अनामिक ग्रहाच्या राज्यात...
अनामिक ग्रहाच्या राज्यात...


डॉ. सहस्त्रबुद्धे आणि त्यांचा आवडता विद्यार्थी रँछो बरेच दिवस स्वतःला प्रयोगशाळेत कोंडून बसले होते. नक्कीच एखादा मोठा शोध जगाला मिळणार आहे याची सर्व खगोलमंडळाला खात्री होती पण केव्हा ?? डॉक्टरांची दाढी जमिनीला टेकायला लागल्यावर की उमदा रँछो म्हातारा झाल्यावर ?? दोघे कधी छतावर दुर्बिण घेऊन बसत तर कधी कंप्यूटरवरून काही सिग्नल पाठवायचा प्रयत्न करत. खूप महीने झाले, बाकी सर्वानी तर आशा सोडली पण मंडळाचे प्रमुख डॉ. सानेंना मात्र दोघांवरही पूर्ण विश्वास होता
शेवटी एकदाचे रहस्य संपले आणि डॉक्टर सहस्त्रबुद्धे व रँछो नवीन शोध घेऊन सर्वांसमोर आले. तर शोध होता तंतोतंत पृथ्वीसारख्या ग्रहाचा !! जो पृथ्वीपासून बरोबर किती अंतरावर आहे आणि तिथे जाण्यास किती दिवस लागतील या योग्य अनुमानासोबत !! याचा तर्क रँछोने केलेला आणि डॉ.सहस्त्रबुद्धेंनी त्यावर संशोधन करून ते खरे आहे हे सर्वाना सांगितले. झाले ऐकून बरेच जण आपले हसू दाबायला लागले. रँछोवर पहिल्यापासून मनोमन जळणारा चतुर लगेच बोलला, " सर हे तर अमेरिकन शास्त्रज्ञ पण सांगत आले आहेत आणि आणि एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपल्या सूर्यमालेतच मंगळ ग्रहावर पृथ्वीसारखे पाण्याचे साठे आहेत मग नवीन काय त्यात ??" यावर रँछो लगेच उत्तरला, " शास्त्रज्ञ इतके वर्ष फक्त तर्कच करत आहेत पण आम्ही संपूर्ण अभ्यास करूनच हे तुम्हाला खात्रीने सांगत आहोत. विचार करा तंतोतत पृथ्वीसारखा ग्रह सापडलाय आमच्या अनुमानानुसार तिथे अजुन मनुष्य जन्म नाही झालाय. मग आपण त्या ग्रहावरची नैसर्गिक संपत्ती इथे आणू शकतो किंवा काही वर्षांनी पृथ्वीवरील गर्दीही कमी करू शकतो !!" चतुरला अजूनही वाद घालायचा होता पण डॉ. सानेंनी त्याला अडवून डॉ. सहस्त्रबुद्धेंना "पुढे काय ?" असे विचारले. सानेंनी हिरवा सिग्नल दिलाय हे सहस्त्रबुद्धेंनी ओळखले आणि स्मितहास्य करत ते म्हटले." सर आता पुढे मला आणि रँछोला अंतराळ वारी करायचीये आणि त्या ग्रहावर जाऊन आम्हा दोघांचा सेल्फी घ्यायचाय. तुमची मदत लागेल." साने थोडे गंभीर झाले आणि सहस्त्रबुद्धेंना म्हणाले, " तुम्हाला माहीत आहे ना आपल्या मंडळाचा नियम ? तर्क बरोबर असेल तर त्या ग्रहाला आपण 'सहस्त्ररँछो' नाव देऊ पण चुकीचा निघाला तर खगोल संशोधन कायमचे बंद करावे लागेल. मुख्यतः रँछो तुझी तर अजुन सुरुवात आहे नीट विचार कर."
" सर मला सहस्त्रबुद्धे सरांनी सर्व कल्पना आधीच दिलेली आहे मी तयार आहे या अटीला." रँछो आत्मविश्वासाने म्हणाला.
" ठीक आहे मी सरकारशी बोलतो." साने तयारीला लागले. त्यानी सर्व सरकारी हस्तिंना या अनोख्या शोधाबद्दल सांगितले आणि त्यासाठी किती दिवस अंतराळ यात्रा किती खर्च वगैरे सर्व व्यवस्थापन त्यांनी केले. पण सर्व काही मनासारखे थोडे होते. एक सरकारी अधिकारी हट्टालाच पेटला. त्याचा या संशोधनावर विश्वास बसेना. तो म्हणाला या संशोधनात काहीही काम न केलेली एक व्यक्तिदेखील या दोघांसोबत जाईल. इतरही काही जणांना ही गोष्ट पटली. शेवटी काही परीक्षा घेऊन सहस्त्रबुद्धे आणि रँछो सोबत जाण्यास व्यक्ती निवडायचे ठरले. रट्टा मारून पास होणारा चतुर सगळ्या परीक्षा पास झाला आणि या दोघांसोबत अंतराळात जाण्यास निघाला. जाण्याचा दिवस ठरला. आदल्या रात्री रँछो फरहान आणि राजू सोबत concall वर गप्पा मारत बसला.
फरहान : यार रँछो मला पण घेऊन चल ना त्या ग्रहावर
रँछो : अरे तू नीट इंजीनियरिंग पण नाही केलंस तिकडे काय माकडांसोबत सेल्फी घेशील
फरहान : अरे माकडा सोबत नाही रे. तू म्हणतोयस तिकडे अजुन माणसं नाही मग डायनासोर वगैरे असतील ना. तुम्ही ग्रहाचे संशोधन करत बसा मी माझी जंगल फोटोग्राफी करत बसेन.
राजू : अरे साल्या फरहान तो डायनासोर त्याच्या शेपटीने मारून तुला तुझ्या कॅमरासकट परत पृथ्वीवर पाठवेल. हा हा हा
रँछो : हा हा हा हे मित्रांनो थांबा प्रियाचा फोन येतोय.
राजू: अरे तिला पण घे ना conference मध्ये
रँछो : ओके. हा प्रिया बोल मी राजू आणि फरहानसोबत बोलतोय
प्रिया: रँछो तू नवीन ग्रहावर जाणारेस ना ?
रँछो : हो ग राणी..
प्रिया: तुला नवीन ग्रहावर एखादी मुलगी आवडणार तर नाही ना ..
राजू : हा हा हा अग प्रिया तुझे पप्पा आणि तुझा प्रियकर दोघांच असं म्हणणं आहे की तिथे अजुन मनुष्य नाहीये.
प्रिया: हुश्श् मग ठीक आहे
फरहान : हो पण या रँछोला एखादी डायनोसोरिन आवडली तर तेरा पत्ता कट हा प्रिया
रँछो : साल्या फरहान तू डायनोसोरवरच अडकलायस का अजुन. प्रिया हाच लाइन मारेल त्या डायनोसोरवर म्हणून मी याला नाही नेते.
सर्वच जण जोरात हसले. रँछोला शुभेच्छा देऊन सगळे झोपले.
दुसऱ्या दिवशी त्या त्रयींची अंतराळवारी सुरु झाली. चतुर तर रँछोच्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही चुका काढायचे काम मनोभावे करत होता. डॉ. सहस्त्रबुद्धे आणि रँछोने सांगितलेल्या वेळेनुसार आणि सांगितलेल्या दिशेनुसार हे तिघे त्यांनी अनुमान केलेल्या ग्रहावर पोहोचलेसुद्धा !! चतुरचा फारच हिरमोड झाला.
तिघांनी आपलं यान डोंगराच्या पायथ्याशी उतरवलं. अहाहा काय दृश्य होतं. तंतोतंत दुसरी पृथ्वीच !! ना ऑक्सिजन ना गुरुत्वाकर्षणाची कमतरता. सगळीकडे सुंदर सुंदर हिरवी झाडं, झरे, नद्या, पक्षी, प्राणी पण मानवप्राणी ?? तो कुठेच दिसत नव्हता. कदाचित त्यामुळेच तिथे कचरा प्रदूषण काहीही दिसत नव्हते.
डॉक्टरांनी आणि रँछोने तर पटापट सेल्फी घेण्यास सुरुवात केली. आपलं संशोधन यशस्वी झालंय हे पाहून दोघेही मनोमन आनंदले. चतुरही थोडा त्या निसर्गात हरखुन गेला आणि एकटाच जंगलात फिरु लागला. " अरे चतुर इथले प्राणी कसे आहेत माहीत नाही आपल्याला एकटाच नको जाऊस." रँछोचे हे शब्द त्याच्या कानावर पडण्यात आणि त्याचा पाय एके ठिकाणी पडण्यास एकच वेळ झाली. "आआआआSSSSSSS" अशी जोरात किंकाळी ऐकू आली. परक्या ग्रहावर संरक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन रँछो आणि सहस्त्रबुद्धे धावतच आवाजाच्या दिशेने गेले आणि समोरील दृष्य बघून त्यांना हसू आवरेना. चतुर झाडाला उलटा लटकलेला. "अरे रँछो मला सोड हसत काय बसलायस.." चतुर रागाने बोलला. " हो हो सोडतो . इकडे एकदम गर्द झाडी आणि वेली आहेत. पाय खूप जपून टाकावे लागतील नाहीतर मी पण उलटा होइन तुझ्यासारखा " रँछो त्याला सोडवताना म्हणाला. डॉ. सहस्त्रबुद्धे मात्र गंभीर झाले. " रँछो आपल्या इथे पृथ्वीवर शिकार पकडताना जसा सापळा लावतात तसा सापळा वाटतोय का रे हा ??" त्यानी शंका व्यक्त केली." सर अजुनतरी आपल्याला इथे मानवाचा मागमुस नाही दिसलाय मग हा सापळा कोण बांधेल ?" रँछोला हा फक्त वेली आणि फांद्यांचा गुंता वाटत होता. आता दोघांनाही या ग्रहाचा पृथ्वीवासियांना कसा फायदा होईल यासाठी संशोधन करायचे होते. त्यासाठी खनिजांचे, पेट्रोलसारख्या द्रव्यांचे साठे कुठे कुठे असतील हे शोधायचे होते. दोघेही कामाला लागले. चतुरचं अशा कामात कधीच डोकं चालत नसे म्हणून तो इकडे तिकडे फिरत बसला. त्याला डॉक्टरांनी खाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले तसा तो परत घाबरत घाबरत जंगलाच्या दिशेने चालू लागला. जसजसा तो जवळ आला तसं एक झाड खूप हलतंय याची जाणीव त्याला झाली. एखादा प्राणी असेल म्हणून तो हातात बंदूक घेऊन उभा राहिला. झाड जसजसं मागे जाऊ लागलं तसा चतुर घाबरून रँछो आणि सहस्त्रबुद्धेंच्या दिशेने धावत सुटला आणि ओरडतच म्हणाला. "सर ह्या ग्रहावर चालणारी झाड आहेत. मगाशी पण त्यांनीच मला पकडलेल बहुतेक."
" अरे चतुर हा ग्रह पृथ्वीची कॉपी आहे इथे चालणारी झाडं कशी असतील? तुला भास झाला असेल." रँछोने चतुरला समजवलं पण तो अडुनअडून बसला. शेवटी ते तिघे त्या झाडाच्या दिशेने गेले. ते झाड आता चतुरने सांगितलेल्या जागी नव्हते !! अंधार खूप झालेला त्यामुळे ते तिघे मोकळ्या जागी आले. रँछोने प्रकाशासाठी शेकोटी पेटवली. जंगल एकदम शांत भयाण वाटत होते. छान गारव्यामुळे तिघांना आपापल्या तंबूत शांत झोप लागली. मध्यरात्री फांद्यांचा आवाज खूप येऊ लागला म्हणून रँछोला जाग आली. बाहेर येऊन पाहतो तो काय एक झाड शेकोटीभोवती उभं होतं. रँछोने थोडं जवळ येऊन पाहिलं तर काय खोडाच्या वर माणसासारखा चेहरा !! हाताना अनेक फांद्या आणि संपूर्ण शरीराला खोडाची जाड साल त्यामुळे तो माणूस झाडासारखा दिसतोय हे रँछोने लगेच ओळखल. Oh my god !! म्हणजे या ग्रहावर मानव प्राणी आहे !! पण कितपत प्रगत. असे किती आहेत. कुठे आहेत?? रँछो हा विचार करत असताना तो झाडाच्या वेषातला माणूस मात्र कुतुहलतेने शेकोटीकडे बघत होता. त्याच्या प्रकाशात दिसणाऱ्या वस्तू निरखत होता. अच्छा म्हणजे या आदिमानवाला अजून आग माहीत नाही होय !! रँछो मनोमन हसला. तो त्या माणसाच्या अजून जवळ जाणार तोच त्याच्या चाहूलीने तो माणूस धूम पळत सुटला आणि जंगलात गुडूप झाला.
सकाळी उठल्यावर रँछोने डॉ. सहस्त्रबुद्धेंना ही गोष्ट सांगितली. डॉक्टर गंभीरतेने म्हणाले " हम्म मला शंका वाटतच होती. चतुरसोबत ज्या घटना झाल्या त्यामुळेच. म्हणजे इथे मानवाचे अस्तित्व आहे, पण अजून त्याला आग माहीत नाही पण तो झाडाच्या फांद्या साली वापरून त्याचे कपडे घालतोय म्हणजे त्याची प्रगती चालू आहे,. एक सांगू रँछो मग आपला या ग्रहावरच्या नैसर्गिक संपत्तिवर काहीच अधिकार नाही आपण इथून निघून गेलं पाहिजे." पण सर संशोधन अर्धवट टाकून जायच?" रँछोने असं म्हणाल्यावर डॉक्टर स्मित हास्य करत त्याला म्हणाले " रँछो मला खात्री आहे तू इतर कुठल्याही क्षेत्रात नाव कमवशील." डॉक्टरांच्या म्हणण्याचा रोख रँछोला समजला तो विचार करत म्हटला." सर पण मला इथे थोडे दिवस राहायचंय."
" Don't tell me rancchho तुला प्रसिद्धी आणि पैसे मिळवायला इथे थांबायचंय !!" सहस्त्रबुद्धे थोडे रागानेच बोलले.
"नाही सर या क्षेत्रात काय कोणत्याही क्षेत्रात मी पैसा वा प्रसिद्धीसाठी काम नाही करणार. पण मला इथे थांबून एक प्रयोग करायचाय. अर्थात तुम्ही परवानगी देणार असाल तरच." रँछोच्या डोळ्यातली चमक पाहून डॉक्टरांनी त्याची योजना अगदी लक्षपूर्वक ऐकली. ते नंतर एवढंच म्हणाले, " रँछो तू मला नेहमीच न मागता गुरुदक्षिणा दिली आहेस. I am proud of you my boy ..!!"
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच रँछो आपल्या कामाला लागला. हा इसम सकाळी लवकर जाऊन रात्री उशिरापर्यंत नक्की करतोय काय याचा चतुरलाही प्रश्न पडला. पण सानेंनी त्याला संशोधनात मध्ये लुडबुड नाही करायची अशी सक्त ताकीद दिलेली त्यामुळे तो शांत बसला. डॉक्टरही या ग्रहावर खनिज तेल, धातू व इतर नैसर्गिक संपत्तीचा साठा कुठे कुठे असेल याचे संशोधन करत बसलेले. बरेच दिवस गेले. पृथ्वीशी इथे काहीच संपर्क होत नव्हता त्यामुळे हे तिघे परत आल्यावरच हे संशोधन खरे की खोटे हे पृथ्वीवासियांना समजणार होते.
आधीच्या घटनांमुळे चतुर जंगलात जायला घाबरत होता पण एकदा जेवणाची व्यवस्था बघायला तो त्याच्या नकळत बराच आतवर गेला आणि पाहतो तो काय रँछो १० - १५ माणसांना शेती कशी करावी शिकवत होता. तिथेच बाजूला काही मध्यमवयीन मुले मेंढीचे लोकर काढून कपडे बनवत होते. काही स्त्रिया कापसापासून कपडे बनवत होत्या. लहान मुले पाटीवर अक्षरे गिरवत होते. काही पुरुष मातीपासून भांडी बनवत होते. आपल्याला इतके दिवस तर इथे एकही माणूस दिसला नव्हता मग एवढी माणसं कधी आली की पृथ्वीवरून मागवली या रँछोने ?? चतुर एकदम गोंधळात पडला. तो धावत सहस्त्रबुद्धेंकडे गेला आणि त्याने पाहिलेली सगळी हकीकत सांगितली. डॉक्टर शांतपणे म्हणाले, " माहीत आहे मला सगळं. चतुर तू जी हलणारी झाडं पाहिलीस ती हीच. रँछोला जेव्हा कळलं की इथे मनुष्य वस्तीही आहे तेव्हा त्याने एक प्रयोग करायचे ठरवले. आपण इतिहासात जसे आदिमानवाची आग शोधापासून प्रगती वाचत आलो आणि त्याला त्यासाठी खूप वर्ष लागले हेही आपल्याला माहीत आहे. रँछो तो इतिहास इकडे जगला. पृथ्वीवरचा माणूस स्वतः सर्व शिकला. या ग्रहावरच्या माणसाला एका दुसऱ्या ग्रहावरच्या माणसाने हे पटापट शिकवले आणि त्यानेही ते लवकर आत्मसात केले. आग / भाषा हे काहीही माहीत नसलेल्या लोकांना रँछोने स्वतः आधी त्यांना विश्वासात घेऊन खाणाखुणा करून सर्व शिकवले. उद्या मी त्याना इथे नैसर्गिक संपत्ती कुठे आहे आणि ती कशी वापरायची हे सांगणार. "
