STORYMIRROR

Sakshi Iwale

Fantasy

4  

Sakshi Iwale

Fantasy

आयुष्य एक परिकथा

आयुष्य एक परिकथा

12 mins
365

खिडकीत बसलेली विती समोर दिसणाऱ्या पर्वत राई कडे पाहत आपल्याच विचारात हरवली होती.. कधी नाही ते आज सगळ सुरळीत पार पडलं होतं. विक्रांतिका सारख्या इतक्या मोठ्या राज्याच्या मुख्य पदाचा त्याग केल्यानंतर त्यामुळे झालेल्या वादातून अन् राजकारभारातून सुटका भेटल्यावर आयुष्य किती सुंदर झालं याचा विचार करत होती. टेबलावर कोरे कागद आणि लेखणी पडलेली होती. भूतकाळात डोकावून आता पर्यंत घडलेल्या अगणित घटनांना आणि इतिहास जमा होण्याआधी विक्रांतिकाने पाहिलेल्या भरमसाठ अश्रूंना कुठेतरी जागा भेटावी म्हणून तिने पाहिलेली, तिने जगलेली कथा ती त्या पानांवर उतरू पाहत होती..

तो समोर उभा होता. मी त्याच्याकडे टक लावून पाहत राहिले. आधी कॉलेज मध्येही तो दिसला होता. तोच अवतार तेच कपडे, तोच कोरा चेहरा. आधी लांबून पाहिलं तेव्हा तितका सुंदर दिसला नव्हता. पण आज तो वेगळाच दिसत होता. काळा ओवरकोट, आतमध्ये निळ्या रंगाचा सूट आणि पायात त्याला शोभेल असे बूट होते. डोक्यावरचे केस विस्कटलेले दिसत होते. त्याच्या राखाडी डोळ्यांवर साधा काचेचा चश्मा होता जो त्याच्या उभट चेहऱ्याला उत्तम दिसत होता. एका हातात महागडे घडयाळ आणि दूसरा हात ओवरकोट च्या खिशात घालून तो माझ्याकडे एकटक पाहत होता. कॉलेज मध्ये दिसला तेव्हा दुर्लक्ष केलं. त्याची मला बाजारात एक झलक दिसली, तेव्हा मी गोंधळले होते. मला वाटलं होतं त्याचा सतत विचार केल्याने होत असावं पण तसं ते कदाचित नव्हतं. आज तो दिसला पण तेही गच्चीमध्ये.? मला आश्चर्य वाटलं. मी मागे वळून दार पाहिलं ते माझ्या बाजूने बंद होतं, मग हा गच्चीत कसा आला? माझ्यासमोर कधी न पडणारा आणि गोंधळवून टाकणारा प्रश्न होता. घाबरले, गोंधळले असले तरी शांत होते, असं म्हणण्यापेक्षा तसा शांत राहण्याचा प्रयत्न केला.

‘मी तुला याधीही पाहिलं आहे. क-कोण आहेस तू? अचानक वर कसा आलास? आणि तेही दार बंद असताना? त्यादिवशी कॉलेज मध्येही होतास तू, हो ना? माझा पाठलाग करतो आहेस की..?’ मी एका मागे एक प्रश्नांचा भडिमार करत सुटले होते. पुढच्याच क्षणी तो डोळ्यांची पापणीही न लावता माझ्या अगदी जवळ आला होता. 

‘शुss शांत बस.’ त्याने आपला उजवा हात हवेत फिरवला. ‘हां आता ओरड तुला काय ओरडायचं आहे ते.’ 

‘आई, दार उघड. आई.. बाबा..’ खूप भीती वाटत होती. जवळ जवळ रडायलाच लागले. 

‘आता तुझं झालं असेल तर तुझ्या माहिती साठी म्हणून सांगतो तुझा आवाज इथून बाहेर पडणार नाही.’ 

‘कोण आहेस तू? काय हवं आहे तुला?’

‘तिच्यासारखीच आहेस यात शंका नाही. पण तुझा आवाज.’ त्याने कान चोळले. ‘किती मोठ्याने ओरडतेस तू.’

‘तिच्यासारखीच आहे म्हणजे? काय म्हणायचं आहे तुला?’

‘तू तिला इतका त्रास का देत आहे?’ अचानक माझ्या पाठीमागून आणखी एक आवाज कानावर पडला. मी मागे वळून पहिलं. ‘सरळ सरळ सांगत का नाहीस?’ 

‘आता आणि तू कोण आहेस?’ मी डोक्याला हात लावला. ‘आणि तू—तू इथे अचानक कुठून आलास? मला काहीच कळत नाहीये.’ त्याचे कपडे जरा जुने असल्यासारखे वाटत होते. त्या समोरच्या व्यक्तीच्या बरोबरीत सांगायचं झालं तर, त्या दृष्टीने खूपच जुने. त्याचा चेहरा थोडासा गोलाकार होता, केस चिमणीच्या घरट्यासारखे नुसतेच वाढलेले होते. कधी त्यावरून हातही फिरवला गेलेला नसावा असे ते दिसत होते. 

‘माफ करा राजकुमारी, मी अशर.’ थोडावेळापूर्वी आलेला तो मुलगा म्हणाला. 

‘राजकुमारी? क—कोण राजकुमारी?’

‘तुम्ही आणि कोण?’ तो अशर नामक व्यक्ती हसला. 

‘अशर तू इथे का आला आहेस? ती माझी जबाबदारी आहे.’

‘तुझी जबाबदारी रिहान? अरे, ती दिती हिच्या मागे पडली असताना तू एकटा तिला सुरक्षित कसा ठेवशील? विसरू नको दितीची शक्ती केवळ तिच्याकडे पाहून कळणाऱ्यातील नाही. पन्नास वर्षांचा अनुभव आणि शिवाय दोनशे वर्ष बंदिवासात राहून तिची शक्ती अनेक पटींनी वाढलेली आहे.’ 

‘मला सगळं कळत आहे. पण तिला सगळ्यात आधी विक्रांतिका मध्ये न्यावं लागेल. मला नाही वाटत ती इथे काही बोलू देईल.’ डोळ्यांतील अश्रु गाळण्याव्यतिरिक्त माझ्यासमोर कुठलाही मार्ग नव्हता. 

‘मग आपण थांबलो का आहोत?’

‘कारण ती साधारण मनुष्य आहे, जादू-’ रिहान आपलं वाक्य पूर्ण करण्यापूर्वीच माझ्या डोक्याला जबर मार बसलेला जाणवला, आणि मला इतकी झोप आली की असं वाटलं मी पुन्हा कधीच या झोपेतून उठू शकणार नाही. 

शुद्धित यायला वेळ लागला, किती ते ठाऊक नाही. डोळे उघडले तेव्हा लक्षात आलं. मी—मी कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात आहे. मऊ, उबदार पलंगावर मी रेशमी चादर पांघरून झोपलेली होते. पलंगाच्या संपूर्ण बाजूनी पडदे होते. मी खाडकण उठले पण डोक्यात एक सनकण शिरशिरी आली आणि जणू विजेच्या लहरीच्या स्वरूपात अचानक निघून गेली. त्याक्षणापूर्ते डोके फुटते की काय असं वाटलं. नजर सावरल्यावर पाहिलं, तो रिहान नामक युवक तिथे असलेल्या नक्षीदार सोफयांच्या पलीकडे खिडकीतून बाहेर डोकावत होता. तिथे सज्जा असावा कारण त्याबाजूने हवेचा झोत आतबाहेर करत होता. मी उठायचा प्रयत्न केला पण डोक्यात घणाचे घाव पडल्यासारखे वाटत होते सहन न झाल्याने मी ओरडले. माझ्या आवाजाने तो माझ्या दिशेने यायला निघाला. मी पटकन उठले. जमिनीवर पाय ठेवताच गरगरल्यासारखं झालं. 

‘तू मला कुठे घेऊन आला आहेस? माझ्यासोबत काय केलंस? डोकं आत्ता फुटेल की काय असं वाटतं.’ मी चिडलेल्या स्वरात म्हणाले. तिथे असलेल्या त्या दोन पायऱ्या उतरून मी खाली आले. बाजूलाच तो मोठा बाहेर जाण्याचा दरवाजा दिसला. 

‘माझं ऐकून तर घे.’ मी दारापर्यंत गेले आणि इतक्यात धाडकन ते कोणीतरी बाहेरच्या बाजूने ढकललं, माझा तोल गेला. आणि मी मागे पडले.

कोणीतरी पाठीमागून हसलं. ती मुलगी होती. खूपच सुंदर. .हातापायांतली घुंगरू वाजत होते. तिची केशरचना आणि तिने घातलेले ते मोत्यांचे दागिने, तिचं रूप अजूनच उठवत होते. 

‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.’ त्या मुलीचा आवाज दारा मागून माझ्या कानावर आला.

‘काहीही बोलू नको सायरा. आईनं तुला लायब्ररीमध्ये जायला सांगितलं होतं ना? पुस्तकं लावून झाले का?’

‘हा हा, मी काही तुझ्यासारखी काम चुकार नाही समजलं ना?’ त्यांचं बोलणं काही कळत नसलं तरी त्यांची भाषा तरी माझ्यासारखी आहे म्हणून हायसं वाटलं. 

’काय चालू आहे इथं? कधी कोणी येऊन मला म्हणतंय मी तिच्यासारखी दिसते. त्यातली ती कोण आहे? आणि मला इथं का आणलंय? धड काही सांगत पण नाही आणि मला इथून जाऊही देत नाहीत.’

‘हे बघ..’ 

‘तू तर काही सांगूच नकोस. तूच मला इथे आणलं आहे लक्षात ठेव. माझ्या आई-बाबांना जर समजलं ना मी घरी नाही आहे, तर..’ काही बोलण्याआधीच त्याने माझा हात धरून दणकण सोफ्यावर बसवलं.

‘आता एकदम शांत राहायचं. मी काय सांगतोय ते आधी नीट ऐक.’ त्याच्या बोलण्यावर मी एकाएकी शांत झाले. ‘तू इथे आली आहेस हे तुझ्या आई-बाबांना समजणार नाही.’

‘आणि ते कसं? तू काय तिथं जादूने माझी प्रतिकृती तयार केली आहेस?’

‘तुला कसं समजलं? मीच केली होती.’ सायरा नावाची ती मुलगी मध्येच बोलली. पण तिचं उत्तर ऐकून मी एक क्षण थंड पडले. 

‘काय? माझी प्रतिकृती?’ मी सोफ्यावरून उठले पण रिहानने मला परत खाली बसवलं. 

‘हे बघ. तू सध्या विक्रांतिका राज्यामध्ये आहेस. हे राज्य निर्वाना देशातील अर्थव्यवस्थेचं मूळ ठिकाण.’

‘तू इतकं फिरवून फिरवून सांगितलं तर आधीच गोंधळलेली ती जास्तच बावरून जाईल.’

‘हो का?’ रिहान उठला आणि सायराकडे पाहून म्हणाला, ‘इतकं असेल तर तूच का नाही कष्ट घेत, तसंही हिच्याशी संवाद करणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे.’ एवढं बोलून तो तिथून बाहेर गेला. 

‘त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. मी काय सांगते ते ऐक. हे जादूचं विश्व आहे. आणि तू सध्या राजमहालामध्ये आहेस.’

‘काय जादूचं जग? हे—हे खरं आहे?’ माझा तिच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. ‘म्हणजे तू—तू जादूगर आहेस?’ सायराने होकारार्थी मान हलवली. मला भीती वाटली मी पटकन तिथून उठले आणि दोन पाऊलं मागे सरकले. 

‘घाबरू नको, काहीही होणार नाही. काही कारणांसाठी आम्हाला तुझी गरज आहे, त्यामुळे पुढचे काही दिवस तू इथेच राहायचं, समजलं?’

‘ह—हो. का नाही.’ 

‘तुला काहीही लागलं की कोणालाही सांग ते आणून देतील. एकदा तुला तुझं अस्तित्व समजलं की तू स्वतःहूनच इथे थांबायचा निर्णय घेशील. परंतु त्याआधी इथून बाहेर पडू नको. तुझ्या जीवाला धोका आहे.’

‘माझं अस्तित्व? मला धोका आहे? कुणापासून?’

‘ठीक आहे, आता पुरते भाषण पुरे मला खूप कामं आहेत, तू आराम कर.’ ती म्हणाली आणि तिथून बाहेर गेली. 

‘माझं अस्तित्व? ही सायरा नक्की काय बोलून गेली?’ मी विचार केला. पण कुठल्याच उत्तराजवळ पोहचले नाही. खोलीभोवती एक नजर टाकली. ‘वाह! किती मोठी आहे. ही खोलीच जर इतकी मोठी असेल तर संपूर्ण महाल किती भव्य असेल?’ तिथे ठेवलेल्या वस्तु खरंच खूप सुंदर होत्या. खोलीचं एकंदर वर्णन करायचं झालं तर.. खूप प्रशस्त, मोठी, आणि मोहून टाकणारी. टेबलवर असलेल्या रेशमी चादरीवर सगळ्या वस्तु पद्धतशीररित्या मांडलेल्या होत्या. मेणबत्तीचे स्टँड, काही पुस्तकं, काही शोभेच्या वस्तु आणि आणखी बरंच काही. खोलीत उजव्या बाजूला चित्र होतं. त्यामध्ये. खुर्चीवर बसलेल्या राणीची आकृती होती. नाकीडोळी छानच होती. रेशमापेक्षाही सुंदर असे काळेभोर केस, तलवारीसारखी धारदार आणि तितकीच तीक्ष्ण नजर, गुलाबाच्या पाकळ्याही लाजतील असे नाजुक ओठ, चेहऱ्यावर चंद्रासारखे शीतल तेज. ‘कोण असेल ही?’ मनात प्रश्न उमटला. ते राखाडी रंगाचे डोळे एका क्षणापूर्ते ओळखीचे वाटले. खोलीत एका कोपऱ्यात दोन सोफे होते. खिडकीच्या दिशेने गेले. त्या खोलीला शोभेल असाच तिचा आकार होता. गुलाबी रंगाचे पडदे लटकत होते. बाहेर पाहिलं. आणि समोरचं दृश्य पाहून एक क्षण भारावून गेले. मागच्या बाजूला डाव्या हाताला महालाचे मोठे गेट होते. त्याच्या दोन टोकाशी दोन शिपाई पहारा देत होते. समोर अथांग हिरवगार पठार पसरलेलं होतं. त्या ओस पडलेल्या जागेच्या पुढे असलेला तो हिरवागार पठार त्याच्या भूभागावर कितीतरी सागाची, निलगिरीची आणि अशा बऱ्याच वृक्षांनी गर्दी होती. ती पुढे जाऊन एका दरीमद्धे विलुप्त होत होती. जिथे ते महालाचे दार होते त्याच्यापासून थोडं पुढे उतार होता आणि त्यावर दगडी पायऱ्या तयार केलेल्या होत्या. माझं डोकं पुन्हा गरगरलं काहीतरी अनोळखी तरीही ओळखीचं वाटत होतं. डोळ्यांतून माझ्याही नकळत पाणी आलं. खोलीचं दार पुन्हा ढकललं गेलं. 

‘रिहान. मला इथून बाहेर पडायचं आहे. प्लीज.’ मी त्याच्या दिशेने धावतच गेले. डोळ्यांतून ओघळणारे अश्रु लपवण्यात काहीही अर्थ नाही याचा अंदाज मला आला होता. ‘ही—ही जागा..’

‘ओळखीची आहे. असंच ना?’ जणू त्याने माझ्या मनातील वाक्य ओळखले असावे. 

‘ओळखीचं वाटतं असं नाही. पण हे सगळं अनोळखी सुद्धा वाटत नाही.’ त्याने माझे खांदे धरले आणि सोफ्यावर बसवलं. ‘हे बघ, तू आधी शांत हो. तुला इथे खरंतर आणायचं नव्हतं, पण..’

‘पण काय?’

‘तुझ्या जीवाला धोका आहे.’ 

‘कोणापासून? आणि का? सायरा सुद्धा असंच काहीतरी सांगत होती. आणि मी कोणाचंही काहीही वाईट केलेलं नसताना..’

‘ज्यादिवशी आपण पहिल्यांदा भेटलो, त्यादिवशीही तुझ्यावर हल्ला झाला होता. पण बघ तू आता सुखरूप आहेस. थोडेदिवस इथे रहा. तुला गोष्टी आपोआप उमजायला लागतील. माझ्यावर विश्वास ठेव.’ 

‘विश्वास कसा ठेऊ? माझ्यासमोर घडणाऱ्या घटना माझ्यासाठी अनपेक्षित आहेत. मी कोण आहे यावर सायराने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. माझ्या जगात मी आनंदी होते. माझं काहीतरी अस्तित्व त्या जगात होतं. पण इथे, इथे माझं काय अस्तित्व आहे?’

‘विक्रांतिका राज्य, आणि या राज्याचा वारसा जितका गोंधळवून टाकणारा आहे.. तितकाच समजून घ्यायला सुद्धा सोपा. अर्थव्यवस्था म्हंटली की.. निर्वाना साम्राज्याचं लक्ष फक्त विक्रांतिका कडे. वस्तूंचा मोठा बाजार, कला गुणांना अधिकाधिक प्राधान्य देण्यासाठी तयार केलेले वेगवेगळे विभाग, त्यांच्या कामकाजासाठी नेमून दिलेले उच्च दर्जाचे कलाकार, आणि मुख्य म्हणजे इथले राजकारण. या सगळ्यात गुरफटलेलं हे राज्य. त्याचा इतिहास जाणून घ्यायला जितका मेंदूला जोर द्यावा लागतो तितकाच मनावर ताबाही ठेवावा लागतो. राज्याचा इतिहासच जर जाणून घ्यायचा झालं तर लाखोंनी पुस्तकं सापडतील, परंतु राजघराण्यातील काही सत्य आणि त्यांचे व्यवहार जाणून घेण्यासाठी ती पुस्तकं काहीच कामाची नाहीत.’ 

‘राजघराणे? ही परिकथाच वाटत आहे.’ 

‘आहे नाही. होती. विक्रांतिका राज्य म्हणजे परिकथाच होती. एक राजा, एक राणी, आणि तू..’ त्याच्या निळ्या डोळ्यांत वेगळेच भाव दिसत होते. 

‘मी?’

‘हो कथा म्हंटलं की राजकुमारी आली, आणि ती तू आहेस. या विक्रांतिका राज्याची राजकुमारी.’ मी एक क्षण गोंधळले. ‘योग्यच ऐकलं?’ असं वाटलं. ‘परिकथा होती, यासाठी की.. हे राज्य पूर्वी खूप सुंदर होतं. आनंदी होतं. आणि त्यानंतर तो सांगताही न येणारा दिवस उगवला. कोणाला अपेक्षाही नव्हती. की विती.. अशी एकाएकी..’

‘हे नाव कुठेतरी ऐकलं आहे.’ माझ्या वाक्यावर तो हसला. 

‘आज संध्याकाळी तुला तुझं न कळणारं अस्तित्व समजेल, त्यामुळे तू आता आराम कर.’ तो तिथून उठला.

‘रिहान, मला माझं सत्य ठाऊक नाही. तू मला इथे का आणलं? तेसुद्धा माहीत नाही. पण.. थॅंक यू.’

‘आणि ते का?’

‘कदाचित मला समजून घेतलं म्हणून?’ तो पुन्हा हसला आणि खोलीतून बाहेर गेला. 

‘मी राजकुमारी? पण मी नाहीये. मी तर.. कोण आहे मी?’ उत्तर सापडलं नाही पण डोळ्यांवर झोप मात्र खूप आली होती. मी तशीच त्या सोफ्यावर बसले. ‘क-कोण आहे मी?’ प्रश्न विचारत राहिले आणि कधी डोळे मिटले कळलंच नाही. 

‘रागिणी? रागिणी?..’ आईचा आवाज कानावर पडला. आणि अचानक एखादी चौकट फिरवावी तसं माझ्यासमोरचं चित्र बदललं. आता मी एका महालात होते. खूप जुना होता. ऐतिहासिक भग्नावशेष दिसायचे अगदी तसंच ते समोरचं दृश्य दिसत होतं. चित्र पुन्हा पालटलं. 

‘विती? तू इथं आहेस.’ एका मुलीचा आवाज कानावर पडला. ‘रिहान ने जे काही केलं ते तुझ्यासाठीच होतं, मग तू इतकी का चिडली आहेस त्याच्यावर?’ पण तिची आकृती सावलीसारखी दिसत होती. 

