santosh bongale

Inspirational

2  

santosh bongale

Inspirational

अखंड प्रेरणांचा दीपस्तंभ सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा एक ध्येयवेडा प्रवास

अखंड प्रेरणांचा दीपस्तंभ सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा एक ध्येयवेडा प्रवास

5 mins
229


मराठी साहित्य परंपरेमध्ये संत वाड्मयापासून आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे. पण आजच्या साहित्यात विविध क्षेत्रातील आत्मचरित्रपर लेखन हे विविधांगी झालेले दिसून येते. आत्मचरित्रामध्ये गतजीवनाचा आलेख तटस्थपणे मांडलेला असतो. लेखकाच्या जीवनानुभवातून वाचकांना प्रेरणा मिळते. असेच सतत प्रेरणा देणारे डॉ. बाळासाहेब गोफणे यांचे ‘सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा एक ध्येयवेडा प्रवास” हे आत्मचरित्र शब्दशिवार प्रकाशन यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये प्रकाशित केले आहे. आपणाला या आत्मचरित्राचा थोडक्यात परिचय करून घेता येईल.  


आपका हर सपना सच हो सकता है, अगर आप उसे पाने की हिम्मत रखते है| या वाक्याप्रमाणे स्वतःशी तुलना इतरांशी करण्यापेक्षा स्वतःची स्पर्धा स्वत:शी जेव्हा केली जाईल तेव्हा प्रत्येक व्यक्ती यशाच्या खूप उंच शिखरापर्यंत पोह्चते. समाजजीवनात वावरत असताना सन्मानपूर्वक कसे वागावे, त्याचबरोबर वेळेचे बहुमोल महत्व, बोलून विचार करण्यापेक्षा, अनुभव एक सर्वश्रेष्ठ शिक्षक असतो. हे व्यवस्थित समजावून घेवून त्यानुसार आपल्या जीवनाचा सदमार्ग कशा पद्धतीने निवडावा हे लेखक डॉ. बाळासाहेब गोफणे यांनी ‘सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा’ या आत्मचरित्रात खूपच प्रांजळ शब्दांमध्ये सांगितले आहे. खरे तर पुस्तके हि आपली सगळ्यात चांगली मित्र असतात असे म्हणतात. काही पुस्तके करमणुकीची साधन म्हणून वाचली जातात, काही ज्ञानाचे भांडार म्हणून तर काही पुस्तके आयुष्यातल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. डॉ. बाळासाहेब गोफणे यांचे हे आत्मचरित्र वाचकांच्या आयुष्याला नवी कलाटणी देणारे तर आहेच परंतु सातत्याने प्रेरणा आणि आत्मविश्वास देणारा एक ग्रंथरुपी दीपस्तंभ आहे असे वाटते.


पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्या सिमारेषेवर असलेले उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील भोतरे हे सातशे लोकसंख्या असलेले खेडेगाव. या गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आपल्या अथक परिश्रमातून आपल्या ध्येयाचे उत्तुंग शिखर कसे गाठतो. पावलोपावली आलेला संकटाना कसे सामोरे जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. बाळासाहेब गोफणे यांचे हे आत्मचरित्र होय. 


डॉ. गोफणे आपल्या मनोगतात म्हणतात कि, ‘’मोडून पडला संसार तरी मोडला नाही.’’ हा संदेश देण्यासाठी मी हा लेखन प्रपंच केला आहे. आणि हे खरेच आहे कि पुस्तक हातात घेतले कि आपणाला ते सोडवत नाही. सदर आत्मचरित्रात १. सीनेचे वाळवंट २. पंचगंगेचा पूर ३. कृष्णेचा अथांग सागर आणि ४. नावेतील प्रवासी असे एकूण चार मुख्य विभाग केलेले आहेत. 


