बॉण्ड तात्या
बॉण्ड तात्या


या कथेतील सर्व पात्रे, घटना व प्रसंग काल्पनिक आहेत. त्याचा कोणत्याही जिवीत अथवा मॄत व्यक्तीशी संबंध नाही. तसा अढळल्यास निव्वळ एक योगायोग समजावा.
© सदर कथेचे सर्व हक्क लेखक श्री. विनय शिवाजी दहिवाळ यांचेकडे सुरक्षित. सदर कथा कोठेही, कोणत्याही स्वरूपात अंशत: अथवा पुर्णपणे सादर करणेपुर्वी अथवा रूपांतरीत करणेपुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व वादांसाठी न्यायालयीन कार्यक्षेत्र “माढा” जिल्हा : सोलापूर राहिल.
आज सगळी मंडळी जमा झाली होती पण बॉण्ड तात्याला मात्र उशीर झाला होता. कोणी घड्याळाकडे पाहात होतं तर कोणी मोबाईलमध्ये डोकं घालून बसलं होतं. शेवटी भास्करने न राहवून फोन लावलाच. “अरे कुठं उलथला आहेस? किती वेळ झालं आम्ही सगळे वाट पाहातोय तुझी?” पुढचं उत्तर ऐकून “बरं… ये लवकर” म्हणून भास्करने फोन ठेवला. “का रे? येतोय का?” रमाकांतने विचारलं. “गेटवर आहे... तुला सांगतो रम्या हा दरवेळी अशीच काशी करतो. याला चार वाजताचा कार्यक्रम दोन वाजता सांगितला ना तरी हा पठ्या पाच वाजता पोहोचेल अगदी आपलं काहीही चुकलं नसल्याच्या अविर्भावात. वर अजून पावशेर टाकेल 'का रे? उरकलं होयं एवढयात?'” सगळेजण हसतात.
तेवढयात तात्या आलेच. “का रे काय झालं? मलाही सांगा..”
“बॉण्ड… राहू दे. तुझ्या हसण्याचा आवाज ऐकायची या पार्कला आणि इथे फिरायला येणाया माणसांना सवय नाही. सगळे पळून जातील आणि तुला इथे यायला आजीवन बंदी घालतील...” सम्यानं टिपीकल बामनी पद्धतीनं शालजोडीतून मारायचा प्रयत्न केला. “अबे जा… मला बंदी घालाणारा जन्माला यायचाय अजून. उलट तुझे ते लाफ्टर क्लबवाले माझ्याकडे शिकवणीसाठी येतील. हसायलासुद्धा क्लब शोधण्याच्या मनगटात तेवढं नेट नाही रे या तात्याला बंदी घालण्याचं. आणि माझ्यावर कसली बंदी घालताय म्हणावं. ओलरेडी साठीच्या पुढंय. एक्सपायरी डेट जवळच आहे. कधी तुम्हाला माझ्यासाठी दोन मिनीटांचं मौन पाळावं लागेल सांगू शकत नाही.” तात्याने नेहमीच्या तिरकस मिश्कीलपणानं उत्तर देत त्या पार्कला आपल्या हसण्याची पहिली झलक ऐकवली. सगळेजण तात्यांच्या हसण्यात सामिल झाले.तात्या सोडून कोणाचाच हसण्याचा आवाज समजत नव्हता. आणि या हसण्याबरोबर तात्या आणि त्यांच्या वर्गमित्रांचा मॉर्निंग वॉक या गोंडस नावाखाली गप्पा मारण्यासाठी एकत्र जमण्याचा कार्यक्रम सुरू झाला. तब्बल 25 ते 30 वर्षानंतर तात्यांनी सगळ्यांना एकत्रीत आणलं होतं. काहींना प्रेमानं सांगून तर काहींच्या खानदानाचा उद्धार करून. पण सगळ्यांची मोट बांधली हे मात्र निश्चीत.
मुळात तात्या हे रसायनच वेगळं होतं. तात्यांचं खरं नाव पांडुरंग. जे त्यांना कधीच आवडलं नव्हतं अगदी आजही. हे नाव खूपच अनरोमॅन्टीक आहे असं त्यांचं मत होतं. पण घरचा परमार्थ आणि पैलवान वडिलांचा धाक यामुळे त्यांच्या मनातल्या या भावना कधी उघड करता आल्या नाहीत. पण पांडुरंग म्हटलं की त्याला तात्या किंवा अण्णा येतच…… आपसूकच. अगदी तसंच त्यांना तात्या ही पदवी चिकटली. पण तात्या लहानपणापासून करामती होते. फटाक्याच्या माळेला उदबत्ती लावून त्याला टाईम बाॅम्बसारखं फोडायची आयडिया तात्याच्याच डोक्यातली. मास्तरला कुठं आणि कसं सायकलवरून पाडायचं तेही दूर राहून याचाही जनक तात्याच. पण तात्यांचा एक प्रॉब्लेम होता की त्याला आयडिया (उपद्व्यापी) भन्नाट सुचायच्या पण त्या अमलात आणायचं म्हटलं की त्याचे पाय लटपटायचे. डोळ्यासमोर 100 किलो वजन असलेला पिळदार शरीराचा पैलवान बाप दिसायचा. मग दिन्या, रम्या, सम्या, बाळ्या यांना तात्याच्या आयडिया प्रत्यक्षात उतराव्या लागायच्या. म्हणजे आजपर्यंतच्या तात्याच्या शाळेत झालेल्या अनेक कुरापाती उद्योगाचा मास्टर माइंड तात्या आणि त्यांची ही सगळी गँग होती. अजूनही तात्या तसाच आहे. तात्याच्या असल्या नवनवीन शोधांमुळे तात्या बॉण्ड तात्या झाला. तात्यांना पण आवडायचं त्यांना या नावानं हाक मारलेलं. पुढे लग्न जमलं. घरच्यांनी पांडुरंगाच्या पदरी रूक्मिणी बांधली. बायकोचं बदललेलं नाव पसंत नसलं तरी बापाच्या धाकानं तात्यांनी एक चकार शब्द देखील काढला नाही.
आज या पांडुरंग रखुमाईनं संसाराची पंढरी जोपासली, फुलवली, वाढवली…… अगदी प्रेमानं. पण तात्यांची एक इच्छा मात्र आजपर्यंत अपूर्णच राहिली होती. आणि ती म्हणजे कॉलेजात असताना प्रेम करण्याची. तात्यांना खूप वाटायचं की आपण कोणावर तरी प्रेम करावं किंवा कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं. आणि मग बच्चन आणि राखीसारखं एखाद्या रोमॅण्टिक गाण्यावर डान्स करावा. तसा डान्स आजपर्यंत तात्यांनी अनेकदा केला… मनातल्या मनात. तात्यांच्या तिर्थरूपांचा दरारा सबंध तालुक्यात होता. त्यामुळे इकडे नुसतं खट वाजलं की तिकडे तिर्थरूपांना समजायचं. बापाच्या असल्या धाकामुळे आपल्या तारूण्यातल्या एका अतिशय महत्त्वाच्या सोनेरी काळाला आपण मुकणार हे तात्यानी मनाशी पक्क केलं होतं. अनेकदा वाटायचं होऊन जाऊ दे एकदाचं काय व्हायचं ते. करावं एखादीवर प्रेम आणि जरी तिर्थरूपांना कळालं तरी बेहत्तर…… असं मनाशी विचार करत असतानाच अचानक तिर्थरूपांचा ताजा ताजा पराक्रम कानावर यायचा. सगळी हवा निघून जायची. मुळात सगळी बंधनं, रितीभाती, परंपरा आणि सामाजिक चाकोरी सोडून प्रेम करण्याचा मुळातच तसा पिंड असावा लागतो. जो तात्यांचा अजिबात नव्हता.