" पण सर रँछो तर म्हणत होता आपण या ग्रहाची संपत्ती पृथ्वीवर नेऊ शकतो किंवा तिकडची गर्दी इथे पाठवून कमी करू शकतो. आता हाच त्यांच्यासोबत दोस्ती करून बसला. या लोकांना नैसर्गिक संपत्तीचा मोह झाला तर ते आपल्याला कसे वापरु देतील ? आपण खरंतर युद्ध करून या ग्रहावर आपली सत्ता ठेवली असती. मग असं का केलं रँछोने ??" चतुर रँछो किती चुकीचा वागला हे डॉक्टरांना पटवून सांगू लागला.
डॉक्टर त्याला फक्त एवढंच म्हणाले, " उद्या तुला याचे उत्तर मिळेल आणि हो परवा आपल्याला इथून पृथ्वीकडे कूच करायचंय तेव्हा तयारीला लाग."
चतुरला तसचं गोंधळलेलं ठेऊन डॉक्टर आपल्या कामाला लागले. त्या रात्री रँछोला त्यानी त्या ग्रहावर कुठे कुठे खाणी बनवता येतील याची माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी रँछो त्या दोघांना घेऊन मनुष्य वस्तीत गेला. रँछोने शिकवलेली भाषा त्यांना चांगली अवगत झालेली. रँछोने त्यांच्या म्होरक्याला खाणीचे नकाशे दिले. सर्वांना गोळा करून आपण उद्या इथून जाणार आहोत हे त्याने सांगितले. सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले.
रँछोने त्यांना नैसर्गिक संपत्तीबद्दल माहिती दिली. तिचा वापर कसा किती प्रमाणात करावा हेही सांगितले. शिवाय पृथ्वी या ग्रहावर या गोष्टीमुळे किती फायदे आणि किती तोटे झाले आहेत हे सर्व सांगितले. सध्या या गोष्टीमुळे अनेक देश युद्ध करत आहेत हे ऐकून तर सर्वजण अवाकच झाले. काही वयस्कर मंडळी तर ही बला नकोच असे सांगू लागले. पण रँछोने व्यवस्थित समजून सांगितल्यावर ते शांत झाले. मात्र हे सर्व पाहून चतुर एकदम सैरभैर झाला.
तिघांच्या जाण्याचा दिवस उजाडला. सर्वजण त्यांना निरोप देण्यास आले. म्होरक्याने तिकडे सर्वांना ओरडून सांगितले की आजपासून या ग्रहाचे नाव 'सहस्त्ररँछो' असे ठेवण्यात येईल. सर्वांनीच त्याला दुजोरा दिला.
त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला तसे चतुरने लगेच रँछोला प्रश्न केला, " रँछो हे काय करून बसलास तू ?? तू यांना शिकवलेस, प्रगतीशील केलेस पण काय फायदा ? पृथ्वीवर या संशोधनाबद्दल सांगितले की अनेक देश युद्धाच्या तयारीनेच इथे येतील. हे लोक एवढे प्रगत पण नाहीयेत की युद्धाला प्रत्युत्तर देतील."
रँछो कसनुस हसला आणि फक्त एवढंच म्हणाला, " चतुर आज तुला तुझ्या आवडीचे काम देणारे मी !! पृथ्वीवर जाऊन सर्वाना ओरडून सांग की रँछो fail झाला. त्याचे संशोधन चुकीचे ठरले आणि सहस्त्ररँछोला दूसरी पृथ्वी बनण्यापासून वाचव प्लीज."
आयुष्यात पहिल्यांदा चतुरने रँछोचे म्हणणे ऐकले पण तो सुद्धा गहिवरला होता..!!