पहिल्या भागामध्ये डॉ. बाळासाहेब गोफणे यांचे बालपण, आई वडील यांचे सुसंस्कार, प्राथमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, जन्मभूमी या विषयीचे विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. नानाविध संदर्भाने नायकाच्या जीवित कहाणीची अनेक संस्मरणीय असे वलये या भागात आहेत. आई ‘माबई’ आणि वडील ‘आण्णा’ यांच्या ह्र्दयद्रावक जीवनसंघर्षाची अफलातून कहाणी आहे. लेखक आईविषयीची आठवण सांगताना म्हणतात कि, ‘मला आजही जेव्हा जेव्हा तिची आठवणहोते, तेव्हा मी आरशापुढे उभा राहतो आणि माझ्या चेहऱ्यात तिचे रूप पाहतो. परंतु भरल्या डोळ्यांमध्ये तीचा चेहराही अस्पष्ट होऊन जातो. त्यामुळे तिचे दर्शन अधुरेच राहते.’ शेतकरी कुटुंबातील जिव्हाळ्याचे सबंध, नातेसंबंध, कृषी संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धती, गावगाडा यांचे विलोभनीय पैलू बरोबरचबालपणातील सच्चा जीवनानुभव आणि शिक्षणासाठीचा जीवघेणा संघर्ष उत्तमरीत्या शब्दबद्ध केला आहे. 


तर दुसऱ्या ‘पंचगंगेचा पूर’ या भागात विद्यापीठीय शिक्षण घेत असताना आलेल्या अनुभवाचे कथन आलेले आहे.विद्यापीठात विचाराच्या कक्षा रुंदावत असताना तेथील शिक्षक, ग्रंथालय, हॉस्टेलचे जीवन, विद्यापीठ परिसर, संशोधन कार्य या विषयाचे सांगोपांग तपशीलवार वर्णन तर आले आहेच परंतु आत्मविश्वासाने केलेली वैचारिक वाटचालसुद्धा अतिशय महत्वाची आहे. आपल्या गुरूविषयी आयुष्याच्या वाटेवरचा पारिजातक आणि या पारिजातकाच्या छायेत भूगोलशास्त्रातील पहिला पीएचडी (डॉक्टररेट) मिळविण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला. विद्यापीठातील माणसाच्या आपुलकीचा सुगंध, मैत्रभाव, विश्वास, याविषयीचा कृतज्ञभाव सरळ साध्या शब्दातून प्रांजळपणे कथन केलेला आहे.


तिसऱ्या ‘कृष्णेच्या अथांग सागर’ या भागात कराड येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वेणूताई चव्हाण कॉलेजमधील प्रदीर्घकाळ नोकरीत असताना आपल्या कार्य आणि कर्तृत्वामुळे अध्यापन, संशोधन याबरोबरच सामाजिक कार्याचा, उत्तुंग यशाचा दैदिप्यमान जो कालखंड आहे त्याचा यशस्वी आलेख मांडलेला आहे. एक भूगोलशास्त्राचा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विद्यापीठच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जावून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयाच्या विकासासाठी अनेक प्रतिमाने तयार करून राबवितो.


वेगवेगळ्या अभिमत संस्थांच्या बोर्ड फोर गव्हर्नन्स म्हणून म्हणून काम करतो. तर विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगासारख्या उच्चतम संस्थांच्या वेगवेगळ्या समित्यांवर काम करून आपली योग्यता सिद्ध करतो व यातून आपल्या कार्याची मोहोर कसा उमटवितो तसेच कॉलेज, संस्था याविषयीचा अपार जिव्हाळा, कृष्णाकाठी मिळालेले गुणीजन यांच्याविषयी कृतज्ञभावाने केलेले मनोहारी असे वर्णन आहे. आपल्या कामावर निष्ठा कशी असावी याचे सुंदर कथन या भागात पाहायला मिळते. 


चौथ्या भागात कौटुंबिक नातेसंबंध आणि त्या संबंधीच्या गोड आठवणींना उजाळा दिला आहे. ‘नावेतील प्रवासी’ असे या भागाचे नाव. पत्नी, मुले, सुना, बहिणी यांच्या सहवासातील मधुर आठवणीचा हा सुगंध वाचकांना मोहित करतो. कर्मभूमी आणि माणसांविषयीची सद्भावना, प्रेम आणि ओलावा आपणास हा ग्रथ वाचत असताना पानोपानी दिसून येतो.     

   

लेखकाच्या आत्मचरित्रामध्ये नकारात्मकता कोठेही शोधून सापडत नाही याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन हा होय. दुष्काळी शेती मातीतून सुरु झालेला हा एक जीवनाचा ध्येयवेडा प्रवास ज्ञानार्जन करता करता पंचगंगेच्या ज्ञानामृताने अधिकच पवित्र आणि यशश्वी होत जातो आणि शेवटी कृष्णेच्या सुपिक प्रदेशात आपल्या कार्यातून ज्ञानामृत मनोभावे मुक्तपणे वाटत राहतो. यामध्येच त्यांच्या आयुष्याचे साफल्य आहे, असे वाटते. सामाजिक बांधिलकी, मूल्यनिष्ठा, परोपकारी वृत्ती, जोपासण्यात त्यांना आनंद मिळतो. 

    

डॉ. बाळासाहेब गोफणे यांच्या आत्मचरित्रामध्ये १९५० पासूनच्या कालखंडाचे विविधांगी संदर्भ आहेत. सामजिक परिस्थिती, कृषी व्यवस्था, गावगाडा, शिक्षण, त्यासाठी करावी लागणारी पायपीठ, अथक परिश्रमातून गाठलेले ध्येय, कालानुरूप घडलेले बदल, विकसित झालेल्या जीवन जाणीव, सकारात्मक दृष्टीकोन, संस्थेसाठी वाहिलेले जीवन आदी घटना वाचकांच्या काळजात घर करून राहतात. ‘असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे’ या न्यायाने आपणही त्यांच्या समान व्हावे हा मूलमंत्र घेऊन रसिक वाचक आपले ध्येय गाठण्यासाठी सज्ज होतो यातच या आत्मचरित्राचे यश आहे असे वाटते.   


डॉ. बाळासाहेब गोफणे यांच्या आत्मचरित्राचे जे रूप आकाराला आले आहे, त्यामध्ये त्यांचे जीवन, कार्य, विचार, मूल्य, शिक्षण, दृष्टिकोन, संस्थेविषयीची आपुलकी इत्यादीविषयी त्यांची एक व्यापक दृष्टी व आकलन विकसित झालेले आहे. डॉ. गोफणे 'व्यक्ती' म्हणून जितके मोठे आहेत. तितकेच त्यांचे आत्मचरित्र वाचकांसाठी खूप मोठे प्रेरणा देणारे आहे. मानवी जीवनात अनेक चढउतारांची विविध वळणे घेत अनेक प्रश्न व समस्यां येत असतात त्यांना दृढ आत्मविश्वासाने कसे सामारे जावे याचा वस्तुपाठ सदर आत्मचरित्रात पाहायला मिळतो. डॉ. गोफणे जे विचार व्यक्त करतात, त्यांचे ते चिंतन मानवजातीच्या अंतिम कल्याणाचे अमर भाष्य बनून जाते. या ग्रंथात भाषिक सौंदर्याचा विलास नाही कि शाब्दिक कोट्या नाहीत. जे व्यक्त केले आहे ते अतिशय प्रांजळपणे. हे आत्मचरित्र एकाच वेळी ललित, मनोहर व विचारोत्तेजक बनत असते. तर कधी कधी रिपोर्ताजचा बाज आल्याचे दिसते. त्यामुळे ते वाचकावर आपल्या निखळ शब्दसौंदर्य व विचार सामर्थ्याची मोहिनी घालतात. वाचक अंतर्मुख होऊन विचारप्रवण होतो. लेखकाची शैली अगदी खिळवून ठेवणारी आहे. शाब्दिक कोट्या, म्हणी, वाक्प्रचार यांचा वापर क्वचित असला तरी भाषेच्या वळणाची आडवळणे दाखवत लेखक आपल्याशी गप्पा मारतात असे सतत वाटत राहते.


डॉ. बाळासाहेब गोफणे यांच्या या आत्मचरित्राला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख व सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांची संपूर्ण ग्रंथाचा अर्क व्यक्त करणारी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांच्या कलाकुसरीतून निर्माण झालेले आहे. हे मुखपृष्ठ आखीव रेखीव आणि सुबक असून नद्यांच्या प्रीतिसंगमावर फुललेला हिरव्या प्रतिभेचा नवोन्मेष तीरावरील मानवी जीवनाला सुफल करीत आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा करण्याचा संदेश देते.  

 

मरगळलेल्या मनाला एक प्रेरणा मिळून सजग परिवर्तनाचे साधन बनावे असा आत्मविश्वास मनात जागृत होतो. वाचकांना डॉ. गोफणे यांचे हे आत्मचरित्र कायमच प्रेरणा देईल, अशी आशा वाटते. 


पुस्तकाचे नाव – सीना ते कृष्णा व्हाया पंचगंगा’ 

प्रकाशक – शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा 

प्रथमावृत्ती- २६ जून २०२१

मूल्य – ३०० रुपये 

पृष्ठ संख्या - २४० 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational