santosh bongale

Others

2  

santosh bongale

Others

खरंच! जग रीस्टार्ट होतंय?

खरंच! जग रीस्टार्ट होतंय?

5 mins
323


गेल्या चार महिन्यात संपूर्ण जगात हजारो लोकांचे बळी घेऊन हे जग जागच्या जागी थांबायला भाग पाडणारा एक अतिसूक्ष्म कोरोना विषाणू म्हणजे कोवीड -१९. या विषाणूचा संसर्ग इतका भयानक आहे की अनेक देशातल्या आरोग्य यंत्रणासमोर लोकांचे प्राण वाचवणे हे खुप मोठे आणि कठीण आव्हान होऊन बसले. संसर्ग वाढू नये म्हणून जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. जगातील शास्त्रज्ञ या विषाणूवर लस शोधण्यात गर्क आहेत. त्यांच्या सर्वोतोपरी प्रयत्नांना यश लवकरच येईल. आणि जगावरील हे विषाणूचे संकट काही दिवसांत नष्ट होईल. 

   

कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झाले असून या जगात अनेक बाबींवर अनुकूल, प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो. त्यामध्ये याकाळात सर्वच कारखाने, उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्यांचे दुषित पाणी ज्या ज्या नद्यांमध्ये मिसळत होते. ते आता पूर्णपणे थांबले असल्यामुळे सर्वच नद्याचे पाणी शुद्ध होत आहे. नद्यांच्या पाणी प्रदुषणामुळे कितीतरी जलचर प्राणी मृत्युमुखी पडत होते ते प्रमाण आता कमी झाले आहे. जगातील समुद्रकिनारे वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असायचे, तेथे सातत्याने होत असलेले प्रदूषण आज थांबले आहे, आता तेथे निरव शांतता असल्यामुळे जंगलातील प्राणी, पक्षी मनसोक्तपणे आनंद घेत आहेत. रेल्वे सेवा, बससेवा, विमान सेवा, माल वाहतूक सेवा सुद्धा बंद असल्यामुळे होणारे हवा प्रदूषण बरेच कमी झाले आहे. आकाशातील ओझोनच्या थरावर अनुकूल परिणाम होईल, विशेष बाब म्हणजे सध्या पृथ्वी मोकळा श्वास घेत आहे. हे गेल्या कित्येक वर्षानंतर प्रथमच घडताना दिसत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जग पुन्हा नव्याने रिस्टार्ट होतय का ? असा प्रश्न मनात येतो. मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, मद्रास अशा अनेक शहरातील प्रदूषण घटत असून हवा स्वच्छ व मोकळी होत आहे. लॉकडाऊनमुळे अपघताचे प्रमाण पूर्णपणे घटले आहे. असे असले तरी कोरोनाची भीती जनसामान्यांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढत असून मृत्युचे वाढणारे आकडे पाहिले कि काळजाचा ठोका चुकत आहे. यासाठी प्रत्येकाने घरातच राहून स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे. शासन आदेशांचे पालन केले पाहीजे तरच आपण आपला जीव वाचवू शकू.

    

खरं तर मानव जन्माला आल्यापासून आपल्या स्वार्थासाठी सतत धावत होता. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण घरीच असल्याने आपल्या प्रत्येक नात्यातील वाढलेला दुरावा आता कमी करता येऊ शकतो. निवांत क्षण प्रत्येकाला मिळाल्याने आपले मन मोकळे करता करता स्नेह प्रेम वाढीस लागेल. घराला घरपण लाभण्यासाठी आणिक काय हवे असते माणसांना? तर कुटुंबातील एकमेकांचे प्रेमळ शब्द आणि आपुलकीचा अंतस्वर.   

   

निसर्ग त्याच्या वेळेनुसार सर्व जगाची घडी व्यवस्थित बसवून घेतच असतो कारण त्याच्याएवढा मानव कधीच सक्षम नव्हता आणि नसणार आहे, म्हणून वाटतंय कि निसर्ग पुन्हा नव्याने जग रीस्टार्ट करतोय की काय? पृथ्वीला थोडीतरी विश्रांतीची गरज असेल म्हणूनच आज सारे जग कोरोना विषाणूच्या निमित्ताने लॉकडाऊन झाले तर नसेल? अजून एक महत्वाचे म्हणजे बरीच खाजगी दवाखानेही बंद असल्यामुळे कुणी पेशंट नाही का ? आपण मास्क वापरू लागलोय. वारंवार हात स्वच्छ धुतले जात आहेत. नकळतपणे का होईना स्वच्छतेचे महत्व मानवाला बरेच काही शिकवून गेले आहे. याबरोबरच पुरेशी विश्रांती घेत असल्याने आपल्या जीवनातील बराचसा ताणतणाव हळूहळू कमीही झाला असेल. व्यसनावर मर्यादा आल्याने व्यसनी लोकांना आरोग्यदायी जगता येऊ लागेल. तसेच बाहेरचे खाणे उदा: फास्टफूड, हॉटेल, पूर्णपणे बंद झाल्यामुळे आपण घरातच पौष्टिक अन्नपदार्थ वा समतोल आहाराचे सेवन करू लागलो आहोत. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असे वाटते की खरंच या जगातून कोरोना विषाणू जरी नष्ट झाला तरी या विषाणूमुळे मानवाला अनेक गोष्टीचा पुनर्विचार करून नव्याने जीवन जगायला प्रवृत्त केले आहे. 


आपण या जगात असू वा नसू परंतु हे निसर्ग सृष्टीचे चक्र अव्याहतपणे चालूच राहणार आहे. निसर्गावर मात करायला निघालेला मानव आज मात्र अतिशय सूक्ष्म अशा विषाणूमुळे पूर्णपणे हतबल झाला आहे. जगात कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे कितीतरी लोक मृतुमुखी पडले. कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन योग्य त्या उपाययोजना करत आहेत. आपण त्यांचे पालन करायला हवे. कोरोनाची दहशत वाढीस लागल्यामुळे आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, टीव्ही चनेल जीव ओतून काम करत आहेत. कारण आपण सुरक्षित राहिलो तर देश वाचेल.

    

समाजात 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' अशी अवस्था झाली आहे. प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण प्रत्येकाचे आपल्या जीवनावर नितांत आणि निस्सीम असे प्रेम आहे. खर तर ही भीती बाळगण्याचे कारण नाही. आपण सुरक्षित राहण्यासाठी योग्य ते उपाय करायला हवेत. सर्वजन काळजीत आहेत कि हा कोरोणाचा विळखा कधी सुटेल म्हणून. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. जीवित हानीमुळे देशाचे कधीच भरून न येणारे नुकसान होत आहे परंतु संयम कायम ठेवून प्रशासनाला

सहकार्य केल्यास आपण सुरक्षितपणे पुढील काही दिवसात नव्याने जीवनाचा आनंद घेण्यास तयार होऊ या. आदिम कालखंडापासून मानव निसर्गाच्या सहाय्याने आपले जीवन अधिक वृद्धिंगत करत आला आहे परंतु अलीकडच्या पन्नाश वर्षात जेवढे निसर्गाचे नुकसान मानवाने केले तेवढे मागील हजारो वर्षात कधी झाले नाही.


सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक घरात समस्या निर्माण होऊ शकतात. अति मोबाईल, टीव्हीचा वापर करणे, अति झोप किंवा अति जागरण करणे. शारीरिक हालहाल कमी झाल्याने आळस वाढू लागणे, आपली रोग प्रतिकार शक्ती व मानसिक एकाग्रता कमी होणे. याचा आपल्या शरीरावर व मेंदूवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आपण सर्वजणच आर्थिक नुकसान सहन करत आहोत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे टेन्शन तर पालकांना आपली नोकरी तर जाणार नाही ना ? याचे टेन्शन आहे. अनेकांच्या अनेक समस्या आहेत. म्हणून आपण दैनंदिन जीवनाचे योग्य वेळापत्रकच तयार करायला हवे. 


आपण सर्व समस्यांवर पुन्हा नव्याने मात करू शकतो. सध्या आपण स्वतः व कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण आपल्या आवडी व छंद जोपासले पाहिजेत. घरातल्या घरातच योगा, व्यायाम, आवडीचे छंद, वाचन, लेखन, सुसंवाद, सकस आहार घेणे इत्यादी. असे केल्यास आपणास व कुटुंबातील सदस्यांना आनंद मिळेल. मानसिक आरोग्य सदृढ राहण्यास मदत होईल. खरं तर कुटुंबातील सदस्य २४ तास एकत्र आहोत ही आपल्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे. कारण अलीकडच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकजण पैसामागे धावतो आहे. शहराकडे घेतलेली धाव अधिक वेगवान झाली आहे. त्यामुळे एकमेकांसाठी वेळच नाही तेव्हा आपण एकत्र आल्याने प्रेमाच्या, सुखदुखाच्या गोष्टी एकमेकांना बोलून दाखवूया. त्यामुळे विचारातील वाढलेली दरी कमी होऊन एकमेकांविषयी प्रेम आणि जिव्हाळा निर्माण होईल. नुसते आत्मकेंद्रित होऊन चालणार नाही तर आपल्या नात्यासाठी, समाजासाठी आपण काही देणे लागतो म्हणून त्यांच्यासाठी वेळ देण्याची हीच वेळ आहे. लोक एकमेकांना माणुसकीच्या नात्याने मदत करत आहेत. स्यानिटायझर, मास्कचे वाटप केले जातेय. पैशाच्या स्वरूपातही लोक शासनाकडे मदत करत आहेत. 


एकंदरीत मानवाचे निसर्गाशी सुरु झालेले हे एक युद्ध असून मानवाने यापूर्वीही अनेक आपत्तींना सक्षमपणे तोंड दिलेले आहे, उदा: सुनामी, भूकंप, चक्रीवादळे, पूर, दुष्काळ इत्यादी. परंतु ही कोरोना विषाणूची आपत्ती अधिक घातक आहे. या वैश्विक महामारीच्या विळख्यातून आपण लवकरच सहीसलामत बाहेर पडूच. हेही वाईट दिवस निघून जातील. श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच, धर्म जाती पलीकडे जाऊन, सर्व भेदभाव मिटवून इथून पुढे तरी माणसाने जिव्हाळ्याने, प्रेमाने एकत्रित राहूया. खरंच निसर्गाच्या सहाय्याने आपणही आपले जीवन नव्या उमेदीने रीस्टार्ट करू या. 


Rate this content
Log in