बालकथा
बालकथा


चला बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सुरभीच्या चष्म्याची गोष्ट सांगणार आहे. सुरभी आई बाबांची एकुलती एक लाडकी मुलगी होती. सुरभीचे आई
बाबा नोकरी करत होते. सुरभी खूपच नटखट होती. आईला कामाची घाई असली की आई तिला टिव्ही,तर कधी मोबाईल द्यायची. तिच्यासोबत खेळायला कोणीही
मित्र मैत्रिणी नसल्याने ती कंटाळून जायची. मग कार्टून
पाहण्यात रमायची. भीम, चुटकी, नोबिता, हातोडी, टॉम आणि जेरीच तिचे मित्र बनले. आईचे काम संपेपर्यंत ती
सतत टिव्ही पाहायची.
कधी मैत्रिणी तिच्यासोबत खेळायला आल्या तरीही ती खेळायला जायची नाही.मोबाईल आणि टीव्हीची तिची सवय वाढत गेली. आई बाबांनी समजावून सांगितले तरी ती ऐकत नसायची. काही
दिवसांनी तिचे डोळे खूप दुखू लागले. डोळ्यातून सारखे पाणी येवू लागले. दवाखान्यात तिच्या डोळ्यांची तपासणी केली.तेंव्हा कळाले की तिच्या डोळ्यांचा नंबर वाढला आणि तिला डाॅक्टरकांकानी चष्मा दिला.
ती चष्मा घालून शाळेत चालली. तेंव्हा मुली तिला
चिडवू लागल्या. छोट्याशा सुरभीच्या नाकावर चष्मा
पाहून सारे तिला हसू लागले. सुरभी उदास होवून
घरी आली. तिने रागात चष्मा काढून जमिनीवर भिरकावला. चष्मा सुरभीचा म्हणाला, अगं बाई माझ्यावर कशाला रागवतेस? तु टिव्ही, मोबाईलवर कार्टून पाहत राहतेस, पण तुच सांग त्या टिव्हीतले
राजू, भीम, चुटकी कधी तुझ्यासारखे टिव्ही पाहत बसतात का? सुरभी म्हणाली ,"नाही,ते तर खूप खेळतात, धम्माल मस्ती करतात".चष्मा म्हणाला, "अगं,
राणी, तू पण टिव्ही, मोबाईल सारख पाहणं सोड".
सुरभी म्हणाली, "टिव्ही नाही पाहीली तर जाईल का डोळ्याचा नंबर?" चष्मा म्हणाला, "हो, नक्कीच पण त्याबरोबर तू गाजर, पपई सारखी नारंगी रंगाची फळं ही खा, मग बघ तुझ्या डोळ्यावरून मी गायब कसा होतो".
सुरभीला चष्म्याचे म्हणणे पटले. चष्मा म्हणाला, "तुझा डोळ्याचा नंबर लवकरच कमी होईल, पण तोपर्यंत तुला
माझा वापर करावा लागेल".
सुरभी म्हणाली, "चालेल, आता मी अजिबात टिव्ही, मोबाईल नाही पाहणार, केशरी रंगाची फळं ही
खाणार. डोळ्यांची काळजी घेवून लवकरच तुला माझ्या
नाकावरुन गायब करणार". चष्मा हसला आणि परत सुरभीच्या नाकावर जाऊन बसला. सुरभी खुशीत मैत्रिणींसोबत खेळायला गेली.