउड ऑफ यु..... असाच साधा रहा ,शिकत रहा..... शिकवत रहा.... पण तुला हे एवढं सुंदर इंग्रजी शिकवलं कोणी?'

'पाटील मास्तरांनी' आणि या नावा बरोबर नान्या च्या डोळ्यात पाणी कधी आलं कळलंच नाही.Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational