आपल्याला शांत ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे
आपल्याला शांत ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे
आपल्याला शांत ठेवण्याची जबाबदारी ही खरं तर सर्वस्वी आपलीच असते. आजूबाजूला मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना, माणसांचे वेगवेगळे मूड्स, आपल्याविषयी होणारे गैरसमज, नकोशा माणसांची आयुष्यात असलेली हजेरी ह्या आणि अशा अनेक गोष्टी मनाला सतत अस्वस्थ करत राहतात.
ही अस्वस्थता मनाची परिस्थितीशी जुळवून घेतानाची हतबलता दाखवते. परिस्थितीवर नसलेलं नियंत्रण नकळत मनावर आणि विचारांवरही आघात करत जातं आणि एका कुठल्या क्षणी आपण अंतर्बाह्य "विरक्त" होतो. कुणाशीही संवाद नकोसे होतात.
खरं तर हीच वेळ असते स्वतःला सावरण्याची, समजून घेण्याची... ही अवस्था अनेकांच्या आयुष्यात येते पण फक्त काही क्षणांपुरती...
"विरक्तीतलं सुख" जरी हवंहवंसं वाटलं तरी पुन्हा परिस्थिती मात्र त्याच मळलेल्या वाटेवर घेऊन जाते आणि पुन्हा मन त्याच क्षणभंगुर सुखांच्या पंगतीत जाऊन रमतं...
मात्र समाजाचा अशा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन अस्वस्थ करणारा आहे. आयुष्य कसं जगावं ह्या निवडीचं स्वातंत्र्य तरी निदान असलं पाहिजे..
