अग्रलेख!! मनसे...
अग्रलेख!! मनसे...


Lockdown ची एक उतरणीला आलेली दुपार, वामकुक्षीतुन बाहेर येत अंगभराचा आळस झटकतानाच माझं लक्ष खिडकीकडे गेलं.
बायको त्या खिडकी जवळ हातात चहाचा कप घेऊन पाठमोरी उभी होती. मी तसाच उठून तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो. अजुनही ती बेसावधच..! तिचं लक्ष एका झाडाच्या पानांमधल्या खोबणीतल्या घरट्यावर एकवटलेलं होतं. मग मीही त्या घरट्याकडे निरखू लागलो. सूर्याच्या धगधगत्या आग ओकणाऱ्या झळा, अन् घोंघावणारा वारा यांपासून बचाव करण्यासाठी एक चिऊताई तिच्या पिल्लांना पंखाखाली लपवत घरट्यातच दडून बसलेली होती, अन् तो चिमणादादा खोप्याच्या कमकुवत भागात गवताची एकेक काडी विणत डागडुजी करत होता.
हे दृश्य खूप काही सांगून जात होतं, आपण ते बघत राहावं अन् त्यातून आपल्या घरट्यासाठी कुटूंबासाठी शिकत राहावं.
माझा हात आपसुकच बायकोच्या खांद्यावर जाऊन विसावला, तशी ती भानावर आली आणि अचानक माझ्याकडे वळती झाली. ती माझ्याकडे अन् मी तिच्याकडे एकटक बघतच राहिलो, जणू त्या दृश्यातला सारांश आम्ही एकमेकांना नजरेतूनच सांगत होतो.
मग आम्ही पुन्हा त्या घरट्याकडे बघू लागलो.
आज या जगात प्रत्येक कुटूंबावर अशीच काहीशी परिस्थिती ओढवलेली आहे. आपलंही या चिमणी-पाखरांसारखंच झालंय. या संकटापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक आई तिच्या पिल्लांना उराशी धरून घरातच जिवापाड काळजी घेताना दिसतेय आणि प्रत्येक बाप घरात काही कमी पडू नये म्हणून धडपडत घराच्या दरवाजात खंबिरपणे उभा राहून कुटूंबाचं संरक्षण करताना दिसतोय.
प्रत्येक कुटूंब या घरट्यासारखं महामारीच्या या वादळी तडाख्यातून स्वत:च्या अस्तित्वाचा कस लावत, तग धरून उभं आहे. आज निसर्गाची करणी बघा, मानव प्राणी इतका प्रगत असूनही तो या संकटाशी दोन हात करण्यास असमर्थ आहे, त्याच्या पुढे फक्त एकच पर्याय शिल्लक आहे, तो म्हणजे स्वत:ला घरात कोंडून घेऊन हे जीवघेणं वादळ शमण्याची वाट बघणं.
“एक दिवस असाही येतो!
माणसाचा गर्व सारा झाडून नेतो!
कितीही कमवलं, सजवलं हे जग तरी,
या धरतीवर फक्त पाचोळाच उरतो!!”