अरेंज मॅरेज
अरेंज मॅरेज


आज निशा खूप खुश होती. त्याला कारणही तसंच होतं, तिचं लग्न ठरलं होतं. तिचं वय काही खूप नव्हतं पण लग्नायोग्य नक्कीच होतं. तिला बघायला आलेला मुलगा सुयश. उत्तम देखणा अगदी तिला शोभेल असा.. त्यामुळे मॅडम जास्तच खुश. घरच्यांच्या पसंतीससुद्धा सुयश होता. खास करून निशाच्या भावाच्या आणि तिला तेच हवे होते.
आज निशाला अगदी 'आज मै उपर' असं काहीसं झालेलं. निशा अत्यंत बोलकी, मनमिळाऊ, सुस्वभावी. बोलकेपणाने तिने सर्वांना आपलेसे करून घेतलेले. याविरुद्ध सुयश शांत मोजकेच बोलणारा.
सर्वांच्या भेटीने ह्यांच्या लग्नाची तारीख निघाली. ती तर काय हवेतच. मनात खूप प्लॅनिंग करून ठेवलेलं. आता आपण भेटू तेव्हा हे करायचं ते करायचं असे कपडे घालायचे वगैरे वगैरे. त्याच्या फोनची तर ती आतुरतेने वाट बघायची. पण खूप कमी वेळा असं व्हायचं तो तिला फोन करायचा. त्याचं ऑफिस न शांत स्वभाव ह्यामुळे त्याला बोलायला आवडायचं नाही.
निशा पण कधी स्वतःहून फोन करायची नाही. तिला मुळात ते आवडायचं नाही. ती म्हणायची तो कधी बिझी असेल कधी काय कामात असेल माहीत नाही त्याला वेळ मिळाला की येईल फोन. फोन नाही आला की हिरमुसुन जायची. पण कोणाला दाखवायची नाही. सगळ्यांमध्ये खुश राहायची. जास्तीत जास्त वेळ भावासोबत न वडिलांसोबत घालवायची.
आता त्यांचा साखरपुडा झाला. आता तर स्वारी एकदम खुश. हा मात्र तेवढ्यापुरतच बोलायचा. हिच्या मनात कधी कधी नको नको ते विचार यायचे. ह्याला आपण आवडलो नसेल का? ह्याचा मनात दुसरी कोणी असेल का? पण सगळे विचार ठेवायची बाजूला आणि लागायची कामाला.. कधी कधी विचारायची त्याला तू असा का वागतोस? का बोलत नाहीस, तुला लग्न नाही करायचं का? सर्व प्रश्नांवर ह्याच एकच उत्तर, थोडा वेळ जाऊ दे लग्न झालं की होईल गं नीट. मला फोनवर बोलण्यापेक्षा सोबत राहायला जास्त आवडते.
४ महिन्यात फक्त एक दोन वेळा त्य
ांची भेट झाली असेल तीसुद्धा घरचे सोबत असताना. एकदाच फक्त ती दोघेच भेटलेले त्यादिवशी तर तिला काय करू न काय नको असे झालेले. तो पण खुश होता तिला मस्त खरेदी करून दिली सगळं त्यादिवशी तिच्याच आवडीचं. तिलापण ते आवडत होत.
हळूहळू लग्नाची तारीख जवळ येत होती. ती मनातून कासावीस होत होती. एकीकडे नवीन घर मिळणार, नवा संसार सुरू होणार ह्याचा आनंद तर दुसरीकडे प्रत्येक मुलीच्या मनात असलेली आई वडिलांना सोडून जाण्याची घालमेल. खास करुन भावाला. तिचा तिच्या भावात खूप जीव न वाहिनीमध्येसुद्धा तेवढाच दोघी बहिणीप्रमाणे राहायच्या.
लग्नाचा दिवस उजाडला. आज त्यांचे लग्न दोघेपण एकमेकांना शोभेल असे दिसत होते. झालं लग्न. सासरी जाताना तर तिच्याकडे बघवत नव्हते. बोलक्या स्वभावामुळे सगळ्यांची लाडकी होती ती. मामा, मावशी, आत्या अगदी सगळेच. सगळेच रडले पण तिला तिच्या बाबा न दादाशिवाय कोणीच दिसत नव्हते. आईकडे तर ती बघूच शकत नव्हती. आईला बघितलं असतं तर तिचा पाय निघालाच नसता त्याला कारणही तसंच होतं.
तिच्या मनात विचारांचं सत्र सुरूच होतं. हा माझ्याशी नीट वागेल ना आमचा संसार चांगला होईल ना कसं असेल सगळं. सासुबद्दल तर जरापण शंका नव्हती तिच्या मनात. तिला सासू आधीच खूप आवडलेली अगदी तिची दुसरी आईच जणू..
अचानक ती संध्याकाळ उजाडली ज्याचा तिने विचारच नव्हता केला. हा दिवस एवढ्या लवकर येईल आपल्या आयुष्यात अस वाटलंच नव्हतं. काहीतरी कारण काढून सुयश तिला गच्चीत घेऊन गेला. घरात सगळेच होते पण तीसुद्धा गेली. अगदी लाजत होती.
तो तिला अनपेक्षितपणे म्हणाला मला तू आवडायला लागलीयेस मला नाही वाटत मी तुझ्याशिवाय राहू शकेन. तिला हे अपेक्षितच नव्हतं की सगळं एवढ्या लवकर होईल म्हणून खूप खुश झाली. ती अगदी पुन्हा "आज मैं उपर" अशीच परिस्थिती होती... मनातच म्हणाली हीच आहे अरेंज मॅरेज ची गंम्मत...