‘पण त्याने मला याची आधी कल्पना द्यायला हवी होती.’ माझ्या कंठातून आवाज फुटला. पण असं का झालं ते समजलं नाही. ‘जाऊ देत ना. त्याच त्याच गोष्टी परत परत बोलल्याने थोडीच ना तो परत येणार आहे.’

‘तू जर प्रयत्न करायचे सुद्धा सोडून दिलेस तर कसं होईल?’ आणखी एक जड आवाज कानावर पडला. 

‘माझ्यासमोर पर्याय नाही.’ पुन्हा कंठातून आवाज फुटला. अचानक डोळ्यांसमोर उजेड आला आणि कोणीतरी ओरडलं, ‘विती..’ नंतर सगळं काही धूसर होत गेलं. 

पटकन डोळे उघडले. श्वास घ्यायला अडचण होत होती. कपाळावर पाण्याचे थेंब साचले होते. जे काही स्वप्नात पाहिलं ते भयंकर होतं. आजूबाजूला नजर भिरभिरली आणि पलंगावर बसलेल्या एका मुलावर येऊन थांबली. दिसायला छानच होता. पण त्याचे केस.. जरा विचित्र होते. त्याचे काळे डोळे माझ्यावर खिळलेले होते. नाही म्हणायला.. नाक जरा बसकंच होतं.  

‘क-कोण आहेस तू?’ मी अडखळत विचारलं. आणि माझ्या प्रश्ना पाठोपाठ तो माझ्याकडं पाहून चक्क हसला. 

‘मी कोण आहे? हा काय प्रश्न आहे?’

‘का? असा प्रश्न नसतो का?’ ‘असं काय बोलतोय हा?’ 

‘नाही. तसं नाही.’

‘मग कसं?’ मी गोंधळले होते. 

‘मी आरनी. विक्रांतिकाचा सभाध्यक्ष, आणि सेनापती. रिहानने मला सांगितलं की, तू..’

‘मी-काय? हे बघ तू विक्रांतिकाचा सभाध्यक्ष आहेस की राजा त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही. पण तू जे काही बोलत आहेस ते स्पष्टपणे बोलशील का? एक तर आधीच माझ्या डोक्यात नको नको त्या गोष्टींनी घर केलं आहे, ज्या खरंच माझ्या विचारांच्या पलीकडच्या आहेत. आणि_’

‘जरा थांब, तुला तुझं अस्तित्व समजलेलं नाही असं दिसतंय. ठीक आहे चल माझ्यासोबत.’ तो पलंगावरुन उठला. 

‘क-कुठे?’

‘तू कोण आहेस? तुला जाणून नाही घ्यायचं?’

‘क-कोण आहे मी?’ तो पुन्हा हसला. 

‘आधी चल तर..’ त्याच्यापाठोपाठ त्या खोलीतून बाहेर पडले. मी जसा विचार केला होता तो महाल अगदी तसाच होता. भव्य, आणि सुंदर. खोलीतून बाहेर पडले आणि एका खूप मोठ्या सज्ज्याजवळ आले. खाली जायला पायऱ्या होत्या. ती आरनी नामक व्यक्ती थोडी पुढे गेली. आणि आणखी एक सज्जा दिसला. यावेळी इथल्या पायऱ्या वरच्या दिशेला जात होत्या. पायऱ्या चढून वर गेलो आणि आणखी एक सज्जा दिसला. पण हा आधीपेक्षा अधिक मोठा होता. आणि बाहेरच्या बाजूला जास्त पसरलेला होता. आरनी मला घेऊन डावीकडे वळला. त्या बाजूला खूप मोठं कॉरिडॉर होतं. आणि तिथे दोन खोल्या सुद्धा होत्या. तो मला घेऊन अगदी शेवटच्या खोलीकडे गेला आणि बाजूला झाला. त्या खोलीवर पडदा टाकलेला होता. 

‘या खोलीत जा.’ तो म्हणाला. मी त्याच्याकडं एक क्षण पाहिलं.

‘काय आहे या खोलीत?’

