अश्वत्थामा
अश्वत्थामा
सहजच त्या दिवशी नदी काठावर फिरायला गेलो आणि दगडाला टेकून बसलो जिथून सहज पाण्यात पाय ओले होतील असे. पाण्यातील लहान लहान मासोळ्यांचे थवे पायाभोवती जमा होत आणि परतून जात. असे वाटे यांना काय वाटत असेल यांचेही जिवन असेच चिंताग्रस्त आहे काय जसे आज माझे आहे आणि मन विचार चक्रांच्या आऱ्यांमधून वर्तमानकाळ
ते भुतकाळ असे फिरत होते.
लहानपणी असं वाटायचं लवकर मोठ व्हावं आई वडीलांच्या खांद्यावरील ओझं आपल्या खांद्यावर घ्यावं. पण जेव्हा नियतीने खरंच मोठं केलं तेव्हा असं वाटू लागलं माणसाच्या आयुष्याला खरचं काही ध्येय नाही.
माणूस जगतो फक्त त्या समाजासाठी ज्याची निर्मिती त्याने स्वतःच्या सोयीसाठी केली. आज तोच समाज तिच माणसं फक्त एक डोक्यावरील लटकत्या तलवारीची भूमिका बजावत आहेत आणि अचानक मला माझ्या खांद्यावर स्पर्शाची जाणीव झाली पाहतो काय तर विशाल
" अरे केव्हा आलास ",
" बस आताच आलो भावा, तू का असा एकांतात बसला ",
" काय सांगू मित्रा जिवनाची खूप फरफट चालली रे काहीच कळतं काय करावं, कुठं जावं ",
" तुझे तर क्लास चालू होते ना अकोल्याले ",
" हो गड्या पण काय आता सार भर्ती निघाण्यावर आहे त्यात जागा निघतात दहा हजार फॉर्म येतात. एक लाख त्यात upsc , mpsc ,
d ed , be , me वाले आणि आपण त्यात आर्टस वाले ",
समदुःखी दोघही होतो त्याच्या काळजाची सल माझ्या काळजाची एक तोही सुशिक्षित बेरोजगार आणि मीही. तेवढं नदीकाठावर आलं की बरं वाटायचं नाही तर मग घरी गेलं की वावरातुन कष्ट करून येणारा बाप माय त्यांची सारी हयात माझ्या सुखासाठी भविष्यासाठी राबण्यात गेली अन् अजूनही तेच चालू आहे हे सारं पाहून मन हेलावून जाते कधी कधी तर
असं वाटे बापाच्या उराशी बिलगुन मनसोक्त रडावं अन् सांगावं बाबा नका करू हो एवढे कष्ट. एका पराजित योद्ध्यासाठी तो तुमच्या कष्टांना पराजयाशिवाय काहीच देऊ शकत नाही. कधी कधी अस वाटते शिकलो नसतो तर बर झालं असत. कमी कमी शेतातील काम तरी केली असती ,
अश्या अतिवृष्टीसारख्या विचारांच्या सरी येतात आणि मन गुदमरून जाते.
भर तारूण्यात आलेल्या नैराश्येचा काही थांग लागतच नाही.
" योगेश असा तू बोलता बोलता गप्प का झालास कुठं हरवला ,
आपण एकाच वाटेचे वाटसरू सुखदुःख लोकांच डिवचण हे आपल्या सुशिक्षितांच्या पाचवीलाच पुजल आहे."
" नाही विशाल आपण शिक्षणामुळे पंगू झालोय, आपलं समाजशास्त्र, अर्थशास्त्र ओव्या अभंग कुठं उपयोग आहे या गोष्टींचा खरं तर आपली शिक्षणपध्दती ही नपुंसक आहे "
" खरं आहे मित्रा जोपर्यंत आपली शिक्षण पध्दती बदलणार नाही तो पर्यंत हा बेरोजगारीचा आलेख असाच चढत राहील आणि याचा उपयोग फक्त राजकीय लोक त्यांच्या फायद्यासाठी करून घेतात ",
" तो सातवीत शाळा सोडलेला ईश्वर नाही काय तो टपरीवर खर्रा खात होता तर त्यान आवाज दिला काबे म्हणे तुमी एवढे शिकले काय फायदा झाला बे त्याचा निरा मायबाच्या भरोश्यावर खाता लेकहो निरा भाकरीले भार त्याच्याशी काय बोलाव हेच कळत नव्हत मला तर ",
" काल गड्या मी बँकेत गेलो होतो ",
" कश्याला "
" अरे म्हटलं बघाव काई कर्ज मिळते काय एखाद्या व्यवसायाकरता तर बँके वाले म्हणत की आम्ही नव व्यवसायिकांना कर्ज देत नाही ",
" एवढ्या योजना निघतात मेक ईन ईंडिया पठो ईंडीया खेलो ईंडिया मग हे ",
" हे सारी फसवणूक आहे आपली या योजना कागदावर जन्म घेतात आणि कचरा कुंडीत गाळल्या जातात ",
आजचा तरूण हा सेना नसलेल्या सैन्यांचा सेनापती आहे त्या अश्वत्थामा सारखा ...
ज्याच्या सुशिक्षितपणाचा अजेय मणि काढला आहे बेकारीने मग फिरतो तो नशेच्या रानावनात अपयशाच्या दुर्गंधीतून स्वतःची सुटका करायला ......
तो दारोदार फिरतो आहे
कंपन्यांच्या त्या जखमांत
तेल टाकायला पण
तिथही त्याची निराशाच होते .....
आजचा प्रत्येक तरूण
जन्मत आहे अश्वत्थाम्याचे
भाग्य घेऊन
जसा मी .....