आज वयाची साठी ओलांडल्यानंतर मागे वळून पाहताना केवळ ही एक गोष्ट सोडली तर तात्यांना कोणत्याच गोष्टीची खंत नव्हती. तात्या अगदीच धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ वगैरे काही नव्हते. प्रेम सोडलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा तात्याने मनमुराद आस्वाद घेतला होता. पण तिर्थरूपांच्या समोर कैलासवासी लागल्यानंतर. आजही प्रेमाचा विषय निघाला की तात्यांचा चेहरा खुलतो. स्वत:ला त्या प्रसंगात पाहतात.पण थोड्याच वेळात पिकल्या केसांची आठवण झाली की मन खट्टू होतं. आजही प्रेम, ते ही लपून छपून केलेलं प्रेम ही भावना तात्यांच्या मनात तेवढीच ताजीतवानी आहे की जेवढी ती कॉलेजमध्ये असताना होती. उतरतीला लागल्यावर तात्यांना मित्रांची आठवण झाली. आणि मग तात्यांनी सगळ्यांचे पत्ते आणि मोबाईल नंबर शोधून काढले त्यातले तिघे जण गेली 10 वर्षे त्याच शहरात होती. पण एकमेकांच्या संपर्कात नसल्याने कोणालाच माहिती नव्हतं. मग तात्यांनी जेवढे आहेत तेवढ्यांनी मॉर्निंग वॉकला जमण्याचा जणू फतवाच काढला. आता तात्यांनी सांगितलं म्हटल्यावर ते टाळण्याचं धाडस कोणी दाखवणार नव्हतं. कारण तसं केलं तर तात्या त्याचा, त्याच्या खानदानाचा मरेपर्यंत उद्धार केल्याशिवाय राहणार नव्हता. मुळात तात्यांवर मित्रांचा जीवही होताच. पण या मॉर्निंग वॉकचा बेत ठरविण्यामागे तात्याचा मुख्य हेतू वेगळाच होता. का कोण जाणे तात्यांना असं वाटत होतं की पार्कमध्ये त्यांना कोणी ना कोणीतरी नक्की भेटेल. तात्यांचा हा हेतू तात्या सोडून कोणालाच माहिती नव्हता.
आता मॉर्निंग वॉकच्या नावाखाली पार्कमध्ये जमणे आणि फक्त मनसोक्त हसणे हा नित्यक्रम न चुकता सुरू होता. आपण काय करतो हे कोणालाच कळत नाही असं तात्यांना वाटायचं पण त्यांचे मित्र हे त्यांच्याच वयाचे होते याचा बहुतेक तात्यांना विसर पडला होता. सगळ्यांना कळून चुकलं होतं तात्यांचं नेमकं काय सुरू आहे ते पण बोलत मात्र कोणीच नव्हतं. तात्यांचे प्रयत्नही सुरूच होते. पण प्रत्येकवेळी त्यांचं वय आणि व्यक्तिमत्व आडवं येतं होतं. पिकलेल्या केसांमुळे आणि वाढलेल्या वयामुळे प्रत्येक मुलीकडून आजोबा किंवा बाबा याच नावानं प्रतिसाद मिळायचा. तात्यांना खूप वाईट वाटायचं पण हेच सत्य होतं आणि तात्या हे नाकारू शकत नव्हते. नाईलाजानं ती हाक पचवायचे आणि नकली हसण्याने मनाला झालेल्या यातना लपविण्याचा प्रयत्न करायचे. कायम डोक्यात विचार यायचा की ज्यावेळी वय होतं तेव्हा बापामुळं काही करता आलं नाही आणि आता काही तरी करावंसं वाटतंय तर साला हे वय काही पिच्छा सोडत नाही. या वयाचं काही तरी केलं पाहिजे. तात्यांचा असा पोपट झाला की सगळ्या ग्रुपमध्ये एकच हशा पिकायचा. तात्यांना कळत नसे की माझा पोपट झाला तेव्हाच या मंडळींना एवढे जोक्स कसे सुचतात? पण काहीही झालं तरी तात्या हार मानायला तयार नव्हते. त्यांचे प्रयत्न करणं आणि पोपट होणं चालूच होतं. इतक्या दिवसात एक मात्र झालं होतं की रोजच्या जाण्याने आणि विशेष करून तात्यांच्या हसण्याने बरीच मंडळी येता जाता ओळख देऊ लागली होती. त्यात तरूणीही होत्या.
एके दिवशी असाच गप्पांचा फड रंगला होता आणि अचानक एक नाजूक आणि मंजूळ आवाज आला, “आजोबा, थोडी मदत हवी आहे. माझा मोबाईल जस्ट हरवला आहे. इथेच कुठेतरी पडला असेल. तुमच्या मोबाईलवरून कॉल लावाल प्लीज… म्हणजे रिंग वाजली की सापडेल लवकर…… प्लीज आजोबा.....” ती थोडी घाबरली होती पण बोलण्यात खूप आत्मविश्वास होता. दिसायलाही आकर्षक होती. तात्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत:चा मोबाईल काढून दिला. मुळात तात्यांचे प्रयत्न सगळ्यांना ठाऊक होते त्यामुळे कोणीही मोबाईल काढण्याची घाई केली नव्हती. तात्या स्मार्टफोन वापरायचे पण कॉल घेणे आणि करणे यापलीकडे काहीही त्यांना जमत नव्हतं. तात्या त्या तरूणीच्या नंबरवर कॉल करीत जवळपास अर्धा तास तिच्या सोबत फिरले. सरते शेवटी तिचा मोबाईल सापडला आणि त्या तरूणीचा जीव भांड्यात पडला. सहवास संपला म्हणून तात्या थोडे नाराज झाले खरे.
“थँक्स आजोबा, आज तुम्ही वेळेवर मदत केली म्हणून माझा मोबाईल सापडला. नाहीतर...... तुम्ही एफ.बी. वर आहात? मी फ्रेंड रिक्वेस्ट टाकते तुम्हाला. गिरीजा नावानं प्रोफाईल आहे माझं...”
“अच्छा म्हणजे गिरीजा नाव आहे तर तुझं?”
“नाही ओ आजोबा… माझं खरं नाव योगिता.”तात्यांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून पुढं तिनं स्पष्टीकरण दिलं, “सध्या मी गिरीजा नावानं अकाउंट चालवते. खऱ्या नावानं अकाऊंट काढलं तर हवी तशी प्रायव्हसी आणि स्पेस मिळत नाही. बाबा चेक करणार, भाऊ चेक करणार, नातेवाईक चेक करणार. मग या भितीपोटी ना मनासारख्या पोस्ट शेयर करता येतात ना हवे ते मित्र-मैत्रिणी बनवता येतात. अनोळखी नावानं आणि अनोळखी पर्सनॅलिटीनं हवं तसं चॅट करता येतं कारण मी खरी कोण आहे हे फक्त मलाच माहिती आहे. आणि माझं हे सिक्रेट फक्त तुमच्यापाशीच ठेवा… प्लीज. तुम्ही मला मदत केली म्हणून बोलले.” त्या तरूणीचं बोलणं ऐकून तात्या जणू समाधीवस्थेत गेले होते. आपल्याला गेली चाळीस वर्षे सतावत असलेल्या प्रश्नाचं उत्तर या आजच्या पिढीकडे किती सहज उपलब्ध आहे. कदाचीत मला माझ्या समस्येवर उपाय मिळाला. तात्यांचे डोळे चमकले आणि तात्या म्हणाले, “तुझं सिक्रेट नाही कोणाला सांगणार… प्रॉमिस… पण एका अटीवर…… तू… मला तुमचं ते एफ.बी. की काय आहे ना ते नीट शिकवायचं.” त्या तरूणीनं अगदी उत्साहात होकार दिला. “मग… केव्हा येणार…?” तात्यांचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच ती म्हणाली, “अहो आजोबा नुसतं एफ.बी. च नाही तर इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हॉटसअप सगळे शिकवते. पण उद्या मी बाहेर गावी चालले आहे त्यामुळे येणार नाही. परवा दिवशी…… पक्का......याच वेळेला भेटूयात....” आणि जॉगिंग करत ती निघून गेली. तात्या चेहऱ्यावर हास्याची लकेर घेऊन परतले. “मासा गळाला लागला वाटतं?” रम्यानं खोचकपणे विचारलं. “मासा नाही… पण योग्य तो गळ मात्र नक्कीच सापडला.” तात्या उत्तरले… हसत.
ठरल्या दिवशी तात्या वेळेच्या आधी दहा मिनीटं हजर होते. सगळ्यांना थोडं धक्कादायकच होतं हे. थोडया वेळात योगिता आली. मग तिनं अगदी मेल आय.डी. काढण्यापासून सर्वकाही म्हणजे फेसबुक, व्हॉटसअप, इंस्टाग्राम ते टेलीग्राम सर्वकाही एप्लीकेशनस मोबाईलमध्ये टाकून दिले. मग त्यात स्वत:चं प्रोफाईल कसं एडिट करायचं? स्वत:ची माहिती कशी भरायची? चॅट कशी करायची? एखाद्या व्यक्तीसोबत चॅट सुरू करायची झाली तर ती कशी करायची असं बरंच काही शिकवलं. योगिता सगळं अगदी सोप्या भाषेत तात्यांना समजावून सांगत होती. एव्हाना तात्यांच्या कुरापती डोक्यात वेगवेगळे प्लॅन सुरू झाले होते. त्यानुसार भविष्यात काय अडचणी येऊ शकतील याचा अंदाज घेत तात्या योगिताला प्रश्न विचारत होते. खूप मोठ्या खजिन्याची चावी आपल्या हाती लागल्याचा आनंद तात्यांना झाला. त्या दिवसापासून तात्या जे मोबाईलला चिकटले ते चिकटलेच.
तात्यांनी बॉण्ड या नावाने स्वत:चं प्रोफाईल तयार केलं. अगदी कॉलेज कुमार असल्याची सगळी माहिती त्यात भरली. बऱ्याच मैत्रिणी गोळा केल्या फेसबुकवर. अनेकजणींसोबत चॅटिंग सुरू केलं होतं. पण बऱ्याच जणी ऑलरेडी ऐंगेज असल्याचं सांगायच्या. आता त्या किती खरं बोलायच्या हे ज्या त्या मुलीलाच माहिती. मुलगी ऐंगेज म्हणजे आपल्यासाठी एक दरवाजा बंद हे समजून तात्या मग दुसऱ्या सावजाच्या शोधाला सज्ज व्हायचे. हार मानतील ते तात्या कसले…… आणि ते ही बॉण्ड तात्या. अखेर बऱ्याच दिवसां नंतर एक मुलगी त्यांच्या फ्रेंड लिस्ट मध्ये ऍड झाली. जेनी नाव तिचं. नावावरून मॉडर्न वाटली. आत्तापर्यंत अनोळखी मुलींसोबत चॅट करायला तात्या बरेच सरावले होते. बिनचूक सुरूवात आणि अचूक शब्दांचा मारा करीत हवी ती सगळी माहिती तात्यांनी दोनच दिवसात मिळवली. जेनीचं नुकतंच ब्रेकअप झालं होतं हे समजल्यावर तात्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.तिच्या दुखा:त तात्यांना स्वत:साठी एक संधी दिसत होती. तात्यांनी हळूहळू एक एक पत्ते टाकत तिचा विश्वास संपादन केला. स्वत: एक इंजिनियर असल्याचं खोटं सांगितलं. तात्या एक एक पाऊल पुढे टाकत होते. हळूहळू वर वरचं बोलणं संपून त्याची जागा भावनिक साद प्रतिसादांनी घेतली होती. हल्लीच्या मुली किती पटकन पुढच्या माणसावर विश्वास ठेवतात आणि आपली सगळी माहिती देतात याचं तात्यांना आश्चर्य वाटलं. आपल्या काळी मुलीची एवढी माहिती मिळवायला निम्मं आयुष्य खर्ची पडलं असतं. आजकालच्या मुली खरचं इतक्या भोळ्या भाबड्या आहेत की प्रमाणापेक्षा जास्त स्मार्ट? काहीही असो पण तात्या त्या चेहरा नसलेल्या 'जेनी' या नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. जो रोमांच तात्यांना अनुभवायचा होता त्याची सुरूवात झाली.
आता भिती बापाची नाही तर रखुमाईची होती. तात्यांना जेनी कशी दिसत असेल याची उत्सुकता लागली होती. त्यांनी जेनीला तिचा फोटो प्रोफाईलला ठेवायला सांगितलं तर जेनीने घरी आवडत नाही म्हणून टाळलं. मग जेनीने पण तात्यांना त्यांचा फोटो ठेवण्यासाठी सांगितलं. “जोपर्यंत तू तुझा फोटो टाकत नाही तोपर्यंत मी माझा फोटो टाकणार नाही” असं धूर्त उत्तर देऊन स्वत:ची सुटका करून घेतली. आता जवळपास महिना उलटून गेला होता. पार्कने तात्याच्या हसण्याचा आवाज ऐकला नव्हता. कारण सकाळी आल्यापासून तात्या जे मोबाईलमध्ये डोकं घालून चॅटिंग करत बसायचे की सगळी मंडळी निघून गेलेलं सुद्धा कळायचं नाही. तात्या आता खरोखरच स्वत:चं वय विसरून जेनीच्या प्रेमात पडले होते. आता बोलण्याला कसल्याच सीमा उरल्या नव्हत्या. आता रसभरीत श्रॄंगारीक गप्पांमध्ये कसे तासन तास निघून जायचे कळायचंच नाही. जेनीकडूनही तात्यांना अपेक्षीत असा प्रतिसाद मिळत होता. या क्षणाला जरी आपल्याला मरण आलं तरी लगेच आपल्या पिंडाला कावळा शिवेल. सगळ्या इच्छा तॄप्त झाल्या होत्या. पण आता तात्यांना जेनीची ओढ लागली होती. आणि शेवटी तात्यांनी जेनीला भेटायचं ठरवलं. तात्यांनी सगळ्या गोष्टींची सुरूवाती पासूनच काळजी घेतली होती. गावाचं नाव, वय, स्वत:ची माहिती सगळं खोटं सांगितलं होतं. तात्या मुद्दाम फक्त फेसबुक वर चॅट करायचे फोन नंबर दिला नव्हता. यामागे एकच उद्देश की जर का ती मुलगी आवडली नाही किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपल्याला तिचा संबंध तोडायचा म्हटलं तर तो झटक्यात तोडता यावा. आणि त्यानंतर मग आपल्यापर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाही. अगदी आता भेटायची वेळ आली तरी तात्यांनी सांगितलं होतं की जेव्हा आपण एकमेकांना भेटू तेव्हाच फोन नंबर घ्यायचे. तोपर्यंत फेसबुक वरच चॅट करून एकमेकांच्या संपर्कात राहायचं.
पुण्यातल्या एका पार्कमध्ये भेटायचं ठरलं. तारीख वेळ सगळं ठरलं. तात्या त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर तो दिवस उजाडला.
तात्यांची तयारी सकाळ पासूनच सुरू होती. ठेवणीतला एक आवडता शर्ट काढून इस्त्री करून ठेवला होता. रखुमाइला जरा विचित्र वाटलं खरं पण म्हातारचळ असेल म्हणून तिनं दुर्लक्ष केलं. तात्या तयार झाले होते. त्यावर मस्तपैकी मजमुआ अत्तराचा फाया फिरवून कानात लावला. आता घराबाहेर पडणार तोच रखुमाई हातात पिशव्या घेऊन बाहेर आली पिशव्या सोबत एक चिठ्ठी तात्यांच्या हातात दिली आणि “येताना येवढं सामान तेवढं घेऊन या” असं बजावलं. अचानक सामोऱ्या आलेल्या पेचप्रसंगाला घाबरतील ते तात्या कसले. क्षणाचाही विलंब न लावता ते उत्तरले, “एक काम कर. तू पण चल माझ्या सोबत. माझं खूप महत्त्वाचं काम आहे. मी तुला सोडतो, माझं काम करून पोहोचतो तिकडे. आणि जर तुझं लवकर झालं तर रम्याच्या घरी थांब मी येईपर्यंत. आणि हे बघ… ऑलरेडी मला उशीर झालाय. जास्त आवरत बसू नकोस. पटकन उरक.” स्वत:च्या पुढयात आलेल्या गुगली बॉलवर एक लिलया षटकार मारून तात्या निवांतपणे हॉलमध्ये रखुमाईची वाट पाहात थांबले होते. थोडक्यात आटोपून रखुमाई आली होती. दोघेही निघाले. बसमध्ये बसून इच्छित स्थळी दोघेही उतरले. आता रखुमाईची वाट वेगळी झाली होती. शेजारी रखुमाई असल्याने तात्यांनी मुद्दाम मोबाईलचं नेट बंद करून ठेवलं होतं की जेणेकरून मेसेज येऊ नये. रखुमाईची पाठ होताच तात्यांनी नेट सुरू केलं. आता धडाधड मेसेज येत होते. कुठे आहेस? किती वेळ लागेल?
तात्या मेसेज वाचत वाचत तंद्रीत चालले होते. तेवढयात मोबाईलवर काहीतरी पाहण्यात गुंग एक तरूणी दिसली.तिच्या मागून एक भरधाव वेगानं येणारी एक कार तात्यांना दिसली. त्या तरूणीचं याकडे लक्ष नसल्याचं लक्षात येताच तात्यांनी चपळाईनं त्या तरूणीला हाताला धरून बाजूला ओढलं. त्या तरूणीला समजलंच नाही की म्हाताऱ्या माणसानं आपल्याला असं का ओढलं? आणि जेव्हा भोवती जमलेल्या गर्दीकडून तिला समजलं तेव्हा तिचे हातपाय थरथर कापू लागले. तात्यांनी व इतर लोकांनी बराच धीर दिला. एकानं लगेच गार पाण्याची बाटली पुढं केली. गटागटा पाणी प्याली. थोडी स्थिरावली आणि मग सर्वांचे व तात्यांचे आभार मानून ती तरूणी निघून गेली. या सर्व गडबडीत जेनीच्या मेसेजकडे तात्यांचं लक्षच नव्हतं. मोबाईल बाहेर काढून पाहिलं तर जेनीचा मेसेज होता की आपण एकमेकांना कसं ओळखणार? तात्यांना तो पार्क पूर्णपणे माहित होता. त्यांनी त्या पार्कमधली एक जागा तिला सांगितली आणि तिथे थांबायला सांगितलं. आपण एक गुलाबी कलरचा शर्ट घातल्याचं तिला खोटं सांगितलं. उद्देश एकच की ती मुलगी पसंत नाही आली तर लगेच फेसबुक अकाऊंट डिलीट करायचं आणि न भेटताच तिथून निघून यायचं.
पण त्याच बरोबर जेनी कशी दिसत असेल? आपल्याला समोर पाहून काय प्रतिक्रीया असेल तिची? इतके दिवस ज्याला तीशीच्या आतला समजून वाट्टेल तसं बोलत होतो. कोणत्याही मर्यादा न पाळता जे काही बोललो तो माणूस एक साठीच्या पुढचा म्हातारा आहे हे समजल्यावर काय करेल ती? पण मुळात तिनं तरी आपल्याला तिचं खरं वय सांगितलं कशावरून? मुळात आपण जेनी म्हणून इतके दिवस जिच्या सोबत बोलत होतो ती खरंच मुलगी तरी असेल का? की आपल्यासारख्या एका टवाळखोर पोरानं जेनी बनून आपल्यासोबत गप्पा मारल्या? हे विचार एकीकडे सुरू होते तर दुसरीकडे मघाशी त्या तरूणी सोबत घडलेला प्रसंग डोळ्यासमोरून जात नव्हता. तिला वाचविण्यासाठी जेव्हा तिला पकडलं आणि ओढलं, सांत्वनासाठी, धीर देण्यासाठी पाठीवरून हात फिरवताना त्या स्पर्शामध्ये आपल्याला काहीच जाणवलं नाही. ना मला काही वागवं वाटलं ना त्या मुलीला. तिला स्पर्श केला तेव्हा त्याच वासना नव्हतीच. त्यात होतं फक्त वात्सल्य एका बापाचं मुलीवर असतं ते. त्या संवेदनांमध्ये वासनेला थाराच नव्हता. होती फक्त माया. विचारांच्या या धुमश्चक्रीत तात्या मेन गेटवर पोहोचले होते. क्षणभर आत जाणारा रस्ता पाहिला. हा आत जाणारा रस्ता आपलं इतके दिवसांच सुप्त स्वप्न पूर्ण करेल. कदाचीत आपल्या पिंडाला कावळा शिवेलही विलंब न लावता पण माझं हे रूप जर समाजासमोर आलं तर? प्रश्न एकट्या माझ्यावर उठणाऱ्या बोटांचा नाही. तर माझ्या वयावर आणि त्याच बरोबर समस्त सिनीयर सीटीझन्सकडे बघण्याचा दॄष्टिकोन बदलणार असेल तर हे करणं खरचं गरजेचं आहे? माझ्या या असल्या वागण्यानं काय बोध घ्यायचा पुढच्या पिढीन? मुळात कुणी बोध घेण्यासारखं मी काही करतोय का?
एखाद्या गोष्टीचं अप्रुप वाटणं काही चुकीचं नाही. पण ती गोष्ट मिळवण्यासाठी ज्या थराला आपण जाऊन ती मिळवतो हे महत्त्वाचं. आजच्या या इंटरनेटच्या जमान्यात नको ते करता येतं. आजची ही सुधारलेली टेकनॉलॉजी म्हणजे माकडाच्या हातत कोलीत दिल्यासारखंच तर आहे. कोणीही यावं, काहीही लिहावं, कुणाबद्दलही लिहावं, आणि हे सगळं स्वत:ची ओळख लपवून. या इंटरनेटच्या जमान्यात सगळंच आभासी, सगळचं टेंपररी. मिळालेल्या सुखसोयींचा सदुपयोग करण्यापेक्षा त्याचा दुरूपयोग कसा करायचा याकडे बरेचसे जण आकॄष्ठ होतात. मी ही त्याच मोहाचा बळी. नाही…… हे चुकीचं आहे. जेनी कोणीही असो मी नाही भेटणार तिला. पण हो अगदी अर्धवट सोडूनही नाही जाणार. कारण आजच्या पिढीला जीव फार स्वस्त झालाय. कोणत्याही क्षुल्लक कारणा वरून जीव देतात लेकाचे. मी जेनीला माझी खरी ओळख सांगणार, माफी मागेल तिची. मनाशी पक्का निर्धार केला आणि तात्यांनी परतीचा रस्ता पकडला. आता मेन गेट दूर होत चाललं होतं. मोबाईलवर मेसेज आल्याने तात्यांची तंद्री भंगली. जेनीचा मेसेज होता. किती वेळ लागेल म्हणून विचारत होती. तात्यांनी तिला सांगितलं की मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय. थोड्या वेळात बोलतो. आणि रखुमाईला फोन लावून बस स्टॉप वर यायला सांगितलं. दोघेही बसमध्ये बसले. सामानाच्या पिशव्या व्यवस्थीत ठेवल्या. थोडं स्थिर झाल्यावर तात्यांनी मोबाईल काढला आणि जेनीला मेसेज टाईप केला 'प्रिय जेनी, आज भेटायचं ठरवलं होतं. पण काही अपरिहार्य कारणामुळे नाही भेटू शकलो. सॉरी… परत कधी भेटू? माहीत नाही. मुळात परत आपण भेटू का हे देखील माहित नाही. पण एक सांगू … आय ऍम नॉट दी परफेक्ट मॅच फॉर यु डिअर. ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर' तात्यानं मेसेज सेंड केला. आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले. रखुमाईचा फोन वाजला पण रखुमाईचं काही लक्ष नव्हतं. तात्यांनी तिला सांगितलं मोबाईल बघ म्हणून. रखुमाईनं मेसेज वाचला. तात्यांकडे पाहून एक गोड हास्य दिलं आणि खांद्यावर डोकं टेकवतं तात्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाली, “इटस ओके बॉण्ड.”