‘तुझ्या प्रश्नांची उत्तरं.’ त्याच्या म्हणण्याबरोबर मी आत गेले. अचानक मागचं दार बंद झालं. खोली साधी होती. एक क्षण घाबरले. परंतु लगेच सावरले कारण ती अचानक ओळखीची वाटली. हसण्याचे आवाज कानांच्या पडद्यांवर अलगद उमटले. आणि त्यापाठोपाठ कोणीतरी ओरडल्याचा आवाज ऐकू आला.

 ‘विती.. विती.. मला पकडून दाखव.’ या आवाजा पाठोपाठ एक थरथरणारी सावली नजरेस पडली. त्या निव्वळ किरणांच्या प्रकाशातही मला त्या आकृत्या स्पष्ट दिसत होत्या. घुंगरांचे आवाज कानावर पडले. पलंग आणि सोफ्याच्या मधोमध असलेल्या रिकाम्या जागेत पावलं उमटल्याच्या खूणा दिसल्या. थंड शिथिल करून टाकणारी हवेची झुळूक चेहऱ्यावर धडकली आणि अंधाऱ्या खोल गर्तेत मी सामावून जाऊ लागले. मला भूतकाळातील प्रत्येक अन् प्रत्येक क्षण दिसू लागला. 

रिहानच्या नजरेला नजर देऊन मी त्या जुन्या खोलीत उभी होते. तो नवीन वाटला, पण कदाचित ओळखीचाही. 

‘क-कोण आहेस तू? माझ्या घरात येण्याचं धाडस कसं केलं?’ तो घाबऱ्या स्वरात म्हणाला. त्याच्या हातात धारदार तलवार असूनही तो नखशीतांत थरथरत होता. जणू त्याने समोर एखादा दैत्य पहिला असावा. वाटणारंच कारण त्यावेळी माझा अवतारच तसा होता. मोकळे केस, रडल्यामुळे डोळ्यांखाली पसरलेलं काजळ, कपाळाला झालेली जखम, गळ्याभोवती बसलेल्या फासाच्या खुणा आणि अंगात असलेल्या फ्रॉक वर धुळमातीचे डाग. ही अशी होती आमची पहिली भेट.  

‘माफ कर पण आजची रात्र मला इथे थांबू दे. ती-तिने माझ्या मागावर जादूगर पाठवले आहेत. माझा जीव धोक्यात आहे.’

‘कोण ती? आणि कुठले जादूगर. आणि तू कोण आहेस?’

‘मी राजकुमारी विती. ते..’

‘राजकुमारी? तुम्ही या अशा अवस्थेत?’ माझी ओळख ऐकून त्याने आपली तलवार खाली केली. त्या संवादानंतर माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. 

माझाच भूतकाळ आठवून मला रडू येत होतं. डोकं हळूहळू जड होऊ लागलं. दितीने केलेले वार, राज्य हस्तगत करण्यासाठी केलेल्या हत्या अशा एकाएकी डोळ्यांसमोर येऊ लागल्या. स्मृती मंत्राच्या प्रभावाने जे काही विसरले होते ती प्रत्येक अन प्रत्येक गोष्ट डोळ्यांसमोर थैमान घालू लागली. आपल्या आईवडिलांच्या केलेल्या हत्या आठवल्या. राजसभेतील सदस्य आणि शिपाई, दास आणि दासी, अंगरक्षक आणि सेनापती अशा सगळ्यांच्या रक्ताने लाल झालेल्या महालातील पायऱ्या आठवल्या. गळ्यात बसलेला आपल्याच ओढणीचा गळफास आठवला. तिला हरवण्यासाठी रिहान, सायरा, आरनी, दक्ष, देव आणि कालिंदी सोबत मिळून केलेल्या योजना आठवल्या. महाल हस्तगत केल्यावर, तिला हरवल्यावर आणि राजकुमारी म्हणून आपले कर्तव्य पूर्ण केल्यावर याच महालात त्यांच्यासोबत घालवलेले आनंदी क्षण आठवले. आणि सरतेशेवटी आपण त्या विश्वात कसे गेलो हेही आठवले. डोळ्यांसमोर त्यावेळी पडलेल्या प्रकाशाचे कण फिरताना दिसू लागले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy