STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

कांता

कांता

6 mins
1.5K


कातरवेळी वार्‍याची मंद झळूक उंबरठ्यावर बसलेल्या कांताची बट हळूवार उडवत होती. सूर्यास्ताला निघालेला अरुण चराचराचा निरोप घेवून आकाशात लाल छटा पसरवून गेला. नयनरम्य देखावा चोहोकडे पसरलेला असताना कांताची नजर मात्र शून्यात हरवलेली होती. 

    "कांता, अगं ये कांता" आई हाक मारत होती पण जणू शब्द हवेत विरुन गेले आणि कांताकडून आईला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. परत आईने हाक मारली, "अग कांता, ये ना पोरी आत,काय करत बसलीस बाहेर, चहा तरी पी ना पोरी". कांता मात्र आपल्याच तंद्रीत होती. "काय झालं या पोरीला, नवी नवरी खूपच गुंग झालेली दिसते. जावईबापूंच्या विचारात पुटपुटत चहाचा कप घेवून आई बाहेर कांताजवळ आली. "अगं कांते, किती हाका मारायच्या बाई तुला, कोणत्या विचारात बुडाली बाई, लग्न होवून एक महिना ही झाला नाही अन् जावईबापूंचा एवढा लळा लागला की काय? काय हा अवतार करुन बसलीस बाई, कुठं गेलं गं बाई माहेरच्या अंगणातलं तुझं खळखळणारं बालीश हसू गं, घे हा चहा. गरम गरम पिऊन टाक.मी आज तुझी आवडती भरली भेंडी बनवते. " एवढे बोलून आई स्वयपाकघराकडे निघून गेली. चहाचा कप थंड पडला तरीही कांता स्वतःमध्येचं

गुंग झालेली होती. 

        एवढ्यात जोराची हाक ऐकू आली, "कांतुडी, अगं ये कांतुडे, कधी आलीस गं माहेरी? एखादा फोनबिन तर करुन सांगायचास की नाही. कसं आहे गं नवरीबाई नवं नवं सासर? आणि अशी काय रोग लागल्यासारखं गप्प गप्प बसून राहीलीस उंबऱ्यावर. थोडा वेळ या मैत्रिणीला पण देत जा बाई. "शुभ्राची आपली एकसलग टकळी चालूच होती. कांता तरीही गप्पच होती. शुभ्राने तिला गदगदून हलवले, तशी कांता भानावर आली. उदास स्वरातच म्हणाली, "काही नाही गं शुभ्रा, तब्बेत थोडी ठीक नाही. " खोडसाळ शुभ्राला एवढं बोलण्याचच निमित्त, ती म्हणाली, "भाऊजींनी खूपच प्रेम उत्तू घालवलेलं दिसतंय, हो ना कांतुडी" तिचे शब्द ऐकताच कांतांचे डोळे भरुन आले. जिवलग सखीने कांतांच्या मनातली चलबिचल ओळखली आणि आपल्या बडबडीला आवर घातला. तितक्यात आईच्या येण्याची चाहूल लागताच कांतांने डोळे पुसले. शुभ्रासाठी चहा घेवून आई बाहेर आली. "शुभ्रा,चहा घे पोरी आणि हे काय गं कांता चहा थंडगार झाला तू का गं नाही प्यायलीस? या पोरीच तर काही कळतच नाही" बडबड करत चहाचा कप घेवून आई घरात गेली. 

     शुभ्राने कांतांचा हात हातात घेत तिला हलक्या आवाजात विचारलं, "काय गं कांतुडी नवरा काही त्रास देतो काय? काय झालं डोळ्यातलं टपकन पाणी भरायला? " कांता म्हणाली, "काही नाही गं"."कांतुडे,तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे बघ, काय झालयं अगदी खरंखुरं सांग मला, आपल्या दोघींमध्ये तिळाएवढी गोष्ट ही लपून ठेवलेली नाही हे तुला चांगलच माहित आहे".कांताने शुभ्राला मिठी मारली आणि हमसुन रडू लागली. डोळे पुसत शुभ्राने तिला शांत केलं आणि कांताला म्हणाली, "हे बघ कांतुडे तू उद्या माझ्या घरी जेवायला ये, आपण सविस्तर बोलू, आता मात्र शांत रहा. काहीही अडचण असू दे मी तुझ्यासोबत आहे हे कधी विसरु नकोस. " इतक्यात आईचा फोन येताच कांताचा निरोप घेवून शुभ्रा घरी परतली. 

      आईने बनवलेली खमंग भेंडीही कांताला आज बेचव लागली. खाण्यावर तिचे लक्ष नाही हे पाहून आई काळजीत पडली. कदाचित तब्बेत ठीक नसेल असे समजून आईने कांताला विश्रांती घ्यायला सांगितली. 

कांता मात्र रात्रभर कुस बदलत सकाळ होण्याची वाट पाहत राहिली. सकाळी तिने आईला शु़भ्राकडे आपण जेवायला जात असल्याचे सांगितले. आईनेही होकार दिला. शुभ्राचा फोन येताच गडबडीने आवरुन कांता शुभ्राच्या घरी पोहोचली. शुभ्राचे आईबाबा मामाकडे गेलेले असल्यामुळे दोघींना आज एकांत मिळाला. शुभ़्राच्या घरी पोहचताच कांताने पुन्हा शुभ्राला घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात हमसून हमसून रडू लागली. शुभ्रानेही तिच्या अश्रुंना ओघळू दिलं. तिचं मन हलकं होवू पर्यत ती रडत राहिली. शुभ्राने तिला आता रोखलं.ती म्हणाली, "अगं,बास कर रडणे, सांग पाहू तुला काय झालं ते आधी. माझा जीव अर्धा अर्धा होत आहे. माझी रणरागिणी अशीकशी रडूबाई झाली. "

      शुभ्रा रागाने म्हणाली, "अगं त्या सत्याने तुला काही त्रास दिला काय सांग, त्याला एका झटक्यात सुतासारखे सरळ करते बघ" कांता म्हणाली "नाही गं शुभू, तो तर देवमाणूस आहे, फुलाप्रमाणे जपतोय गं मला. " "मग सासू-सासरे काही नाटकं करत आहेत का सांग, महिला आयोगाचा इंगा दाखवू त्यांना".रागात शुभ्रा बडबडली. "नाही गं नाही, खूप प्रेमळ आहेत सासू सासरे, नाव ठेवायला जागा नाही. "कांताच्या डोळ्यात सासू सासऱ्याबद्दल कौतूक दिसत होते. "मग कोण उरलं गं तुला रडवणार बाई,तुझं कुटूंब तर इन मिन पाच माणसांचं".शुभ्रा कोड्यात पडली. "अगं पाचवा जो नराधम माझा छोटा दिर रमेश आहे ना, तोच माझ्यासाठी कर्दनकाळ ठरला गं बाई. "पुन्हा कांता रडू लागली. "अगं, तो तर बिना लग्नाचा,चेहऱ्यावरची माशीही उडत नाही. त्याने तुला काय त्रास दिला गं". "अगं तो खूप हरामखो

र निघाला, एकदा सतिश कामावर गेलेला होता, चूलत सासरे खूप सिरीयस असल्याने सासू सासरे बोरगावंला गेले होते. रमेश ही मित्रांसोबत पाकणीला जातो म्हणून गेला होता. मी घरी एकटीच होते. शेतात घर आहे. भावकीची काही घरे ही दुरवर आहेत .त्यामूळे मला सासू सासऱ्यांनी काळजी घेण्याची सुचना दिली होती. मी घरात एकटीच होते. अचानक दुपारी रमेश घरी आला.नवीन असल्याने मला ही थोडं अवघडल्यासारखे वाटले. मी त्याला जेवण विचारावे म्हणून त्याच्या खोलीत गेले तर अचानक तो दाराकडे धावला व त्यांने दार बंद केले. मी घाबरले, त्यांने माझे हात पाय घट्ट धरून ठेवले.मी खूप झटपट केली पण माझी ताकद त्यापुढे निभाव धरू नाही शकली. त्याने टेपवरच्या गाण्यांचा आवाज मोठा केला. माझा आवाज बाहेर ऐकू जावू नये म्हणून माझे तोंड दाबले. या अनपेक्षित प्रसंगाने मी चक्कर येवून जागीच पडले. नंतर जेंव्हा शुद्ध आली तेंव्हा पाहिलं तो माझ्या तोंडावर पाण्याचे हबके मारत होता. मी हडबडून उठून बसले तेंव्हा माझ्या लक्षात आले की त्याने बेशुद्ध अवस्थेत माझ्यावर बलात्कार साधून घेतला होता. ही गोष्ट कुणालाही सांगायचं नाही म्हणून तो मला धमकवू लागला. तो परत बाहेर निघून गेला. काय करावं हे मला काहीच कळेना. मला माझा नवरा, सासू सासरे हरवायचे नव्हते. पण मरणापेक्षाही असह्य ही वेदना सहनशक्तीच्या पलीकडे होती. मी स्वतःला कसंबसं सावरलं आणि नवर्‍याची वाट पाहू लागले. नवरा, सासू सासरे घरी परतले. रमेश मात्र कामाचं निमित्त सांगून घराबाहेर राहिला. मी मात्र चेहर्‍यावरची उदासी लपवू शकले नाही. माझ्या अंगाची मला घृणा वाटू लागली. त्यांना वाटले मला बहूतेक ते सर्वजण घरी नसल्याने करमत नसावे. माझी उदासी तशीच राहिली.माहेरची आठवण येत असावी असा विचार करून लवकरचा मुहुर्त काढून त्यांनी मला माहेरी पोहोच केलं. त्या घटनेनंतर रमेश जास्तीत जास्त घराबाहेरच राहू लागलाय. तूच सांग शुभे आई वडीलांनी परिस्थिती नसताना थाटामाटात लग्न लावून दिलं. नवरा, सासू सासरे मनाजोगे मिळालेत पण या नराधमाचे कृत्य कळाले की सासर माहेर उध्वस्त होईल मी काय करु गं? मला तर मरुन जावं वाटतंय, कुणालाच माझा त्रास नको? तूच सांग मी काय करु गं, असं कसं विपरीत घडलं माझ्याबरोबर? "कांताचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. 

     शुभ्रा म्हणाली "रडू नकोस, यात तुझा काहीही दोष नाही, ही गोष्ट तू कुणालाच सांगू नकोस. आपण कुणालाही न कळू देता त्या नराधमाला धडा शिकवू"

तिने सर्व आयडिया कांताला सांगितली. या कामात तिच्या विश्वासू मैत्रिणींची मदत घेण्याचे ठरले. कांतांच्या मनाचा भार थोडा हलका झाला. न जेवताही पोट भरल्यासारखे वाटले. बळजबरीने चार घास कांताला खाऊ घालून शुभ्राने तिला घरी सोडले. 

        ठरल्याप्रमाणे रमेश एकटा शेताच्या रस्त्यावर कधी असतो ही माहिती तिथल्या एका मैत्रिणीकडुन मिळवली. कराटे पट्टू मैत्रिणींना घेवून रमेश ज्यावेळी एकटा रस्त्यावर होता तेंव्हा शुभ्रा तिथे पोहोचली. जाड काठ्यांनी अचानक बेसावध रमेशवर मुलींनी हल्ला चढवला व फोटो काढले. तो जखमी झाला. गयावया करू लागला. दूरपर्यंत रस्त्यावर कुणीही नव्हते. लाथांचा मारा करत शुभ्रा म्हणाली "खूप मस्ती आहे ना तुझ्यात, तुला वहीणीचं नातंही कळतं नाही. थांब तुझा सगळा माज उतरवते." रमेश गयावया करु लागला. मला माफ करा पुन्हा चूकुनही वहिणीवर वाकडी नजर ठेवणार नाही.खूप मोठी चूक झाली. बहिणीप्रमाणेच मानून वहिणीचा मान राखेन. मी वासनेच्या आहारी जावून असे वागलो. नंतर मला माझीच लाज वाटली. मला एक संधी द्या".शुभ्रा म्हणाली, "हे बघ गिधाडा,परत असलं काम करशील तर हा व्हिडिओ युट्यूबवर सोडू, तुला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. " रमेश शुभ्राचे पाय पकडून गयावया करू लागला. माफी मागू लागला. तिने त्याला खडसावून सांगितले की, "माफी मागायची असेल तर कांताची माग, माझी नको. "

       रमेश खूप खजील झाला.तो तात्काळ कांताच्या घरी पोहोचला. आईने त्याचा आदरसत्कार केला. आई जेवण बनवायला आत गेली. कांता बाहेरच्या खोलीत एकटीच होती. रमेशने तिचे पाय पकडून माफी मागितली. पुन्हा असे वागणार नसल्याची ग्वाही दिली.  जे घडलं ते वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जाण्याची विनंती केली. पुन्हा कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणार नाही असा शब्द दिला. 

    शुभ्रानेही कांताची समजूत काढली. कांतानेही 

झालेली गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले. तिला देवासम सासू सासरे, नवरा गमवायचा नव्हता. आज भले ही एक न पचणारे सत्य लपवून पुन्हा नव्याने संसाराची सुरुवात करणार होती. तिचा खरोखरचं काही गुन्हा नव्हता आणि अशा अपराधाची शिक्षा सासर माहेरांतील लोकांनी सहन करून नाती दुभंगण्यापेक्षा परिस्थितीवर मैत्रिणीच्या मदतीने नियंत्रण आणून संसार वाचवणे हे तिला अधिक महत्त्वाचे वाटले. हेही तितकंच खरं होतं की यात फक्त मनाच्या कोपर्‍यात मरेपर्यंत बोचणारं चारित्र्याचं अनपेक्षित बलिदान राहणार होतं!!!!!!



Rate this content
Log in