STORYMIRROR

siddharth ambekar

Romance

3  

siddharth ambekar

Romance

आज तिचा मेसेज आला, पण...

आज तिचा मेसेज आला, पण...

8 mins
605

        काॅलेजला असल्यापासून निशांत चा तीच्यावर जीव जडलेला. ती म्हणजे " प्रेरणा ". दिसायला अतिशय सुंदर एखाद्या अप्सरेलाही लाजवेल. आणि स्वभाव म्हणाल तर अगदी मधाळ... याच प्रेरणा वर निशांत चा जीव जडला होता. ती होतीही तशीच. काॅलेजपासून दोघेही एकत्र. एका शहरात राहणारे. बघता बघता मैत्रीही झाली त्यांची. प्रेरणासाठी ते कदाचित अनपेक्षित होतं पण निशांतने तर तीच्याशी मैत्री करण्यासाठी देखील जीवाचं रान केलं होतं. काही ना काहीतरी निमित्त शोधून तीच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण; ती मात्र मोजकंच अगदी कामापुरत बोलायची. त्यामुळे निशांत ने वारंवार केलेल्या सा-या कल्पना धुळीस मिळत होत्या. पण; तरीही तो काही हार मानत नव्हता. पुन्हा नव्याने काहीतरी निमित्त शोधून काढायचा आणि तीच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. बरेच दिवस असेच गेले. ती फक्त कामापुरतं बोलत होती. शेवटी निशांत अक्षरशः कंटाळला आणि एक दिवस काॅलेज सुटल्यानंतर त्याने तीला गाठलं..

" प्रेरणा... थांब जरा. मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. "

पाठिमागून अचानकपणे आवाज आल्याने प्रेरणा गोंधळून गेली. मागे वळून पाहिलं तर निशांत होता. त्या पाहून ती जागीच थांबली. तो तिच्याजवळ गेला आणि बोलू लागला..


"मला तुझ्याशी मैत्री करायची आहे पण; तू कामाव्यतीरिक्त काही बोलतच नाहीस. रोज मीच काहीतरी कारण शोधून तुझ्याशी बोलायला येतो आणि तू मात्र फक्त हो, नाही इतकंच बोलतेस. "

निशांतचं हे वागणं प्रेरणाला बालिशपणाचं वाटलं आणि ती हसू लागली.

"अगं हसतेस काय ? मी सिरियस होऊन काहीतरी बोलतोय आणि तू चक्क हसतेयस ? ए पूर्वा काय ग ही मैत्रीण तुझी अशी.. ? "

तो प्रेरणासोबत असलेल्या त्यांच्या मैत्रिणीला म्हणाला. आणि ते पाहून समोरुन प्रतिप्रश्न आला.

"मी फक्त पूर्वाचीच मैत्रीण आहे का?"


प्रेरणाचं हे बोलणं ऐकून निशांत अक्षरशः विरघळून पडला. त्याच्या चेह-यावर एक वेगळंच स्मितहास्य आलं होतं. अखेरीस प्रेरणाने मैत्रीसाठी आपला हात पुढे केला. निशांतचा हात थरथरत होता. तरीही तीने मात्र त्याला सावरुन घेतलं. काय करु अन् काय नको अशी अवस्था निशांतची झाली होती. त्या रात्री तर तो झोपलाच नाही. तीचा स्पर्श झालेला तो त्याचा हात सारखा न्याहाळत होता... खूप दिवसांनी या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. आज रविवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती. निशांतचा हक्काचा आरामाचा दिवस होता. आणि म्हणूनच बाल्कनीमध्ये झोपाळ्यावर बसून तो या सा-या गोष्टी आठवत होता.


           रविवार म्हटलं की निवांत उठायचं, आणि मग तयार होऊन शांतपणे झोपाळ्यावर बसून आपल्या विश्वात रममाण व्हायचं हेच निशांतचं रविवारचं नियोजन. आजही नेहमीप्रमाणे तयार होऊन तो बाल्कनीमध्ये गेला पण अचानक " त्या " सा-या जुन्या आठवणी त्याच्यासमोर पुन्हा उभ्या ठाकल्या. आज वारंवार त्याला प्रेरणाची आठवण येत होती. साधारणतः तीन चार वर्षे झाली होती. काॅलेज जीवन संपल्यापासून प्रेरणा आणि निशांतचा काहीच संपर्क झाला नव्हता. निशांतचं प्रेम होतं तिच्यावर पण; तो ही गोष्ट प्रेरणाला सांगू शकला नव्हता. तीलाही याबद्दल सारं काही माहित होतं पण; काही कारण होती ज्यामुळे ती निशांतपासून लांब रहाणंच पसंत करत होती. आणि या सगळ्याची कल्पना निशांतला देखील होती. म्हणूनच आजपर्यंत कधीही त्याने आपल्या मनातील भावना तीच्याकडे व्यक्त केली नव्हती. हे सारं काही निशांतला आज आठवत होतं पण; तो नक्की काय माणूस होता तेच समजत नव्हतं. सगळ्या गोष्टी माहीत असताना देखील त्याच्या चेह-यावरचं स्मितहास्य काही केल्या हलत नव्हतं. आपण आपल्या आयुष्यातील खुप महत्वाची गोष्ट गमावून बसलो आहे हे माहीत असूनही तो हसत होता. शेवटी त्याचं कॅल्क्युलेशन काय असावं ते त्यालाच माहित. तो त्याच्याच विश्वात शांतपणे रममाण झाला होता. इतक्यात आई ने हाक मारली आणि त्याच्या शांततेचा भंग केला.


 "काय गं आई? काय झालं? हाक का मारलीस?"

आई ला प्रतिप्रश्न करत तो घरात गेला. "अरे काही नाही. तयार हो आपल्याला बाहेर जायचं आहे एका कार्यक्रमासाठी. "

"पण; मी कशाला येऊ तिकडे ? माझं काय काम ? जा तू. मी नाही येत. "

जुन्या आठवणीत रमलेल्या निशांतला त्याचं शांततेमध्ये रमायचं होतं. पण; आई काही ऐकायला तयार नव्हती.

"अरे बाळा आपल्याला सगळ्यांनाच बोलावलं आहे तिकडे. चल आता तयार हो. उशीर नको. "

शेवटी मनात नसताना देखील निशांत जाण्यासाठी तयार झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणीही पोहोचला. पण; आताही त्याच्या मनात प्रेरणाचाच विचार सुरू होता. मागील सा-या गोष्टी आज पुन्हा त्याला आठवत होत्या. आणि त्यांचा तो नव्याने अर्थ लावत होता. काही गोष्टी स्पष्ट होत्या ; पण काही गोष्टी अद्यापही अस्पष्टच. त्याची उत्तरं फक्त प्रेरणाकडेच होती. पण; गेले तीन ते चार वर्षे तीच्याशी काहीच संपर्क नव्हता. कुठे आहे, काय करते, लग्न वगैरे झालं का ? काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे निशांतला पडलेल्या त्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अशक्यच होतं. तसं ते त्यानेही मान्य केलं होतं. " पर क्या करे जनाब... ये दिल बडी बेईमान चीज है, साला है तो अपनी लेकीन खुद में बसाती किसी और को है " अशीच काहीशी अवस्था त्यावेळी निशांतची होती. त्याला या सगळ्या गोष्टी समजत उमजत होत्या पण; हा प्रत्येक क्षण तो हसत हसत जगत होता. कार्यक्रम आवरला आणि निशांत आणि त्याचे आई वडील घरी परतले. 

  

        अख्खा दिवस कार्यक्रमात गेला. घरी परतेपर्यंत रात्र झाली होती. जेवण झालं आणि निशांत त्याच्या रूममध्ये जाऊन बेडवर निवांत पहुडला. आज ऑफिसला जरी सुट्टी असली तरी निशांतच्या विचारचक्राला काही सुट्टी नव्हती. शांतपणे निपचित पहुडलेला निशांत मनातून मात्र चलबिचल होता. आज कधी नव्हे तर असं झालं होतं की तो दिवसभर फक्त प्रेरणाच्या विचारात होता. त्याला वाटत होतं कदाचित आज तिच्याशी काही कॉन्टॅक्ट असता तर बोलू शकलो असतो. पण; विचार करण्या पलीकडे त्याच्या हाती काहीच नव्हतं. शेवटी मनात निर्माण झालेल्या या वावटळाला शांत करण्यासाठी त्याने झोपण्याचा मार्ग पत्करला.

            काही वेळातच एका अनोळखी नंबरवरुन निशांतला मेसेज आला...

" Hiii निशांत.. "

नंबर काही ओळखीचा नव्हता. कुणाचा नंबर असेल म्हणून निशांतने मेसेज केला..

" Who r u ? "

" एवढ्यात विसरलास का मला ? काॅलेजला असताना तर अक्षरशः सांगावं लागायचं तुला सगळे बघतायत असा पाठलाग करत फिरु नकोस. आणि आता काय तर Who r u ?... छान हा... "

निशांतला पुन्हा एकदा काॅलेज कॅम्पस मधला तो प्रसंग आठवला आणि ओळख पटली...

" प्रेरणा... तू... माझा विश्वासच बसत नाहीये. "

चेहरा खुलला होता त्याचा. साधारणतः तीन ते चार वर्षांनी ते बोलत होते.

" कसा आहेस रे ? "

तिने आपुलकीने त्याला प्रश्न केला. तीच्या या प्रश्नासोबतच तीचा तो सुंदर चेहरा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहीला.

" मी बरा आहे. तु कशी आहेस ? आणि कुठे असतेस सध्या ? "

" मी पण ठिक आहे. मुंबई मध्ये असते एका साॅफ्टवेअर कंपनीमध्ये जाॅब ला आहे. "

" वाह.. छान... पण; माझा नंबर तुझ्याकडे कसा काय ? "

" काय करणार ? तुला काही माझी आठवण येत नाही म्हटलं आपणच काहीतरी करावं, म्हणून मग पूर्वाला विचारलं तीच्याकडेही नंबर नव्हता मग तीने त्या सतीश ला काॅल केला आणि त्याच्याकडून तुझा नंबर मिळाला मला. "

बहुतेक हातून निसटून गेलेली ती गोष्ट पुन्हा मिळणार म्हणून निशांत ला प्रचंड आनंद झाला होता. 

" आठवण तर मलाही येते पण; कुठे आहेस? काय करतेस ? काहीच माहीत नव्हतं, नंबरही नव्हता त्यामुळे काहीच शक्य होत नव्हतं. "

" अरे नशीब म्हणायचं माझं ओळखलंस मला. नाहीतर मला वाटलं दुसरी एखादी प्रेरणा भेटली असेल मग मला कशाला लक्षात ठेवशील ना.."

तीने त्याची मस्करी करण्याची सुरुवात केली.

" अजिबात नाही. तुला वाटतंय तसं काहीच नाही. माझ्या आयुष्यातली प्रेरणा ही एकच दुसरी कुणी होऊच शकत नाही. "

तो पटकन बोलून गेला आणि ते तिच्याही लक्षात आलं.

" का रे असं का ? माझ्या प्रेमात वगैरे पडला आहेस कि काय ? "

आता तर काय सांगू आणि काय नको असं निशांतचं झालं होतं पण; त्याने ठरवलं तीला जे खरं आहे ते सांगायचं आणि तो बोलू लागला..

" हो पडलो आहे तुझ्या प्रेमात. आताच नाही. तेव्हाच जेव्हा तुला भेटलो तेव्हापासून फक्त एवढंच की नाही सांगू शकलो तुला तेव्हा पण; आता सांगतो. आहे माझं तुझ्यावर मनापासून प्रेम.. "

हातामधली एखादी जड वस्तू खाली ठेवल्यानंतर जितकं हलकं वाटावं ना तीतकंच हलकं त्याला आता वाटत होतं. सहाजिकच होतं कारण इतक्या वर्षांपासून मनात चाललेलं सारं काही आज तो बोलून मोकळा झाला होता. मन हलकं झालं होतं त्याचं.

           समोरुन मात्र निशांतच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर नाहीतर मग प्रतिप्रश्न हे सुरुच होते.

" इतकं प्रेम आहे माझ्यावर मग ते मला का नाही कळलं आजपर्यंत ? "

" पण; आता तर कळलं आहे की तुला. "

 माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे असं तीनेही सांगावं हिच त्याची इच्छा होती.

" हो निशांत कळलं आहे. पण काय उपयोग तुझ्या एवढ्या प्रेमाचा ? "

निशांतला तीचं बोलणं काही कळलं नाही. 

" का असं का म्हणतेयस ? का उपयोग नाही माझ्या प्रेमाचा ? "

तो थोडा गंभीर झाला होता. आणि ती उत्तर देऊ लागली..

" काहीच उपयोग नाही आता त्याचा. कारण माझं लग्न ठरलं आहे निशांत. पंधरा दिवसांनी लग्न आहे माझं. "

निशांत हे ऐकून पूर्णतः ढासळला काय बोलावं त्याला काहीच समजत नव्हतं. हे जे काही घडत होतं ते त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. त्याने काहीच रिप्लाय केला नाही. समोरुन प्रेरणा मात्र बोलत होती. 

" मला समजलं होतं काॅलेजमध्ये असतानाच तुझं माझ्यावर प्रेम आहे ते. मी त्यावेळी थोडा वेळ घेत होते. मला काहीतरी तसं जाणवत होतं पण; मग वाटलं तुला फक्त माझ्याबद्दल आकर्षण असेल. त्यात काॅलेज संपल्यानंतर काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. म्हटलं बदलल्या असतील तुझ्या प्रायोरीटी. कदाचित मी त्यात नसेन. म्हणून मी लांब झाले. इच्छा होत असून सुद्धा तुला कॉन्टॅक्ट नाही केला. पण हे खरं आहे की मला माहित होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे ते. "

निशांत प्रेरणाचे मेसेज वाचून सुन्न पडला होता. ते मेसेज पाहून त्याला काय रिप्लाय द्यावा हे देखील त्याला कळत नव्हतं.

" प्रेरणा... चूक माझी पण आहे तुझीही. मी तुझ्याकडे माझं मन व्यक्त केलं असतं किंवा तुला जे जाणवलं त्याबद्दल तू मला काही विचारलं असतंस तर आजची परिस्थिती वेगळी असली असती. "

" साॅरी निशांत... माझ्याकडूनही चूक झाली. पण; आज ती लक्षात येईपर्यंत खुप उशीर झाला आहे. आता काही होऊ शकत नाही. फक्त एका गैरसमजामुळे, एका न बोलण्याच्या छोट्याशा चुकीमुळे मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट गोष्ट गमावून बसले याचं दुःख आयुष्यभर मला सलत राहील. जमलं तर मला माफ कर... तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला खुप शुभेच्छा...GOOD BYE निशांत... "

इतकाच मेसेज तीने केला...त्याला निशांतने देखील रिप्लाय केला...

" प्लीज प्रेरणा... आणखी थोडावेळ बोल. मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. "

पण; हा मेसेज तीला पोहोचेपर्यंत ती ऑफलाईन गेली होती. शेवटी सकाळपासून ज्या विचारात निशांत गुंतला होता त्याचा शेवट झाल्यासारखं त्याला वाटू लागलं. तो खुप निराश झाला. कोणत्याही परिस्थितीत हसत राहणा-या निशांतच्या डोळ्यांत आज पाणी होतं. चेहरा हताश झाला होता.

 

           इतक्यात एक फोन आला. डोळे चोळत निशांतने फोन उचलला. समोरुन आवाज आला...

" ए साहेबा उठलास का ? की अजुन अंथरुणातच आहेस. मिटींग आहे आज ऑफिसमध्ये विसरलास कि काय ? "

निशांतने प्रश्न केला..

" कोण बोलतंय ? "

" अरे हरामी माणसा सतीश बोलतोय... तुला मोबाईल स्क्रीन वर नाव पण दिसत नाही का रे ? काल रात्री प्रोग्रॅम केलास की काय मला न सांगता ? "

तसा निशांत ताडकन उठून बसला... घड्याळ पाहिलं तर सकाळचे आठ वाजले होते. तो स्वतः शीच पुटपुटला...

"सकाळ... सतीश चा काॅल.. आणि मग ते प्रेरणासोबतच बोलणं. "

असं म्हणाला आणि मोठ्याने हसू लागला. समोरुन सतीश ला काही समजतच नव्हतं...

"अरे साल्या मी विचारतो काय ? आणि तू हसतोयस ? "

"ए सत्या काही नाही रे... आताच झोपून उठलोय ना.. निघालो की काॅल करतो. "

सतीश ने बाकी काही न विचारता फोन ठेवला.


इकडे निशांत मात्र मनापासून हसत होता. कारण प्रेरणाचा त्याला आलेला मेसेज हे एक स्वप्न होतं. दिवसभर तेच विचारांचं चक्र डोक्यामध्ये फिरत असल्यामुळे असं स्वप्न पडलं असावं हे त्याच्या लक्षात आलं. तो मनमुराद हसत राहीला. आणि म्हणाला....

"काही का असेना आज तिचा मेसेज आलाच... पण; स्वप्नात... असो... हकीकत में नही, पर ख्वाबों में ही सही... आपको जहाँ आना हो वहाँ आइएगा, लेकीन आइएगा जरुर..." असं म्हणाला आणि तीच्या आठवणीत हसत हसत पुन्हा आपल्या दिनक्रमाला निघून गेला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance